एक भटका दिवस

रोहित हरीप 
शनिवार, 20 मे 2017

बदलणाऱ्या काळानुसार भटकंतीच्या व्याख्या आणि निकषही बदललेले आहेत. वर्षातून एकदा आखली जाणारी 'फॅमिली ट्रीप' आता वर्षातून दोन ऋतूत निघते. एकदा हिवाळ्यात एकदा उन्हाळ्यात. त्याशिवाय जोडून येणाऱ्या सुट्ट्याचे नियोजन असते ते वेगळे. नोकरी, व्यवसायाच्या वाढत्या व्यापामुळे एक दिवसात चटकन बघता येतील अशी स्थळे शोधली जातात

बदलणाऱ्या काळानुसार भटकंतीच्या व्याख्या आणि निकषही बदललेले आहेत. वर्षातून एकदा आखली जाणारी 'फॅमिली ट्रीप' आता वर्षातून दोन ऋतूत निघते. एकदा हिवाळ्यात एकदा उन्हाळ्यात. त्याशिवाय जोडून येणाऱ्या सुट्ट्याचे नियोजन असते ते वेगळे. नोकरी, व्यवसायाच्या वाढत्या व्यापामुळे एक दिवसात चटकन बघता येतील अशी स्थळे शोधली जातात किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही मुक्काम करुन आजूबाजूचा परिसर पिंजून काढला जातो. एका दिवसात फिरता येतील अशाच काही निसर्गरम्य जागा... 

मढे घाट 
तोरणा- राजगडची जोडगोळी डोंगरयात्रींमध्ये सुप्रसिध्द आहे. या किल्ल्यांची वारी केली नाही असा गिर्यारोहक विरळा ! तोरणाच्या मागे पसरलेल्या अफाट सह्यरांगामधून अनेक घाटवाटा खाली कोकणात उतरतात. या घाटवाटांपैकी एक ऐतिहासिक घाटवाट म्हणजे 'मढे घाट'. तानाजी मालुसरेंचे पार्थिव सिंहगडावरून त्यांच्या गावाला, उमरठला या घाटाने नेण्यात आले म्हणून या घाटाला नाव पडले 'मढे घाट'. तोरण्याच्या मागून वेल्हे गावातून एक रस्ता केळदला जातो. वेल्हे ते केळद हे अंतर सुमारे 17 किलोमीटर आहे. केळदपासून एक किलोमीटर अंतर चालत गेले की मढे घाट सुरू होतो. पावसाळ्यात इथे एक अजस्र धबधबा तुमची वाट बघत उभा असतो. देशावरुन वाहणारा पाण्याचा एक प्रचंड मोठा प्रवाह इथून थेट शंभर एक फूट थेट कोकणात उतरतो. हे विहंगम दृश्‍य बघण्यासारखे असते. या धबधब्याच्या थेट खाली जाता येत नाही तरी धबधबासमोर ठेवून उजव्या हाताची एक वाट कोकणातल्या कर्णवाडी गावात उतरते. ही वाट पकडली तर या धबधब्याच्या खालच्या अंगाला जाता येते. येथून कोसळणारा प्रपात आपले कान काही काळाकरता अक्षरशः बंद करुन टाकतो. ही वाट थोडी अरुंद आणि वाहत्या पाण्याची असल्याने उतरताना काळजीपूर्वक उतरावे. वरच्या पठारावर वाहणाऱ्या या नदीसदृश जलप्रवाहात खेळण्याची मजा लुटता येते. सरकारकडून हा रस्ता थेट महाडला जोडण्याचे काम सुरू आहे त्यामुळे रस्त्याची स्थिती बरी आहे. चारचाकी वाहने केळदपर्यंत जाऊ शकतात. केळदपासून मात्र पुढे चालतच जावे लागते, पावसाळा सोडून इतर ऋतूत गेल्यावर सह्याद्रीच्या रांगांचे नयनरम्य दर्शन येथून घडते. कुटुंबीयांसोबत एका दिवसात हे ठिकाण सहज बघून होते. 

पुणे - वेल्हे - 70 किलोमीटर 
वेल्हे - केळद - 17 किलोमीटर 

आरे- वारे कोस्टल रोड 
रत्नागिरी म्हणले की आठवतात ते तोंडाला पाणी सुटणारे हापूस आंबे आणि निसर्गरम्य समुद्र किनारे ! रत्नागिरीपासून अवघ्या 33 किलोमीटरवर असणारे गणपतीपुळे हे गणेश भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. दर चतुर्थीला इथे लाख दीड लाख भाविक सहज असतात. मात्र गणपतीपुळ्यावरुन रत्नागिरीला जोडणारा जो रस्ता आहे तो आता हळूहळू पर्यटकांनी गजबजू लागला आहे. रत्नागिरी ते गणपती हा रस्ता संपूर्ण रस्ता समुद्राला खेटून जातो. परदेशात किंवा चित्रपटात दिसतो तसा एका बाजूला पसरलेला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला त्याला खेटलेला डोंगर, या दोन्हींच्या मधून जाणारा वळणावळणाचा असा हा रस्ता. इथे असणारी आरे व वारे या दोन गावांच्यामध्ये असणाऱ्या डोंगरावरून दिसणारा समुद्र डोळ्याचे पारणे फेडतो. आरे व वारे या दोन्ही गावांचे समुद्र किनारे अतिशय शांत आणि लोभस आहेत. गावकरी आणि मोजके पर्यटक सोडले तर बाकी कोणाचाच वावर येथे नसल्याने इथे समुद्राच्या गाज ऐकत घालवलेली संध्याकाळ तुमच्या चिरस्मरणात राहते. रत्नागिरी शहरात आले की थिबा पॅलेस, भाट्याची चौपाटी, भगवती मंदिर ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत मात्र तुमच्या जीवलगांसोबत एखादी संध्याकाळ इथे घालवण्याइतके दुसरे सुख नाही. रत्नागिरी ते गणपतीपुळे या रस्त्यावर असणाऱ्या जवळपास सर्व गावांना अशा निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांचे वरदान मिळाले आहे. रत्नागिरी शहरात तसेच गणपतीपुळे येथे मुक्कामाची सोय होते. येथे मुक्काम करुन एका दिवसात हे समुद्रकिनारे सहकुटुंब सहज धुंडाळता येतात. 
रत्नागिरी - आरे-वारे - 15 किमी 

मालगुंड 
रत्नागिरी शहरातून जाणारा रस्ता आरे-वारेच्या किनाऱ्याने निघून गणपतीपुळ्याला पोहचतो. हे अंतर सुमारे 35 किलोमीटर आहे. गणपतीपुळ्यात लागणारी गणेश भक्तांची गर्दी संपली की पुढचे गाव आहे मालगुंड. 
गणपतीपुळ्याची गर्दी मालगुंडला पोचेपर्यंत एकदम संपून जाते. स्वच्छ आणि निर्मनुष्य समुद्रकिनारा हे मालगुंडचे वैशिष्ट आहे. याशिवाय मालगुंडची खासियत म्हणजे ही मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी केशवसुत यांची हे जन्मगाव. केशवसुतांचे घर इथे अत्यंत उत्तम प्रकारे जतन केलेल आहे. हे घर या गावाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी कायम उघडे असते. रत्नागिरीवरुन एका दिवसात भेट देता येणारे हे स्थळ आहे. डिसेंबरच्या सुमारास मालगुंजवळ निसर्गाचा चमत्कार पहायला मिळतो. मालगुंडच्या पाण्यावर 'नॉक्‍टील्युका' नावाच्या सूक्ष्मजीवांमुळे निळ्या रंगाची झालर पसरते.यामुळे सर्व किनारपट्टी या निळाईने झळाळून उठते. 
महाराष्ट्र सरकारने नुकतेच पाचगणी जवळील भिलार गावात पुस्तकांचे गाव हा प्रकल्प राबवला. भिलारनंतर आता मालगुंड गावातही आता 'पुस्तकांचे गाव' प्रकल्प राबवला जाणार आहे. या प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लवकरच हे गाव जगाच्या नकाशावर येणार आहे. 
रत्नागिरी - मालगुंड - 28 किलोमीटर 

जयगड किल्ला व बंदर 
गणपतीपुळे आणि मालगुंडपासून पुढे जाणारा रस्ता जयगड किल्लाकडे जातो. मालगुंड ते जयगड अंतर 15 किलोमीटर आहे. तर रत्नागिरीपासून जयगड किल्ला 55 किलोमीटर अंतरावर आहे. शास्त्री नदीच्या काठावर वसलेल्या गावावरून या किल्लाला जयगड नाव मिळाले. या किल्लाची एक बाजू पूर्णपणे समुद्राकडे आहे. किल्ल्याला 12 बुरूज आहेत. किल्ल्याची तटबंदी चांगल्या अवस्थेत आहे.या तटबंदीवरुन पूर्ण किल्ल्याला चक्कर मारता येते. किल्ल्याभोवती पंधरा फूट लांबीचा व तितक्‍याच खोलीचा खंदक आहे. किल्लाच्या प्रवेशद्वारापासून एक दगडी बांधीव वाट खाली गावात उतरते. किल्ल्याच्या मधल्या भागात किल्लेदाराचा वाडा तसेच एक गणेश मंदिरही आहे.जयगड किल्लापासून जवळच जयगडचे प्रसिद्ध लाइट हाउस आहे. 'किल्ला' चित्रपटात झालेले चित्रीकरण याच परिसरात झालेले आहे. संपूर्ण किल्ला बघण्यासाठी दोन तास पुरेसे आहेत. किल्ल्यावर मुक्कामाची सोय नाही. रत्नागिरीवरुन येथे येण्यासाठी बसेसची सुविधा उपलब्ध आहे. जयगड बंदर म्हणून आता मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. जिंदाल उद्योग समूहाचा येथे मोठी प्रकल्प आहे. किल्ल्याजवळच असलेला हा प्रकल्प जयगड किल्लाकडे जातानाच लक्ष्य वेधून घेतो. 'सागरमाला' या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत जयगड बंदर कोकण रेल्वेला जोडले जाणार आहे. 

सौजन्य : साप्ताहिक सकाळ

भटकंतीसाठी आणखी काही ऑफबीट ठिकाणांच्या माहितीसाठी वाचा फक्त 27 मे 2017 या दिवशी प्रकाशित झालेला साप्ताहिक सकाळ भटकंती विशेषांक

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rohit Harip writes about monsoon destinations