तणाव भारत-पाकचा; आवाज फक्त मीडियाचा!

cartoon
cartoon

गेले तीन दिवस भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर खूप मोठे मोठे आवाज आपल्याला ऐकायला मिळत आहे. पण हे आवाज मिराज २०००, मिग, पाकिस्तानचे एफ १६ किंवा आपण टाकलेल्या १००० किलोच्या बॉम्बचा नसून दोन्ही देशातील मीडियाचा आहे. दोन्ही देशातील मीडियाने असे काही चित्र उभा केले काही दिवसांत भारत पाकिस्तान युद्ध होईल.आपण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे युद्धाने कोणालाही फायदा होत नाही. इतिहासात पाहिले तर पहिल्या महायुद्धात जवळपास ३ कोटी आणि दुसऱ्या महायुद्धात ६ कोटी इतक्या लोकांचा मृत्य झाला. या दोन युद्धात ९ कोटी लोकांनी आपला प्राण गमावला. त्यावेळी जे देश हे युद्ध लढले हे आता कुठे उभे आहेत हेही पहिले पाहिजे. फ्रान्स आणि जर्मनी किंवा इंग्लंड, इटली एकेकाळचे शत्रू आज मित्र आहेत. सोव्हियत संघ पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. या दोन युद्धात होरपळून निघालेल्या देशांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत. आता राष्ट्रवाद हा फक्त गरीब असणाऱ्या प्रदेशात शिल्लक आहे. खासकरून दक्षिण आशियात देशांमध्ये. 

खरं तर या देशांसमोर अनेक प्रश्न आहेत. दक्षिण आशियातील लोक उपासमार, बेरोजगार, असमानता अशा अनेक समस्यांशी लढत आहेत. पण इकडे आपला मीडिया दुसरीच लढाई लढत आहे. आज अनेक तरुण न्यूज चॅनेल किंवा मोठमोठ्या माध्यमांच्या प्रतिनिधींना किंवा आपल्या सोशल मीडिया वर लिहत आहेत हे सगळं सोडा आणि आमचे प्रश्न मांडा. पण आपल्या मीडियाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोचे बॉम्ब फेकले. या कामगिरीबद्दल भारतीय वायू सेनेचा आम्हाला गर्व आहे. यासाठी सरकारचेसुद्धा अभिनंदन केले पाहिजे. या कारवाईवर भारत सरकारने ही कमालीची संयत प्रातिक्रिया दिली. दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान शांततेचेबी आणि चर्चेचे आव्हान करत होते. हे सर्व होत असताना दोन्ही देशामधील मीडियामध्ये मात्र युद्ध सुरु झाले होते. काही वाहिन्यांवरचे अँकर फक्त सैन्यांचा युनिफॉर्म घालायचा बाकी होता. 

ज्यावेळी परिस्थिती गंभीर असते त्यावेळेस मीडियाने कसे वार्तांकन करावे याचे काही नीतिमूल्यं आहेत. ते मात्र यावेळेस पूर्णपणे विसरून गेलेले दिसतात. काही माध्यमांनी दिलेल्या हेडलाईन पाहुयात. काल घुसून मारलं, आज घुसल्यावर मारलं, पाकिस्तान नकाशावरून होणार गायब, जाब तक तोडेंगे नहीं तब छोडेंगे नहीं अशा हेडलाईन दिल्या गेल्या. ज्यावेळेस युद्धासारखी गंभीर परिस्थिती असते, त्यावेळेस सगळ्यांनी देशाबरोबर उभे राहिले पाहिजे यात अजिबात शंका नाही. पण अशी उतावळेपणाची भाषा बघितली तर लक्षात येते कि माध्यमांना आपल्या जबाबदारीचे भान राहिलेले नाही. कालचं ताज उदाहरण म्हणजे आनंद महिंद्रा यांनी एका टीव्ही अँकरला झापलं. पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय हवाईदलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तान सुटका करणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाक संसदेत केली. या बातमीनंतर देशभरात आणि प्रसारमाध्यमांमध्ये एकच उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. मात्र गेल्या काही दिवसांत भारतीय वृत्तवाहिन्यांनी पुलवामा आणि विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या ताब्यात असतानाचं केलेलं वृत्तांकन अनेक लोकांच्या पचनी पडलेलं नाहीये. दोन देशांपेक्षा भारतीय प्रसारमाध्यमांनाच युद्ध हवं आहे, त्यामुळे या वाहिन्यांवर निर्बंध घालावेत अशी मागणीही सोशल मीडियावर होताना दिसते आहे. याच मागणीचा धागा पकडत प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी, रिपब्लीक टिव्हीच्या ट्विटर हँडलवर आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना, बातमीचं वृत्तांकन करताना ताळतंत्र बाळगा असा सल्ला पत्रकार अर्णब गोस्वामी यांना दिला आहे. आपल्या वायुसेनेने केलेल्या कामगिरीच्या आडून केलेल्या वार्तांकनाने माध्यमांनी पूर्णपणे आपली पत घालवली आहे. आज माध्यमांचे वार्तांकन हे तत्वांवर नसून वातावरण निर्मितीवर आहे. ही परिस्थिती आपण लक्षात नाही घेतली तर हीच टीव्ही एक दिवस आपल्याला विस्थापित करेल. 

बरं हा उतावीळपणा फक्त भारतातच होता असे नव्हे तो पाकिस्तनातही कायम होता. त्यांनीही हेडलाईन देताना असं म्हटलं आहे कि 'भारत को लाग रहा हैं कि ओ अमरिका बन गया हैं, भारत हमें फिलीस्तान समज रहा हैं, यहा भूखे लोग सडक सो जाते हैं'. टीव्ही असेल किंवा वर्तमानपत्रे यांनी नेहमी प्रमाणे संकटाचे रूपांतर तमाशामध्ये केले. सगळ्यांची भाषा ही युद्धाचीच. हे असंच चालत राहिलं तर समाजासाठी खूप घातक असेल. यासाठी समाजाने सावध राहण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com