यापुढची वाटचाल खूप जबाबदारीची (रुचिरा केदार)

ruchira kedar
ruchira kedar

गाणं शिकायला लागल्यापासून ते गायक होण्यापर्यंतची वाट अतिशय खडतर आहेच; पण स्वतःवर आणि आपल्या गुरूंवर नितांत विश्वास आणि श्रद्धा असेल व खूप मेहनत करायची मनाची तयारी असेल, तर हा मार्ग थोडा सुकर होतो आणि ध्येयही निश्‍चितच गाठता येतं. ही वाट चालताना बरेच टक्के-टोणपे खायची वेळ येऊ शकते; पण संगीतावर निस्सीम प्रेम असेल तर प्रतिकूल परिस्थितीही आपल्याला काही तरी चांगलं शिकवून जाते

भारतीय शास्त्रीय संगीताचं उगमस्थान मानल्या जाणाऱ्या ग्वाल्हेर इथं माझा जन्म झाला, हे माझं भाग्यच. संगीताचं बाळकडू मला माझ्या घरातूनच मिळालं. माझे आजोबा मधुकरराव काळे हे ख्याल, भजन, भक्तिसंगीत, भावगीतं आदी गात असत, तसंच व्हायोलिनही उत्तमरीत्या वाजवत. माझे वडील दिलीप काळे हे व्यवसायानं भोपाळला अभियंता. तेही उत्तम शास्त्रीय गायक. आई प्राची हिलादेखील गाण्याची उत्तम जाण. अशा तऱ्हेनं घरात संगीताचं वातावरण असल्यानं माझ्यावर गाण्याचे संस्कार आपोआपच होत गेले.

बाराव्या वर्षी माझं संगीताचं रीतसर शिक्षण बाबांकडं सुरू झालं. माझे बाबा खूप कडक शिस्तीचे आणि गाण्याच्या, रियाजाच्या बाबतीत कुठलीही तडजोड खपवून न घेणारे. जे काही आयुष्यात करायचं ते अत्युत्तमच व्हायला हवं, असा त्यांचा कटाक्ष असायचा. मी नववीत शिकत असताना जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. अलका देव-मारुलकर यांचं गाणं भोपाळला एका महोत्सवात झालं. बाबांना त्यांची गायकी खूप भावली व त्यांनी पुढच्या संगीतशिक्षणासाठी मला त्यांच्याकडंच पाठवायचा निश्‍चय केला. अलकाताई त्या वेळी पुण्यात राहत असत. मी तेव्हा अवघी 14 वर्षांची असल्यानं "ती खूप लहान आहे, काही वर्षांनी तिला येऊ देत' असं अलकाताईंनी माझ्या बाबांना सांगितलं. मात्र, हीच वेळ योग्य आहे, असं बाबांचं मत होतं म्हणून बाबा मला पुण्याला घेऊन आले आणि "कृपया रुचिराचं गाणं ऐका आणि मग ठरवा,' अशी विनंती त्यांनी अलकाताईंना केली. तेव्हा विनंतीखातर अलकाताईंनी माझं गाणं ऐकलं आणि त्यांची शिष्या म्हणून मला लगेच स्वीकारलं. वयानं मी लहान असल्यानं अलकाताईंनी माझ्यावर आईसारखी माया केली. फक्त गाण्याचीच नव्हे तर माझ्या राहण्याची आणि शालेय शिक्षणाचीही सगळी जबाबदारी अलकाताईंनी घेतली. मी भोपाळची, मध्य प्रदेशातली असल्यानं साहजिकच माझ्यावर हिंदीचा प्रभाव अधिक होता. त्यामुळे पुण्यात आल्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्या संस्कृतींमधला फरकही मला प्रकर्षानं जाणवला. संगीत किती व्यापक आहे आणि मेहनत करणं किती महत्त्वाचं आहे हे मला अलकाताईंकडं शिक्षण सुरू केल्यापासून समजू लागलं. आवाजाच्या तयारीपासून ते ख्यालगायकीतले बारकावे, तसंच जयपूर घराण्याचे खास राग, त्यांच्यातल्या कसदार बंदिशी, आकारयुक्त समृद्ध गायकी आदी बऱ्याच गोष्टी अलकाताईंनी मला शिकवल्या व सादरीकरणात त्या कशा मांडायच्या हेही शिकवलं. अलकाताईंसोबत बऱ्याच वेळा मी तानपुरा आणि स्वरसाथ करायला बसत असल्यामुळे शिकत असतानाच मला प्रत्यक्ष मैफिलींमध्ये गाण्याचा अनुभवही मिळत गेला आणि माझा सादरीकरणाचा आत्मविश्वासही वाढू लागला. त्या वेळी अनेक महत्त्वाच्या शास्त्रीय गायनस्पर्धांमध्ये मला यश मिळालं. आकाशवाणीच्या राष्ट्रीय ख्यालगायन स्पर्धेतही मी भारतात पहिली आले. या काळातच जसराजजी यांनी "वेदिक हेरिटेज' संस्थेतर्फे अमेरिकेत न्यूयॉर्क इथं एका कार्यक्रमात मला गाण्याची संधी दिली. तिथं जसराजजी, विश्वमोहन भट्ट, झाकीर हुसेन, सी. आर. व्यास अशा मातब्बर गायक-वादकांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मला लाभलं. खूप लहान वयातला हा अनुभव माझ्यासाठी संस्मरणीय होता. अनेक स्पर्धांमध्ये मिळत असलेल्या यशामुळे आणि छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमुळे पुढं जाण्यासाठी मला अधिक उत्साह आणि बळ मिळालं. या माझ्या प्रवासात चोखंदळ पुणेकर रसिकांनी खूप प्रोत्साहन आणि भरभरून प्रेम दिलं आणि अजूनही देत आहेत. त्यानंतर कोलकत्याला आयटीसी, "एसआरए' (संगीत रिसर्च अकादमी) इथं स्कॉलरशिप मिळणं आणि तिथं ग्वाल्हेर-जयपूर घराण्याचे श्रेष्ठ गायक आणि गुरू उल्हास कशाळकर यांच्याकडं गाणं शिकायला जाणं हे माझ्या आयुष्याला अतिशय निर्णायक दिशा देणारं ठरलं. गुरुजींची तालीम देण्याची पद्धत अद्वितीय होती. त्यांना सतत गाण्यात उत्कटतेचा, नावीन्याचा ध्यास असे आणि तीच सांगीतिक दृष्टी ते आम्हाला देत असत. सुरेलपणा, लयदारपणा, रागाचं चलन, आवर्तन भरणं, समेला येण्याची अचूकता, सांगीतिक वाक्‍यांची उपज आदी अनेक सांगीतिक घटकांच्या शुद्धतेबाबत ते फार आग्रही असायचे. गुरुजींकडं शिकायला लागल्यावर मला संगीताकडं सूक्ष्मपणे बघायची नजर मिळाली आणि स्वतःमधल्या साधक प्रवृत्ती प्रत्येक क्षणी जागरूक ठेवण्याची प्रेरणाही मिळाली. ग्वाल्हेर घराण्याची बोलयुक्त आलापी, मिंड, गमक, बेहलावे, सपाट ताना, आवाजाची तयारी हे सगळी गाण्यातली महत्त्वाची तत्त्वं, तसेच जयपूर घराण्यातले खास राग, त्यांची नागमोडी वळणानं जाणारी गायकी, त्यातला सूक्ष्म लयीचा अभ्यास, ग्वाल्हेर घराण्यातले खास राग, तसेच तिलवाडा, झुमरा यांसारखे खास या घराण्यात गायले जाणारे ताल आणि त्यांतला अतिशय सुंदर ताल-लयीचा अभ्यासही गुरुजींनी माझ्याकडून खूप करून घेतला. यावरून एक प्रसंग मला आठवतोय, गुरुजींनी बिहाग रागात विलंबित तिलवाड्यातली चीज मला शिकवली होती आणि तालाचं आवर्तन पक्कं व्हावं म्हणून कितीतरी दिवस फक्त स्थायीच गायला सांगितलं. त्या वेळी मी दिवसाला किमान हजार वेळा तरी तिलवाडा तालात त्या चीजेची स्थायी म्हटली असेल. बरीच वर्षं या पद्धतीचा प्रखर रियाज, सतत गाण्याचंच चिंतन-मनन, श्रवण आणि कलाकार घडवण्यासाठी "एसआरए'मधलं अतिशय पोषक वातावरण या सगळ्याचा मला घडवण्यात मोठा वाटा आहे. त्या वेळी बनारस घराण्याच्या प्रसिद्ध गायिका गिरिजादेवीजी यासुद्धा "एसआरए'मध्ये गुरू म्हणून कार्यरत होत्या. गुरुजींच्या प्रेरणेमुळेच मी त्यांच्याकडंही शिकायला लागले. त्यांच्याकडून खास बनारस घराण्याचे असलेले ठुमरी, दादरा, होरी, कजरी, चैती, झूला, टप्पा आदी उपशास्त्रीय गीतप्रकार मला शिकायला मिळाले. ठुमरीतला शृंगार कसा प्रकट करायचा, तसंच शब्द, सूर, राग, लय या घटकांच्या माध्यमातून ठुमरीतली नायिका कशी साकार करायची, ठुमरीतला आंतरिक भाव बोलांनी कसा व्यक्त करायचा असे उपशास्त्रीय संगीतातले अनेक महत्त्वाचे बारकावे त्यांनी मला शिकवले.

कुठल्याही कलेच्या साधकाचं आपल्या कलेतलं शिक्षण अविरत सुरूच असतं, तसंच ते माझंही सांगीतिक शिक्षण गुरुजी उल्हास कशाळकर यांच्याकडं अजूनही सुरू आहे. एका कलाकारावर अनेक घराण्यांचे आणि गायकींचे प्रभाव असतातच. ते सगळे सांभाळून आपलं गाणं कसं फुलवायचं आणि आपल्या मूळ गायकीचं स्वरूप बदलू न देता त्यात भर कशी घालायची हे विचारसुद्धा आता गुरुजींकडून मला मिळतात. इतक्‍या खुल्या मनाचे आणि इतके व्यापक सांगीतिक विचार असणारे गुरू मला लाभले, ही परमेश्वरी कृपाच आहे. अजून काय?
एक कलाकार म्हणून देशी-परदेशी दौरे करताना मला खूप विविधरंगी अनुभव येतात आणि तेसुद्धा बरंच काही शिकवून जातात. भारतात तर सगळीकडं हिंदुस्थानी संगीताचे दर्दी आहेतच; पण भारताबाहेरसुद्धा इतके दर्दी श्रोते आहेत हे बघून फार समाधान वाटतं. काही वर्षांपूर्वी बांगलादेशात ढाका इथं "बंगाल क्‍लासिकल म्युझिक फेस्टिव्हल'मध्ये माझं गाणं झालं आणि सुमारे 50 हजार रसिक-श्रोत्यांसमोर गाणं सादर करताना अतिशय आनंद वाटला व आपल्या संगीताची जगभर पसरलेली लोकप्रियता बघून फार अभिमानही वाटला. अमेरिका, कॅनडा आदी विविध देशांमध्ये दौरे करतानाही लक्षात राहण्यासारखे अनेक अनुभव आले. भारतात आणि भारताबाहेर अनेक नामवंत संगीतमहोत्सवांमध्ये मला गायची संधी मिळाली आणि श्रोत्यांचंही भरभरून प्रेम व आशीर्वाद मला मिळत आहेत, याचं सगळं श्रेय मी माझ्या गुरुजनांना देते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची एक प्रतिनिधी आणि कलाकार म्हणून मला असं वाटतं, की गाणं शिकायला लागल्यापासून ते गायक होण्यापर्यंतची वाट अतिशय खडतर आहेच; पण स्वतःवर आणि आपल्या गुरूंवर नितांत विश्वास आणि श्रद्धा असेल व खूप मेहनत करायची मनाची तयारी असेल, तर हा मार्ग थोडा सुकर होतो आणि ध्येय ही निश्‍चितच गाठता येतं. ही वाट चालताना बरेच टक्के-टोणपे खायची वेळ येऊ शकते; पण संगीतावर निस्सीम प्रेम असेल तर प्रतिकूल परिस्थितीही आपल्याला काही तरी चांगलं शिकवून जाते हे मी स्वानुभवातून संगीतातल्या सगळ्या होतकरू विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते. त्यात आपल्या कुटुंबाचा पाठिंबा असेल तर सोन्याहून पिवळं. माझ्या सुदैवानं सासरची मंडळीही मला खूप चांगली मिळाली आणि माझ्या गाण्यासाठी नेहमीच त्यांचा आणि माझे पती केदार बारटके यांचा पाठिंबा
मला मिळतो. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे, माझ्या वडिलांच्या करारी आणि उत्कृष्टतेचा सतत ध्यास असणाऱ्या स्वभावापासून मला लहानपणापासूनच खूप प्रेरणा मिळाली आणि आजही मिळते. मी लहानपणीच रंगमंचावर गायला सुरवात केल्यामुळे साहजिकच घरातले इतर नातेवाईक आणि रसिक-श्रोत्यांकडून खूप स्तुती व्हायची; पण बाबांनी मला याचा कधीही मला अहंकार येऊ दिला नाही आणि सतत पुढच्या प्रवासाकडं बघायला उद्युक्त केलं. असं असलं तरीही एक कलाकार म्हणून काही प्रसंग अगदी स्मरणात राहतात. काही दिवसांपूर्वी मी ग्वाल्हेरला कार्यक्रमानिमित्त गेले होते. हा कार्यक्रम माझ्यासाठी खूप आनंद देणारा होता. कारण, ज्या संगीतविद्यालयात माझे बाबा गाणं शिकले आणि गायक म्हणून ग्वाल्हेरला प्रसिद्ध झाले, तिथंच माझं 40 वर्षांनंतर गाणं होतं. त्यात जिथं माझा जन्म झाला तिथं गायचा एक वेगळाच आनंद होता. ज्यांनी बाबांचंही गाणं ऐकलं होतं, असेही श्रोते तिथं बरेच होते.

- माझं गाणं झाल्यावर एक वयोवृद्ध रसिक-श्रोते मला येऊन भेटले आणि म्हणाले ः ""आता आयुष्य असेपर्यंत तुमचे स्वर कानात राहतील''. ही दाद म्हणजे माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी घेतलेले कष्ट, मला घडवण्यासाठी त्यांनी केलेला त्याग, तसंच माझ्या गुरूंनी माझ्यासाठी घेतलेली मेहनत आणि वरदहस्तानं दिलेली त्यांची विद्या या सगळ्या बाबींना दिलेली होती, असं मला वाटतं.
माझ्या श्रेष्ठ गुरूंकडून मला मिळालेला विद्येचा अमूल्य ठेवा पुढच्या पिढीला देण्याचाही मी मनापासून प्रयत्न करते आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं ललित कला केंद्र गुरुकुल, आवर्तन गुरुकुल आणि निष्ठेनं संगीत शिकू इच्छिणाऱ्या शिष्यांना माझ्या निवासस्थानी मी मार्गदर्शन करते.
यापुढच्या प्रवासात एक गायिका आणि कलाकार म्हणून माझ्यावर खूप जबाबदारी आहे,

हे मला आता मला प्रकर्षानं जाणवतं. जी विद्या माझ्या गुरूंनी इतकी जतन करून ठेवली, फुलवली आणि आमच्यापर्यंत पोचवली, ती तेवढ्याच ताकदीनं व प्रेमानं मीसुद्धा ती जपून ठेवली पाहिजे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवली पाहिजे. गुरूंकडून मिळालेली प्रेरणा आणि स्वतःच्या चिंतन-मननातून संगीताच्या क्षेत्रात माझी स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, एक कलाकार म्हणून नेहमी उत्कृष्ट दर्जाची कला माझ्याकडून सादर व्हावी यासाठी मी कायमच प्रयत्नशील असते आणि आतापर्यंतच्या सांगीतिक प्रवासात मिळालेलं यश, तसेच आई-वडिलांचे, सर्व गुरूंचे आणि लहान-मोठ्यांचे मिळालेले आशीर्वाद व प्रेम हे सगळं नक्कीच मला पुढच्या वाटचालीसाठी स्फूर्ती देणारं ठरेल.

(शब्दांकन : श्रुतिका कासलीकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com