पाच वर्षांनंतर रूपाली भोसले पुन्हा रंगभूमीवर

रूपाली भोसले
सोमवार, 16 डिसेंबर 2019

अभिनयातील माझा प्रवास ‘कशासाठी कोणासाठी’ या एकांकिकेतून सुरू झाला. या एकांकिकेसाठी मला सर्वोत्कृष्ट नायिका हा पुरस्कार प्राप्त झाला तेव्हा मला जाणवले की, मला अभिनयाचेच क्षेत्र निवडायचे आहे. मात्र माझी आर्थिक परिस्थिती एवढी सबळ नव्हती की, मी संपूर्ण वेळ नाटकांसाठी किंवा अभिनयासाठी देऊ शकेल. कारण त्या काळात नाटकांसाठी देण्यात येणारे मानधन पुरेसे नसायचे.

सेलिब्रिटी व्ह्यू - रूपाली भोसले, अभिनेत्री
अभिनयातील माझा प्रवास ‘कशासाठी कोणासाठी’ या एकांकिकेतून सुरू झाला. या एकांकिकेसाठी मला सर्वोत्कृष्ट नायिका हा पुरस्कार प्राप्त झाला तेव्हा मला जाणवले की, मला अभिनयाचेच क्षेत्र निवडायचे आहे. मात्र माझी आर्थिक परिस्थिती एवढी सबळ नव्हती की, मी संपूर्ण वेळ नाटकांसाठी किंवा अभिनयासाठी देऊ शकेल. कारण त्या काळात नाटकांसाठी देण्यात येणारे मानधन पुरेसे नसायचे. त्यामुळे मी कॉल सेंटरला काम करता-करता अभिनयाला पण वेळ देत होते. नाईट शिफ्ट करून मी सकाळी नाटकांची तालीम करायचे. काम आणि अभिनय असा हा प्रवास असा घडत होता. दरम्यान, आरती आर्ट अकादमीच्या नाट्य परिषदेत आणि संमेलनात मला सहभागी होता आले. यावेळी मी फक्त बॅक स्टेजचे काम केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एका संमेलनात असेच काम करत असताना प्रशांत दामले यांनी मला विचारले की, ‘तू व्यावसायिक नाटक का करत नाही?’ त्यांनी मला विचारले आणि पुढच्या वर्षी मला ‘जागो मोहन प्यारे’ या पहिल्या व्यावसायिक नाटकात कुशल बद्रिके, सिद्धार्थ जाधव, अभिजित चव्हाण सारख्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. यानंतर मी दहा व्यावसायिक नाटकांमध्ये काम केले. मला पहिला ब्रेक ‘अनुपमा’ या मालिकेच्या माध्यमातून मिळाला. यानंतर ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘कन्यादान’, ‘दोन किनारे दोघी आपण’ अशा विविध मालिकांमध्ये भाग घेतला. मला ‘बडी दूरसे आए हैं’, ‘तेनाली रामा’ सारख्या हिंदी मालिकांमध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली.

जामीया इस्लामिया विद्यापीठाबाहेर जाळपोळ, बस पेटवल्या; 'कॅब' विरोधाला हिंसक वळण

परंतु, यामुळे मला मराठी मालिकांमध्ये खूपच कमी काम मिळत गेले. नंतर पुढील पाच वर्षे मला कोणतेही काम मिळाले नाही. त्यानंतर २०१९मध्ये मला बिग बॉसची ऑफर आली. या घरात मला चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव मिळाले. काही मित्र बनले तर काहींसोबत वाद झाले. यात मांजरेकर सरांची भूमिका मोठी होती. कारण ते वेळोवेळी आमचे मार्गदर्शन करत होते. बिग बॉस नंतर आता तब्बल पाच वर्षांनंतर मी ‘गांधी हत्या आणि मी’ या नाटकातून पुन्हा कमबॅक करत आहे. हे नाटक येत्या २० डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून मी यामध्ये सिंधू गोडसेंची भूमिका साकारणार आहे. गांधीच्या हत्येनंतर नथुराम गोडसे यांना फाशी आणि गोपाळ गोडसे यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती. परंतु या सर्व प्रसंगानंतर गोडसे कुटुंबीयांना कायकाय भोगावे लागले ते या नाटकातून दाखविण्यात येणार आहे. 
(शब्दांकन - अक्षता पवार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rupali bhosale on state after five years