।। जागर ।। | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girl

प्रत्येक मातृत्वाने आपल्या लेकींना पुस्तकी ज्ञानाचा एखादा धडा नाही शिकवला तरी चालेल, पण आयुष्याच्या पुस्तकात कणखरतेचा अनुभव शिकवा.

।। जागर ।।

- रूपाली चाकणकर rchakankar95@gmail.com

प्रत्येक मातृत्वाने आपल्या लेकींना पुस्तकी ज्ञानाचा एखादा धडा नाही शिकवला तरी चालेल, पण आयुष्याच्या पुस्तकात कणखरतेचा अनुभव शिकवा. तिला आत्मविश्वासाने सांगा की, तूच तुझ्या आयुष्याची जिजाऊ हो, सावित्री हो, अहिल्या हो आणि वेळप्रसंगी राणी लक्ष्मी हो! आपण नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची आराधना करतो. आदिमाया, आदिशक्तीचा जागर करतो, तसाच जागर गर्भात वाढणाऱ्या लेकींचाही होवो, हीच प्रार्थना!

या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।

नमस्तसै नमस्तसै नमस्तसै नमो नमः।।

नवरात्रीचा हा नऊ दिवसांचा जागर, चैतन्याच्या, भारावलेल्या वातावरणात आदिमायेची आराधना.

प्रत्येकाच्या घरात घटस्थापना झाली, घटस्थापनेसाठी घरातील स्वच्छता, घरातील थोरा-मोठ्यांची लगबग, फराळाची नऊ दिवसांतील तयारी, तिळाच्या फुलांनी सजलेला आजूबाजूचा परिसर, चौका-चौकातील सार्वजनिक मंडळांची आरास, सारं कसं उत्साहाचं वातावरण... पण आज प्रकर्षाने आठवण होते ती गेल्या नवरात्रीची, देवीची आरती चालू असताना फोन वाजत होता. आरती संपताच मी फोन उचलला. पलीकडून वेल्हे तालुक्यातील कार्यकर्त्याचा आवाज आला. कुरण येथे एक-दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण झाले आहे. तुम्ही तातडीने पोलिसांना तपास करायला सांगा.

मी पुणे पोलिस अधीक्षकांना फोन केला, पोलिसांकडे तक्रार नोंद झाली होती. पोलिसांनी तपासासाठी टीम तयार केली होती. पोलिस अधीक्षक स्वतः तपासासाठी निघाले होते. पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे, आता लवकर तपास लागेल, म्हणून मीसुद्धा माझ्या पुढच्या कार्यक्रमाला निघाले. दिवसभरच्या कामाच्या व्यापात होते. एक-दोनदा तपास अधिकाऱ्यांना फोन करून माहिती घेतली, तपास सुरू आहे म्हणून सांगितले.

दिवस मावळतीला आला होता, आता जरा अस्वस्थ वाटू लागले. कारण दोन वर्षांच्या चिमुरडीला आपण हरवलो तरी काय समजणार? तिला घरचा पत्ता सांगता येईल का? कोणी पळवून नेले की स्वतः रस्ता चुकली असेल? असे एक ना अनेक प्रश्न मनात पिंगा घालू लागले. दिवसभराचे कार्यक्रम, अनेक मंडळांच्या गाठीभेटी, आरती उरकून घरी निघाले. रात्रीचे साधारण बारा-साडेबारा झाले असतील. जेवायला बसताना आठवण झाली. माझा त्या मुलीशी संबंध नाही, मी जिला पाहिले नाही, तरी मला इतकी अस्वस्थता वाटतेय, जिने स्वतःच्या गर्भात हे लेकरू वाढवलं, तिला जन्म दिला, त्या माऊलीची अवस्था काय झाली असेल? रात्री एकच्या दरम्यान तपास अधिकाऱ्यांना फोन केला, अद्याप तपास लागला नव्हता. जवळपासच्या सगळ्या गावांमध्ये, वाड्या-वस्त्यांवर शोध घेऊन झाला होता.

पोलिसांनी सर्व पोलिस स्टेशनच्या माध्यमातून मुलीचा फोटो पाठवून ‘हरवलेली व्यक्ती’ म्हणून माहिती पाठवली होती. एव्हाना सोशल मीडियावर वाऱ्यासारखी बातमी पसरत होती. मनात अनेक विचार येत होते; पण अशा प्रसंगात काय करणार? त्या दिवशी नवरात्रीच्या चौथ्या माळेच्या ‘कुष्मांडा’ देवीच्या रूपातील पूजा होती. दुर्गादेवीच्या या चौथ्या रूपात, देवीला आठ हात, हातात कमंडल, धनुष्यबाण, चक्र, गदा, अमृतकलश, कमळ पुष्प आणि सिद्धी व निधी देणारी जपमाळ. देवीची आराधना केल्यास भक्तांची सर्व संकटे दूर करते, हे वाचून माहीत होते. क्षणभरात त्या दोन वर्षांच्या मुलीच्या आईची आठवण झाली. त्यांनी केली असेल का देवीला प्रार्थना? नऊ दिवसांच्या या नवरात्रीत ‘त्या’ चिमुकलीवर काही विघ्न येऊ नये म्हणून ही माऊली किती आणाभाका घेत असेल, किती नवस कोठे कोठे बोलत असेल? तिची आर्त हाक ऐकू जात असेल का आदिमायेला?

या आयुष्यात अनेक वाईट प्रसंगांना सामोरे गेले, जवळून पाहिले, पण आज मनात उगाचंच विचारांचे काहूर माजले होते. सकाळी उठल्यापासून, माळेच्या पाचव्या दिवसाच्या देवी ‘स्कंदमाता’ला पाहत होते. एक माता दुसऱ्या मातेला जास्त चांगली समजून घेईल. आज सापडेल ही चिमुरडी, असा आशादायी विचार रेंगाळत राहिला. तेवढ्यात पोलिस अधिकाऱ्यांचा फोन आला, ‘मुलगी सापडली असेल’ असं घरात जोरात आवाज देत आनंदाने फोन उचलला. पलीकडून पोलिसांनी सांगितले, ‘मुलीचा शोध लागला आहे, पण तिच्यावर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली आहे. तिच्या शरीराच्या नाजूक भागात खूप जखमा झाल्या आहेत. डोक्याला प्रचंड मार लागला आहे. शरीर रक्ताने माखले आहे. चेहरा विद्रूप झाला आहे. फार ओळखू येत नाही; पण मुलीच्या आईने सांगितलेल्या कपड्यावरून मुलीची ओळख पटत आहे.

हातातला फोन तसाच खाली ठेवला. पाच-दहा मिनिटे तसेच बसून राहिले. तोपर्यंत पोलिसांनी मुलीचा फोटो पाठवून दिला होता. फोटो पाहून अंगावर शहारे आले. ही घटनाच प्रचंड वेदना देणारी होती. तळपायाची आग मस्तकात जात होती. तीव्र राग, वेदना असह्य होत होत्या.

माणसांच्या कळपात वावरणाऱ्या या हिंस्र श्वापदांचा नायनाट झालाच पाहिजे, ही भावना तीव्र होत होती. मुलीच्या घरी तिच्या आई-वडिलांची भेट घेण्यासाठी गेले. छोटेसे छपराचे घर. कातकरी समाजातील हे कुटुंब. आजी कोपऱ्यात सुन्न होऊन बसलेली. वडील एकटक नजर लावून लेकीच्या घरातल्या कपड्यांकडे बघत होते. आईसारखी बेशुद्ध पडत होती. क्षणात काय अवस्था झाली या हसत्या-खेळत्या घराची? का आणि कशासाठी? कोण जबाबदार? मी, माझ्या आजूबाजूचा समाज, समाजाची मानसिकता की कायद्याचा धाक? प्रश्न अनेक आहेत; पण उत्तर शोधायला हवे. हो, समाजाची मानसिकता बदलायला हवी. दुसऱ्याचे आयुष्य, कुटुंब उद्‌ध्वस्त करणाऱ्या या दोन पायाच्या राक्षस वृत्तीला जगण्याचा अधिकारच नाही. हे सतत मनात बिंबत होते. म्हणून पोलिसांकडे सातत्याने पाठपुरावा केला. पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी अतिशय उत्तमरीत्या तपास करून आरोपीला अटक केली. २७ दिवसांत आरोपपत्र दाखल केले. आरोपीला सन्माननीय न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.

या सगळ्या प्रक्रियेत कायदा, न्यायव्यवस्था यांचे मनापासून आभार! पण पुन:पुन्हा, ‘येरे माझ्या माघल्या’ म्हणत घडणाऱ्या अशा घटनांचे काय? घटना घडून गेल्यावर आपण मोर्चे काढू, आंदोलन करू, कॅन्डल मार्च काढू. कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षादेखील होईल; पण गेलेला जीव परत येईल का? उद्‍ध्वस्त झालेले कुटुंब स्थिरावेल का?

म्हणून या नवरात्रीच्या निमित्ताने संकल्प करू या, लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, बालविवाह, हुंडाबळी, विद्यार्थिनींची छेडछाड या महिषासुर वृत्तीचा संहार करू या. या विकृतीला मूठमाती देऊन स्त्रीसन्मानाचे बीज घरातूनच अंकुरावे.

प्रत्येक मातृत्वाने आपल्या लेकींना पुस्तकी ज्ञानाचा एखादा धडा नाही शिकवला तरी चालेल, पण आयुष्याच्या पुस्तकात कणखरतेचा अनुभव शिकवा. तिला आत्मविश्वासाने सांगा की, तूच तुझ्या आयुष्याची जिजाऊ हो, सावित्री हो, अहिल्या हो आणि वेळप्रसंगी राणी लक्ष्मी हो! आपण नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची आराधना करतो. आदिमाया, आदिशक्तीचा जागर करतो तसाच जागर गर्भात वाढणाऱ्या लेकींचाही होवो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना!

(लेखिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून, गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत.)