लढाई आत्मसन्मानाची

वटपौर्णिमा आज साजरी होईल. वैवाहिक आयुष्यात प्रत्येक वेळी ‘हाच नवरा जन्मोजन्मी मिळो’ म्हणून प्रार्थना करणाऱ्या, दिवसभर नवऱ्यासाठी उपवास करणाऱ्या माउलीने यावर्षी आपले हिमोग्लोबिन आधी तपासून घ्यावे.
vat purnima
vat purnimasakal

- रूपाली चाकणकर, rchakankar95@gmail.com

वटपौर्णिमा आज साजरी होईल. वैवाहिक आयुष्यात प्रत्येक वेळी ‘हाच नवरा जन्मोजन्मी मिळो’ म्हणून प्रार्थना करणाऱ्या, दिवसभर नवऱ्यासाठी उपवास करणाऱ्या माउलीने यावर्षी आपले हिमोग्लोबिन आधी तपासून घ्यावे. ते फारच कमी भरले, तर नवऱ्याला सांगावे, इतकी वर्षे मी वड पूजला, उपवास केला, व्रतवैकल्ये करून हिमोग्लोबिन कमी भरले आहे. यंदा माझ्याऐवजी तुम्ही वडाची पूजा करा... बघू किती नवरे तयार होतात? काय हरकत आहे, इतके मोठे आयुष्य जगताना, आयुष्यातील एक दिवस म्हणजे एखाद्या वटपौर्णिमेला बायकोसाठी वट पुजायला.

घरातून सकाळी लवकर बाहेर पडून ऑफिसमध्ये आलेल्या काही तक्रारदारांना भेटून तीन दिवसांसाठी नागपूर, वर्धा व भंडाऱ्याच्या दौऱ्याला निघालेच होते. ऑफिसच्या कामाचे तीन दिवसांचे नियोजन करून बाहेर पडता येईल म्हणून लगबगीने कागद नजरेखालून घालत असताना स्टाफमधील माझी सदस्या राधिका म्हणाली, ‘‘ताई मी उद्यापासून एक महिनाभर येऊ शकणार नाही, माझे एक ऑपरेशन आहे. मी पुढच्या महिन्यात येईल.’’ ठीक आहे म्हणत, ‘पण कोणते ऑपरेशन? कधी करणार? हॉस्पिटल कोणते? डॉक्टरांशी बोलू का?’’ ही सगळी चौकशी करत काळजी घे म्हणून सगळ्यांचा निरोप घेऊन मी बाहेर पडले.

पुढे तीन दिवसांच्या दौऱ्यात अनेक ठिकाणी भेटी, जनसुनावणी घेत धावपळीत मी राधिकाला फोन लावला; पण तो बंद होता. मनात विचार आला कदाचित हॉस्पिटलला असेल म्हणून बंद ठेवला असेल. पुण्यात आल्यानंतर दोन दिवसांनंतर ‘जनता दरबार’ होता. काही बैठकादेखील होत्या म्हणून ऑफिसमध्ये गेले तर राधिका समोर उभी... मी आश्चर्याने विचारले, ‘‘अग तू तर महिनाभर येणार नव्हतीस, मग काय झालं?’

ती म्हणाली, ‘ऑपरेशनपूर्वी तपासणी केली तर माझं हिमोग्लोबिन सहाच भरलं. डॉक्टर म्हणाले, किमान दहाच्या पुढे पाहिजे. म्हणून ऑपरेशन रद्द केलं. महिनाभर व्यवस्थित आहार घेऊन हिमोग्लोबिन वाढले की ऑपरेशन करायचे आहे.’’ हे सांगताना तिचा चेहरा काळवंडलेला होता; पण मला नेहमीचेच होतं, कारण महाराष्ट्रात फिरताना महिलांची आरोग्य तपासणीचा विषय निघाला की हे कारण नेहमीच पुढे येते. केवळ ग्रामीण, आदिवासी भागात नाही तर शहरातील सधन कुटुंबात हे पाहायला मिळते. एकंदरीत ही आमच्या नारीशक्तीच्या आरोग्याची अवस्था आणि नवीन सृष्टी निर्माण करणाऱ्या मातृत्वाची स्वतःबद्दलची अनास्था!

समाजाची मानसिकता बदलेल, मग आम्ही बदलू. कोणीतरी देवदूत आमची आरोग्याची काळजी घ्यायला येईल, आम्हाला पराकोटीची सुरक्षितता बहाल करेल आणि आमच्या प्रत्येक समस्येला ‘उत्तर’ शोधायला आणि अलगद आम्हाला सुखाच्या हिरवळीवर आनंदाने बागडायला ‘जादूचा चिराग’ येईल, या आभासी कल्पनेतून आम्ही केव्हा बाहेर पडणार ही एक आत्मचिंतनाची बाब आहे.

आपली संस्कृती जरूर जपायची आहे; पण या पुरुषप्रधान संस्कृतीत जगताना, आपले सगळे सण साजरे करताना, आवर्जून भिंतीवरचे कॅलेंडरदेखील न्याहाळावे. त्यातील सगळे सण महिलांनीच साजरे करायचे आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीत एकतरी सण पुरुषांसाठी उपवासाचा हवा होता ना! बारा महिन्यातील बारा सण आम्ही आनंदाने साजरे करू, कोणाच्या श्रद्धेला दुखावण्याची भावना मनामध्ये मुळीच नाही; पण प्रत्येक सणाला उपवास महिलांच्या वाटेलाच का? एखादा उपवास नवऱ्याने बायकोसाठी किंवा भावाने बहिणीसाठी का करू नये?

वटपौर्णिमा आज साजरी होईल. आत्तापर्यंत म्हणजे वैवाहिक आयुष्यात ३०-४० वर्षांच्या प्रत्येकवेळी ‘हाच नवरा जन्मोजन्मी मिळो’ म्हणून प्रार्थना करणाऱ्या, दिवसभर नवऱ्यासाठी उपवास करणाऱ्या माउलीने यावर्षी आपले हिमोग्लोबिन आधी तपासून घ्यावे. ते फारच कमी भरले तर नवऱ्याला सांगावे, ‘‘इतकी वर्षे मी वड पूजला, उपवास केला, सारखे उपवास, व्रतवैकल्ये करून हिमोग्लोबिन कमी भरले आहे. यंदा माझ्याऐवजी तुम्ही वडाची पूजा करा.’’ बघू किती नवरे तयार होतात? काय हरकत आहे, इतके मोठे आयुष्य जगताना, आयुष्यातील एक दिवस म्हणजे एखाद्या वटपौर्णिमेला बायकोसाठी वट पुजायला. शेवटी ती तुमच्यासाठी लग्न होऊन माहेरून येताना सर्व काही माहेरी सोडून नवीन माणसात, नवीन घरात, नवीन वातावरणात नवऱ्यासाठी घरातील सगळ्यांशी क्षणात एकरूप होते. तिच्यासाठी एक दिवस ‘उपवास’ करून वट पुजायला काहीच अडचण नसावी. हो ना?

नागपंचमीही अशीच आदल्या दिवसाचा भावाचा उपवास. वर्षानुवर्षे भावासाठी उपवास करणाऱ्या बहिणीला वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीची वेळ येताच, भाऊ हळूच ‘हक्क सोड पत्रावर’ सही मागतो. ही आमची स्वार्थी प्रेमाची बांधिलकी. नागपंचमी आणि वटपौर्णिमा जरूर साजरी करा. तुम्ही दोऱ्यांनी गुंडाळून घट्ट आवळलेल्या झाडाला मोकळा श्वास घेता यावा म्हणून ‘अंनिस’सारख्या अनेक संघटना दुसऱ्या दिवशी कात्रीने दोरे कापतात आणि पुढे महिनाभर हे काम चालू राहते.

फेऱ्या मारताना स्वतःच्या मनाला जरूर एक प्रश्न विचारा. नक्की फेऱ्या कशासाठी मारतोय? यामागे वैज्ञानिक कारण काय? खरंच सावित्रीने सत्यवानाचा प्राण परत आणला आहे ना? आणि सगळ्यात महत्त्वाचे ज्यांच्या कथेवरून आमचे उपवास-तापास ठरले गेले, त्या सत्यवानाच्या सावित्रीला आम्ही पाहिले आहे का? मी पाहिले नाही, माझ्या सात पिढ्यांमध्ये कोणी पाहिल्याची नोंद नाही. आजूबाजूला कोणी पाहिल्याचा दाखला नाही. मग हा अट्टहास कशासाठी?

जी सत्यवानाची सावित्री आम्ही पाहिलीच नाही तिच्यासाठी व्रतवैकल्य करून उपवास करून वडाला फेऱ्या मारण्यापेक्षा ज्या जोतिबाच्या सावित्रीने आमच्यासाठी शेणामातीचे गोळे झेलले, तिचा विचार जर आत्मसात केला तर काय हरकत आहे? जोतिबाच्या सावित्रीने आम्हा लेकींना ज्ञानाचा प्रकाश मिळावा म्हणून स्वतः समाजाची अवहेलना सहन केली; पण आजही दीडशे-पावणे दोनशे वर्षांनंतर आम्ही काही शिकलो की नाही, हा प्रश्न ‘आ’वासून उभा आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे संविधान आम्हाला वाचता यावे, आत्मसात करता यावे, माणूस म्हणून ज्यांनी आम्हाला जगण्याचा अधिकार दिला त्यांचा विचार पुढे घेऊन जाता यावा, यासाठी जी जोतिबाची सावित्री लढली, झगडली, या समाजाच्या अनिष्ट रुढीविरोधात भिडली, तिचा लढा आम्ही पाहिलाही, ती मात्र अजूनही आम्हाला समजली नाही. जितकी कधीच न पाहिलेली सत्यवानाची सावित्री आम्हाला लगेच समजली, हेच आमचे दुर्दैव.

सावित्रीमाईने आम्हाला लिहायला, वाचायला शिकवले; पण काय वाचायचं आणि काय लिहायचं तेच आम्हाला कळले नाही. बाबासाहेबांनी दिलेलं ‘संविधान’ आम्ही कधी वाचले नाही; पण सोळा सोमवार, पंधरा गुरुवार, चौदा रविवारच्या पोथ्या मात्र वाचल्या.

वृक्षवाढीसाठी आणि त्यांची जोपासना करण्यासाठी असलेली वटपौर्णिमा आणि मुक्या प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी असलेल्या नागपंचमीचे पुण्य वडाच्या फांद्या तोडून आणि गारुड्याने पकडलेल्या सापाची पूजा करून मिळणार आहे का?

समाजात आजही गर्भनिदान चाचणी केली जाते, कारण आम्हाला वंशाला वारसदार लागतो. यात शरीराची अवहेलना होते ती त्या बाईची. आजही आमचा बालविवाह होतो, चौदाव्या वर्षी लग्न होऊन पंधराव्या वर्षी नको असलेले बाळंतपण अक्षरश: लादले जाते. ज्या शरीराची वाढ झालेली नसते, बुद्धीची वाढ झालेली नसते, गर्भाशयाची वाढ झालेली नसते, त्या गर्भाशयात नवीन जीव तयार होतो आणि म्हणून बाळंतपणात आमच्या या भगिनींचे जीव जातात. आजही आमचा हुंड्यासाठी छळ होतो. चार पैशांच्या हव्यासापोटी हाडामासांचा जीव सहज जाळला जातो. या सगळ्यात बळी जातो तो फक्त आणि फक्त ‘बाई’चा. कारण आम्ही फक्त शिक्षित झालो, पुस्तके वाचली, पदव्या घेतल्या, नागरिकशास्त्र वाचलं; पण सुशिक्षित व्हायचे तर बाजूलाच राहिले, आम्ही धड ‘माणूस’ म्हणूनही अजून जगायला शिकलो नाही.

माझ्या माता-भगिनींना मला आवर्जून सांगायचे आहे, प्रश्न तुझे आहेत, संघर्ष तुझा आहे, आयुष्याच्या या प्रवासात येणाऱ्या वादळांना रोखण्याची क्षमता तुझ्यात आहे. गरज आहे आत्मसन्मानाची आणि त्याहून अधिक आत्मभानाची. तुझे उपवास, सण, व्रतवैकल्य जरूर साजरे कर, पण स्वतःची आरोग्याची काळजी घेऊन. कारण जेव्हा तुझ्या आयुष्याची सायंकाळ होईल, तेव्हा अनेक आजार, व्याधी जडतील तेव्हा ज्यांच्यासाठी हे केले ते तुझ्या दुःखात वाटेकरी नसतील. कारण एकवेळ मनाच्या वेदनांचे वाटेकरी मिळतील; पण शरीराच्या वेदना वाटून देता येणार नाहीत, त्यासाठी आपल्यालाच सामोरे जावे लागेल. वडाच्या झाडाभोवती जसा दोरांचा फास आवळला जातोय, काकणभर जास्त अत्याचाराचा फास तुझ्या गळ्याभोवती आवळला जातोय. या सगळ्या विषारी वेदनांचा विळखा सोडविण्यासाठी या अनिष्ट रुढी-परंपरेला छेद देण्यासाठी तुला तुझ्या अस्तित्वाच्या लढाईसाठी लढावे लागेल. सज्ज हो. यशस्वी हो!

आणि कायम वक्षात ठेव,

इतिहास के पन्ने फिर से नहीं दोहराएंगे

शस्त्र उठावो द्रौपदी अब कृष्ण नहीं आयेंगे।।

(लेखिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून,

गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com