रुपेरी कडा

file photo
file photo
केवळ आजारी नसणं म्हणजे स्वस्थ असणं नसतं, हे आपल्याला हजारदा सांगून झालेलं असतं. पण, आपण "कळतं पण वळत नाही' या वर्गातले विद्यार्थी असल्याने या गोष्टीकडे, पर्यायाने सकारात्मक आरोग्य सवयींकडे सपशेल दुर्लक्ष करत असतो. मानसिक आजाराबद्दल तर विचारायलाच नको. आपल्याला या जन्मात वेडबिड लागण्याची शक्‍यता नाहीय. तेव्हा कशाला विचारसुद्धा करा त्याबद्दल? अशा विचारांमुळे आपण आपल्या जगण्याचा साधा आढावादेखील घेत नाही. केवळ मानसिक आरोग्यदिनसारखे दिवस साजरे करणे असा सगळा उत्सवी कार्यक्रम बनून जातो. पहिली कहाणी- एक हसरं घर. त्यातल्या मुलाची मात्र चिडचिड वाढलीय. सतत खोलीत घुम्यासारखा बसायला लागलाय. बोललो तरी त्याचं लक्षच नसल्यागत वाटतंय. हरवलाय कुठेतरी तो.' दुसरी कहाणी- नववी-दहावीच्या काठावरच्या पाल्यांच्या मागे आईवडील हात धुऊन लागलेत. येता-जाता "अरे अभ्यास करा'च्या विविध सप्तकातल्या सूचना त्यांना देण्यात सर्व पालक, आजी-आजोबा वगैरे गुंगून गेलेत. मात्र, त्या पाल्यांच्या मनात दहावी आणि नंतरच्या परीक्षांबद्दल एक अढी निर्माण झालीय. त्यातून परीक्षेच्या आधी छातीत दुखणं किंवा चक्कर येणं किंवा परीक्षेत काहीही न आठवणं असे प्रकार वाढायला लागलेत. तिसरी कहाणी- मुलंमुली लग्नाच्या वयाची झालीत. मात्र, लग्नच करायला तयार नाहीयत. एकीने तर धसकाच घेतला आहे लग्नाचा, पुरुष स्पर्शाचा. चौथी कहाणी- पती-पत्नी घटस्फोट घ्यायचा म्हणताहेत. कारण, पती-पत्नी म्हणून एकमेकांशी पटू शकत नाहीय. एकाच्या सवयीच विचित्र आहेत. अस्वच्छ राहणी, हळूहळू काम करणे वगैरे. पाचवी केस- मला कोणी समजूनच नाही घेत म्हणत ती रडत राहते एकटीच. एका पोतेऱ्या इतकीसुद्धा किंमत नाही देत घरातले मला, ही तिची तक्रार. त्यात सतत डोकेदुखी, अंगदुखी. सहावी केस- बायको अंथरुणाला खिळली आहे. जवळ कोणी नाही तरी आजोबा निष्ठेने सर्व निभावताहेत. मात्र, कधी-कधी जीवन संपवावं दोघांचं, हा विचार बळावू लागला आहे आजकाल. या सहाही कहाण्या आपल्या घरातल्या किंवा शेजारच्या वाटू शकतील इतक्‍या प्रमाणात आढळतात. या सर्वच घटनांकडे बरेचदा सहज दुर्लक्ष केले जाते. पण, ही एखाद्या गंभीर मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छिन्नमनस्कता, पॅनिक अटॅक, मेनोपॉजच्या आसपास अस्तित्वाबद्दलची वाटणारी चिंता, अवसाद (डिप्रेशन) व त्यातून आत्महत्येची प्रवृत्ती अशा विविध मानसिक आजारांची ही उदाहरणं आहेत. पण, खरोखर किती घरांमधून याकडे गांभीर्याने बघितलं जातं, हा एक मोठ्ठा प्रश्‍नच आहे. अजूनही सर्वसामान्यच नव्हे, तर शिक्षित उच्चमध्यम वर्गीयांतदेखील मानसिक आजारांना अमान्य करायची सवय आहे. "अहो, त्याला ना डिप्रेशन आलं होतं जरा', असं धादांत खोटं सांगून स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर आजारांवर पांघरूण घातलं जातं. डिप्रेशनदेखील मामुली आजार मानणे अयोग्यच. कारण, हाच आजार तीव्र स्वरूपात उमळला तर प्राणघातकदेखील होऊ शकतो. मानसिक आजार हे कमकुवत मनाचं लक्षण आहे. आम्ही सुशिक्षित आहोत. आमच्या घरी कोणालाही असला आजार नाही म्हणत डिंग मारणारे लोक अपरिपक्वच म्हणावे लागतील. कारण, मानसिक आजार कधीही कोणालाही होऊ शकतात. पण, जर व्यक्तिमत्त्वाची जडणघडण आरोग्यपूर्ण असेल, भावनिक बुद्धीचा विकास करण्यावर विशेष लक्ष असेल, ताण हाताळायच्या योग्य सवयी लावल्या असतील, विविध स्थित्यंतरांच्या वेळेस शारीरिक व मानसिक बदलांचा स्वीकार करत यथायोग्य व्यवहार अंगीकारले तर मानसिक आजार होण्याची संभावना कमी असते. मानसिक आजारांची कारणं वेगवेगळी असू शकतात. काही आजार आनुवंशिक असू शकतात. काही मेंदूच्या कार्याशी संबंधित असतात. काही चुकीचं वातावरण, बालसंगोपन पद्धती यामुळेही निर्माण होऊ शकतात. यासंबंधी लोकशिक्षणाची खूप आवश्‍यकता आहे. एकीकडे मानसिक आजाराबद्दलचे गैरसमज, दुसरीकडे त्याबद्दल अजूनही मनीमानसी रुजलेली सामाजिक अवाच्यता (टॅबू). यामुळे त्यांचा सहज स्वीकार होताना दिसत नाही. एकूण आरोग्याचा मानसिक आरोग्य हा अविभाज्य घटक आहे, हे मान्य व्हावे म्हणून सार्वजनिक आरोग्यसेवांमध्ये त्यासंबंधित सेवांचा अंतर्भाव करण्यात आला. पूर्वी मेंटल हॉस्पिटल हे गावकुसाबाहेर असायचे. रुग्णांना वाळीत टाकले जायचे. मात्र, पूर्वी त्या रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांपेक्षा आधुनिक मानसोपचार पद्धती बरीच बदलली आहे. आता मेंटल हॉस्पिटल्सशिवाय खासगी मानसोपचार, समुपदेशन, रिहॅब्जदेखील उपलब्ध आहेत. बदल गरजेचा आहे तो रुग्णांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात. मानसिक आजार हा देवाचा शाप, कोप किंवा पूर्वजन्मातील चुकीच्या कर्माची शिक्षा नसते, हे वाक्‍य आज एकविसाव्या शतकात लिहायची गरज पडतेय, हेच किती भयंकर आहे नाही! या मान्यता जेव्हा विज्ञानयुगाचा आरंभ नव्हता त्या वेळेस लोकांमध्ये अस्तित्वात होत्या. मात्र, भारतात आजही मंत्रतंत्र आणि बुवाबाजीच्या मागे लागून मनोरुग्णांचा छळ होत असतो. मानसिक आजारांचे निदान करण्यासाठी आवश्‍यक विशेषज्ञांची उपलब्धता हादेखील कळीचा विषय आहेच. मोठ्या शहरांमध्ये हे उपलब्ध असतात. मात्र, लहान शहरं, ग्रामीण भागात आजही याबद्दल प्रचंड अज्ञान आहे. उपचार करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक, रिहॅब्ज उपलब्ध नाहीयत. करियरचा एक उत्तम पर्याय म्हणून याकडे अजूनही बघितले जात नाहीय. मानसिक आजारांवर उपचार उपलब्ध करून देणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. त्याकरिता आवश्‍यक प्रशिक्षित लोकांची चमू तयार होण्याकरिता तातडीने प्रयत्न हवे आहेत. काही स्वयंसेवी संस्था गेली अनेक वर्षे या विषयावर काम करत आहेत. मात्र, त्यांची संख्या वाढायला हवी. या विषयावर काम करणाऱ्यांनीच नव्हे, तर सर्वांनीच जागतिक आरोग्य संघटनेने समर्थन दिलेल्या जागतिक मानसिक आरोग्य फेडरेशनने जी घोषणा केलीय तीदेखील लक्षात घ्यायला हवीय. या वर्षीचा विषय आहे "मानसिक आरोग्यसंवर्धन आणि आत्महत्या प्रतिबंध'. मनोरुग्णांच्या समस्या, त्यांची काळजी घेणाऱ्यांच्या समस्या यावर मोकळेपणाने बोललं गेलं पाहिजे. आधी सुरुवात घरात मनमोकळं व्यक्त होण्याने करता येईल. नात्यांची जपणूक, संवादाची ऊब, एकमेकांबद्दल आदर, जबाबदारीने वागणं, परिस्थितीचा स्वीकार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आनंदीवृत्ती यातून मानसिक आरोग्याची दारं खुली होतात, हे लहानपणापासून कोवळ्या मनावर बिंबवलं गेलं पाहिजे. काळ्याकुट्ट ढगांनादेखील रुपेरी कडा असतात. त्या शोधूयात. सुरुवातीला अवघड वाटेल; पण नंतर लख्ख उजाडेल. पता है, होती है बौखलाहट मिलकर भीतरी तुफानोंसें यकीन कर मगर ऐ दोस्त, उभरकर आता है, विश्‍वास फिरसे लडखडाते कदम फिर पातें है सुकून हौसलों के दिये जगमगाते है फिरसे न कर बात रुकने की या रोकने की ना होना उदास तुम हटती ही है हर बदली खिलखिलाता है सूरज फिरसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com