गोष्ट एका चकमकीची (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

कारवाईच्या तयारीसाठी आम्हाला तीन, चार दिवस पुरेसे होते; पण संयमानं काम करणं आणि नंतर वाट पाहणं आवश्‍यक होते. ज्या भागात दहशतवाद्यांचा वावर होता, त्या भागाची आमच्या टीम्सनी नियमितपणे जाऊन नीट माहिती घेतली. आमच्या उपयोगी पडेल अशी छोट्यातली छोटी बाबही नजरेतून सुटणार नाही, याचीही काळजी त्यांनी घेतली होती. मीदेखील माझ्या कामात दक्षता घेत होतो. मी एकटाच मोटरसायकलवरून दोनदा त्या परिसरात जाऊन आलो. तिथले रस्ते, वेळप्रसंगी बाहेर पडण्याचे मार्ग नीट पाहून ठेवले. आम्ही सर्वतोपरी सज्ज होतो आणि कारवाईच्या दिवसाची वाट पाहत होतो.

धीर धरणं, शांतपणे वाट पाहणं, संयम राखणं हा एक महत्त्वाचा गुण आहे. कोणतंही काम करताना हा गुण मदतीस येतो, दहशतवादविरोधी कारवायांमध्ये तर संयम अत्यावश्‍यकच असतो. समजा एका बसमधून प्रवास करणाऱ्या संशयित दहशतवाद्याला पकडायचं आहे. बसमधून उतरता क्षणी त्याला ताब्यात घ्यायचं आहे; पण एखादेवेळी बसला उशीर होईल, किंवा बस येईल- मात्र संशयित व्यक्ती त्यात नसेलच. अशा वेळी अतिउत्साही असण्यात काही मतलब नसतो. अशा वेळी डोकं शांत ठेवलं, तर तो दहशतवादीच तुम्हाला त्याला पकडण्याची आणखी एक संधी देत असतो.

अजनाला सेक्‍टरमधल्या दहशतवाद्यांच्या हालचालींबद्दल आम्हाला मिळालेल्या माहितीलाही हाच नियम लागू होतो. आम्हाला जवळपास तीन आठवड्यांचा वेळ मिळाला होता. कारवाईच्या तयारीसाठी आम्हाला तीन, चार दिवस पुरेसे होते; पण संयमानं काम करणं आणि नंतर वाट पाहणं आवश्‍यक होते. ज्या भागात दहशतवाद्यांचा वावर होता, त्या भागाची आमच्या टीम्सनी नियमितपणे जाऊन नीट माहिती घेतली. आमच्या उपयोगी पडेल अशी छोट्यातली छोटी बाबही नजरेतून सुटणार नाही, याचीही काळजी त्यांनी घेतली होती. मीदेखील माझ्या कामात दक्षता घेत होतो. मी एकटाच मोटरसायकलवरून दोनदा त्या परिसरात जाऊन आलो. तिथले रस्ते, वेळप्रसंगी बाहेर पडण्याचे मार्ग नीट पाहून ठेवले. आम्ही सर्वतोपरी सज्ज होतो आणि कारवाईच्या दिवसाची वाट पाहत होतो.

ठरलेल्या दिवशी मी नेहमीपेक्षा लवकरच तयार झालो होतो. थोडी चिंताही वाटत होती. कारवाईसाठी आवश्‍यक त्या तयारीनिशी गणवेशात मी माझ्या कार्यालयात बसलो होतो. माझ्या टेबलवर काही रूटिन कामं, काही कवितासंग्रह, काही हलक्‍याफुलक्‍या विषयांवरची पुस्तकं होती. नेहमीच्या कामात काही तास गेले; पण अजूनही फोन वाजला नव्हता. रोजचं काम संपवून मी कंट्रोल रूममध्ये गेलो. तिथं पण फोन सुरू होते, माझं कोणाकोणाशी बोलणंही होत होतं; पण या कारवाईसाठी म्हणून जो एक खास नंबर होता तो फोन शांतच होता. अकरा वाजून गेल्यानंतर आज काही होईल याची आशा जवळजवळ सोडूनच दिली होती. इतक्‍यात माझ्या ऑफिसमधला शिपाई माझा "ऑप्स फोन' वाजतो आहे, असं सांगत आला. मी धावतच जाऊन फोन घेतला. "काकांची तब्येत बरी नाही,' पलीकडची व्यक्ती म्हणाली. मी म्हणालो ः ""मी आवश्‍यक ते सगळं करतो'' आणि फोन कट केला.

या ऑपरेशनबद्दल कोणालाच माहिती नव्हती. मी माझ्या ऑफिसचं दार लावून सेक्‍टर-कमांडर आणि सक्‍सेना यांना "गो अहेड'चे आदेश दिले. कारवाईदरम्यान मला सातत्यानं माहिती देत राहा म्हणून सांगितलं आणि "ऑल द बेस्ट'चा निरोपही दिला.
आता धीर धरण्याची दुसरी खेळी सुरू झाली होती. आमच्या टीम्स लवकर निघाल्या असल्या, तरी त्या विशिष्ट जागेवर पोचण्यासाठी त्यांना तीन तास लागणार होते. वाहनांमधून जाणाऱ्या टीम्स आणि पायी जाणाऱ्या टीम्सना वेग आणि वेळाचा ताळमेळ राखायचा होता. कारवाईदरम्यान गोळीबार सुरू झाला, तर ते लगेच मला कळवतील आणि मीदेखील तातडीनं तिथं पोचून त्यांच्या कामात अडथळा येणार नाही अशा रितीनं कारवाईत सामील होईन, असं ठरलं होतं.

दुपारी साडेबाराच्या सुमारास माझी सगळी कामं संपली, आणि वाट पाहण्याचा खेळ पुन्हा सुरू झाला. आमच्या टीम्सना त्या भागात पोचायला दुपारचे साडेतीन- चार वाजणार होते. तोपर्यंत वाट पाहणं एवढंच माझ्या हातात होतं. मग मी सकाळचे सगळे पेपर परत वाचून काढले. भूक नव्हतीच, त्यामुळं मी दुपारचं जेवणही नको म्हणून सांगितलं. कारवाई पूर्ण होईपर्यंत आता मला जेवणखाणही सुचणार नव्हतं. प्रतीक्षेच्या या काळात मिर्झा गालिब मला नेहमीच साथ द्यायचे. रोजच्या समस्या, तणाव, निराशा, चिंता यापासून गालिब साहेब मला नेहमीच दूर ठेवत असत. आमच्या दोघांच्याही परिस्थितीत आणि आजूबाजूच्या वातावरणात जमीन-आस्मानचा फरक असला, तरी गालिब साहेबही खूप तणावाखाली जीवन जगले, असं मला नेहमीच वाटत होतं. अशा प्रसंगातले माझे आणखी एक मार्गदर्शक म्हणजे कबीरजी. मात्र, या सगळ्याची चर्चा नंतर करू या, कारण अचानक फोन वाजल्यानं माझी ही विचारश्रृंखला तुटली. ""सर, पुण्याहून कोणाचा तरी फोन आहे,'' ऑपरेटर सांगत होता. ""नमस्कार विर्क साहेब, मी पुण्यातल्या "सकाळ'मधून विजय साळुंके बोलतो आहे. थोडा वेळ आपल्याला भेटता येईल का?''

पंजाबमधल्या परिस्थितीच्या वार्तांकनासाठी विजय आले होते. त्या संदर्भात त्यांना भेटायचं होतं. मी त्यांना सांगितलं, की ते लगेच येऊ शकत असतील तर भेटता येईल- कारण नंतर मला वेळ मिळणार नाही. ते लगेचच माझ्या ऑफिसमध्ये आले. भेटल्यावर आधी पुण्याच्या, तिथल्या आमच्या दोघांनाही माहिती असणाऱ्या काही मित्रांच्या आठवणी निघाल्या. मग आम्ही पंजाब समस्येविषयीही बोललो. भूक नव्हती, तरी बोलताबोलता आम्ही चहा घेतला, थोडं खाऊनही घेतलं. पंजाबमधली परिस्थिती, हिंसा, त्याची कारणं आणि परिणाम याविषयी आम्ही बोललो. आम्ही या चर्चेत एवढे तल्लीन झालो होतो, की आजच्या ऑपरेशनचंही भान राहिलं नाही. अचानक कंट्रोल रूममधल्या अधिकाऱ्यानं मला सांगितलं ः ""सर, अजनाला सेक्‍टरसे मेसेज है. जगतपूर के पास फायरिंग शुरू है।'' मी लगेच त्यांना माझ्या सुरक्षारक्षकांना तयार राहण्याचा निरोप द्यायला सांगितलं. अमृतसरचे वरिष्ठ एसपी इज़हार आलम यांनाही फोन करून गोळीबाराबद्दल सांगितलं. त्यांनीही माझ्याबरोबर यायची इच्छा व्यक्त केली. काही वेळातच ते त्यांच्या सुरक्षा दलासह माझ्या कार्यालयात पोचले.

एक ऑपरेशन सुरू असल्याने मला जावं लागत आहे, असं विजयना सांगून मी दिलगिरी व्यक्त केली. आपण एक-दोन दिवसांत पुन्हा भेटू, असं सांगून त्यांना निरोप देत असतानाच विजयनी, ""मी येऊ शकतो का तुमच्याबरोबर?,'' असा प्रश्न केला. त्यांचा जीव धोक्‍यात घालण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. अखेरीस मी त्यांना बजावलं, की त्यांनी आमच्या माणसांना सोडून एकट्यानं कुठंही इकडंतिकडं जायचं नाही आणि माझे पीएसओ नेहरू राम यांना त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितलं. विजय यांनीही माझ्या सगळ्या अटी मान्य केल्या. मग मी त्यांना इज़हार आलम आणि माझ्याबरोबरच राहायला सांगितले. आम्ही चकमकीच्या ठिकाणी जात असतानाही गोळीबाराबद्दलची ताजी माहिती आम्हाला कारमधल्या वायरलेस सेटवर सतत मिळत होती.

कंट्रोल रूमच्या अधिकाऱ्यानं आम्हाला सांगितल्यानुसार, जगतपूरजवळच्या त्या फार्महाऊसच्या परिसरात काही संशयास्पद हालचाली दिसल्यामुळं सेक्‍टर कमांडरनं चार टीम्सना गस्त घालण्यासाठी पाठवलं होतं. वाहनांतूनही आणखी दोन टीम त्या भागात पाठवल्या होत्या. जगतपूर भागातल्या त्या फार्महाऊसच्या परिसराची दुर्बिणीतून पाहणी करताना टीम प्रमुख सक्‍सेना यांनी काही संशयास्पद व्यक्ती टिपल्या होत्या. त्यावर त्यांनी एका टीमला समोरच्या बाजूनं जाऊन फार्महाऊसची तपासणी करण्यास सांगितलं. तीन टीम्स घराच्या मागच्या बाजूनं गेल्या आणि मक्‍याच्या शेतात लपून त्यांनी आपापल्या जागा घेतल्या. पहिली टीम जवळ पोचल्यावर फार्महाऊसमधून त्यांच्यावर गोळीबार झाला. आतल्या काही लोकांनी फार्महाऊसच्या मागच्या बाजूनं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला; पण मागच्या शेतांमध्ये असलेल्या टीम्सनी त्यांचा रस्ता रोखला होता. परिणामी तीन ठिकाणी गोळीबार सुरू झाला. गोळीबार करणाऱ्यांचे पळून जाण्याचे सगळे मार्ग रोखून ठेवण्याच्या सूचना मी दिल्या, आणि मी पण पोचतोच आहे, असंही सांगितलं.

जगतपूरला पोचल्यावर आम्ही चकमकीच्या ठिकाणी पायी निघालो. दोन्ही बाजूंनी होणाऱ्या गोळीबाराचे आवाज ऐकू येत होते. आम्ही आणखी पुढं गेल्यावर एका टीमच्या अधिकाऱ्यानं आणखी पुढं न जाण्याबद्दल सुचवलं. दोन्ही बाजूंनी अजूनही गोळीबार सुरू होता. आम्हीही आमच्या जागा घेऊन दुर्बिणीतून समोरच्या हालचाली न्याहळू लागलो. एका गवताच्या गंजीमागं लपून गोळीबार करणारे दोन दहशतवादी दिसत होते. त्या सर्वांना चारही बाजूंनी घेरले आहे आणि त्यांनी सरेंडर करावं, असं एका टीम कमांडरनं त्यांना ओरडून सांगितलं. प्रत्युत्तर म्हणून समोरून गोळ्यांच्या आणखी काही फैरी झाडल्या गेल्या. त्यानंतर आमचे काही जवान कव्हरिंग फायरचा फायदा घेत आणखी पुढं सरकले. आता ते त्या दहशतवाद्यांच्या अगदी जवळ पोचले होते. त्या ऍडव्हान्सिंग पार्टीच्या गोळीबारात अखेरीस ते दोन्ही दहशतवादी मारले गेले. पार्टी कमांडरनं मग सर्व टीम्सना आसपासच्या भागाची नीट तपासणी करण्यास सांगितलं. हे सुरू असतानाच त्या फार्महाऊसमध्ये उरलेल्या एकमेव दहशतवाद्यानं त्याच्याजवळच्या हॅन्डगनमधून पोलिसांवर गोळीबार केला. गोळीबार सुरू झाला तेव्हा हा दहशतवादी फार्महाऊसमधल्या गोठ्याच्या बाजूला असलेल्या एका खोलीत दडून बसला होता. हॅन्डगनमध्ये पुन्हा गोळ्या भरत असतानाच आमच्या एका प्लाटून कमांडरनं त्याला टिपलं.

या चकमकीत सहा दहशतवादी मारले गेले. एक घराच्या आत, एक घराच्या मागच्या व्हरांड्यामध्ये, एक गोठ्यात आणि तिघंजण मागच्या बाजूनं पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना टिपले गेले. आमचा एक जवान या चकमकीत जखमी झाला. त्याच्या पोटात गोळी लागली होती. त्याला ताबडतोब रुग्णालयात पाठवण्यात आलं.
मधल्या काळात, विजय यांनी थोडं पुढं जाऊन या चकमकीची छायाचित्रं घेतली होती. छायाचित्रं काढण्याच्या नादात ते इतके पुढे आले होते, की एका टीममधल्या एका जवानानं त्यांच्यावरही बंदूक रोखली होती. मात्र, समोरच्या माणसाच्या हातात कॅमेरा पाहून आश्‍चर्यचकित झालेला तो जवान थांबला, तेवढ्यात माझ्या पीएसओनं धावत येऊन त्यांना सुरक्षितस्थळी नेलं. चकमक संपल्यावर आमची पुढची कारवाई सुरू असतानाही विजय छायाचित्रं घेत होते. थेट एक चकमक अनुभवल्याचा थरार त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

थोड्या वेळानं ऑपरेशन संपवून आम्ही आमच्या जखमी जवानाला भेटण्यास गेलो. सुदैवानं त्याच्या जीवाला धोका नव्हता. आमची कामगिरी फत्ते झाली होती; पण त्या सहा तरुण मुलांचे मृतदेह पाहून मला वाईट वाटले. ऑपरेशनच्या यशानंतरही माझ्या मनात विचार येत होता, की या सगळ्यासाठी मी पोलिसांत दाखल झालो आहे का? उत्तर होतं ः "नाही, नक्कीच नाही.' मात्र, नंतर मग माझ्या आतल्या आवाजानं मला विचारलं ः "हे तुझं कर्तव्य होतं की नाही?' "हो, हे माझं कर्तव्य होते आणि जरी कटू असलं, तरी मी ते करतच राहणार.'

दरम्यान, विजयनं मला आठवण करून दिली ः ""साहेब, मला आजच्या आज ही बातमी द्यायची आहे, आपण निघूया.'' मी "होय, निघूया' म्हणालो आणि लवकरच आमच्या गाड्या पुन्हा अमृतसरच्या वाटेवर होत्या.
(उत्तरार्ध)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com