लाडोवाली रोड शूटआऊट (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

जालंधरला वरिष्ठ जिल्हा पोलिसप्रमुख (सिनिअर एसपी) म्हणून नियुक्तीस असताना मी असंच एक शूटआऊट पाहिलं. मी अनुभवलेलं हे पहिलंच शूटआऊट. ती सन 1984 च्या दिवाळीच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ होती. "ऑपरेशन ब्लू स्टार' होऊन चार महिने झाले होते. पंजाबमध्ये हिंसाचाराचे तुरळक प्रकार घडत होते. वातावरणात सतत एक अस्वस्थ शांतता भरलेली असायची. पंजाबी समाजाची धर्मनिरपेक्ष वीण खूपच विसविशीत झाली होती...

महाराष्ट्रातून पंजाबमध्ये प्रतिनियुक्तीवर आल्यानंतर आणखी एका वेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारीचा मला सामना करावा लागला. शूटआऊट्‌स -म्हणजे आकस्मित गोळीबार. त्यावेळच्या- ऐंशीच्या दशकातल्या- पंजाबमध्ये शूटआऊट्‌सचे प्रकार नित्याचेच झाले होते. पंजाबमधल्या त्या वेळच्या शूटआऊट्‌सवर लिहिण्याच्या दृष्टीनं विचार करताकरता मी टीव्ही लावला. एका न्यूज चॅनेलवर बातम्या सुरू होत्या. आपण पाकिस्तानबरोबर त्वरित युद्ध घोषित करावे, असं त्या चॅनेलवरचा न्यूज अँकर जोरानं सांगत होता. ज्या उत्साहानं आणि आवेशानं लगेचच्या लगेच युद्ध जाहीर करण्याचा आग्रह चालला होता, त्यामुळे पंजाबमधल्या हिंसाचाराऐवजी माझे विचार सद्यःस्थितीवर केंद्रित होऊ लागले. आज आपल्या देशात युद्ध हा मुख्य मुद्दा होऊन समोर आला आहे.

काय काय घडलं गेल्या महिन्याभरात? फेब्रुवारीच्या 14 तारखेला एका बॉम्बरनं केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यातल्या एका वाहनावर आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले. बारा दिवसांनंतर- 26 फेब्रुवारीला- भारतीय हवाई दलानं पाकिस्तानातल्या बालाकोट इथल्या आणि पाकव्याप्त काश्‍मीरमधल्या दोन ठिकाणच्या दहशतवादी तळांवर लक्ष्यवेधी हल्ले करून ते तळ उद्‌ध्वस्त केले. दुसऱ्या दिवशी- 27 फेब्रुवारीला- पाकिस्तानी विमानांनी भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करून काही ठिकाणी बॉम्बिग केलं. भारतीय विमानांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना आपल्या हद्दीतून पिटाळून लावलं. पाकिस्तानी विमानांचा पाठलाग करताना आपल्या हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानचं एक विमान पाडलं. आपलंही एक विमान कोसळलं. दोन्ही विमानांचे पायलट इजेक्‍ट झाले आणि पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये उतरले. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना स्थानिक लोकांकडून जबरदस्त मारहाण झाली; पण त्यातून ते वाचले. पाकिस्तानी लष्करानं नंतर त्यांना ताब्यात घेतलं. पाकिस्तानी हवाई दलाचा पायलट मात्र स्थानिकांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडला. पुलवामा हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानविरुद्ध निर्णायक युद्ध घोषित करण्याबाबत काही लोक आग्रही आहेत. त्यांची शैली, देहबोली, ते वापरत असलेली भाषा, ते देत असलेली कारणं यामुळं कोणत्याही राष्ट्रभक्त व्यक्तीचं मन पाकिस्तानबरोबर निर्णायक युद्ध करण्याच्या बाजूनं झुकू शकेल यात मुळीच वाद नाही; पण निर्णायक युद्ध एवढा एकच पर्याय आत्ता या क्षणाला भारतासमोर आहे का? लष्करीदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, धोरणात्मकदृष्ट्या, युद्धनीतिदृष्ट्या आपण त्यासाठी सज्ज आहोत का? हे संभाव्य युद्ध किती काळ चालेल हे आपल्याला सांगता येईल का? त्या युद्धाचा बोजा उचलण्यास आत्ता आपली अर्थव्यवस्था सक्षम आहे का? आपण युद्धाच्या सापळ्यात अडकू नये, असं मला वाटतं. राजनैतिक कूटनीती आणि आंतरराष्ट्रीय दबावासारख्या पर्यायांचा विचार करायला हवा. पाकिस्तानातले सुशिक्षित लोक कट्टर मूलतत्त्ववाद्यांना आधीच कंटाळले आहेत, अशी माझी खात्री आहे. इम्रान खानसुद्धा त्यांना आळा घालण्याचा प्रयत्न करतील, असा माझा कयास आहे. जैशे महंमदसारख्यांना आत्ता युद्ध हवं आहे, कारण त्यामुळं पाकिस्तान "एकजूट' होऊ शकेल असं त्यांना वाटतं. आपण युद्धाचा मार्ग पत्करू नये. अन्य कमी खर्चाच्या पर्यायांवर आपण विचार केला पाहिजे. निर्णायक युद्ध हा चांगला पर्याय आहे, असं मला वाटत नाही.
कालच मी साहिर लुधियानवींची यांची एक रचना वाचत होतो; ते लिहितात -
""जंग तो खुद ही एक मसला है, जंग क्‍या मसअलोंका हल देगी?
आग और खून आज बक्‍शेगी, भूक और एहतीयाज कल देगी।
इसलिए ऐ शरीफ इन्सानों, जंग टलती रहे तो बेहतर है।
आप और हम सभी के आंगन में, शमा जलती रहे तो बेहतर है।''

मी साहिर साहेबांशी पूर्णपणे सहमत आहे. निव्वळ रागाच्या भरात किंवा बदला घेण्याच्या चुकीच्या कल्पनेपोटी आपण युद्धात उतरू नये. त्यासाठी योग्य वेळ येऊ द्यावी. जेव्हा आपण पूर्णपणे तयार असू तेव्हाच युद्धाचा निर्णय घ्यावा. तसंच, आपल्या देशाचं नेतृत्व चांगलं, जबाबदार आहे. देशहिताच्या दृष्टीनं ते योग्य ते निर्णय घेतीलच. आपण हा मुद्दा त्यांच्यावरच सोपवू या.

तर, आपण ऐंशीच्या दशकातल्या पंजाबमधल्या आकस्मित गोळीबारांविषयी चर्चा करत होतो. त्या काळात पंजाबमध्ये शूटआऊट्‌स हा नेहमी घडणारा गुन्हा होता. काही लोक अचानक, बाजारात किंवा बस-स्टॅंडसारख्या गर्दीच्या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करायचे. काही गुन्हेगारांकडं एके-47 सारखी स्वचलित शस्त्रं असायची, इतर काही छोटी शस्त्रं असायची; पण एकाच वेळी चार, पाच किंवा त्याहूनही अधिक शस्त्रांमधून होणाऱ्या गोळीबारामुळं दहा-बारा लोक जखमी व्हायचे, त्यातले अर्धेअधिक त्या गोळीबारात बळी पडायचे. बाकीच्यांना अनेक दिवस रुग्णालयात पडून राहावं लागायचं. हल्लेखोर मात्र निसटून जायचे. अशा घटनांमुळं इतकी दहशत निर्माण व्हायची, की कोणीही त्याबद्दल शब्दही काढायचं नाही. कायदा व सुव्यवस्थेवरही त्याचे गंभीर परिणाम व्हायचे. वैद्यकीय तज्ज्ञांकडून होणारे उपचार, मृतदेहांचं शवविच्छेदन, त्यांच्यावरचे अंत्यसंस्कार, कर्फ्यू, गर्दीचं नियंत्रण, लोकांचा राग, दगडफेकीसारखे प्रकार अत्यंत संवेदनशीलतेनं हाताळण्याची गरज असायची. भय आणि दहशत निर्माण करणं, लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणं आणि पोलिसांचे नीतिधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करणं यासाठीच अशी शूटआऊट्‌स घडवली जायची. अशा शूटआउट्‌सचा आणखी एक वेगळा प्रकार म्हणजे अल्पसंख्य समुदायातल्या लोकांना बस किंवा रेल्वेतून बाहेर काढून मारणं. बस आणि रेल्वेतून लोकांना उतरवून झालेल्या अशा शूटआऊट्‌समध्ये एकाच वेळी साठ- सत्तर लोकही मारले गेल्याच्या घटना घडल्या आहेत. इतर काही प्रकरणांमध्ये अगदी सर्वसामान्य व्यक्तीही नाहक मारल्या गेल्या. याविषयी बोलणं आपल्या जीवावर बेतू शकेल या भीतीमुळं कुणी न सांगितल्यानं किंवा गुन्हेगारांचे चेहरे झाकल्यानं त्यांची ओळख पटू न शकल्यानं या प्रकरणांचा तपासही लागत नसे. जालंधरला वरिष्ठ जिल्हा पोलिसप्रमुख (सिनिअर एसपी) म्हणून नियुक्तीस असताना मी असंच एक शूटआऊट पाहिलं. मी अनुभवलेलं हे पहिलंच शूटआऊट. त्या शूटआऊटची कहाणी मी आज आपल्याला सांगणार आहे.

ती सन 1984 च्या दिवाळीच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ होती. "ऑपरेशन ब्लू स्टार' होऊन चार महिने झाले होते. पंजाबमध्ये हिंसाचाराचे तुरळक प्रकार घडत होते. वातावरणात सतत एक अस्वस्थ शांतता भरलेली असायची. जालंधरमध्ये वरिष्ठ जिल्हा पोलिसप्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्याला सहा आठवडे झाले होते. जालंधर हा मध्य पंजाबमधील एक महत्त्वाचा जिल्हा. पंजाबमध्ये त्या वेळी राष्ट्रपती राजवट लागू होती; पण प्रशासन अजूनही राजकीय प्रभावाखाली होतं. समाज सांप्रदायिक मुद्द्यांवर विभागला गेला होता. हिंदू आणि शीख दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल अविश्वास आणि शंका होत्या. दोन्ही समाजांमधले बरेच जण अतिरेक्‍यांच्या हिट-लिस्टवर असले, तरी पंजाबी समाजाची धर्मनिरपेक्ष वीण खूपच विसविशीत झाली होती. जालंधर शहरातली स्थानिक वृत्तपत्रंही सांप्रदायिक किंवा भाषिक मुद्द्यावर विभागलेली होती. समाजातली अशी दुही मी या आधी कधीच पाहिली नसल्यानं, ही परिस्थिती माझ्या दृष्टीनं अत्यंत दुःखद होती. कारण त्यामुळं संपूर्ण समाज कमकुवत आणि असुरक्षित होत चालला होता. पेट्रोलिंग, नाकाबंदी, असुरक्षित वाटणाऱ्या ठिकाणी चौक्‍या अशा उपाययोजना करून आम्ही जालंधरमधली शांतता बिघडू दिली नव्हती; पण हिंसाचार आणि अव्यवस्थेच्या वातावरणात ही शांतता तात्पुरती आहे, असं मला सारखं वाटत होते. माझ्या सूचनांप्रमाणं, आमचे अधिकारी शहरांत आणि आसपासच्या ग्रामीण भागात वेगवेगळ्या वेळी लक्ष ठेवून होते. तरुण मुलांच्या संशयास्पद हालचालींवरही आमची नजर होती. कोणत्याही क्षणी हिंसाचार किंवा शूटआऊट्‌स होऊ शकतात, ही जाणीव असल्यानं आम्ही अत्यंत दबावाखाली काम करत होतो.

त्या दिवशी संध्याकाळी मी शहराच्या एका भागातून फिरून आलो होतो. असं शहराच्या वेगवेगळ्या भागात जाऊन आल्यानं तिथल्या बंदोबस्ताची पाहणीही व्हायची आणि लोकांमध्येही सुरक्षेची भावनाही निर्माण व्हायची. मी घरी आलो. कपडे बदलले आणि मुलांबरोबर चहा घेत होतो. तेवढ्यात फोन वाजला. ऑपरेटरनं सांगितलं ः ""कंट्रोल रूम ऑफिसर (सीआरओ) लाईनवर आहेत.'' कंट्रोल रूम ऑफिसरनी मला सांगितलं ः ""लाडोवाली रोड उपनगरातल्या एका मंदिराबाहेर अनोळखी व्यक्तींनी रमेशकुमार नावाच्या एका व्यक्तीला गोळ्या झाडून त्याला ठार मारलं आहे. रमेशकुमार त्याच्या अशोक नावाच्या मित्राबरोबर मंदिरातून बाहेर पडत असताना तीन अज्ञात शीख युवकांनी हा गोळीबार केला होता. रमेश अशोकच्या मागं चालत होता. गोळीबार झाला तेव्हा अशोक खाली वाकल्यानं बचावला आणि गोळ्यांनी रमेशचा बळी घेतला. तीन हल्लेखोरांपैकी दोघं नंतर रमेशजवळ गेले. त्यातल्या एकानं आणखी दोनदा गोळ्या झाडल्या. तिसरा हल्लेखोर स्कूटर चालू ठेवून तयार होता. तिघंही त्या स्कूटरवरून पळून गेले. अशोकनं आसपासच्या लोकांच्या मदतीनं जखमी रमेशला रुग्णालयात नेलं होतं. त्या भागातल्या पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनाही (एसएचओ) गुन्ह्याबद्दल कळवलं आहे. ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले आहेत आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी गेले आहेत.''

मी लगेचच ऑपरेटरला माझ्या सुरक्षा दलाला निघण्याच्या तयारीत राहण्याचा निरोप द्यायला सांगितलं. मीही पुन्हा गणवेश घालून तयार झालो. थोड्याच वेळात आम्ही त्या मंदिराच्या परिसरात पोचलो. आम्ही वाटेत असतानाच एसएचओंनी मला वायरलेसवर "हॉस्पिटलमध्ये पोचण्यापूर्वीच रमेशचा मृत्यू झाल्याचं डॉक्‍टरांनी सांगितलं आहे,' असं कळवलं. हिंदूबहुल जालंधर शहरात या घटनेचे पडसाद उमटणार, दुसऱ्या दिवशी बंद, निषेध असं काहीतरी घडणार असं मला नक्की वाटत होतं. मी एसएचओंना अशोकला घेऊन घटनास्थळी यायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी घडू शकणाऱ्या घटनांच्या संदर्भानं उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं अन्य अधिकाऱ्यांनीही तिथंच येण्याच्या सूचना दिल्या. खुनाचा गुन्हा नोंदवून त्याचा तपासही सुरू केला. या प्रकरणातले गुन्हेगार कसे शोधायचे याचा मी विचार करत होतो. हल्ल्यात मरण पावलेल्या रमेशचा मित्रच मला या घटनेवर अधिक प्रकाश टाकायला मदत करेल, अशी माझी खात्री होती. एवढ्यात एसएचओनं मला सांगितलं ः ""सर, अशोक माझ्याबरोबर इथं आलेला आहे.''

(पूर्वार्ध)
(या घटनेतल्या व्यक्तींची नावं बदलली आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com