'गॅंग' जेरबंद (एस. एस. विर्क)

एस. एस. विर्क
रविवार, 24 मार्च 2019

अमृतसरला सिनिअर एसपी असताना मला पहिल्यांदा बिल्ला-रोशन गॅंगची माहिती मिळाली. एक दिवस सकाळी मला, अमृतसरपासून वीस किलोमीटर असलेल्या एका गावाचे सरपंच जरनैलसिंग यांच्यावर दोन जणांनी गोळ्या झाडून त्यांना जखमी केल्याची माहिती मिळाली. जरनैलसिंग यांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं ः ""घराच्या अंगणात बसलो असताना दोघा जणांनी कंपाऊंडमध्ये घुसून गोळ्या झाडल्या.'' जीव वाचवण्यासाठी ते घराबाहेर धावले; पण दोन गोळ्या त्यांना लागल्या. त्यांच्या पत्नीनं आणि नोकरांनी ओरडाओरडा केला; पण हल्लेखोर बाहेर उभ्या केलेल्या स्कूटरवरून पळून गेले. जरनैलसिंग यांनी हल्लेखोरांना ओळखलं होतं.

अमृतसरला सिनिअर एसपी असताना मला पहिल्यांदा बिल्ला-रोशन गॅंगची माहिती मिळाली. एक दिवस सकाळी मला, अमृतसरपासून वीस किलोमीटर असलेल्या एका गावाचे सरपंच जरनैलसिंग यांच्यावर दोन जणांनी गोळ्या झाडून त्यांना जखमी केल्याची माहिती मिळाली. जरनैलसिंग यांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं ः ""घराच्या अंगणात बसलो असताना दोघा जणांनी कंपाऊंडमध्ये घुसून गोळ्या झाडल्या.'' जीव वाचवण्यासाठी ते घराबाहेर धावले; पण दोन गोळ्या त्यांना लागल्या. त्यांच्या पत्नीनं आणि नोकरांनी ओरडाओरडा केला; पण हल्लेखोर बाहेर उभ्या केलेल्या स्कूटरवरून पळून गेले. जरनैलसिंग यांनी हल्लेखोरांना ओळखलं होतं. ते त्याच वरपाल गावातले छोटेमोठे गुन्हे करणारे रेशमसिंग उर्फ बिल्ला आणि रोशनलाल होते.

या आठवड्यात आपल्या बरोबर कोणता अनुभव शेअर करायचा याचा विचार करताना अचानक आठवणीच हरवल्यासारख्या झाल्या होत्या. पोलिस खात्यात काम करत असतानाच्या काळातली एखादी घटना मी या लेखमालेसाठी निवडतो. आठवणींची सीडी पुनःपुन्हा प्ले करून त्या घटनेशी संबंधित असलेले सर्व तपशील नीट क्रमवार जुळवतो आणि लिहायला सुरवात करतो. लिहितालिहिता ती गोष्ट आकार घेत जाते; पण मी काही फक्त आठवणींच्या जगात रमतो असं नाही. माझ्याही भोवतालच्या वर्तमानात पुलवामासारख्या खूप घटना घडत असतात. त्यातल्या काही घटनांमुळं आपण बेचैन होता, मलाही तसाच अनुभव येतो. मलाही त्या घटना बेचैन करतात.
सध्या स्वतःला आपल्या यंत्रणेचा "चौकीदार' म्हणवून घेण्याचा ट्रेंड दिसतोय. लहानथोर सगळेच जण आपण "चौकीदार' आहोत असे सांगत आहेत. त्यात राजकारणी आहेत, नोकरशहा, शिक्षक, व्यावसायिक- अगदी मजूरही आहेत. सर्वच जण सांगत आहेत ः "मी चौकीदार आहे.' फेसबुक, ट्विटर, इतर सर्व सोशल मीडियावर सध्या हीच चर्चा आहे. मी स्वतः चार दशकं पोलिस खात्यात काम केलं. सगळीकडे लक्ष ठेवणं हा त्या कामाचा एक भाग होता. पुण्यासह वेगवेगळ्या शहरांमध्ये पायी, मोटारसायकलवरून, अन्य वाहनांमधून रात्रीची गस्त घालणं, आमचा भाग सुरक्षित राहील याची काळजी घेणं हा आमच्या कामाचा भाग होता. लोकांना निःशंकपणे रात्रीची झोप घेता यावी, म्हणून आम्ही जागे राहत असू; पण आजच्या भाषेतल्या "चौकीदारा'च्या शर्यतीत मी असेन असं मला वाटत नाही. असो, मोठ्या लोकांच्या गोष्टी आपण त्यांच्यावरच सोडूया.

शांत समजल्या जाणाऱ्या न्यूझीलंडमध्ये अलीकडंच झालेला गोळीबारदेखील अशीच अस्वस्थ करणारी घटना आहे. आज कोणताही देश दहशतवादापासून मुक्त असल्याचा दावा करू शकत नाही. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जगातल्या बहुतेक देशांनी दहशतवाद अनुभवला आहे. ज्या देशांमध्ये शांतता आहे, अशा देशांमध्येही भूमिगत हालचाली सुरू असतात. परिपक्व, विकसित समाजांमध्येही अशा काही सामाजिक किंवा वैयक्तिक विसंगती दाखवणाऱ्या घटना घडत असतात. अमेरिकेसारख्या देशातही काही ठिकाणी शाळांमध्ये बेछूट गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांमध्ये अनेक निष्पाप मुलं आणि इतर लोक बळी पडले आहेत. युरोपातल्या फ्रान्ससारख्या देशांमध्येही दहशतवाद्यांनी हल्ले घडवून आणले आहेत. कुठं एखादा धार्मिक गट किंवा एखादी जिहादी संघटना असेल, तर कुठं वर्ग संघर्ष किंवा एखादी डाव्या किंवा उजव्या विचारप्रणालीला मानणारी चळवळ असेल. सेमीऑटोमॅटिक शस्त्रांच्या साह्यानं न्यूझीलंडमधल्या दोन मशिदींमध्ये बेछूट गोळीबार करून पन्नास जणांचा बळी घेणारा हल्लेखोर अतिरेकी उजव्या विचारसरणीचा गौरवर्णीय आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियासह सर्वच लोकशाहीवादी देश या धक्‍क्‍यातून अजून सावरलेले नाहीत. आपल्या देशातही दहशतवादाचा आणि दहशतवाद्यांनी उभ्या केलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण सदैव सक्षम असायला हवं.

सोळा वर्षांपूर्वींची एक घटना मला आठवते. खालिस्तानच्या कथित सरकारचे स्वयंघोषित नेते डॉ. जगजीतसिंह चौहान त्यांच्या सर्व मागण्या सोडून देऊन अचानक भारतात परतले होते. त्यांच्या या निर्णयामागचं कारण समजावून घेण्याकरता मी त्यावेळी त्यांना भेटलो होतो. त्यावेळी ते मला म्हणाले होते ः ""भविष्यात विश्‍व दोन भागात विभागलं जाईल, मुस्लिम ब्लॉक विरुद्ध उरलेले सगळे.'' त्यांचे शब्द आजही माझ्या कानात घुमत आहेत. त्यांचं म्हणणं खरं ठरताना दिसत आहे. जग वेगानं त्या दिशेनं चाललं आहे, आणि गोळीबाराची अलीकडची घटनाही त्याच घातक घटनाक्रमाचा एक भाग आहे; पण त्याविषयी आपण पुन्हा केव्हातरी चर्चा करू.
ऐंशीच्या दशकातला पंजाबही खूप अस्वस्थ परिस्थितीत होता. काही दहशतवाद्यांनी एकत्र येऊन टोळ्या बनवल्या होत्या. खालिस्तान असा शब्द घेऊन त्या टोळ्यांना काहीतरी नावं दिली जायची. ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात पंजाबमध्ये अशा बत्तीस टोळ्या अस्तित्वात होत्या. यातले बरेच जण अपहरण झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांकडून खंडण्या घेणं, धमक्‍या देऊन पैसे उकळणं किंवा सुपाऱ्या घेऊन हत्या घडवून आणण्याचे उद्योग करत असत.

खेड्यापाड्यामधले बरेचसे लहान-मोठे गुन्हेगार या टोळ्यांमध्ये सामील झाले होते. दहशतवादाच्या नावाखाली गुन्हे करताना ते आधी सर्वसामान्य गुन्हेगार अशी ओळख पुसून एखाद्या गटाचा दहशतवादी अशी नवी ओळख मिळवायचे. मग त्यांच्याकडं आधुनिक शस्त्रं यायची. दुसरं म्हणजे एकदा दहशतवादी अशी ओळख मिळवल्यावर स्थानिक चौक्‍या किंवा ठाण्यांतले अधिकारी त्यांच्यापासून लांब राहायचे. दहशतवाद्यांची सर्वांनाच भीती वाटायची. ते अधिक पैसा मिळवायचे, त्यातून आणखी चांगली शस्त्रास्त्रं विकत घ्यायचे. दुसऱ्या बाजूला त्यांना धार्मिक पातळीवरही मान मिळायचा. त्यांच्या कुटुंबीयांनाही लोक घाबरायचे. भीतीपोटी त्यांनाही गावात मान मिळायचा. दहशतवादी टोळ्यांची संख्या अशा रितीनं वाढत गेली. एकदा दहशतवादी झाल्यावर मग काही समस्या उरायच्या नाहीत. कधीतरी सुरक्षा दलांबरोबर चकमकीचे प्रसंग यायचे; पण ग्रामीण भागात मका किंवा उसासारख्या उभ्या पिकांमध्ये या दहशतवाद्यांना लपायला भरपूर जागा असायची.

अशा टोळ्यांमधल्या लोकांचं पवित्र मंदिरांमध्येही येणं जाणं असायचं. पोलिस किंवा अन्य कोणत्याही सुरक्षा दलांच्या अडथळ्यांशिवाय ते तिथं राहू शकत असत. एखादं धार्मिक स्थळ सुरक्षा दलांच्या कायदेशीर अधिकारांपलीकडं कसं काय असू शकतं, हे मला अजूनही न उलगडलेलं कोडं आहे. एखाद्या गुन्हेगाराच्या येण्या-जाण्यामुळं एखाद्या धार्मिक स्थळाच्या पावित्र्याला जर धक्का लागत नसेल, तर अशा गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिस जर त्या धार्मिक स्थळी गेले, तर त्या स्थळाच्या पावित्र्याला नक्कीच धक्का पोचणार नाही, असं मला वाटतं. ज्युनिअर ऑफिसर असताना मी अनेकदा बैठकांमध्ये माझं हे मत मांडण्याचा प्रयत्न केला; पण कोणाकडूनच मला यावर समाधानकारक उत्तर मिळालं नाही. एकदा फक्त एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं मला "यंत्रणेचा भाग आहेस, तसाच राहा, उगाच नवे प्रश्न उभे करू नकोस,' असा "सल्ला' दिला. बऱ्याचदा रुढी आणि परंपरांसमोर कायदा आणि कर्तव्य यांना माघार घ्यावी लागते, हे समजल्यानं मीदेखील काहीशा अनिच्छेनंच तो सल्ला मान्य केला होता.

त्या काळात दहशतवादी पंजाब पोलिसांसमोर रोज नवी आव्हानं उभी करत होते. पोलिस आपल्यापरीनं त्यांना तोंड देत होते. अशाच दहशतवादी गटांपैकी एक गट अमृतसरच्या ग्रामीण भागात एकदम सक्रिय बनला होता. बिल्ला-रोशन गॅंग नावानं ओळखल्या जाणाऱ्या त्या टोळीत काही निर्ढावलेले, कट्टर लोक होते, तर काही लोक एखाद्यादुसऱ्या गुन्ह्यापुरते त्यांच्यात सामील व्हायचे आणि नंतर पुन्हा आपल्याआपल्या उद्योगाला लागायचे. हे असे कधीतरीच टोळीत सामील होणारे लोक एरवी त्यांच्यात्यांच्या गावात नेहमीप्रमाणंच राहत असत; पण त्यांच्या भागातले रस्ते, वाटा, आडवाटा त्यांना चांगल्या माहिती असायच्या. शिवाय गावातल्या महत्त्वाच्या लोकांशीही त्यांचा संपर्क असायचा. टोळीतल्या इतर लोकांना काही दिवस दडून राहण्याकरता जागेची व्यवस्था करायलाही या लोकांचा उपयोग व्हायचा.
मी सन 1985मध्ये अमृतसरला सिनिअर एसपी असताना मला पहिल्यांदा या बिल्ला-रोशन गॅंगची माहिती मिळाली. एक दिवस सकाळी मला, अमृतसरपासून वीस किलोमीटर असलेल्या एका गावाचे सरपंच जरनैलसिंग यांच्यावर दोन जणांनी गोळ्या झाडून त्यांना जखमी केल्याची माहिती मिळाली. जखमी सरपंचांना अमृतसरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. खबर मिळाल्यावर मी ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोचलो. जरनैलसिंग यांना खांद्यावर आणि छातीच्या वरच्या भागात गोळ्या लागल्या होत्या. मी त्यांना भेटलो, तेव्हा त्यांचा धोका टळला होता. त्यांनी मला सांगितलं ः ""घराच्या अंगणात बसलो असताना दोघा जणांनी कंपाऊंडमध्ये घुसून गोळ्या झाडल्या.'' जीव वाचवण्यासाठी ते घराबाहेर धावले; पण दोन गोळ्या त्यांना लागल्या. त्यांच्या पत्नीनं आणि नोकरांनी ओरडाओरडा केला; पण हल्लेखोर बाहेर उभ्या केलेल्या स्कूटरवरून पळून गेले. जरनैलसिंग यांनी हल्लेखोरांना ओळखलं होतं. ते त्याच वरपाल गावातले छोटेमोठे गुन्हे करणारे रेशमसिंग उर्फ बिल्ला आणि रोशनलाल होते. त्यांच्याविरुद्ध सरपंचांनी अमृतसरच्या सदर पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दिल्यानं त्यांचा सरपंचांवर राग होता. त्या भागाचे उपअधीक्षक आणि पोलिस ठाण्याचे अधिकारी हॉस्पिटलमध्येच होते. मी त्यांच्याबरोबर चर्चा केली. गुन्हेगारांना शोधण्यासाठी पथकं पाठवण्याच्या सूचना दिल्या आणि कार्यालयात परतलो.

काही तासांनी त्याच दोघांनी त्याच गावातल्या चुनीलाल नावाच्या किरकोळ व्यापाऱ्याची त्याच्याच दुकानासमोर गोळ्या घालून हत्या केल्याची माहिती मिळाली. चुनीलाल गावच्या पंचायतीचेही सदस्य होते. सरपंचांवर केला, तसाच इथंही अचानक हल्ला करून हल्लेखोर स्कूटरवरून पसार झाले होते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याआधीच चुनीलाल यांचा मृत्यू झाला होता. मी आधी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो. नंतर मी त्यांच्या गावात जाऊन पंचायतीच्या सदस्यांना भेटलो. ते सगळे खूप घाबरलेले होते. गाव तसं मोठं होतं. काही वेळातच डिस्ट्रिक्‍ट मॅजिस्ट्रेटही तिथं पोचले. मग आम्ही गावातल्या प्रमुख व्यक्तींबरोबर बैठक घेतली. मी गावात सशस्त्र पोलिसांची एक तात्पुरती पोलिस चौकी उभी करण्याचे आणि मोटारसायकलवरून गस्त घालण्याचे आदेश दिले. सर्व पंचायत सदस्यांना सावध राहण्याच्या आणि विनाकारण प्रवास वगैरे टाळण्याच्या सूचना दिल्या. गावातल्या काही वजनदार व्यक्तींना मी शस्त्र परवान्यांसाठी अर्जही करण्यास सांगितलं. स्वसंरक्षणासाठी त्यांना या शस्त्रांचा उपयोग करता आला असता.

डिस्ट्रिक्‍ट मॅजिस्ट्रेट आणि मी दुपारी साडेतीनच्या सुमारास आपापल्या कार्यालयात परतलो. एकाच दिवशी या गॅंगनं दोन गंभीर गुन्हे केले होते. लवकरात लवकर त्या टोळीचा छडा लावणं आवश्‍यक होतं. या प्रकरणी पुढची व्यूहरचना ठरवण्यासाठी संध्याकाळी मी सर्व अधीक्षक आणि उपअधीक्षकांची बैठक बोलावली. आम्ही चर्चा करत असतानाच कंट्रोल रूम अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं ः ""सर, बिल्ला-रोशन गॅंगनं वैरोवाल गावात दाना मंडी इथं अंदाधुंद गोळीबार केला आहे. अनेक लोक जखमी झाले आहेत. एसएचओ तिथं रवाना झाले आहेत, उपअधीक्षकही तिकडंच जात आहेत.'' मी कंट्रोल रूम अधिकाऱ्यांना सांगितलं ः ""मीदेखील डिटेक्‍टिव्ह आणि ऑपरेशन्सच्या अधीक्षकांना बरोबर घेऊन तिकडं जात आहे. तुम्ही तरण तारण आणि पट्टीच्या उपअधीक्षकांनाही तिकडं यायचा निरोप द्या.'' आणि वेळ न दवडता आम्ही त्या दिवसातल्या तिसऱ्या गुन्ह्याच्या ठिकाणाकडं रवाना झालो.

(घटनांमधली गावांची आणि व्यक्तींची नावं बदलली आहेत.)
(पूर्वार्ध)

Web Title: s s virk write in and out crime article in saptarang