बिल्ला रोशन गॅंग : 2 (एस. एस. विर्क)

एस. एस. विर्क
रविवार, 31 मार्च 2019

पळून गेलेल्या हल्लेखोरांचा माग पायांच्या ठशांवरून काढण्याचा प्रयत्नही आम्ही केला; पण तसा माग काढत आम्ही फार लांबवर जाऊ शकलो नाही. कदाचित हल्लेखोर फार दूर गेले नसतीलही; पण सुगावा काही लागत नव्हता. बिल्ला व त्याच्या गॅंगला बहुधा नशिबाची चांगलीच साथ होती. माझ्या टीममधले लोक, अधिकारी थोडे निराश झाल्याचं मला वाटू लागलं होतं.

पळून गेलेल्या हल्लेखोरांचा माग पायांच्या ठशांवरून काढण्याचा प्रयत्नही आम्ही केला; पण तसा माग काढत आम्ही फार लांबवर जाऊ शकलो नाही. कदाचित हल्लेखोर फार दूर गेले नसतीलही; पण सुगावा काही लागत नव्हता. बिल्ला व त्याच्या गॅंगला बहुधा नशिबाची चांगलीच साथ होती. माझ्या टीममधले लोक, अधिकारी थोडे निराश झाल्याचं मला वाटू लागलं होतं.

अमृतसर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वावरणाऱ्या बिल्ला-रोशन गॅंगनं वैरोवाल गावातल्या दाना मंडीमध्ये- धान्यबाजारामध्ये- बेछूट गोळीबार केल्याची खबर मिळाल्यावर मी "डिटेक्‍टिव्ह आणि ऑपरेशन्स'च्या अधीक्षकांना बरोबर घेऊन तातडीनं वैरोवालकडं रवाना झालो. बिल्ला-रोशन गॅंगचं हे एकाच दिवसातलं तिसरं शूटआउट होतं. त्या दिवशी सकाळी बिल्ला-रोशननी वरपाल गावाच्या सरपंचांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. सरपंचांचं दैव बलवत्तर म्हणून ते वाचले; पण दुसऱ्या प्रकरणात गावातच दुकान असणारे आणखी एक पंचायत सदस्य मात्र गोळीबाराला बळी पडले होते.

हिवाळा असल्यानं त्या दिवसांत सूर्यास्त लवकर होत असे. आम्ही वैरोवालकडं जायला निघालो त्या वेळी अंधार पडायला लागला होता. "डिटेक्‍टिव्ह आणि ऑपरेशन्स'चे अधीक्षक माझ्याच गाडीत होते. दहशतवाद्यांबरोबर चकमक झाली तरी तिला तोंड देता येईल इतका फौजफाटा आमच्याबरोबर होता. सव्वा ते दीड तासाच्या प्रवासात आमच्या बोलण्यात मुख्यतः या नव्या आव्हानाचाच विषय होता. या टोळीनं एकाच दिवसात तीन गंभीर गुन्हे केले होते. तपासाच्या दृष्टीनं काही उपयुक्त दुवे सापडले तर रात्रीतूनच काय काय करता येईल आणि येत्या काही दिवसांत या गॅंगला जेरबंद करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांच्या नियोजनाविषयीही आम्ही तपशिलानं चर्चा केली. बिल्ला-रोशन गॅंगला लवकरात लवकर वेसण घालायला हवी होती, अन्यथा ते गुन्हे करत राहणार आणि आम्ही फक्त त्यांचा पाठलाग करत राहणार.

वैरोवालच्या धान्यबाजारात आम्ही पोचलो तेव्हा सगळीकडं सन्नाटा पसरला होता. लोक अजूनही धक्‍क्‍यातून सावरले नव्हते. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या मारुती कारमधून हल्लेखोर आले होते. त्या कारची नंबरप्लेट काढून टाकलेली होती. बाजारात मध्यवर्ती ठिकाणी कारमधून उतरलेल्या तिघांनी जॅकेटमध्ये लपवलेल्या छोट्या शस्त्रांमधून बेछूट गोळीबार केला होता. मंडीमध्ये एरवी खूप लोक असायचे; पण त्या दिवशी संध्याकाळी गर्दी जरा कमी होती. गोळीबारात तीन जण ठार झाले होते आणि सात जण जखमी झाले होते. तिथल्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलेल्या जखमींपैकी दोघांची स्थिती चिंताजनक होती. त्यांना अमृतसरच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. अचानक झालेल्या गोळीबाराच्या आणि घाबरलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी केलेल्या धडपडीच्या खुणा धान्यबाजारात सगळीकडे विखुरलेल्या होत्या. अनेक ठिकाणी रक्ताचे डाग पडले होते, चपलांचा खच पडला होता. जीव वाचवण्यासाठी पळताना घसरून पडल्यानंही अनेक जणांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. जखमींपैकी दोघं आधी वरपालमध्ये कामाला होते, त्यांनी बिल्ला आणि रोशनला ओळखले होते. गोळीबार करताना दोघांनीही खलिस्तानवादी घोषणा दिल्या होत्या. रोशननं खालिस्तानवादी घोषणा देणं थोडं विचित्र होतं. ते दोघंही दहशतवाद्यांच्या कंपूत सामील होऊ इच्छित होते, असं दिसत होतं. त्या काळात "पंथक कमिटी' नावाची एक उच्चस्तरीय संस्था अशा लोकांना आश्रय द्यायची आणि सगळ्या दहशतवादी कारवायांवर या "पंथक कमिटी'चं लक्ष असायचं.

गोळीबारानंतर ती पांढरी गाडी काही किलोमीटर अंतरावर खडूरसाहेब रस्त्यावर काही जणांनी पाहिली होती; पण नंतर ती खेड्यापाड्यातल्या रस्त्यांवर गायब झाली.
मी सीआरपीएफच्या सेक्‍टर कमांडरना आणि पोलिस उपअधीक्षकांना (डीएसपी) त्या सगळ्या परिसरात रात्री लगेच आणि पुन्हा सकाळी शोधमोहीम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. गावातल्याच रुग्णालयात एका स्वतंत्र खोलीत आम्ही चर्चा करत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळपासून पायी गस्त घालणाऱ्या पोलिस टीम्सनी त्या भागातल्या शेतांची व फार्महाऊसची आणि मोटारसायकलवर गस्त घालणाऱ्या टीम्सनी त्या भागाला जोडणाऱ्या सगळ्या रस्त्यांची, आतल्या भागांतून मुख्य रस्त्याला मिळणाऱ्या रस्त्यांची तपासणी करायची होती. मोठ्या रस्त्यांवर योग्य ठिकाणी तपासणी-नाकी उभारून काही टीम्स वाहनातूनही गस्त घालणार होते. वेगवेगळ्या टीम्सना वेगवेगळे भाग आणि त्या टीम्सच्याही जबाबदाऱ्या योग्य अधिकाऱ्यांकडं वाटून दिल्या. मी स्वतःदेखील या शोधमोहिमेत सहभागी होणार होतो. सर्च ऑपरेशनदरम्यान दुपारच्या जेवणातही फार वेळ जाऊ नये म्हणून अधिकाऱ्यांसह सगळ्यांना पॅक लंच देण्याच्याही सूचना दिल्या.

दुसऱ्या दिवशी मी माझ्या सुरक्षारक्षकांबरोबर सकाळी लवकरच निघालो. दुपारचं जेवण आम्ही पॅक करून घेतलं होतं. आठ वाजल्यापासूनच सगळीकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू झाल्याचे मेसेज यायला लागले. दिवसभर त्या परिसरातली मोठी फार्महाउसेस व अन्य ठिकाणी आम्ही शोध घेतला. रात्रीही गस्त आणि वाहनांची तपासणी करण्यात आली होती; पण फार काही हाती लागलं नाही.
हल्लेखोरांनी वापरलेली पांढरी मारुती कार हा आणखी एक दुवा होता; पण ती गाडी शोधताना खूप फसव्या माहितीचा सामना करावा लागला. मात्र, आम्हाला मिळालेला माहितीचा प्रत्येक तुकडा आम्ही नेटानं तपासत होतो. त्यातूनही फार काही मिळालं नाही. खडूरसाहेबच्या रस्त्यावर स्कूटरवरून आलेल्या दोघांनी आपल्याला अडवून बंदुकीच्या धाकानं आपली पांढरी मारुती कार पळवून नेल्याची तक्रार एका व्यक्तीनं केली होती. कार पळवून नेणाऱ्या दोघा तरुणांची वर्णनंही त्या कारमालकाकडून मिळाली होती. त्यातलं एक वर्णन बिल्लाशी जुळत होतं; पण दुसऱ्या संशयिताची ओळख पटत नव्हती. दिवसभार चाललेल्या या ऑपरेशनमधून नवीन काही मिळालं नव्हतं.

त्या परिसरात माझे काही खबरी होते; पण त्यांच्याशी मी उघडपणे संपर्क साधू शकत नसल्यानं मी त्यांना अमृतसर इथं भेटण्याविषयी निरोप पाठवला. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी भेटलो. बिल्ला-रोशन गॅंगला पकडण्यासाठी जी काही मदत त्यांच्याकडून मिळेल ती मला हवी होती. माहिती देण्यासाठी त्यांना आकर्षक बक्षिसं मिळतील याबाबत मी त्यांना आश्वस्त केलंच; पण त्यांच्यापैकी काहींना रोजच्या खर्चासाठी पैसेही दिले. पोलिसांसाठी काम करणारे हे मुखबीर माहिती काढण्यासाठी बराच वेळ घालवतात. काही वेळा ते त्यांचं नेहमीचं कामही बाजूला ठेवतात. परिणामी, त्यांचा रोजगार बुडतो. अशा वेळी मग त्यांच्या आणि क्वचित त्यांच्या कुटुंबीयांच्या रोजच्या गरजा भागतील याची काळजी घ्यावी लागते. माझ्या या सगळ्या खबऱ्यांनी मला "शक्‍य ते सगळे प्रयत्न करू' असं आश्‍वासन दिलं.

दुसऱ्या दिवशी शेजारच्या गावातल्या एका हिंदू व्यापाऱ्याला त्याच्या घरात टाकलेलं एक पत्र सापडलं. "खालिस्तानच्या लढाईसाठी शस्त्रं विकत घेण्यासाठी दहा लाख रुपये द्यावेत,' अशी मागणी त्या पत्रात केलेली होती. मागणीप्रमाणे पैसे दिले नाहीत तर त्याला गोळ्या घालण्याची धमकीही त्या पत्रात होती. तसा सुस्थितीत असणारा तो व्यापारी आणि त्याचे कुटुंबीय या पत्रामुळे घाबरून गेले होते आणि पंजाब सोडण्याच्या तयारीत होते. मी त्यांना धीर दिला. चोवीस तास संरक्षण देता येईल असं त्यांना सांगितलं; पण ते सगळे खूपच घाबरलेले होते. त्याच परिसरातल्या एका मोठ्या शीख शेतकऱ्यालाही असंच धमकीचं पत्र मिळालं होतं. त्याच्याकडेही दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. पैसे कधी, कुठं आणि कसे द्यायचे याविषयी नंतर कळवू, असंही त्या पत्रात म्हटलं होतं. "पोलिसांना कळवलं तर सगळ्या घरादाराला संपवून टाकू,' अशी धमकीही पत्रातून देण्यात आली होती. या लोकांवरही आम्ही नजर ठेवली; पण अजूनही ठोस असं काहीच हाती लागत नव्हतं.

त्याच गावातल्या आणखी एका व्यापाऱ्यालाही खंडणी मागणारं पत्र मिळाल्याचं माझ्या एका खबऱ्याकडून एके दिवशी मला समजलं. बिल्ला आणि रोशननं त्या व्यापाऱ्याला निर्जन ठिकाणी असलेल्या एका गुरुद्वारात बोलावलं होतं, असा त्याला संशय होता. त्या परिसरात जवळपास अर्धा किलोमीटर अंतरातल्या पिकांची नुकतीच कापणी झाली होती. कुणालाही संशय येणार नाही, अशा पद्धतीनं त्या भागाची पाहणी करण्यास मी माझ्या खबऱ्याला सांगितलं. काही दिवसांनी तो पुन्हा मला भेटला. एका गॅंगला त्या भागात खंडणीचे पैसे वसूल करताना पाहिल्याचं तो सांगत होता; पण ती टोळी अत्यंत सावधपणे हालचाली करत होती. दरवेळी ते त्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळा बदलायचे. वेगवेगळी वाहनं वापरायचे. कधी स्कूटरवर तर कधी पायी फिरायचे. एकदा त्यांनी ट्रॅक्‍टर-ट्रॉलीही वापरली होती. आणखी एका खबऱ्याकडूनही बियास नदीच्या किनाऱ्यालगत या टोळीच्या हालचाली सुरू असल्याची पक्की माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, ही गॅंग वारंवार जागा बदलत होती. आठवडाभर आमचे हे प्रयत्न सुरू राहिले. अचानक या टोळीनं धोटियां गावच्या सरपंचाची हत्या केल्याची माहिती मिळाली. गावाजवळच स्कूटरवरून जात असताना या टोळीनं सरपंचांना लक्ष्य बनवलं होतं. धोटियां गावात त्या सरपंचांना मानणारे पुष्कळ लोक होते. सरकारतर्फे मी त्यांना संरक्षण देऊ करूनही, स्वभाव धाडसी असल्यानं त्यांनी स्वतःसाठी संरक्षण घेतलं नव्हतं. त्याची किंमत त्यांना मोजावी लागली होती. या टोळीनंच त्यांची हत्या केली होती.

काही दिवसांनी एका शाळेत शूटआउट झाल्याची माहिती मिळाली. स्कूटरवर आलेल्या तीन तरुणांनी शिक्षकांवर गोळीबार केला होता. विद्यार्थ्यांनी आरडाओरडा करत दगडफेक सुरू केल्यानं हल्लेखोरांना काढता पाय घ्यावा लागला होता. एक शिक्षिका आणि दोन शिक्षक अशा तिघांना गोळ्या लागल्या होत्या. सुदैवानं कुणी मृत्युमुखी पडलं नव्हतं. सीआरपीएफचं पथक थोड्याच वेळात त्या ठिकाणी पोचले आणि त्यांनी हल्लेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; पण काही अंतर गेल्यावर हल्लेखोरांची स्कूटर जणू काही अदृश्‍य झाली! आणखी कुमक पोचल्यावर त्यांनी आजूबाजूला तपास केला तेव्हा एका मक्‍याच्या शेतात ती स्कूटर सापडली. स्कूटर तिथंच सोडून हल्लेखोर पळून गेले होते. आम्ही स्कूटरचा उपयोग करून सापळा रचण्याचा विचार केला; पण आजूबाजूला खूप गावकरी होते. आम्हाला स्कूटर सापडल्याचं त्यांनी पाहिलं होतं. पळून गेलेल्या हल्लेखोरांचा माग पायांच्या ठशांवरून काढण्याचा प्रयत्नही आम्ही केला; पण त्या ठशांचा माग काढत आम्ही फार लांबवर जाऊ शकलो नाही. कदाचित हल्लेखोर फार दूर गेले नसतीलही; पण सुगावा काही लागत नव्हता. बिल्ला व त्याच्या गॅंगला बहुधा नशिबाची चांगलीच साथ होती. माझ्या टीममधले लोक, अधिकारी थोडे निराश झाल्याचं मला वाटू लागलं होतं.
(क्रमशः)
(घटनांमधल्या स्थळांची नावं बदललेली आहेत.)

Web Title: s s virk write in and out crime article in saptarang