बिल्ला-रोशन गॅंग : 3 (एस. एस. विर्क)

एस. एस. विर्क
रविवार, 7 एप्रिल 2019

सायंकाळचे चार वाजत आले होते. अनेक निरपराध लोकांचे जीव घेणाऱ्या आणि कल्पनेपलीकडली दहशत माजवणाऱ्या बिल्लाला आज काहीही करून पकडायचं होतं. त्याच वेळी दहशतवादी आणि सीआरपीएफदरम्यान झालेल्या गोळीबाराचे आवाज ऐकू आले...

सायंकाळचे चार वाजत आले होते. अनेक निरपराध लोकांचे जीव घेणाऱ्या आणि कल्पनेपलीकडली दहशत माजवणाऱ्या बिल्लाला आज काहीही करून पकडायचं होतं. त्याच वेळी दहशतवादी आणि सीआरपीएफदरम्यान झालेल्या गोळीबाराचे आवाज ऐकू आले...

एकामागोमाग एक गुन्हे करत सुटलेल्या बिल्ला-रोशन गॅंगचा तपास करत असतानाच थंडीच्या दिवसात बेलापूर गावाजवळ एका निर्जन ठिकाणी असणाऱ्या गुरुद्वाराच्या मागं असलेल्या खोल्यांच्या बाहेर बिल्ला व रोशनला उन्हात बसलेलं पाहिल्याचं मला माझ्या खबऱ्याकडून कळलं होतं. तपास पुढं नेण्यासाठी आम्हाला या गुरुद्वाराची मदत होऊ शकली असती. लोक तिथं येऊन बिल्ला-रोशनला खंडणीच्या रकमा द्यायचे, असं त्या खबऱ्याचं म्हणणं होतं. त्या भागात आमची नियमित गस्त सुरूच असायची. अशाच एका गस्तीच्या वेळी मी त्या भागाची भौगोलिक रचना पाहून घेतली. त्या गुरुद्वाराकडं जाणारे सगळेच रस्ते कच्चे होते. मागच्या शेतात भरपूर उंचीची पिकं असली तरी समोरच्या शेतात मात्र खुरटीच पिकं होती. लांब पल्ल्याची टेलिस्कोपिक रायफल वापरून बाहेर बसणाऱ्या दहशतवाद्यांवर हल्ला करता येईल अशी एकच सोईची जागा आम्हाला सापडली. जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर मक्‍याच्या पिकात दडलेल्या त्या जागेत ऑलिव्ह ग्रीन गणवेशातले जवान तैनात करून दहशतवाद्यांवर लक्ष ठेवणं सोईचं होतं; पण त्या अंतरावरून दहशतवाद्यांना टिपायचं म्हटलं तर विचलित न होता काम करणारा एक चांगला नेमबाज असायला हवा होता. मात्र, आमच्याकडं दुसरा पर्याय नसल्यामुळे आम्ही सापळा रचायचा निर्णय घेतला.

आम्ही तसाच दुसरा परिसर निवडून तिथं गोळीबाराचा सराव केला; पण आमच्या प्रयत्नांना कितपत यश येईल याची काहीच खात्री देता येणं शक्‍य नव्हतं. आमच्याकडं लांब पल्ल्याच्या दोन टेलिस्कोपिक रायफली होत्या. कमांडोज्‌ची एक छोटी टीम करून त्यांच्यासाठी पाच किलोमीटर अंतरावरच्या एका गावात आम्ही छोट्याशा फार्महाउसमध्ये जागाही करून घेतली होती. काही दिवस कमांडोज्‌नी फक्त रात्रीच्या वेळीच बाहेर पडायचं, दिवसा फार्महाउसमध्येच लपून राहायचं अशी आमची योजना होती. त्या कमांडोज्‌नी त्या सगळ्या परिसराची पाहणी केली. एक दिवस ते टोळीवाले ऊन्ह खात बसले असताना दोन नेमबाजांनी बिल्ला-रोशनच्या दिशेनं गोळ्या झाडल्या. प्रत्युत्तरादाखल समोरूनही लगेच गोळीबार सुरू झाला. बाजूच्या खोल्यांमधून आणखी चारजण बाहेर आले आणि त्यांनी आमच्या जवानांवर एके -47 रायफलींमधून गोळीबार करायला सुरवात केली. आमचे जवान खुल्या मैदानात होते. त्यांनी थोडं पुढं सरकायचा प्रयत्न केला; पण दोन जवान गोळ्या लागून जखमी झाले. बाकीच्या टीम्सनी तातडीनं चकमकीच्या ठिकाणी धाव घेतली; पण परिसर दुर्गम असल्यानं त्यांना पोचायला वेळ लागला. आमच्या टीम्स पोचेपर्यंत दहशतवादी मागच्या बाजूच्या उंच पिकांचा फायदा घेऊन तेथून निसटले होते. जखमी झालेल्या दोघा जवानांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये हलवून, आमच्या शोधपथकांनी पळून गेलेल्या टोळीचा माग काढायला सुरवात केली. माग काढताना सापडलेल्या रक्ताच्या डागांवरून दहशतवाद्यांपैकी किमान एक जण आमच्या गोळीबारात जखमी झाल्याचं आमच्या लक्षात आलं. निसटून जाताना दोन स्कूटर पळवून ते नदीकाठाकडं गेले होते. नदीकाठच्या "मंड' परिसरातून नदी ओलांडून ते पसार झाले होते. श्वानपथकांसह आणखी जवान घेऊन आम्ही नदीचे दोन्ही काठ पिंजून काढले; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

आमच्या गोळीबारात रोशनच्या पोटाला गोळी लागून तो जखमी झाला आणि फिरोजपूरच्या दिशेनं पळून गेल्याचे आम्हाला एक-दोन दिवसांनी समजलं. थोडं बरं वाटायला लागल्यावर दिल्लीला जाऊन तिथं त्यानं वैद्यकीय उपचार घेतल्याचं दिल्लीतल्या काही खबऱ्यांकडून समजलं. त्यांना रोशनला दिल्लीत पाहिलं होतं. बिल्ला-रोशन टोळी त्यानंतर काही दिवस निष्क्रिय झाली होती. अर्थात एक टोळी निष्क्रिय झाल्यानं फारसा फरक पडत नव्हता. कारण, त्याच काळात इतरही टोळ्या होत्या, वेगवेगळ्या भागात लूटमार, दरोडे, शूटआउट, खूनखराबा या रोजच्याच घटना झाल्या होता. किमान अमृतसर जिल्ह्यात तरी ही स्थिती होती. अतिरेक्‍यांना हुसकावून बाहेर काढण्यासाठी आम्ही "मंड' भागात हेलिकॉप्टर वापरून एक "ऑपरेशन' करण्याची तयारी चालवली होती. मी त्या "ऑपरेशन'ची तयारी करत होतो. ते सर्व एखाद्या युद्धासारखंच होतं. त्या "ऑपरेशन'विषयी मी आपल्याला नंतर केव्हातरी सांगेन.

काही दिवसांनंतर बिल्ला अचानक पुन्हा अवतरला. आमच्या कारवाईमुळे आपले दिवस भरल्याची जाणीव त्याला झाली होती. तो अत्यंत खुनशी आणि निर्दयी होता. त्याच्या क्रूर कृत्यांमधून स्त्रिया आणि मुलंही सुटली नव्हती. यावेळी त्यानं एक राक्षसी योजना आखली होती. कारमधून जाताना इतर गाड्यांना किंवा बसला ओव्हरटेक करताना बिल्ला आणि त्याची टोळी त्या गाड्यांवर बेछूट गोळीबार करायची. या हल्ल्यांमध्ये अनेक बसचालक, प्रवासी जखमी झाले, मारले गेले. या दहशतीमुळे अमृतसर जिल्ह्याच्या त्या भागातल्या कितीतरी बसचालकांनी नोकऱ्या सोडल्या, लोक प्रवास करेनासे झाले. लोकांमध्ये बिल्ला या नावाची दहशत होती. आम्ही सतत त्याच्या मागावर होतो; पण त्याला पकडण्यात आम्हाला यश येत नसल्यानं आता पोलिसांवरही टीका व्हायला लागली होती. या टोळीला वेसण घालण्यासाठी आम्ही विशेष कृती दलं तयार केली होती. मी स्वतः त्यांच्या बरोबर फिरत होतो. बिल्लाच्या टोळीबरोबर आमच्या अनेकदा चकमकी झाल्या; पण ग्रामीण भागातल्या रस्त्यांची त्याला आमच्यापेक्षा जास्त चांगली माहिती असल्यानं त्याचा पाठलाग करणं दुरापास्त होऊन बसत असे. आम्ही काही अंतरांपर्यंत त्याचा पाठलाग करायचो; पण तो निसटून जायचा. तो बदला घेईल या भीतीनं आम्हाला लोकांकडून फारशी माहितीही मिळत नव्हती. हे आता उंदरा-मांजराच्या खेळासारखे झाले होते.
मास्टर तीर्थराम हे तरणतारणमधल्या फतेहबादमध्ये राहणारे एक निवृत्त शिक्षक. त्यांच्या परिसरात त्यांना चांगला मान होता. या परिसरातही बिल्ला-रोशन टोळीच्या कारवाया चालत असत. बिल्ला आणि त्याच्या टोळीनं एक दिवस मास्टरजींच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला झाला तेव्हा ते व्हरांड्यात उभे होते. जीव वाचवण्यासाठी ते घरात पळाले. जवळच गस्त घालणाऱ्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एका जीपमधले जवान घरातल्या लोकांचा आरडाओरडा ऐकून मास्टरजींच्या घराकडं धावलं. पुढच्या दारातून पळून जाणं शक्‍य नसल्यानं, बरोबर आणलेली गाडी सोडून बिल्ला त्याच्या साथीदारांसह मागच्या दारातून बाहेर पडला. मागच्या रस्त्यावरून एक स्कूटर जबरदस्तीनं पळवून ते निसटले. वायरलेसवर या घटनेसंबंधी समजल्यावर आम्हीही बिल्लाच्या पाठलागावर निघालो. सोडून दिलेली स्कूटर आम्हाला थोड्याच अंतरावर सापडली. स्कूटर सोडून त्यांनी रस्त्यावरून जाणारी लाल रंगाची एक मारुती कार पळवली होती. आम्ही तातडीनं वायरलेसवरून लाल मारुती कारबद्दल संदेश दिला आणि पंधरा ते वीस किलोमीटर परिसरातल्या पोलिस आणि सीआरपीएफच्या युनिट्‌सनाही आणखी कुमक पाठवण्यास सांगितलं. आता वेगवेगळ्या रस्त्यांवर जितकी वाहनं हल्लेखोरांच्या मागावर होती तितकीच वाहनं समोरूनही त्यांच्या शोधात निघाली होती; पण त्या लाल मारुती कारचाही माग अचानक सुटला. गाडी दिसेनाशी झाल्यानं मी आमच्या शोधपथकांना नजरेच्या टप्प्यात राहून विखुरण्यास सांगितलं. विखुरल्यामुळे अधिक परिसरात शोध घेणं शक्‍य होतं. हल्लेखोरांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, बिल्लाचा एक साथीदार पळताना दिसला. आम्ही त्याचा पाठलाग सुरू केला; पण पळता पळता तो गोळ्या झाडत होता. पिकांची उंची कमी होत होती त्या भागात आम्ही मोर्चे लावले. बिल्लाचा सहकारी, त्याचं नाव अंग्रेजसिंग, त्याच्या जवळचा दारूगोळा पुरवून पुरवून वापरायचा प्रयत्न करत होता. उंच पिकांमधून उघड्यावर आल्यावर पळण्याच्या प्रयत्नात असतानाच गोळी लागून तो खाली कोसळला. खाली पडल्यावरही तो एकेक करून गोळ्या झाडत होता; पण आता त्याच्या जवळच्या गोळ्याही संपत आल्या होत्या. त्याला तिथंच गोळ्या घालाव्यात असं आमच्या अधिकाऱ्यांना वाटत होतं. म्हणजे बिल्लाही नरमला असता आणि त्याच्या दहशतीखाली रहाणाऱ्या गावकऱ्यांनाही दिलासा मिळाला असता.

एखाद्या दहशतवाद्याला मारण्यापेक्षा त्याला जिवंत पकडणं अधिक महत्त्वाचं असतं, हे मी अनुभवातून शिकलो होतो. त्याला पकडून आम्ही बिल्लाच्या लपायच्या जागा, त्याला मदत करणारी माणसं या सगळ्याविषयी माहिती मिळवू शकलो असतो. माझ्या गाडीत नेहमी एक छोटा लाउडस्पीकर असायचा. मी त्या लाउडस्पीकरवरून त्याला सांगितलं ः "मी अमृतसरची सीनिअर एसपी बोलतो आहे, त्यानं गोळीबार थांबवून शरण यावं म्हणजे आम्ही त्याला वैद्यकीय मदत देऊ शकू.' त्याचा आधी माझ्यावर विश्वास बसला नाही, मग मी त्याला त्याची एके-47 डोक्‍यावर धरायला सांगितली. त्यानं तसं केल्यावर मी त्याला ती बाजूला फेकण्यास सांगितलं. तेही त्यानं केलं. मग मी त्याला त्याचं पिस्तूलही फेकून द्यायला सांगितलं. मग त्याला बोलण्यात गुंतवून ठेवत आम्ही त्याच्या दिशेनं चालू लागलो. दरम्यान आमच्या दोन जवानांनी सरपटत जाऊन त्याला पकडलं आणि त्याची गठडी वळली.

अंग्रेजसिंगच्या उजव्या पायाला गोळी लागल्यानं त्याला चालता येत नव्हतं. हल्ल्यापूर्वी बेलापूर गावातल्या एका फार्महाउसमध्ये गाडी ठेवून ते मक्‍याच्या शेतात ते सगळे लपून बसले होते. रामसिंग नावाच्या दुसऱ्या एका साथीदाराबरोबर बिल्ला नदीकाठानं शक्‍य तितक्‍या लवकर रूरका इथं पोचण्याच्या प्रयत्नात होता, असं त्यानं सांगितलं. ग्रामीण भागात गुरांचं खाणं म्हणून गव्हाच्या तुसाचा सर्रास वापर होतो, त्यामुळे त्याचे ढीग लावून ठेवलेले असतात. बेलापूरमध्ये अशाच एका ढिगात बिल्लानं गाडी लपवली होती. त्या फार्महाउसचा मालक भीतीमुळे आधीच गायब झाला होता. खरंतर गावकरी हे पोलिस आणि दहशतवादी दोघांनाही घाबरायचे, ते त्यापैकी कुणालाच "नाही' म्हणू शकत नसत. दहशतवाद्यांनी जर रात्रीच्या वेळी येऊन जेवण आणि राहायला जागा मागितली तर त्यांची मागणी पूर्ण करण्याखेरीज त्या बिचाऱ्या लोकांसमोर दुसरा पर्याय नसे. नंतर दहशतवाद्यांना आश्रय दिला म्हणून पोलिसही त्यांना त्रास द्यायचे. अंग्रेजसिंग आम्हाला त्या फार्महाउसमधल्या एका खोलीत घेऊन गेला. तिथं आम्हाला दोन एके-47 रायफली, चार लहान शस्त्रं व काही गोळ्या सापडल्या; पण बिल्ला मात्र निसटून बियास नदीच्या दिशेनं पळून गेला होता.
रामसिंगबरोबर बिल्ला रूरका गावाच्या दिशेनं गेल्याचं समजल्यानं आम्ही "मंड' भागातल्या आमच्या लोकांना सावध केलं. अंग्रेजसिंगला वैद्यकीय उपचारांसाठी अमृतसरला पाठवून देण्यात आलं. मी स्वतः बिल्लाच्या मागावर रूरकाच्या दिशेनं निघालो. सायंकाळचे चार वाजत आले होते. अनेक निरपराध लोकांचे जीव घेणाऱ्या आणि कल्पनेपलीकडली दहशत माजवणाऱ्या बिल्लाला आज काहीही करून पकडायचं होतं. त्याच वेळी दहशतवादी आणि सीआरपीएफदरम्यान झालेल्या गोळीबाराचे आवाज ऐकू आले. सीआरपीएफचा एक जवान त्या चकमकीत जखमी झाला होता; पण त्याच्या जिवाला धोका नव्हता.

बिल्ला सापडेल म्हणून सात जवानांना बरोबर घेऊन मी रूरकाच्या दिशेनं चालत निघालो तेव्हा सूर्य मावळायला सुरवात झाली होती. थोड्या वेळानं अधूनमधून गोळीबाराचे आवाज ऐकू यायला लागले. आम्ही चालण्याचा वेग वाढवला. अचानक मला दोन जण नदीच्या दिशेनं जाताना दिसले. एका उंच जागेवरून त्या दोघांनी नदीत उडी मारली. पलीकडच्या काठावरच्या कपूरथळा जिल्ह्याच्या दिशेनं ते पोहू लागले. मी त्यांच्या दिशेनं गोळ्या झाडल्या; पण ते माझ्यापासून जवळजवळ एक किलोमीटर अंतरावर होते. पलीकडच्या काठावर असलेल्या पोलिसांना मी सावध केलं; पण बिल्ला पुन्हा एकदा नशीबवान ठरला. बियास नदीच्या प्रवाहात तो आणि त्याचा साथीदार दिसेनासे झाले. आम्ही सगळे खूप थकलो होतो. दुपारच्या जेवणाचाही पत्ता नव्हता. आम्हाला चहा-पाव मिळाला तो जवळच्या कंपनी मुख्यालयात परतल्यावर. तसा तो दिवस आमच्यासाठी बरा ठरला होता. बिल्लाचा एक प्रमुख साथीदार आमच्या हाती लागला होता. त्याच्याकडून आम्हाला भरपूर माहिती मिळू शकली असती. आम्ही त्यांच्याकडची बरीच शस्त्रंही जप्त केली होती; पण मला नक्की माहीत होतं, की बिल्ला परतणार आणि आम्हाला त्याच्या क्रौर्याचा सामना करावाच लागणार.
क्रमशः

(या घटनेतल्या काही व्यक्तींची आणि स्थळांची नावं बदलण्यात आलेली आहेत.)

Web Title: s s virk write in and out crime article in saptarang