पोलिसी नोंदी : तपासाची किल्ली (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

सात-आठ वर्षांपूर्वीच्या त्या घटनेचा उल्लेखही कुटुंबातल्या कुणाच्याच बोलण्यात आला नव्हता. मी त्यांना विचारलं ः ""तुम्ही आम्हाला ही गोष्ट काल सकाळी का नाही सांगितलीत?'' त्यावर अब्दुलशेठ म्हणाले ः ""खरंच माफ करा आम्हाला. काल सकाळी घडलेल्या त्या घटनेमुळे आम्ही सगळेच खूप अस्वस्थ होतो, त्यामुळे लक्षातच आलं नाही.''

चौकशीसाठी बाहेर गेलेले आमचे अधिकारी, इतर लोक दोन-तीन तासांनंतर परत आले. आमचे सहायक आयुक्त, काही पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक व माहीतगार कर्मचारी असे आम्ही सगळे एकत्र बसून बरीच डोकेफोड केली; पण निश्‍चित असं काहीच हाती लागलं नाही. मग आम्ही पुन्हा दुसऱ्या दिवशी भेटायचे ठरवलं आणि आपापल्या कामाला लागलो.

मी माझ्या कार्यालयात आलो. रोजचं काम होतंच; पण त्या इराणी कुटुंबाचा विचार मनातून जात नव्हता. एका क्षणी पोलिसांनी त्यांच्यावरच अविश्वास दाखवल्यानं त्यांना खूप वाईट वाटलं होतं. काही जण तर अगदी रडवेले झाले होते. मला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटली. एकदम मला काय वाटलं कोण जाणे; पण मी पोलिस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की फोरेन्सिक तपासणी संपवल्यावर मला सांगा... कारण, मला एकट्यालाच ती जागा पुन्हा पाहायची होती. चोरटे कसे आले असतील आणि कसे बाहेर पडले असतील ते समजून घेण्यासाठी मी पुन्हा त्या घरी गेलो. चारही बाजूंनी पुन्हा घराची तपासणी केली; पण फार काही हाताला लागलं नाही. चोरीचा तपास लागेल अशी आशा एव्हाना त्या कुटुंबानं सोडून दिल्यासारखीच होती. त्या कुटुंबातले बरेच जण हातात तस्बीह (माळ) घेऊन इबादत (प्रार्थना) करत होते. मी माझ्या परीनं त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आणि "अल्लाह ने चाहा तो सब ठीक हो होगा,' असं सांगून कार्यालयात परतलो.

दिवस संपल्यावरही या प्रकरणात आम्हाला कोणताही दुवा सापडलेला नव्हता. एमओबी किंवा खबऱ्यांकडूनही काहीच माहिती मिळाली नव्हती. तपासाची दिशा बदलली पाहिजे, असं मला वाटू लागलं. त्या घरफोडीचा विचार मनातून जात नव्हता. रात्री घरात बसलो असताना माझ्या मनात लष्कर पोलिस ठाण्यातल्या जुन्या नोंदी पाहण्याचा विचार आला. आमच्याकडं प्रत्येक पोलिस ठाण्यात व्हिलेज क्राईम नोटबुक (व्हीसीएन) नावाचं एक रेकॉर्ड असायचं. मी दुसऱ्या दिवशी लष्कर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना ते रेकॉर्ड काढून ठेवायला सांगितलं. "एक चांगला हुशार कॉन्स्टेबल मदतीला द्या', असाही निरोप दिला. या व्हीसीएनच्या एका भागात घडलेल्या गुन्ह्यांचे तपशील नोंदवलेले असतात आणि दुसऱ्या एका भागात उघडकीस आलेल्या गुन्ह्यांचा तपशील नोंदवलेला असतो. मला या सगळ्या नोंदी तपशीलवार पाहायच्या होत्या.

दुसऱ्या दिवशी दुपारी उशिरा मी पोलिस ठाण्यात पोचलो तेव्हा ठाणे अंमलदारांनी वीसेक रजिस्टर्स काढून ठेवली होती. पुणे कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या हद्दीतल्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या वॉर्डवार नोंदी केलेल्या होत्या. पहिल्या सहा वॉर्डांमध्ये काहीच उपयुक्त माहिती मिळाली नाही; पण सातव्या विभागात एक नोंद आढळली. ती नोंद होती सन 1971 मधली. अकरम खान यांच्या घरी चोरी झाली होती. चोर छतावरची कौलं काढून घरात घुसले होते आणि एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा माल त्यांनी चोरून नेला होता. भाग 3 मध्ये या प्रकारात कर्नाटकातल्या बागलकोटच्या ज़हीर खान नावाच्या 20 वर्षांच्या तरुणाला पकडण्यात आल्याची नोंद होती. चोरीला गेलेला मालही परत मिळाला होता. अकरम खान यांचाही पत्ता अब्दुलशेठ राहत होते त्याच परिसरातला होता. त्या प्रकरणाचे बाकीचे तपशील मला समजले नाहीत; पण अचानक आशेचा एक किरण दिसल्यासारखं वाटलं. मी लगेच अब्दुलशेठ आणि त्यांच्या मुलाला फोन करून "मी त्यांच्याकडं येतो आहे' असं सांगितलं. ते "नाही' म्हणाले नाहीत; पण त्यांच्या आवाजात फारसा उत्साहही जाणवला नाही. मी एसीपींना, लष्कर ठाण्याचे पोलिस निरीक्षक आणि क्राईम ब्रॅंचच्या निरीक्षकांनाही बोलावून घेतलं. अब्दुलशेठ यांच्याकडं गेल्यावर मी त्यांना अकरम खान यांच्याबद्दल विचारलं. त्यावर ते म्हणाले ः ""सर, वो तो हमारे वालिद थे. अल्लाह को प्यारे हो गये चार साल पहले,' (सर, ते माझे वडील होते. चार वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं).
मग, "त्यांच्याही घरी पूर्वी चोरी झाली होती का?' असं मी त्यांना विचारलं.
ते म्हणाले ः ""हां साब, सात साल पहले इसी घर में हुई थी.''
""तेव्हा काय झालं होतं?''
""साहेब, अशीच कौलं काढून चोर आत आले होते.''
""कोणत्या खोलीत?''
""साहेब, आत्ता जिथं ही चोरी झाली आहे, त्याच खोलीत.''
""दागिने आणि पैसे कुठं होते?''
""त्याच अलमारीतल्या तिजोरीत; पण तो चोर पकडला गेला आणि त्याला शिक्षाही झाली होती.''
सात-आठ वर्षांपूर्वी त्याच घरात, त्याच खोलीतून, त्याच तिजोरीतून, त्याच पद्धतीनं चोरी झाली होती.
मात्र, घटनेच्या दिवशी सकाळी त्यांनी आम्हाला इराणमधल्या अशांत परिस्थितीविषयीही सांगितलं होतं; पण सात-आठ वर्षांपूर्वीच्या त्या घटनेचा उल्लेखही कुटुंबातल्या कुणाच्याच बोलण्यात आला नव्हता. मी त्यांना विचारलं ः ""तुम्ही आम्हाला ही गोष्ट काल सकाळी का नाही सांगितलीत?'' त्यावर अब्दुलशेठ म्हणाले ः ""खरंच माफ करा आम्हाला. काल सकाळी घडलेल्या त्या घटनेमुळे आम्ही सगळेच खूप अस्वस्थ होतो, त्यामुळे लक्षातच आलं नाही.''

मग आम्ही त्या ज़हीरची माहिती घेतली. तो अब्दुलशेठ यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या रेस्टॉरंटमध्ये कामाला होता. स्वयंपाकासाठी मदत करायला कधी कधी तो त्यांच्या घरीही येत असे. व्हीसीएनमधल्या नोंदींनुसार त्यानं घराच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास केला होता आणि एका रात्री छतावरची कौलं काढून तो घरात शिरला आणि त्या तिजोरीतून मौल्यवान वस्तू त्यानं चोरल्या होत्या. नंतर, पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या नियमित गस्तीच्या वेळी पोलिसांनी त्याला हटकलं तेव्हा त्याच्याजवळच्या मौल्यवान वस्तू आणि रोख रकमेबाबत तो काही समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकला नाही, म्हणून पोलिसांनी त्याला रेस्टॉरंटमध्ये आणलं. तिथं त्याची चोरी उघड झाली. चोरीला गेलेल्या सगळ्या वस्तू सापडल्या. त्याच्यावर खटला चालला आणि त्याला शिक्षाही झाली. जवळपास सहा वर्षं तो तुरुंगात होता.
आता मला पुढची योजना आखायची होती. आम्ही अब्दुलशेठ यांच्या घरून निघालो तेव्हा मुमताज मला भेटली आणि म्हणाली ः "तुम्हाला यश यावं म्हणून ती सकाळपासून सर्वशक्तिमान अल्लाहकडे प्रार्थना करत होते.' मी तिला आणि तिच्या कुटुंबीयांना सांगितलं ः "अल्लाहची तुमच्यावर कृपा आहे; पण आपल्याला आणखी रहमतची गरज आहे.'

ज़हीर खान कर्नाटकातल्या बागलकोटचा रहिवासी होता. त्यानं जर ही चोरी केली असेल तर तो पुढं काय करू शकतो, त्याच्या संभाव्य हालचाली काय असतील याविषयी आम्ही चर्चा केली. आम्हाला आता तो ज्यांच्याकडं जाऊ शकेल अशा त्याच्या नातेवाइकांची, मित्रांची माहिती हवी होती. मग आम्ही प्रथम त्याच्या मूळ गावी जायचा निर्णय घेतला. आम्ही दोन टीम बनवल्या. आधीच्या प्रकरणात ज़हीर रेल्वे स्टेशनवर पकडला गेला होता, त्यामुळे एक टीम रेल्वेनं प्रवास करणार होती. दुसऱ्या टीमचे दोन भाग होते. त्यातले काही लोक एका खासगी वाहनातून बागलकोटला जाऊन संशयितावर लक्ष ठेवणार होते. त्या टीममधले आणखी काही लोक सरकारी वाहनानं जाऊन स्थानिक पोलिसांच्या साह्यानं कायदेशीर कारवाई करणार होते. बागलकोटमधल्या एका स्थानिक व्यक्तीच्या माध्यमातून या दोन्ही टीमनी एकमेकांच्या संपर्कात राहायचं असंही ठरलं. दोन्ही टीममध्ये एकेक चांगला हुशार पोलिस निरीक्षक आणि मूळचे कर्नाटक भागातले काही लोक होते.
टीम पाठवल्यानंतर चौथ्या दिवशी मला क्राईम ब्रॅंचच्या इन्स्पेक्‍टर हुंडेकरी यांच्याकडून चांगली बातमी मिळाली ः "सर, आम्ही ज़हीरला त्याच्या घरात चोरीच्या सगळ्या मालासह पकडलं आहे. आज आम्ही त्याला स्थानिक न्यायालयासमोर उभं करून त्याचा ट्रान्झिट रिमांड घेऊन पुण्याला येत आहोत.'
पोलिस आयुक्तांना मी ही बातमी सांगितली. त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचा भाव उमटला. अब्दुलशेठ आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी ज़हीरला घेऊन दोन्ही टीम परतल्या.

हे आमचं मोठं यश होतं. सुरवातीला आमच्या समोर कोणतीच दिशा नव्हती. "जुन्या नोंदी' हाच काय तो एकमेव संदर्भ होता; पण त्यातूनच आम्हाला दिशा मिळाली. आरोपी सापडला, इतकंच नव्हे तर, चोरीला गेलेली सगळे दागदागिनेही मिळाले. या प्रकरणाला त्या वेळी बरीच प्रसिद्धीही मिळाली. काही दिवसांनी, चोरीची संपूर्ण मालमत्ता न्यायालयाच्या आदेशानं अब्दुलशेठ यांच्या कुटुंबाला परत मिळाली. आभार मानण्यासाठी ते माझ्या कार्यालयात आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं हास्य पाहून मला खूप आनंद झाला. ते निघत असताना अश्रूभरल्या डोळ्यांनी मुमताज पुढं आली. तिला भरून आलं होतं ः "थॅंक यू, सर...' एवढंच ती कसंबसं म्हणू शकली. मी तिला म्हणालो ः ""मुमताज, तुमच्याच प्रार्थनेमुळे हा चमत्कार घडला. सर्वशक्तिमान, दयाळू अल्लाहचेच आभार मानू या. ये सब अल्लाह की रहमत थी.''
या केसमध्ये मला बरंच काही शिकायला मिळालं. घटनास्थळी काही पुरावे नाहीत, हाता-पायाचे ठसे नाहीत, आतून-बाहेरून कोणतीही हालचाल झाल्याच्या खुणा नाहीत, घरातल्या अन्य सामानाची उचकापाचक केल्याच्या खुणा नाहीत. गुन्हेगार जर कौलं काढून तिजोरी असलेल्या कपाटाकडे थेटच गेला होता, तर त्याला त्या जागेची चांगली माहिती होती, असणार हा विचार आम्ही डोकेफोड करत असताना आमच्या लक्षात यायला हवा होता. पोलिस ठाण्यातल्या जुन्या नोंदी कशा उपयोगी ठरतात
हासुद्धा एक धडा होता.

आणि एक शेवटचा धडा. अल्लाह, भगवान, परमेश्‍वर, रब किंवा वाहे गुरू... नावं काहीही असू द्या, "त्या'च्यावर शेवटची एक टेक (आधार) ठेवावीच लागते. त्यानंच आम्हाला रस्ता दाखवला. कसलाही कठीण गुन्हा असला तरी त्याच्या कृपेनं उघडकीस येतोच, असा माझा विश्‍वास आहे.
पुढच्या आठवड्यात आणखी एका प्रकरणाविषयी बोलू या.
(उत्तरार्ध)
(घटनेतल्या व्यक्तींची नावं बदलण्यात आलेली आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com