खूप काही शिकवणारं नाशिक... (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

अतिवरिष्ठ पातळीवरच्या पोलिस अधिकाऱ्याची विविध कर्तव्यं बजावणं म्हणजे असिधाराव्रतच. असं हे तलवारीच्या धारेवरून चालत असताना कितीतरी बिकट प्रसंगांना सामोरं जावं लागतं. जीव तळहातावर घ्यावा लागतो. निर्णयशक्तीचा कस लागत असतो. थरारक, रोमहर्षक प्रसंग तर रोजचेच असतात. अशाच प्रसंगांची, अनुभवांची कथा-गाथा या साप्ताहिक सदरातून वाचकांपुढं उलगडली जाईल.

खरं तर हे सगळं लिहावं की नाही याबद्दल मी थोडा द्विधा मनःस्थितीत होतो. माझ्यापुढं प्रश्‍न होता... आहे काय माझ्याकडे लिहीण्यासारखं?आणि सुरवात कुठून करायची? पण आज तुम्हाला सगळ्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊनच माझ्या या गोष्टीला सुरवात करतो.
एक शेर आठवतोय....
चंद तस्वीर-ए-बुतॉं, चंद हसीनों के खुतूत
बाद मरने के मेरे घर से ये सामॉं निकला |

कवी म्हणतोय : मी गेल्यानंतर माझ्या घरात (आणखी) काय मिळणार... ? तर प्रियतमेची काही चित्रे आणि काही सौंदर्यशालिनींची पत्रे, बस्स!
पण या कवीइतकं कुठलं पोलिस अधिकाऱ्यांचं भाग्य? समाजाच्या भल्यासाठी ज्यांना चार हात लांबच ठेवायला हवं अशाच लोकांशी त्यांची गाठ. अशानेच बहुधा पोलिस अधिकाऱ्यांचं वागणं काही वेळा भावनाहीन, कोरडं असल्यासारखं वाटतं. असेलही कदाचित; पण गुन्हेगारांना वठणीवर आणण्याचं कर्तव्य बजावत असताना समाजातल्या अनेक घटकांच्या अनेक विषयांशीही पोलिसांचा संबंध येत असतो.
पोलिसिंग हा आज आधुनिक शहरी राहणीचा अविभाज्य भाग बनला आहे. या ना त्या कारणानं पोलिस सतत आपल्या आजूबाजूला असतात; पण त्यांचं अस्तित्व जाणवतं ते एखादा गुन्हा घडला किंवा समाजाचं स्वास्थ्य बिघडवणारी एखादी घटना घडल्यावरच.
* * *

भारतीय पोलिस सेवेत दाखल झालो तेव्हा मी जेमतेम वर्षांचा होतो. आधी मसूरीत दीड वर्षं आणि नंतर माऊंट अबूच्या नॅशनल पोलिस ×कॅडमी मधल्या प्रशिक्षणानंतर आम्हाला वेगवेगळ्या राज्यांत पाठवण्यात आलं. माझं पॅरंट केडर होतं महाराष्ट्र. मला मिळालेल्या आदेशाप्रमाणे सन 1972 च्या जानेवारीत मी नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर उतरलो. महाराष्ट्रात येण्याची ही माझी पहिलीच वेळ. ज्या शहरात मला पोलिसिंगचे प्राथमिक धडे गिरवायचे होते ते शहर आणि मी एकमेकांना अजिबात ओळखत नव्हतो. बीट कॉन्स्टेबल, चौकी हेड कॉन्स्टेबल, चौकी इन चार्ज आणि नंतर पोलिस ठाण्याचा प्रमुख इन चार्ज अशी एकेक पायरी चढण्याची प्राथमिक शिक्षणाची प्रक्रिया, अधिकारांच्या भौगोलिक सीमा, कायदेशीर अधिकारांचा वापर, गुन्हे नोंदवणं, त्यांचा तपास हे सगळं समजून घेण्यात रस वाटायला लागला होता. पोलिस दलातल्या आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधणं हादेखील एक सुखद अनुभव असायचा. माझ्याहून थोडा अधिक अनुभव असणारे जे सहायक पोलिस अधीक्षक, सहायक जिल्हाधिकारी असायचे त्यांची खूप मदत व्हायची. अनेक बाबतीत त्यांचे सल्ले मिळायचे. महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्रातले लोक, त्यांचा इतिहास, संस्कृती, समाजाची जडणघडण, रीती-रिवाज, सण, उत्सव समजून घ्यायला मला या सगळ्यांची खूप मदत झाली. कामाच्या निमित्तानं नाशिक जिल्ह्यात फिरताना महाराष्ट्राबद्दलची माझी समज वाढत गेली. प्रशिक्षणाच्या या टप्प्याबद्दल नंतर विस्तारानं सांगेनच.
नाशिक जिल्ह्यात एक वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर माझी नेमणूक 'पुणे ग्रामीण'मध्ये सहायक अधीक्षक म्हणून झाली. पुण्यानंतरचा पुढचा टप्पा होता जळगाव. जळगाव उपविभागात काम करताना मला ग्रामीण महाराष्ट्राचा, लोकांचा अभ्यास करण्याची, त्यांना समजून घेण्याची चांगली संधी मिळाली. या प्रवासात खूप चांगले लोक भेटले. त्यातले काही चांगले मित्रही झाले. पोलिस अधिकारी म्हणूनही मी खूप काही शिकत होतो. कामाच्या निमित्तानं खेड्यापाड्यांमध्ये मुक्कामाला असताना खात्यात मुरलेल्या अनुभवी मंडल निरीक्षकांकडून ब्रिटिश काळातल्या गुन्ह्यांच्या, तपासाच्या पोलिसांच्या कामकाजाच्या कथा ऐकायला मिळायच्या. या गप्पागोष्टींतून आणि चर्चांमधून मला मराठी भाषा समजायला तर लागलीच; पण मी सफाईदारपणे मराठी कधी बोलू लागलो, हे माझं मलाही समजलं नाही.

जळगावमध्ये असल्यापासूनच मला गुन्ह्यांचा तपास करण्यात विशेष रुची वाटत होती. या काळात आव्हानात्मक अशा काही प्रकरणांचा तपास करण्याचा मी प्रयत्न केला. थोड्याफार प्रयत्नांनी आम्ही ते गुन्हे उघडकीस आणले. अशा काही तपासांनंतर एक पोलिस अधिकारी म्हणून माझा आत्मविश्वासही वाढला. याच काळात गुन्ह्यांच्या तपासाची माझी म्हणून काही सूत्रं मी निश्‍चित केली. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी माहितगारांची मदत घ्यायला हवी, गुन्हा घडलेल्या परिसरात पायी फिरून त्या परिसराचा तपशीलवार अभ्यास करायला हवा, योगायोगानं मिळणारे साक्षीदार आणि खाणाखुणा शोधायला हव्यात, गुन्हेगारीसंदर्भातल्या आधीच्या नोंदींचा अभ्यास करायला हवा, गुन्ह्याच्या दृश्‍याचं पुनर्निर्माण (रिकन्स्ट्रक्‍शन ऑफ क्राईम सीन), ज्या परिस्थितीत गुन्हा घडला त्या परिस्थितीचा आणि त्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीचा विचार हवा आणि योग्य तपासासाठी विश्‍वसनीय आणि खंबीर सहकाऱ्यांची टीम तयार करायला हवी. सुरवातीच्या काळात शिकलेले हे धडे नंतरच्या काळात काम करताना मला फारच उपयोगी ठरले.
* * *

एका बाबतीत मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. बऱ्याच हार्ड-कोअर पोलिस अधिकाऱ्यांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. टी. जी. एल. अय्यर, एस. राममूर्ती, सतीश सहानी, आर.एच मेंडोन्सा आणि एम. जी. उबाळे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांकडून खूप शिकायला मिळालं तरुण अधिकाऱ्यांपैकी एम. एन. सिंग, एम.आर. रेड्डी, के. के. कश्‍यप यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनीही आव्हानात्मक परिस्थितीत काम करून स्वतःची छाप उमटवली होती. त्यांच्याबरोबर काम करतानाही मी बरंच काही शिकलो.

गावागावांमध्ये काम करणारे किती तरी चांगले अधिकारी ही आणखी एक जमेची बाजू होती. त्यातल्या काहींचा गुप्तपणे माहिती काढण्यात हातखंडा होता. काही जण उत्तम पद्धतीनं कायदा व सुव्यवस्था सांभाळायचे. गुन्ह्यांचा तपास ही काहींची खासियत होती, तर काहींना लोकांशी संवाद साधण्याची एक विशेष कला अवगत होती. पोलिस ठाण्यांच्या किंवा चौक्‍यांच्या पातळीवर काम करणारे सहकारी हा महाराष्ट्रातला एक मोलाचा ठेवाच होता. बऱ्याचदा एखाद्या प्रकरणाचा तपास करताना आम्ही अशा एखाद्या वळणावर अडकायचो की तिथून पुढं काय असा प्रश्‍न असायचा; पण दुसऱ्याच दिवशी प्रकरणाची निरगाठ तर सुटलेली असायचीच, पण संशयित गुन्हेगारांनाही अटक झालेली असायची. कुण्या एकाच्या प्रयत्नांपेक्षाही कायम टीम म्हणून काम केल्यानंच हे यश मिळालेलं असायचं. कनिष्ठ अधिकाऱ्यांची बलस्थानं आणि उणिवा समजून घेण्याची सवयच मला लागली होती. त्यांच्या गुणावगुणांनुसार त्यांना योग्य कामगिरी दिल्यानं त्यांचा उत्साह आणि क्षमतांचा योग्य उपयोगही व्हायचा. महाराष्ट्राबाहेर काम करतानाही मी ह्याच पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला. तिथंही मला त्याचा उत्तम उपयोग झाला.
खूप गुन्हे आम्ही उघडकीस आणले. खून, दरोडे, घरफोड्यांपासून ते साखळ्या हिसकावण्यापर्यंतचे गुन्हे. प्रत्येक प्रकरणाची एक स्वतंत्र कथा आहे आणि त्या कथेचा एक संदेश आहे, लोकांसाठी आणि पोलिसांसाठीही. काहीही मागमूस नसताना आम्ही उघडकीस आणलेल्या काही प्रकरणांविषयी मी या सदरातून तुम्हाला सांगणार आहेच.
* * *

आयुष्य कधीच सोपं नसतं.
एका उर्दू कवीनं लिहिल्याप्रमाणे :
चलता जाता हूँ हॅंसता-खेलता मौज-ए-हवादिस से अगर आसानियॉं हो तो जिंदगी दुश्वार हो जाए |
जून 1984. एक दिवस अचानक मला पंजाबमध्ये रुजू होण्याचे आदेश मिळाले. सुदैवानं मी एकटाच नव्हतो, तर माझ्याबरोबरच आसाममध्ये कार्यरत असणारे के. पी. एस. गिल, उत्तर प्रदेशातले बी. एस. बेदी, मध्य प्रदेशातले चमनलाल यांनाही पंजाबमध्ये रुजू होण्यास सांगण्यात आलं होतं. त्याशिवाय अन्य काही अधिकारी आधीपासून तिथं काम करत होतेच. पंजाब पोलिस दलात प्रतिनियुक्तीवर काम करणं हे मोठं आव्हान होतं. आजवर मी जे काही शिकलो
होतो ते कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी, गुन्हेगारी रोखण्यासाठी, गुन्हे शोधण्यासाठी, दंगलखोरांना रोखण्यासाठी, शहरांतली रहदारी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त होतं. पोलिस ठाण्यावर होणारे हल्ले माझ्यासाठी नवीन असले तरी ते होत होते. खलिस्तानची मागणी करणारे संख्येनं अगदीच थोडे होते. पोलिस अधिकारी, राष्ट्रवादी नेते आणि विरोधात बोलणाऱ्या कोणालाही ते लक्ष्य करत होते. कित्येक सर्वसामान्य नागरिकांचेही बळी गेले होते. पाकिस्तानी सैन्याची तसेच त्यांची गुप्तचर संस्था "आयएसआय'ची त्यांना सक्रिय मदत होती.

आधी जालंधरमध्ये आणि नंतर अमृतसरमध्ये जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून काम करताना मी प्रश्‍न समजून घेतला. इतिहास पुन्हा वाचला. परिस्थिती समजून घेण्याबरोबरच त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलिस दलाला तयार करणं आणि माझ्या जिल्ह्यामधल्या लोकांच्या सुरक्षेची तजवीज करणं
हीदेखील माझी जबाबदारी होती. काही काळासाठी निमलष्करी दलंही पंजाबमध्ये तैनात केली गेली होती; पण हळूहळू आमच्या गुप्तचर यंत्रणा आम्ही सुधारल्या. नवीन प्रशिक्षण प्रणाली आणली. शस्त्रं आणि अन्य उपकरणांचा दर्जाही सुधारला. नंतर, एक टप्पा असा आला की पंजाब पोलिसांनी परिस्थितीवर खंबीरपणे मात केली.
पण हे सगळं खूप नंतर. त्याआधी मला तुम्हाला मी उकल केलेल्या पहिल्या गुन्ह्याबद्दल सांगायचं आहे. या माझ्या पहिल्या कामगिरीनं मला एक वेगळा मार्ग दाखवला. योग्य नियोजन आणि योग्य दिशेनं केलेल्या परिश्रमांमुळे गुन्हे उघडकीस आणता येतात हे मला या प्रकरणामुळे समजलं. त्याबद्दल पुढच्या भागात...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com