चोराच्या वाटा... (एस. एस. विर्क)

s s virk
s s virk

आम्ही केलेल्या अंदाजानुसार एका ठराविक झोपडीत तीनजण बसलेले होते. आम्ही ज्याच्या शोधात आलो होतो तो शांताराम आणि इतर दोन मुलं. शांतारामची बोटं झडली होती; पण त्याच्या चेहऱ्यावर आणि बाकी अंगावर रोगाचा फारसा परिणाम झालेला दिसत नव्हता. ""यांना ठाण्यात घेऊन चला,'' मी माझ्याबरोबरच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं.

आपल्याकडं एक जुनी म्हण आहे ः चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक! गुन्हेगारांच्या मागावर असताना देशाच्या वेगवेगळ्या भागांत काम करणारे ब्रिटिश पोलिस अधिकारी अनेकदा ही क्‍लृप्ती वापरत असत. नोकरीच्या निमित्तानं दूरदेशात आलेल्या या अधिकाऱ्यांची स्थानिक भाषेची, स्थानिकांच्या रीती-रिवाजांची, प्रथा-परंपरांची जाण तोकडी असायची; पण त्यावर मात करून या अधिकाऱ्यांनी इथं घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पद्धतींचा त्यांच्या तऱ्हेनं खूप मेहनतीनं खोलवर अभ्यास केला होता. गुन्ह्यांचा तपास करताना अनेकदा हे अधिकारी नवनव्या कल्पना लढवायचे. गुन्हा उघडकीला आणल्यानंतर त्या तपासाबद्दल विस्तारानं लिहून ठेवायचे. केवळ गुन्ह्यांचाच नव्हे तर गुन्ह्यात सामील असणाऱ्या प्रत्येकाचा ते तपशिलानं अभ्यास करायचे. एखाद्या कृत्याची आखणी करताना, प्रत्यक्षात ते कृत्य करताना, केल्यानंतर गुन्हेगार कसे वागतात, त्यांच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, चोरलेल्या मालाचं ते काय करतात, कुणामार्फत चोरीच्या मालाची विल्हेवाट लागते असे बारीकसारीक तपशील ते नोंदवून ठेवायचे. स्थानिक परिस्थितीबद्दल या ब्रिटिश अधिकाऱ्यांचं ज्ञान मर्यादित असलं तरी मानवी वर्तनाबद्दल त्यांची समज खूप चांगली होती. तपास करताना त्यांना त्यांच्या या ज्ञानाचा चांगला उपयोग व्हायचा.

खबऱ्यांचं उत्तम जाळं ही या ब्रिटिश अधिकाऱ्यांची एक खासियत होती. "काट्यानं काटा काढावा' या न्यायानं एक चोर पकडण्यासाठी दुसऱ्या चोराचीच मदत घेण्याची त्यांची पद्धत फारच यशस्वी ठरली होती. पोलिस खात्यातल्या माझ्या सुरवातीच्या दिवसांतल्या एका प्रकरणात मी चोराचा ठावठिकाणा शोधण्यासाठी अशा माहीतगार खबऱ्यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रकरणानं गुन्हेगारीबद्दलचा माझा दृष्टिकोनच बदलला. एवढंच नव्हे तर, त्या प्रकरणामुळे गुन्हेगारी जगतात डोकावण्याची संधी देणारी आणखी एक वेगळी खिडकीच माझ्यासाठी उघडली गेली. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी "मुखबीर' किंवा "खबरी सिस्टिम' हा आमच्या शोधतंत्रातला एक महत्त्वाचा भाग आहे. काही यशस्वी-अयशस्वी तपासांनंतर माझं असं मुखबिरांचं जाळं आणि त्यातून माझी म्हणून तपासाची एक पद्धत उभी करण्यात मी यशस्वी झालो. 39 वर्षांहून थोड्या अधिक काळाच्या पोलिस खात्यातल्या कारकीर्दीनंतर ऑक्‍टोबर 2009 मध्ये मी निवृत्त झालो, तोपर्यंत कितीतरी गुन्ह्यांची उकल करताना माहीतगारांच्या या तंत्राचा मला आणि माझ्या सहकाऱ्यांना उपयोग झाला.

आज मी ज्या तपासाबद्दल सांगणार आहे ती गोष्ट आहे जळगावमधली. 1973 ची. मात्र, गेल्या वेळच्या लेखात राहून गेलेला एक मुद्दा त्याआधी सांगतो. आयपीएस सेवेत रुजू होताना मी जेमतेम 21 वर्षांचा होतो. पंजाब विद्यापीठातलं शिक्षण संपल्यावर मी थेट मसुरीच्या ट्रेनिंग ऍकॅडमीमध्ये दाखल झालो. एका विद्यार्थ्याच्या भूमिकेतून एकदम बाहेर पडून एका अधिकाऱ्याच्या रांगेत जाणं हा एक वेगळाच अनुभव होता. तोपर्यंत मी जरी शिस्तबद्ध जीवन जगलो होतो, तरी मी अजून पुरेसा मॅच्युअर झालेलो नव्हतो. माझे बाकीचे सगळे बॅचमेट माझ्यापेक्षा दोन-तीन वर्षांनी किंवा त्याही पेक्षा जास्त मोठे होते. त्यांचा नोकरीचा किंवा समाजात वावरण्याचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त होता; पण माझा एक फायदा झाला. लहान वयातच वर्दी अंगावर चढवल्यामुळं वर्दीची शिस्त, तत्त्वनिष्ठा, कर्तव्य आणि नैतिक मूल्यं यांचा माझ्यावर जास्त प्रभाव पडला आणि मी खाकी रंगात रंगून निघालो!
जळगावात मी उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून रुजू झालो होतो. केळी आणि कापूस यांसारख्या नगदी पिकांमुळं जळगाव जिल्हा तसा संपन्न होता. आजच्या तुलनेत जळगाव तेव्हा लहान होतं. फार घाई, गडबड-गोंधळ नसलेलं. होऊन गेलेल्या एका दंगलीचा अपवाद वगळला तर शहरातलं वातावरणही चांगलं होतं. मला कधीही तिथं जातीयवाद दिसून आला नाही. मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांचं प्रमाणही फार नव्हतं आणि गुन्हे घडू नयेत म्हणून आम्हीही दक्ष असायचो. जळगावच्या वास्तव्यात सिव्हिल सर्जन डॉ. कडासणे, डॉ. बी. व्ही. कुलकर्णी, डॉ. आठवले, ईश्‍वर ललवाणी अशा अनेक चांगल्या लोकांशी माझा संबंध आला. डॉ. कुलकर्णी तर माझे फ्रेंड-फिलॉसॉफर-गाईडच बनले. ते माझ्याशी नेहमी मराठीत बोलत असत आणि मीही त्यांच्याशी मराठीतच बोलावं, त्यांच्या प्रश्‍नांना मराठीतच उत्तरं द्यावीत अशी त्यांची अपेक्षा असायची. खरंच, महाराष्ट्राबद्दल माझ्या मनात जे प्रेम आहे त्यात या परिवाराची मैत्री आणि त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेमाचा मोठा वाटा आहे. असो.
***

खिसे कापणं हा इतर गुन्ह्यांच्या तुलनेत फार मोठा गुन्हा आहे असं म्हणता येत नाही; पण हा नेहमी घडणारा गुन्हा आहे. आणखी एक म्हणजे, पाकीटमारीचे गुन्हे सर्वसाधारणपणे उघडकीस येत नाहीत. आता मी ज्या प्रकरणाबद्दल तुम्हाला सांगणार आहे, त्यात आम्ही असाच एक गुन्हा उघडकीस आणला होता. त्यानंतर मी काही गंभीर गुन्ह्यांबद्दलही सांगेन.
...तर, त्या दिवशी सुटी होती तरी काही राहिलेली कामं करून टाकावीत म्हणून मी ऑफिसला जाणार होतो. त्या वेळी मी पोलिस वसाहतीच्या अगदी एका टोकाला असलेल्या एका छोट्या घरात राहत असे. शंभरेक यार्डांचं अंतर असेल मुख्य रस्त्यापासून. माझ्या घराकडं येणाऱ्या कच्च्या रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर आल्यानंतर उजव्या बाजूला थोड्या अंतरावर चौकात स्टेट बॅंकेची मुख्य शाखा होती. नेहमीप्रमाणे स्कूटरवरून मी मुख्य रस्त्यावर आलो तर मला बॅंकेच्या आवारात काहीतरी गोंधळ जाणवला. खाकी गणवेशातले एक मध्यमवयीन गृहस्थ मोठमोठ्यानं ओरडून आपल्याला कुणीतरी लुटल्याचं सांगत होते. मी स्कूटर बॅंकेच्या आवारात पार्क करेपर्यंत बॅंकेतल्या कर्मचाऱ्यांसह आणखी काही जण त्या गृहस्थांभोवती जमा झाले होते.

खाकी गणवेशातले ते गृहस्थ तिथले मुख्य पोस्टमन होते. कार्यालयीन कामाकरता त्यांनी बॅंकेतून दहा हजार रुपये काढले होते व त्यांच्या जवळच्या पिशवीत ठेवले होते. आणखी काही रक्कम घ्यायची होती म्हणून ते रांगेत उभे असताना कुणीतरी त्यांची ती पोस्टाची जाड खाकी कापडाची पिशवी अगदी व्यवस्थित कापून आतली शंभर शंभर रुपयांच्या नोटांची बंडलं लांबवली होती. एखाद्या कसलेल्या पाकीटमाराचंच ते काम दिसत होतं.
झालेल्या प्रकारानं बॅंकेतले लोक गडबडून गेले होते. मी स्कूटर पार्क करत असताना त्यातल्या काहींनी मला ओळखलं. मी काहीतरी करावं अशी त्यांची अपेक्षा होती. मी आधी त्यांना सगळी दारं आतून बंद करायला लावली आणि फोन करून तिथल्या पोलिस ठाण्यात रासकर नावाचे जे इन्स्पेक्‍टर होते त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांसह बोलावून घेतलं. रासकर आणि सहकारी काही मिनिटांतच पोचले. पाठोपाठ डीबी (डिटेक्‍शन ब्रॅंच) स्क्वाडचे लोकही पोचले. शहरी भागातल्या प्रत्येक पोलिस ठाण्यात असं डीबीचं पथक असतं. ही मंडळी त्यांच्या ठाण्याच्या हद्दीत साध्या कपड्यात वावरून गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवत असतात. गुन्हेगारांची, त्यांच्या कारवायांची माहिती गोळा करत असतात. त्यांच्या ठाण्याच्या हद्दीतल्या नव्या-जुन्या गुन्हेगारांची माहिती त्यांच्याकडं असते. ठाण्याच्या पातळीवर होणाऱ्या ब्रिफिंगमध्येही ते गरजेप्रमाणे सहभागी होत असतात.
आम्ही बॅंकेतल्या सगळ्या लोकांना एका ठिकाणी जमा व्हायला सांगितलं आणि प्रत्येकाची झडती घेतली. बॅंकेच्या इमारतीची आतून-बाहेरून नीट पाहणी केली; पण बहुधा चोरानं नोटांची बंडलं कुठंतरी - नंतर उचलून नेता येतील अशा जागी - फेकली असणार.
तिथं असणाऱ्या कुणाचाच या चोरीशी काही संबंध असेल असं दिसत नव्हतं. मग आम्ही त्या सगळ्यांची नावं, पत्ते आणि फोन नंबर लिहून घेतले आणि त्यांना जाऊ दिलं.

नंतर इन्स्पेक्‍टर रासकर आणि डीबीच्या कर्मचाऱ्यांशी झाल्या प्रकाराबद्दल बोलताना मी त्यांना जिल्ह्यातल्या पाकीटमारांबद्दल विचारलं. पाटील म्हणून सहायक फौजदार डीबीचे प्रमुख होते. त्यांनी सलीम असं एक नाव सांगितलं; पण तो सध्या तुरुंगात असल्याची माहिती आणखी एकानं दिली. भुसावळमध्ये पांडुरंग नावाचा एक पाकीटमार होता; पण तोही तुरुंगात शिक्षा भोगत होता. पाकीटमारीच्या धंद्यात प्रामुख्यानं आणखी कोण कोण आहे, असं विचारल्यावर एका वयस्कर हवालदारानं "जळगाव शहरातच शांताराम भिकू जैन नावाचा एक सराईत गुन्हेगार आहे,' अशी माहिती दिली. मात्र, पाटील यांच्या माहितीनुसार, शांतारामला कुष्ठरोग झालेला होता. "त्याची बोटं झडून गेली आहेत,' असं त्यांनी सांगितलं. मात्र, कुष्ठरोगानं हाताची बोटं झडून गेलेला शांताराम सध्या रेल्वे स्टेशनवर भीक मागत असला तरी तरुण पोरं हेरून त्यांना पाकीटमारीत तयार करतो आणि अशा नव्या पोरांना सांभाळतोही, असं एका पोरसवदा कॉन्स्टेबलकडून कळलं. जळगाव शहराच्या एका कोपऱ्यातल्या एका झोपडपट्टीत शांतारामनं आपलं बस्तान बसवल्याची माहितीही त्यानं पुरवली.
एवढ्यात जिल्हा पोलिसप्रमुख सरणसिंगही बॅंकेत पोचले. काय घडलं आहे, याची थोडक्‍यात कल्पना मी त्यांना दिली आणि त्या सराईत पाकीटमारावर छापा घालण्याचा आमचा बेतही त्यांच्या कानावर घातला. चाळिशीतले सरणसिंग मूळचे हैदराबाद पोलिस दलातले अधिकारी होते. "हैदराबाद ऍक्‍शन'नंतर मराठवाडा महाराष्ट्राला जोडला गेल्यावर जे अधिकारी महाराष्ट्रात आले, त्यात सरणसिंगही होते. कडक आणि पोलिस दलासाठी अत्यंत योग्य अधिकारी अशी त्यांची प्रतिमा होती.
"त्या कुष्ठरोगी पाकीटमाराला शोधायला जातो आहे', असं मी सांगितल्यावर सरणसिंग यांनी केवळ एक स्मितहास्य करत मला संमती दिली. आमचे प्रयत्न कितपत यशस्वी होतील, याबाबत त्यांच्या मनात शंका असली तरी कदाचित माझ्यासारख्या एका तरुणाला निराश करण्याची त्यांची इच्छा नसावी.

जुन्या जळगावचा तो भाग त्या वेळी अत्यंत गलिच्छ होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास आम्ही एका नाल्याच्या कडेला वसलेल्या झोपडपट्टीपाशी पोचलो. सांडपाणी आणि कचऱ्याची दुर्गंधी सगळीकडं भरून राहिली होती. आम्ही केलेल्या अंदाजानुसार एका ठराविक झोपडीत तीनजण बसलेले होते. आम्ही ज्याच्या शोधात आलो होतो तो शांताराम आणि इतर दोन मुलं. शांतारामची बोटं झडली होती; पण त्याच्या चेहऱ्यावर आणि बाकी अंगावर रोगाचा फारसा परिणाम झालेला दिसत नव्हता. ""यांना ठाण्यात घेऊन चला,'' मी माझ्याबरोबरच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं.

""काय झालं?'' असं शांतारामनं विचारल्यावर, काय घडलं आहे ते ठाणे अंमलदारांनी त्याला सांगितलं. गाडीत बसायला सांगितल्यावर शांतारामनं त्याच्याबरोबर असणारी दोन्ही मुलं पाकीटमार आहेत हे कबूल केलं; पण त्यांचा सकाळी घडलेल्या घटनेशी काहीच संबंध नसल्याचंही त्यानं ठासून सांगितलं. नंतर माझ्याकडं वळून तो म्हणाला ः ""साब, ये काम किसी बहोत साफ हाथवाले का है। ये दोनो बच्चें ये कर सकते है मगर आज कोरट में इनकी तारीख थी, वहॉं इनकी हजेरी लगी हुई है, ये बेकसूर है।''
मग आदल्या दिवशीच इंदूरचा एक कुख्यात पाकीटमार त्याच्या एका साथीदारासोबत जळगाव रेल्वे स्टेशनवर आपल्याला दिसला होता, असं शांतारामनं मला सांगितलं. शांतारामच्या म्हणण्यानुसार, ब्लेड वापरण्यात इंदूरच्या त्या दोन पाकीटमारांचा हात कुणीच धरू शकत नव्हतं आणि शांतारामचा संशय त्या दोघांवरच होता. इंदूरसारख्या दूरच्या शहरातल्या गुन्हेगाराचा यात हात असावा, हे काही मला पटत नव्हतं. माझी शंका ऐकल्यावर शांताराम म्हणाला ः ""साब, हद्दी सरकारला आणि त्यांच्या यंत्रणांना असतात. गुन्हेगारांना कुठलं आलंय हद्दींचं बंधन?''
मी त्याच्या तर्काचं खंडन करू शकलो नाही...
(पूर्वार्ध)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com