#SaathChal सामाजिक जाणिवेचा पालखी सोहळा (वा. ल. मंजूळ)

वा. ल. मंजूळ
रविवार, 22 जुलै 2018

पालखी सोहळा म्हणजे सामाजिक जाणिवेचं दर्शन घडवणारा सोहळा. जात, धर्म, वय, आर्थिक स्तर अशा कोणत्याही गोष्टी न मानता वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात. या सोहळ्याशी संबंधित काही वेगळ्या नोंदी.

पालखी सोहळा म्हणजे सामाजिक जाणिवेचं दर्शन घडवणारा सोहळा. जात, धर्म, वय, आर्थिक स्तर अशा कोणत्याही गोष्टी न मानता वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात. या सोहळ्याशी संबंधित काही वेगळ्या नोंदी.

पुण्यामध्ये इसवीसन 1882 मध्ये संत ज्ञानदेव आणि तुकाराम यांच्या पालख्या येऊन गेल्यावर ज्येष्ठ विचारवंत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी बुधवार पेठेतल्या प्रार्थना समाजात या सोहळ्यावर व्याख्यान दिलं. त्यातले दोन महत्त्वाचे उल्लेख म्हणजे पालख्यांची व्याख्या आणि तत्कालीन महत्त्वाच्या दिंडींचे उल्लेख होत. ही एका विचारवंतांची मीमांसा आहे. त्यांनी म्हटलं ः "वारकरी मंडळी साधूसंत आदी सत्पुरुष विचारधनाने हयात आहेत, असे मानतात. त्या-त्या संतांच्या गावी जाऊन पूजा-अर्चना करून त्यांची प्रतीकात्मक प्रतिमा घेऊन, त्यांच्या प्रिय दैवताच्या- विठ्ठलाच्या दर्शनाला निघतात. सर्व समाज एकत्र येण्यासाठी पायी निघतात. त्यामुळे धार्मिक सहवास मिळतो, मनावर उत्तम संस्कार होतात. या दिंड्या म्हणजे वैष्णव साधूचे थवे, संघ आहेत. त्यामध्ये जाती-वर्ण-सुशिक्षित-अशिक्षित, आर्थिक स्त्री-पुरुष असे एरव्हीचे भेद नसतात. आपली ऐहिक अन्‌ पारमार्थिक उन्नती व्हावी, तीदेखील भक्तीमार्गाने आणि हा मार्ग सुलभ करण्यासाठी. त्यामध्ये कर्मकांडाचे अवडंबर नाही. श्रद्धेचा अतिरेक नाही. त्यामुळे तापी ते तुंगभद्रा परिसरातील ही वारकरी जमात एकाच कावेने रंगलेल्या पताकेखाली एकत्र येऊन पारमार्थिक सोहळा साजरा करते.'

वारी म्हणजे श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी नियमित जात राहणं. त्यातही आषाढी-कार्तिकी माघी-तैत्री शुद्ध एकादशी पंढरीची वारी, तर वद्य एकादशी संतांच्या दर्शनासाठी असा रिवाज आजही पाळला जातो. संत ज्ञानदेव आणि संत तुकाराम यांच्या कुळात वारीची प्रथा होती, असा उल्लेख सापडतो; पण नंतरच्या काळात हैबतबाबांनी इसवीसन 1832 मध्ये माऊलींचा सोहळा, तर नारायणमहाराजांनी तुकोबारायांचा पालखी सोहळा सुरू केला. हैबतबाबांचा मोठेपणा एवढा, की नामदेवरायांना जशी पंढरीच्या मंदिराची पायरी मिळाली, तशी हैबतबाबांना माऊलीच्या महाद्वाराची पायरी मिळाली आणि प्रत्येक उत्सवाची सुरवात पायरीपूजनानं होते. पुढं बाबा थकल्यावर शिंदे सरकार यांच्या सांगण्यावरून बेळगावचे सरदार शितोळे यांनी दोन घोडे, तंबू, एक हत्ती (पुढं बंद झाला), नैवेद्याची व्यवस्था, जरीपटका आणि पंढरपुराजवळच्या विसाव्यापासून पादुका नेण्याची व्यवस्था इत्यादी गोष्टी केल्या. 1836 मध्ये हैबतबाबांचं निधन झालं; पण वारीची परंपरा तशीच चालू आहे. सरदार शितोळे यांचे अश्‍व वारीआधी आळंदीत येतात. त्यांचं खूप स्वागत होतं. घोड्यासाठी पायघड्या टाकून त्यांना समाधीच्या गाभाऱ्यापर्यंत नेलं जातं.

आषाढ शुद्ध नवमीला सर्व पालख्या- दिंड्या वाखरीला एकत्र येतात आणि माऊलींची पालखी पंढरपुराकडं निघाल्यावर बाकी दिंड्या-पालख्या मागोमाग येतात. पंढरपुरात रात्री दहाला पादुका ज्ञानेश्‍वर मंडपात पोचतात. वीणा, पखवाजधारी वारकरी "माऊली- माऊली' घोष करतात. तो एवढा प्रचंड, की आसमंत गर्जून सोडतो. पहाटे पूजाविधी होऊन पुढं पादुका चंद्रभागा स्नानासाठी आणि अलीकडं श्रीविठ्ठल दर्शनासाठी नेल्या जातात. पूर्वी खासगीवाले सरदारांनी बक्षीस दिलेल्या जागेवर मंडप बांधण्यात आला होता. त्यानंतर समोर अतिथीगृह बांधण्यात आलं आणि आता तिथं विठ्ठल- रखुमाई मूर्ती आणि माऊलीच्या पादुकांची स्थापना करून मंडपाचं मंदिर करण्यात आलं आहे.
मुक्कामाच्या ठिकाणी सायंकाळी समाज-आरती नावाचा प्रकार असतो. त्यावेळी पालखी सोहळ्यातील अन्याय, तक्रार दिंड्या टाळ वाजवून नोंदवतात, विश्‍वस्त चौकशी करून त्यावर निर्णय घेतात. दिंड्या या अधिकृत म्हणजे नोंद केल्या असतात. त्यामध्ये रथापुढं 27 आणि मागं 125 दिंड्या असतात. त्याशिवाय न नोंदवलेल्या 200 ते 250 दिंड्या असतात.

दिंडीमध्ये वर्षानुवर्षं परंपरा पाळणारे भाविक आहेत. ते घराण्याची परंपरा जपण्यासाठी आधुनिक सुख- सोयी त्यागून पायी वारीचा त्रासाचा- गैरसोईचा वसा आनंदानं पार पाडतात. घरामध्ये दुचाकी- चारचाकी असूनही भाविकतेनं तीन आठवडे; सुमारे पाचशे मैलाचा प्रवास करतात, समोर येईल ते अन्न आनंदानं स्वीकारतात, एरवी घरी काहीही काम न करणारी पुरुष मंडळी वारीमध्ये दिंडीच्या शेकडो मंडळींच्या स्वयंपाकात महिलांना मदत करतात. मिळेल जागा तिथं घोंगडीवर रात्र घालवतात. उघड्यावर शौचविधी, ओढ्यावर- विहिरीवर थंड पाण्यानं आंघोळी, ऊन- पाऊस यांची तमा न बाळगता टाळ-मृदंगांच्या तालावर वाटचाल करत राहतात. घरचं वैभव अन्‌ सुखसोई बाजूला सारून वडिलार्जित परंपरा पार पाडतात आणि ते केवळ गळ्यातल्या तुळशीमाळेच्या धाकानं! इतर सर्व सवयी बाजूला ठेवून मंडळी शुचिभूर्तपणे समूह यात्रेत सहभागी होतात. या सर्व कार्यात घर आणि व्यवसाय विसरून जातात.
प्रत्यक्ष पंढपुरात कुठल्याही प्रकारचा कर्मठपणाचा शास्त्रोक्‍त यात्राविधी नसतो. ज्या विठ्ठलाच्या भेटीसाठी त्रास सोसायचा, त्याचं पदस्पर्श दर्शन दहा ते बारा तास रांगेत उभं राहून घ्यावं लागतं, तर दुरून मिळणारं मुखदर्शनही वारीत उभं राहून घ्यावं लागतं. अनेक वारकरी मंडळी कळसाचं दर्शन घेऊन वारी पूर्ण करतात. नवस-सायास नाही; मोठाल्या देणग्या मंदिरासाठी नाही, कोणताही कर्मठविधी नाही, हे या वारीचं वैशिष्ट्य होय. पंढरपूर यात्रा, पालखी सोहळा, वारकरी समाज यांच्याविषयी असा वेगळ्या प्रकारचा इतिहास पाहायला मिळतो. हल्ली काही व्यावसायिक गोष्टी, जाहिरातबाजी वगैरे गोष्टी समाविष्ट झाल्या असल्या, तरी वारकऱ्यांच्या भक्तीचा वसा कायम आहे. रूपं बदलली, काही नवीन गोष्टी समाविष्ट झाल्या; पण भक्तीचा मळा फुललेलाच आहे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SaathChal w l manjul write article in saptarang