हिंदुस्थानवरची पहिली प्रभुता (सदानंद मोरे)

सदानंद मोरे
रविवार, 25 जून 2017

राजारामशास्त्री भागवत यांच्या म्हणण्यानुसार, ‘प्राकृत भाषांच्या व्याकरणकारांनी जो भाषाविभाग केला आहे व जो भाषाविभाग कोणत्याही प्रकाराने अयथार्थ दिसत नाही, त्यावरून पाहता मूळची सर्वत्र पसरलेली भाषा महाराष्ट्री व सर्व हिंदुस्थानभर पहिल्याने प्रभुत्व भोगिलेली ती बोलणाऱ्या ‘महाराष्ट्रा’ची अर्थात ‘मऱ्हाठ्यां’ची हेच खरे.’

राजारामशास्त्री भागवत यांच्या म्हणण्यानुसार, ‘प्राकृत भाषांच्या व्याकरणकारांनी जो भाषाविभाग केला आहे व जो भाषाविभाग कोणत्याही प्रकाराने अयथार्थ दिसत नाही, त्यावरून पाहता मूळची सर्वत्र पसरलेली भाषा महाराष्ट्री व सर्व हिंदुस्थानभर पहिल्याने प्रभुत्व भोगिलेली ती बोलणाऱ्या ‘महाराष्ट्रा’ची अर्थात ‘मऱ्हाठ्यां’ची हेच खरे.’

राजारामशास्त्री भागवत यांना मराठी भाषेचा व आपल्या मराठपणाचा यथार्थ अभिमान होता. या अभिमानानं त्यांच्या धर्मभिमानावर व जात्याभिमानावर मात केली होती, हे सांगितलं तर धर्मवादी व जातवादी लोकांच्या भिवया उंचावतील; पण हे खरं आहे व त्यात कोणतीही अतिशयोक्ती नाही.
मात्र, महाराष्ट्र, मराठी भाषा व मराठपण ही एक गोष्ट झाली आणि इतिहासलेखन ही दुसरी. पहिलीच्या अभिमानापायी भागवत दुसरी गोष्ट करायला प्रवृत्त झाले आहेत, असं कुणाला वाटलं, तर ते मात्र चुकीचं आहे. त्यांचं इतिहासलेखन ही एक स्वतंत्र व निरपेक्ष कृती आहे. ते जर पहिल्या गोष्टीच्या अभिमानाशी सुसंगत किंवा तिला पूरक ठरत असेल, तर तो योगायोग समजावा.
वेगळ्या पद्धतीनं सांगायचं झाल्यास असं म्हणता येईल, की मराठे, त्यांची भाषा व त्यांचा देश सर्वश्रेष्ठ आहे, हे गृहीत धरून त्यांनी लेखन केलेलं नाही, तसंच हे प्रमेय सिद्ध करण्यासाठीही त्यांनी लेखनाचा प्रपंच मांडला नाही. हे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची, त्याअनुरोधानं पुरावे गोळा करायचे अशी त्यांची लेखनपद्धती नव्हती.

शास्त्रीबोवा हे चांगले घसघशीत संस्कृत व प्राकृतपंडित होते. वेद-वेदांगं, शास्त्र-पुराणं, काव्य-नाटकं यांवर त्यांचं विलक्षण प्रभुत्व होतं आणि मुख्य म्हणजे ज्या एका साधनाच्या बळावर ते इतिहासाची मांडणी करतात, त्या साधनावर म्हणजे व्याकरणव्युत्पत्तीवर त्यांची जबरदस्त पकड होती.
‘लेखनपूर्व आत्मनिष्ठा’ व ‘लेखनगर्भ आत्मनिष्ठा’ असा भेद कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांनी केला आहे. तो प्राधान्यानं ललित लेखकांच्या; विशेषतः कवींच्या संदर्भात आहे. त्याला धरून त्याच्याशी समांतर असा भेद इतिहासलेखनाच्या संदर्भात करायचा झाला तर ‘लेखनपूर्व वस्तुनिष्ठा’ व ‘लेखनगर्भ वस्तुनिष्ठा’ अशा कोटी कल्पाव्या लागतील. भागवत यांना या दोन्ही कोटी (लेखनपूर्व वस्तुनिष्ठा आणि लेखनगर्भ वस्तुनिष्ठा) लागू पडतात. ते प्रत्यक्ष संशोधन करताना जितके वस्तुनिष्ठ व निःपक्ष असतात, तितकेच त्या संशोधनाची मांडणी करतानाही असतात. मांडणी करताना आणखी एका गुणाची जोड द्यावी लागते व तो गुण म्हणजे निर्भीडता. तीही भागवतांजवळ आहेच. भागवतांची उंची गाठायला इतिहासाचार्य वि. का. राजवाडे कमी पडतात; कारण त्यांच्या वस्तुनिष्ठेला जातिनिष्ठेचं ग्रहण लागतं! ‘ज्ञानकोश’कार श्रीधर व्यंकटेश केतकर यांना हे ठाऊक असल्यानं जातिनिष्ठतेतून मुक्त होण्याची त्यांची धडपड जाणवते; पण त्यात तेही पूर्णपणे यशस्वी झाले आहेत, असं म्हणता येत नाही. तसं करण्याऐवजी ते राजवाडे व भागवत यांचा समन्वय करू इच्छितात; पण मूळ मुद्दा असा आहे, की मर्मदृष्टींनी (insights) खचाखच भरलेल्या भागवतांच्या सूत्ररूप इतिहासलेखनाचा पुरेसा विकास झालाच नाही. त्यांना कुणी भाष्यकार भेटलाच नाही. त्यामुळं त्यांची मांडणी पूर्ण होण्याच्या आत तिच्याशी दुसऱ्या कोणत्या तरी मांडणीचा समन्वय करणं हे पक्वतापूर्व कृत्य होईल. तेच नेमकं केतकरांचं झालं. ‘समाजातल्या अग्रेसर समूहाच्या अग्रेसरत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी लेखन करावं’ असं जेव्हा केतकर सूचित करतात, तेव्हा ते लेखनाचं एक नीतिशास्त्रच बनतं व त्यामुळं लेखनगर्भ वस्तुनिष्ठेला बाध येतो. लेखनपूर्व संशोधनातून, चिंतन-मननातून तुम्हाला एखादी गोष्ट सापडली अन्‌ ती अग्रेसरांना अनुकूल नसेल, तर ती लेखनातून व्यक्त होऊ द्यायची नाही, असं यातून निष्पन्न होतं.

मराठीच्या नगरीविषयीचं म्हणजेच महाराष्ट्राविषयीचं भागवतांचं लेखन अत्यंत गुंतागुंतीचं आहे. आर्य-अनार्य, ब्राह्मण-ब्राह्मणेतर यांसारख्या पारंपरिक, साचेबद्ध किंवा कप्पेबंद द्वंद्वांमध्ये बसणार नाही, अशा चौकटीत लिहिणाऱ्यांचं काम फारच सोपं असतं. ते उपलब्ध पुराव्यांचं सोईस्कर Pigeonholing करतात. अनुकूल पुरावे आणि प्रतिकूल पुरावे अशा दोन प्रकारचे पुरावे आढळून येतात. त्यातल्या अनुकूल पुराव्यांचा कप्पा फुगवत न्यायचा व प्रतिकूल पुराव्यांच्या कप्प्याला कुलूप लावून टाकायचं! आणि कुणी विचारलं तर ‘किल्ली हरवली’ असल्याचं सांगून मोकळं व्हायचं!!
भागवतांच्या महाराष्ट्रमीमांसेचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी ती भारताच्या पार्श्‍वभूमीवर केली आहे आणि जरूर तिथं भारताबाहेरचे संदर्भही घेतलेले आहेत.

दुसरं असं की ही मीमांसा त्यांनी विशेषतः भाषेच्या आधारे केली आहे. भाषा ही काही खासगी किंवा वैयक्तिक वस्तू नसते; किंबहुना Private language नावाची गोष्ट अशक्‍य असल्याचं प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ता विट्‌गेन्स्टाईन यांनी दाखवून दिल्यानंतर कुणी त्याचा यशस्वी प्रतिवाद केल्याचं ऐकिवात नाही. अर्थात भाषा व्यक्तिगत नसली तरी ती पूर्णतः सार्वजनिकही नसते. म्हणजे विश्वातल्या सगळ्याच माणसांची अशी एकच एक भाषा नसते. भाषांच्या उत्क्रांतीच्या इतिहास पाहिला तर वेगवेगळ्या मनुष्यसमूहांनी वेगवेगळ्या भाषा विकसित केल्या असल्याचं आढळून येतं. आता हे मनुष्यसमूह एकमेकांशी कधी सहकार्य करत, तर कधी त्यांचा संघर्षही होई. प्रसंगी असे संघर्ष इतके टोकाला जात, की एक समूह दुसऱ्या समूहाला जिंकून आपल्या अंकित करी. बऱ्याचदा असं जिंकणं याचा अर्थ ‘जेत्या समूहानं जित समूहाच्या मालकीची भूमी अथवा देश अथवा राष्ट्र पादाक्रांत करणं’ असा होई.

या सगळ्या गोष्टींचं प्रतिबिंब त्या त्या समूहांच्या भाषांमध्ये पडल्याशिवाय राहणं शक्‍यच नव्हतं. दुसरं असं की अगदी एका समूहाचे घटक असलेल्या उपसमूहांमध्येही कमी-जास्त प्रमाणात संघर्ष असू शकतो. त्याचंही प्रतिबिंब भाषेत पडतंच. असे संघर्ष पूर्णतः राजकीय असतीलच असं नाही. ते सामाजिक, आर्थिक असू शकतात. एकानं दुसऱ्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी असू शकतात. त्यांचीही छाया भाषेत उतरते.
भाषा हे भागवतांच्या इतिहासलेखनाचं मुख्य साधन आहे. या साधनांच्या आधारे ते प्राचीनच नव्हे; तर अतिप्राचीन काळात पोचतात.

भाषा या साधनाचा सरळ व सोप्या पद्धतीनं उपयोग करून घ्यायची रीत म्हणजे भाषेमध्ये उपलब्ध असलेल्या ग्रंथांचं वाचन करणं व त्यांतल्या घटनांचे वृत्तान्त किंवा हकीकती समजून घेणं. मात्र, ग्रंथांमधून अशा प्रकारे सगळ्याच घटनांच्या तपशीलवार वा सविस्तर हकीकती सापडतीलच असं नाही. अशा वेळी भाषा हाच (ग्रंथ नव्हेत) पुरावा मानून तिच्या आधारे काळाचं अंतर ओलांडावं लागतं. त्यासाठी व्याकरण व विशेषतः व्युत्पत्ती यांचा आधार घ्यावा लागतो. या प्रकारात भागवत पारंगत आहेत.

यासंदर्भात आणखी एका गोष्टीचा खुलासा करायला हवा. राजवाडे-भागवत लिहीत होते, तेव्हाच्या काळात ‘इतिहासाचा वर्ण्यविषय किंवा एकक हे ‘मानवी कुल’ असतं व म्हणून ‘इतिहास हा कौलिक म्हणजेच कुलांचा लिहायला हवा,’ असा विचार प्रबळ झाला होता. त्या वेळी नव्यानं उदयाला आलेल्या मानववंशशास्त्र या ज्ञानशाखेनं जगातल्या मानवाचं वंशनिहाय वर्गीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. याचा संबंध कुठंतरी भाषेशी किंवा भाषिक कुलांशी लावण्याचा प्रयत्न सुरू होता. विल्यम जोन्स, मॅक्‍सम्युल्लर असे मान्यवर संशोधक या आखाड्यात उतरले होते. म्हणजे भाषा या विषयाचं एक व्यापक चर्चाविश्व (Discourse) तयार झालं होतं व तोच या अभ्यासक्षेत्रातला मुख्य प्रवाह ठरला होता. राजवाडे याच चर्चाविश्वात अर्थात मुख्य प्रवाहात लेखन करत होते.

भागवतांना या चर्चाविश्वाची - मुख्य प्रवाहाची- अजिबात पर्वा नव्हती. त्यांचं सगळंच वेगळं होतं. परंपरेतले शब्द वापरायचे झाले तर ते सर्वतंत्र स्वतंत्र होते. सार्वभौम होते. या ‘शब्दावडंबरा’चा व्यवहारातला अर्थ असा होतो, की ते ‘एकांडे शिलेदार’ होते! त्यांना कुणीही चेला नव्हता की दुसरा कुणी विद्वानही त्यांना गुरुस्थानी नव्हता. ते कुणाच्याही संप्रदायात अथवा कळपात मोडत नव्हते व त्यांनी स्वतःचा संप्रदाय तयार करण्याचाही प्रयत्न कधी केला नाही. कदाचित त्यामुळंही त्यांची दखल घेण्याची वा त्यांचा गंभीरपणे प्रतिवाद करण्याची गरज कुणाला वाटली नसावी.
गेल्या लेखात स्पष्ट केल्याप्रमाणे भागवतांच्या मतानुसार, यादवांची आद्यभूमी ही द्रविड होय. या व्यापक भूमीत महाराष्ट्राचाही समावेश करायला हरकत नाही. वेगळ्या शब्दांत सांगायचं झाल्यास, नर्मदेच्या दक्षिणेकडची ही भूमी आहे. विदर्भ हे नाव यदूच्याच वंशातल्या एका पराक्रमी पुरुषामुळं मिळालं आहे. द्रविड देशातली मधुरानगरी ही या यादवांची राजधानी. यादव इथून उत्तरेला गेले असता तिथं राहू लागले. त्या स्थळाचं नाव अपभ्रंशानं ‘मथुरा’ असं झालं. गोदावरी हीच गंगा व तापी ही यमुना (या गोष्टी भागवत विशेषतः व्युत्पत्तीच्या आधारे सांगतात. त्या तांत्रिक तपशिलात जायची गरज नाही). या यादवांच्या पराक्रमामुळं इतर लोक त्यांना ‘महारथ’ म्हणू लागले.
भागवतांच्या म्हणण्यानुसार, ज्या यदूच्या वंशजांना यादव म्हणण्यात आलं तो यदू - सर्वसाधारणपणे जसं मानलं जातं तसं - ययातीचा पुत्र नसून मधुमतीचा पुत्र होय.
यादववंशातला महानायक म्हणजे अर्थातच कृष्ण. या कृष्णाचं संक्षिप्त चरित्र सांगून भागवत म्हणतात  ः ‘हे कृष्णचरित्र अन्यथा करून त्यास मथुरेच्या हरिवंशी राजाचे माहात्म्य वाढवण्यासाठी ‘हरिवंश’ हे नाव वेदव्यासानं दिलं.’
भागवतांची व्युत्पत्ती असं सांगते, की ‘महारथ या शब्दाचा अपभ्रंश ‘मऱ्हाठा.’ नंतर अतिप्राचीन स्वरूप न समजल्यामुळं ऋषिसंततीनं ‘मऱ्हाठा’ शब्द संस्कृत दिसावा एतदर्थ त्यास महाराष्ट्र असे रूप दिले.’

दक्षिणेतल्या गोदावरीची उत्तरेस गंगा कशी झाली, याचा उलगडा शास्त्रीबोवांनी केला आहे. गंगा हा शब्द ‘गम’ धातूपासून आला आहे. जी ‘पुष्कळ जात्ये’ म्हणजे ‘वहात्ये’ ती गंगा. ही व्युत्पत्ती सयुक्तिक मानल्यास गंगा हा शब्द (वाहणाऱ्या) कोणत्याही नदीला लावता येतो. तो नदीवाचक बनतो; पण तो कालांतरानं नदीविशेषाचा म्हणजे गोदावरीचा वाचक होऊन बसला. भागवतांच्या म्हणण्यानुसार, ‘गंगा हे अतिप्राचीन काळापासून ‘गंगथडी’ वगैरे शब्दांवरून पाहता गोदावरीचेच नाव असून, जसजसे मऱ्हाठे पसरले तसतशी गंगाही पसरली.’

जी गोष्ट गंगा-गोदावरीची तीच गोदावरीच्या तीरावरच्या ‘प्रतिष्ठान’ नगरीची! भागवतांच्या म्हणण्यानुसार, ‘प्रतिष्ठान ही अतिप्राचीन काळापासून ते शालिवाहन शतकाच्या चौथ्या किंवा पाचव्या शतकापर्यंत मऱ्हाठ्यांची राजधानी गोदावरीच्या तीरी होती; परंतु, याज्ञिकांनी व त्यांच्या संततीने ‘गंगे’वर (= गोदावरीवर) प्रतिष्ठान होते, ही परंपरा घेऊन ‘भागीरथी’स गंगा हे नाव दिल्यावर तिचा व यमुनेचा जेथे संगम होतो, तेथे प्रतिष्ठान ओढून आणले.’
इतिहासामधल्या या भौगोलिक उलथापालथींचं एक कारण याज्ञिकांनी व पुराणिकांनी केलेली घालघुसड हे असलं, तरी सगळ्याच बाबतींमध्ये हेच घडलं, असा दुराग्रह भागवत धरत नाही. काही बाबतींत त्याचा संबंध मऱ्हाठ्यांच्या गतिमानतेशी, प्रसारणशीलतेशी, म्हणजेच स्थलांतरांशी येतो. यादव ऊर्फ महारथ ऊर्फ मराठ्यांनी संपूर्ण भारतखंड व्यापलं होतं, ही गोष्ट भागवत मुख्यत्वे भाषिक पुराव्यांवरून सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.
यासंबंधीचा सगळ्यात मोठा भाषिक पुरावा कात्यायन वररुचीच्या ‘प्राकृतप्रकाश’ या ग्रंथाचा आहे. विशेष म्हणजे नंतरच्या काळात होऊन गेलेल्या डॉ. केतकरांच्या महाराष्ट्रविषयक संशोधनाची मदारही याच ग्रंथावर आहे.

काही नामांतरं ही स्थलांतराच्या प्रक्रियेत स्वाभाविकपणे घडून आलेल्या घटना आहेत. म्हणजे असं की महारथांचा स्वभाव मुळातच प्रसरणशील असल्यामुळं ते अनेक ठिकाणी गेले व तिथं त्यांनी राज्य केलं. आता ज्या लोकांवर आपण राज्य करतो त्यांच्याशी, त्यांच्या महत्त्वाच्या स्थानांशी, त्यांच्या परंपरांशी सांधा जोडणं ही राज्यकर्त्यांची गरजच असते. ही गरज पुष्कळ वेळा त्यांचे पुरोहित, भाट वगैरे मंडळी भागवतात. यासंदर्भातही असा प्रकार घडला असण्याची शक्‍यता आहे.
मऱ्हाठ्यांच्या प्रसरणशीलतेच्या संदर्भात भागवत उदाहरण घेतात ते शालिवाहन कुलाचं. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘उत्तरेस शालिवाहनाचा किंवा सातवाहनाचा वंश प्रसिद्ध असून, ‘कर्कोट’ वंश संपल्यावर त्यांतील एका पुरुषाच्या हातात काश्‍मीरदेशाचे आधिपत्य आले. जरुसलमीरचे ‘भट्टि’ वंशाचे राजे आपणास शालिवाहन कुलातील म्हणवितात व शालिवाहनाचा जन्म यदूच्या वंशात झाला असे मानतात. भावनगरचे राजेही आपण शालिवाहन कुलातले असे म्हणतात. सारांश, मऱ्हाठ्यांचा व त्यांतील नावाजलेल्या शालिवाहन वंशाचा महिमा प्राचीन काळी काही सामान्य नव्हता. त्यांनी या वेळेस आहिमालय हिंदुस्थान व्यापून टाकले होते.’

भागवत पुढं म्हणतात ः ‘त्याचप्रमाणे ‘मौर्य’ हे ‘मोरे’ या मऱ्हाठी कुलाविशेषवाचक नावाचे संस्कृत रूप. याच रीतीने जे ‘कदम’ होते ते ‘कदंब’ झाले व पवार होते ते ‘प्रमार’ झाले. ‘चुलुक्‍य’ हेही ‘शिरके’ किंवा ‘सालके’ या मऱ्हाठी वंशविशेषवाचक नावाचे संस्कृत रूप दिसते. तेव्हा ही कुले मूळची मऱ्हाठ्यांची असून, त्यांनी नर्मदेच्या उत्तरेस अतिप्राचीन काळी वसाहत केलेली. असे जर आहे तर मऱ्हाठी रजपुतातून निघाले असे म्हणण्यापेक्षा, रजपूत हेच मऱ्हाठ्यांचे वंशज असे म्हणणे अधिक सयुक्तिक दिसते...जयपूरचे राजे आपणास नलवंशी म्हणवितात. उदेपूरचे राजे शिसोदे होत. शिसोदे हे जी मऱ्हाठ्यांची अस्सल कुले आहेत, त्यांपैकी एक होय.’

कात्यायनाच्या ‘प्राकृतप्रकाश’ या प्राकृत भाषांच्या व्याकरणग्रंथात महाराष्ट्री भाषेचं व्याकरण सिद्ध केलेलं आहे. पुढं शौरसेनी भाषेच्या संदर्भातले काही नियम सांगून ‘शेषं महाराष्ट्रीवत्‌’ असं म्हणून इतर नियम महाराष्ट्रीसारखे, असं कात्यायन सांगतो. याचा अर्थ महाराष्ट्री ही शौरसेनी भाषेची प्रकृती होय. हाच न्याय पुढं शौरसेनी ज्यांची प्रकृती आहे, त्या मागधी आणि पैशाची भाषांना लागू होतो. म्हणजेच महाराष्ट्री ही सगळ्या प्राकृत भाषांची जननी होय. (याशिवाय, अलंकारशास्त्रज्ञांनी महाराष्ट्री ही सगळ्या गाथा आणि गीतं यांची जननी असल्याचा निर्वाळा दिलेला आहेच; पण तो मुद्दा वेगळा).

या भाषिक मुद्यावरून भागवत असा तर्क करतात ः ‘प्राचीन काळी मऱ्हाठे साऱ्या हिंदुस्थानभर पसरले होते व जेथे ते गेले, तेथे त्यांनी आपली गाणी व भाषा नेली, असे म्हणण्याशिवाय गती नाही. शूरसेनांनी - म्हणजे मथुरामंडलवासींनी - पहिल्याने मऱ्हाठ्यांपासून स्वतंत्र होऊन त्यास उतरती कळा लावली व हळूहळू नर्मदेपर्यंत दक्षिणेस, ब्रह्मपुत्रेपर्यंत पूर्वेस, सिंधूपर्यंत पश्‍चिमेस मऱ्हाठ्यांचा मुलूख होता, तो काबीज केला व पुढे कालांतराने मागध लोकांनी पूर्वेस व पिशाच्यांनी पश्‍चिमेस स्वातंत्र्य मिळवून शूरसेनांचा मुलूख पुष्कळ कमी केला, असे म्हणावे लागते. अशी व्यवस्था पूर्वी लागलेली असल्याशिवाय महाराष्ट्री शौरसेनीची प्रकृती व शौरसेनी मागधी व पैशाची या दोन भाषांची प्रकृती होण्याचा संभव नाही. सारांश, प्राकृत भाषांच्या व्याकरणकारांनी जो भाषाविभाग केला आहे व जो भाषाविभाग कोणत्याही प्रकाराने अयथार्थ दिसत नाही, त्यावरून पाहता मूळची सर्वत्र पसरलेली भाषा महाराष्ट्री व सर्व हिंदुस्थानभर पहिल्याने प्रभुत्व भोगिलेली ती बोलणाऱ्या ‘महाराष्ट्रा’ची अर्थात ‘मऱ्हाठ्यां’ची हेच खरे.’

प्रत्यक्षात न घडलेला इतिहास असं सांगतो, की आधी मुसलमानांनी आणि नंतर ब्रिटिशांनी हिंदुस्थान काबीज केला नसता, तर पहिल्यांदा देवगिरीच्या यादवांकडं व नंतर मराठ्यांकडं तो जिंकण्याचं सामर्थ्य होतं. अठराव्या शतकातल्या मराठ्यांनी तो जवळपास जिंकला होता, असं म्हटलं तरी चालेल.
इतिहासानं आपल्याला असे दोन वेळा चकवे दिलेले आहेत!

Web Title: sadanand more write article in saptarang