मराठ्यांच्या सत्तेचा महावृक्ष (मराठीचिये नगरी)

सदानंद मोरे
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

मराठ्यांच्या सत्तेसंदर्भातल्या लेखनात ग्रॅंट डफपेक्षा न्या. महादेव गोविंद रानडे यांचं वेगळेपण कुठं आहे, हे सांगण्यासाठी दोघांनी वापरलेल्या रूपकांचा उल्लेख करणं पुरेसं व्हावं. ‘अरण्यात वाऱ्यामुळं झाडाला झाड घासून त्या घर्षणातून लागणारा वणवा’ हे डफचं रूपक आहे, तर रानडे हे मराठ्यांच्या सत्तेच्या उदय-उत्कर्षाचं सादरीकरण करण्यासाठी ‘जाणीवपूर्वक लावून वाढवलेला वृक्ष’ असं रूपक वापरतात. त्यांचा ग्रंथ हे एक महारूपक आहे! 

मराठ्यांच्या सत्तेसंदर्भातल्या लेखनात ग्रॅंट डफपेक्षा न्या. महादेव गोविंद रानडे यांचं वेगळेपण कुठं आहे, हे सांगण्यासाठी दोघांनी वापरलेल्या रूपकांचा उल्लेख करणं पुरेसं व्हावं. ‘अरण्यात वाऱ्यामुळं झाडाला झाड घासून त्या घर्षणातून लागणारा वणवा’ हे डफचं रूपक आहे, तर रानडे हे मराठ्यांच्या सत्तेच्या उदय-उत्कर्षाचं सादरीकरण करण्यासाठी ‘जाणीवपूर्वक लावून वाढवलेला वृक्ष’ असं रूपक वापरतात. त्यांचा ग्रंथ हे एक महारूपक आहे! 

स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा ही त्रिसूत्री सांगणाऱ्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांमुळं महाराष्ट्रात इतिहासाच्या अभ्यास-संशोधनाची आणि लेखनाची एक लाट उसळली हे खरं असलं, तरी महाराष्ट्राचा इतिहास लिहिणं, हे काही शास्त्रीबुवांचं उद्दिष्ट नव्हतं. तेवढा त्यांचा व्यासंग नव्हता व तसा व्यासंग करण्यासाठी त्यांना पुरेसं आयुष्यही लाभलं नाही. त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन इतिहासाकडं वळलेल्या लोकांमध्ये उत्साहाची कमतरता नसल्यामुळं त्यांनी या क्षेत्रात भरपूर कामही केलं.
मात्र, मुद्दा केवळ इतिहासलेखनासाठी आवश्‍यक असणारी साधनसामग्री गोळा करण्याचा नव्हता, तसेच ग्रॅंट डफ यांच्यासारख्या ब्रिटिश इतिहासकारांच्या चुका दाखवण्याचाही नव्हता. या इतिहासकारांनी लिहिलेल्या इतिहासाला पर्याय ठरू शकेल, असा इतिहास लिहिणं अधिक महत्त्वाचं होतं. इतिहासासाठी आवश्‍यक असलेली वस्तुनिष्ठ तथ्यं अचूकपणे हाती आल्याशिवाय इतिहास लिहिता येत नाही, हे तर सत्यच आहे; पण तथ्यांची गोळाबेरीज किंवा जंत्री म्हणजे इतिहास नव्हे, तसंच या तथ्यांची म्हणजेच ऐतिहासिक घटनांची कालानुक्रमे मांडणी म्हणजेही इतिहास नव्हे. अशी सगळी तथ्ये एका सूत्रात गोवणारा, त्यांचा अन्वयार्थ लावणारा, त्यांचं स्पष्टीकरण करणारा सिद्धान्त यासाठी फार महत्त्वाचा ठरतो. ऐतिहासिक पुरावे वगैरे गोळा करण्यासाठी परिश्रम, चिकाटी अशा गुणांची आवश्‍यकता असते; पण या गुणांमुळं सिद्धान्तनाची पात्रता अंगी येईलच, याची खात्री देता येणार नाही. त्यासाठी प्रतिभेची आवश्‍यकता असते.
चिपळूणकरांच्या परंपरेत अशा प्रकारच्या प्रतिभेची देणगी लाभलेला अभ्यासक म्हणजे विश्‍वनाथ काशीनाथ राजवाडे अर्थातच इतिहासाचार्य राजवाडे. तथापि, तीव्र असे जातीय पूर्वग्रह आणि सिद्धान्त बांधण्यातली उताविळी यामुळं राजवाड्यांची प्रतिभा अनेक वेळा स्वैर भरकटली व त्या भरकटलेपणाचे परिणाम महाराष्ट्राच्या केवळ ज्ञानक्षेत्रावरच नव्हे, तर समाज जीवनावरही झाल्याशिवाय राहिले नाहीत. 
अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या इतिहासाला सैद्धान्तिक प्रतिष्ठा आणि गांभीर्य प्राप्त करून देण्याचं श्रेय न्या. महादेव गोविंद तथा माधवराव रानडे यांना द्यावं लागतं.
महाराष्ट्राचा सैद्धान्तिक किंवा सोपपत्तिक इतिहास लिहिण्याचं काम कठीण असल्याचं कारण म्हणजे या इतिहासाची, या इतिहासातल्या घटनांची, इतिहास घडवणाऱ्या कर्त्यांच्या कृत्यांची व्याप्ती. सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात शिवाजीमहाराजांपासून सुरू झालेल्या या इतिहासानं अठराव्या शतकात जवळपास संपूर्ण भारतखंड व्यापलं. ब्रिटिश आणि फ्रेंच या परकीय सत्तांशी आलेल्या संबंधांमुळं मराठ्यांच्या राजकारणाला एक आंतरराष्ट्रीय परिमाण लाभलं.
भारताच्या इतिहासाशी समव्याप्त झालेल्या महाराष्ट्राच्या इतिहासाला कवेत घेणारा सिद्धान्त जर रचता आला नसता, जर त्याची सैद्धान्तिक संगती लावता आला नसती, तर मराठ्यांची कृत्यं या ऐतिहासिक कृती न ठरता दिशाहीन, निरुद्देश, सैरावैरा धावपळी ठरल्या असत्या. 
वेगळ्या शब्दांत सांगायचे म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाच्या लेखनाचं आव्हान घटनात्मक तथ्यं गोळा करणं, त्यापुढं एक टप्पा जाऊन त्या घटनांमधला कार्यकारणसंबंध अर्थात एका घटनेतून दुसरी घटना कशी निघाली, हे दाखवणं एवढंच नसून, मराठ्यांच्या ज्या कृत्यांनी या घटना घडवल्या त्या कृत्यांमागच्या त्यांच्या सैद्धान्तिक वा तात्त्विक भूमिकेचा वेध घेऊन अंतिमतः ही भूमिकाच त्यांची प्रेरणा होती, हे दाखवण्याचं होतं. हे दाखवता आलं तरच मराठ्यांच्या इतिहासाला जगाच्या इतिहासात स्थान व प्रतिष्ठा मिळू शकली असती. हे आव्हान न्यायमूर्ती रानडे यांनी स्वीकारलं व पेललंदेखील.
रानड्यांच्या इतिहास लेखनाकडं वळण्यापूर्वी ते ज्याचा प्रतिवाद करण्यास प्रवृत्त झाले होते, त्या ग्रॅंट डफ याच्या इतिहासासंबंधी काही खुलासा करणं आवश्‍यक आहे. डफच्या समीक्षेची सुरवात खरंतर त्यापूर्वीच झाली होती. नीलकंठ जनार्दन कीर्तने यांनी एका निबंधाद्वारे डफनं लिहिलेल्या मराठ्यांच्या इतिहासातल्या वस्तुस्थितीविषयक तथ्यांच्या चुका उघडकीस आणल्या होत्या; मात्र कीर्तने यांच्या निबंधात तात्त्विक विवेचनाचा अभाव होता. रानडे डफच्या इतिहासातल्या स्थल-कालाच्या गफलती सांगत नाहीत. त्यांचा आक्षेप तात्त्विक म्हणजेच सैद्धान्तिक पातळीवरचा आहे.
डफच्या मर्यादा स्पष्ट करण्यापूर्वी हेही सांगितलं पाहिजे, की डफ हा मराठेशाहीच्या शेवटच्या दिवसांचा साक्षीदार होता. इतकंच नव्हे, तर गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याच्या हाताखाली त्यानं प्रत्यक्ष काम करून इतिहास घडवण्यात भागही घेतला होता. सातारागादीचे छत्रपती प्रतापसिंहमहाराज यांच्या दरबारात त्यानं ब्रिटिश सत्तेचा प्रतिनिधी या नात्यानं कामही केलं होतं. त्याला मराठ्यांच्या दफ्तरखान्यात थेट प्रवेश होता; त्यामुळं त्यानं बरीच कागदपत्रंही अभ्यासली होती.
रानडे हे डफच्या मांडणीची समीक्षा करतात. ती करताना डफ नावाच्या व्यक्तीवर टीका करण्याचं त्यांनी टाळलं आहे. ही गोष्ट रानडे यांच्या स्वभावाशी सुसंगतच आहे. राजवाडे मात्र डफला सोडायला तयार नाहीत. ते थेट डफच्या लायकीचा अथवा पात्रतेचा प्रश्‍न उपस्थित करतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मराठ्यांचा इतिहास समजण्याची डफची पात्रताच नव्हती. वेगळ्या पद्धतीनं सांगायचं झाल्यास डफ हा एक सर्वसामान्य इतिहासकार होता. मराठ्यांच्या इतिहासाचं आकलन करण्याची त्याची बौद्धिक कुवत नव्हती.
डफच्या वैयक्तिक पात्रापात्रतेचा प्रश्‍न उपस्थित करताना सामाजिक-राजकीय बाबींचीही नोंद घ्यायला हवी. पहिली गोष्ट म्हणजे त्याचे पूर्वग्रह व दुसरी गोष्ट म्हणजे ‘जित’ मराठ्यांकडं ‘जेते’ या नात्यानं पाहण्याची त्याची दृष्टी. अशा गोष्टी कुवत असलेल्या अभ्यासकांसाठीही मारक ठरू शकतात. डफ तर तसा शिपाईगडीच. एल्फिन्स्टनप्रमाणे तो काही चांगला वाचक वा अभ्यासक नव्हता.
या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून डफला मराठ्यांच्या इतिहासामधल्या तात्त्विक स्तराचं आकलन होऊ शकलं नाही. तो तिथपर्यंत पोचूच शकला नाही.
डफचा असा समज होता : ‘शिवाजीमहाराजांच्या काळात महाराष्ट्रात मराठ्यांचं जे राज्य निर्माण झालं व ज्याचा पुढं भारतभर विस्तार झाला, तो एक अपघात होता किंवा इच्छेनं घडून आलेली आकस्मिक घटना होती. एखाद्या अरण्यात अचानक वणवा लागावा, तसं हे राज्य अचानक निर्माण झालं, त्याला काही अगापीछा नव्हता.’
हाच मुद्दा वेगळ्या पद्धतीनं सांगायचा झाल्यास असं म्हणता येईल, की डफच्या म्हणण्यानुसार, ‘मराठ्यांच्या लढाया, युद्धं, तह, राज्य कारभार यांच्यात कोणतंही वैचारिक सूत्र नव्हतं.’ डफ याच्या मते : ‘मराठ्यांचं राज्य म्हणजे जणू एक वावटळ होती...अचानक आली...धुरळा उडवला आणि संपून गेली’ !
डफच्या इतिहासानं जवळपास अर्ध शतक महाराष्ट्राच्या वैचारिक विश्‍वावर जणू अधिराज्य केलं. शाळा, कॉलेज व विद्यापीठ स्तरावर डफच्या मांडणीला पर्यायच नव्हता. डफ हा मराठ्यांना लुटारू व विश्‍वासघातकी मानतो. त्यातून मराठ्यांची प्रतिमा ही ‘राज्यकर्ते’ ‘धुरीण’ ‘मुत्सद्दी’ अशी निर्माण न होता वेगळीच निर्माण झाली होती.
या पार्श्‍वभूमीवर रानडे यांच्या मांडणीचं महत्त्व लक्षात येतं. ‘मराठ्यांचा इतिहास ही गंभीरपणे पाहण्याची बाब आहे, सहज उडवून लावायची नव्हे. मराठ्यांचे नायक विभूती म्हणता येईल एवढ्या उच्च पातळीवरचे आहेत,’ हे त्यांनी स्पष्ट केलं.
डफनं लिहिलेला मराठ्यांचा इतिहास हा केवळ लढायांचा व तहांचा इतिहास आहे. मराठ्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक वा साहित्यिक कामगिरीचा व या क्षेत्रांचा मराठ्यांच्या राज्याशी असलेल्या संबंधांचा डफला साधा गंधही नाही. रानडे या सगळ्या पैलूंचा एकत्रित विचार करतात व त्यांच्या परस्परसंबंधांचा वेध घेतात.
The Rise of Maratha Power हे रानडे यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं शीर्षकच बरंच काही सांगून जातं. ग्रंथाचा अनुवाद करणारे वि. गो. विजापूरकर यांनी या शीर्षकाचं मराठी भाषांतर ‘मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष’ असं केलं आहे.
शीर्षकावरून सकृतदर्शनी तरी रानडे हे मराठ्यांच्या राजकीय सत्तेच्या उत्कर्षाविषयी बोलत असावेत, असं वाटतं आणि ते बरोबरच आहे. शिवाजीमहाराजांनी मराठ्यांची सत्ता कशी स्थापन केली, महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कसा विस्तार केला, हा रानडे यांचा प्रतिपाद्य विषय आहे. आता राजकीय सत्तेची स्थापना, बचाव व विस्तार म्हटलं की तो लढायांच्या व तहांच्या मार्फत होणार हे उघड आहे; पण रानडे यांच्या ग्रंथात लढायांचं वर्णन फारसं उपलब्ध नाही. रानडे हे लढाई करणाऱ्या योद्‌ध्यांच्या आणि मुत्सद्द्यांच्या प्रेरणेविषयी अधिक बोलताना दिसतात. ही प्रेरणा लुटालुटीची नाही, सूडाची नाही, राज्यतृष्णेचीही नाही. तिचं वर्णन करायचं झाल्यास तिच्यासाठी ‘धार्मिक’, ‘नैतिक’, ‘तात्त्विक’ असे शब्द वापरावे लागतात.
डफ आणि रानडे यांच्या इतिहासलेखनामागील भूमिकांमधला फरक इथंच स्पष्ट होतो. ‘मराठ्यांची सत्ता हा एक अपघात किंवा आकस्मिक घटना आहे,’ असं डफ मानतो. याचा अर्थच मुळी त्याच्यासाठी या सत्तेच्या उदयाची वा उत्कर्षाची तात्त्विक कारणमीमांसा करायची गरजच नाही. त्यामुळं त्याचं इतिहासलेखन सुरू होतं ते दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी दक्षिणेत उतरून देवगिरीच्या यादवांचं राज्य काबीज करतो तेव्हापासून. नंतरची बहामनी सत्ता, तिच्यातून निर्माण झालेसा सुलतानशहा यांचा त्रोटक आढावा घेऊन तो मराठा सरदारांच्या उदयाचा उल्लेख करून त्यातच भोसले घराण्याची व्यवस्था लावतो. हा सगळा पूर्वेतिहास डफनं २५-३० पानांत उरकला आहे. हा इतिहासही केवळ राजकीय आहे आणि तोही संकुचित अर्थानं म्हणजेच लढायांचा, हे वेगळं सांगायची गरजच नाही. 
आता डफपेक्षा रानडे यांचं वेगळेपण कुठं आहे, हे सांगण्यासाठी दोघांनी वापरलेल्या रूपकांचा उल्लेख करणं पुरेसं व्हावं. अरण्यात वाऱ्यामुळं झाडाला झाड घासून त्या घर्षणातून लागणारा वणवा हे डफचं रूपक आहे, तर रानडे हे मराठ्यांच्या सत्तेच्या उदय-उत्कर्षाचं सादरीकरण करण्यासाठी जाणीवपूर्वक लावून वाढवलेल्या वृक्षाचं रूपक वापरतात. त्यांचा ग्रंथ हे एक महारूपक आहे. पहिल्या प्रकरणात मराठ्यांच्या इतिहासाचं महत्त्व विशद करून झाल्यानंतर प्रत्यक्ष इतिहास सांगताना ते सुरवात करतात तीच मुळी ‘जमीन कशी तयार केली?’ या प्रकरणापासून. उघडच आहे, की बीज लावून झाड वाढवायचं असेल, तर ते बी चांगल्या प्रतिचं असलं पाहिजे. ते लावल्यावर येणाऱ्या वृक्षाची वाढ नीट होण्यासाठी योग्य ते खतपाणी योग्य त्या मात्रेत घातलं पाहिजे, तरच ते नीट उगवेल. रानडे यांच्या ग्रंथातलं पुढचं प्रकरण आहे : ‘बी कसे पेरले?’ त्यानंतर : ‘बी कसे बळावले?’ बी बळावून झाड उगवून आलं. त्यानंतरचा टप्पा म्हणजे अर्थातच ‘झाडास पालवी फुटते’ आणि त्यानंतर अपेक्षेप्रमाणे ‘झाडास फळे येतात.’
मुद्दा सरळ आहे, रानडे हे मराठ्यांच्या सत्तेच्या उत्कर्षाकडं एक जैविक विकास म्हणून पाहतात, त्यासाठीच ते वृक्षाच्या रूपकाची योजना करतात. रानडे यांचं मुख्य लक्ष्य शिवशाही हे असल्यामुळं त्यांनी इतिहासाच्या उत्तरकालाचं म्हणजे पेशवाईचं फारसं विवेचन केलं नाही; पण ते करायचं झाल्यास वृक्षाचं मोघम रूपक पुरेसं ठरणार नाही. त्यासाठी समर्पक अशा वृक्षाची निवड करावी लागेल आणि अर्थात तो महावृक्ष म्हणजे वटवृक्ष असणार, हे उघड आहे.
इतर वृक्षांपेक्षा वडाचं झाड हे वैशिष्ट्यपूर्ण ठरते, ते त्याच्या विस्ताराच्या विशिष्ट पद्धतीमुळं. वडाच्या झाडाच्या फांद्यांना पारंब्या फुटतात. त्या पारंब्यांची वाढ वरच्या दिशेनं होण्याऐवजी खालच्या दिशेनं म्हणजे जमिनीच्या रोखानं होते. जमिनीच्या दिशेनं खाली वाढलेल्या पारंब्या चक्क जमिनीत घुसतात आणि जमिनीतला जीवनरस शोषून घेऊन त्या प्रत्येक पारंबीलाच जणू एक स्वतंत्र वृक्ष उगवतो.
वडाच्या पारंब्यांपासून उगवलेल्या वृक्षांची वाढ इतकी होते, की कालांतरानं मूळचं झाड कोणतं, पारंब्या कोणत्या आणि पारंब्यांना जमिनीतून फुटलेले नंतरचे वृक्ष कोणते, हे ओळखणं कठीण होऊन जावं.
मराठ्यांच्या सत्तेची मीमांसा करताना ती एक आकस्मिक, अपघाती घटना नसून, जमिनीची मशागत करून लावलेल्या बीजापासून उगवलेल्या व जपत जपत जोपासलेल्या फळा-फुलांनी लगडलेल्या झाडाप्रमाणे योजनाबद्ध, प्रयत्नसिद्ध व (तरीही) जैविक घटना आहे, हे रानडे यांनी बरोबर ओळखले व त्यानुसार त्यांनी डफचा समर्थपणे प्रतिवादही केला.
रानडे यांच्या इतिहासलेखनपरंपरेचा विस्तार करणारा तोलामोलाचा इतिहासकार रानडे यांच्यानंतर झाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. राजवाड्यांची एक प्रभावळच निर्माण झाली. महाराष्ट्रातले एक ख्यातनाम विद्वान प्रा. न. र. फाटक हे खरंतर रानडे यांच्या परंपरेतले. त्यांनी विपुल ग्रंथरचना केली; पण त्यांनी रानडे यांनी केलेली मराठ्यांच्या इतिहासाची मीमांसा पुढं नेली, असं म्हणता येणार नाही.
रानडे यांच्या The Rise of Maratha Power  या ग्रंथामधलं झाड कोणतं, हे ओळखूनच ही मीमांसा पुढं नेणं शक्‍य आहे आणि ते झाड अर्थातच वडाचं आहे!

Web Title: sadananda more writes about Maratha