सहकार्य हाच खरा धर्म

सहकार्य हाच खरा धर्म

घरकाम करणारा सालदार गडी परशा आजारी असूनही आळशी मंगेशनं त्याला मालकाच्या रुबाबात मदत केली नाही. परशा थेट तापानं फणफणल्यामुळं नंतर बोलावूनही तो येऊ शकला नाही आणि अचानक आलेल्या पावसानं सगळ्यांची धांदल उडाली. मंगेशला धान्याच्या गोण्या उचलता आल्या नाहीतच. अप्पा पाटलांचं पावसानं मोठं नुकसान झालं.

अप्पा पाटील...गावातलं मोठं प्रस्थ...सधन शेतकरी...त्यांना सारा गाव अप्पा म्हणत. घरात माणसांचा राबता सतत. चाळीस एकर शेतीमुळ घरात सुबत्ता. त्यांना एक मुलगा होता. त्याचं नाव मंगेश...धडधाकट, पण आळशी. झोप त्याला प्रिय. सतत झोपत असे व झकपक कपडे घालून गावात पुढारकी करीत बसे.

त्यांच्या घरात वर्षानुवर्षे काम करणारा एक सालदार होता. परशा त्याचं नाव...शरीरानं काटकुळा; पण काटक... गरीब, होतकरू... मुख्य म्हणजे, प्रामाणिक होता. अप्पा पाटलांचा तो आवडता सालदार होता. अप्पा पाटलांचा तसा त्याच्यावर जीवही होता. बरीच वर्षं तो त्यांच्याकडं काम करत होता. पहाटे पाच वाजता येऊन तो घर आवरायला घेत असे. झाड-झूड, शेण सारवण, पाणी भरणं, बैलांना स्वच्छ करून त्यांना बैलगाडीला जुंपणं व शेतात जाणं हा त्याचा नेहमीचा शिरस्ता होता. काबाडकष्ट करून तो पोट भरत होता. कष्टाळू असल्यानं त्याच्याकडून घरातली सर्वच मंडळी कामं करून घेत असत. त्याच्याकडून कामात एक दिवस खाडा पडला असं कधीही झालं नव्हतं.

शरीर काटकुळं असलं तरी मणामणाचं ओझं तो उचलून नेत असे. कष्ट करीत असल्यानं त्याच्या हाताच्या व पायाच्या नसा तट्ट फुगल्या होत्या. एखाद्या बैलाप्रमाणे तो अप्पा पाटलांच्या शेतात व घरात राबत होता... त्याच्या मदतीला तसं कुणीही नव्हतं...

एक दिवस शेतात त्याला खूपच कामं होती. दोन-तीन मजूर ज्वारी खुरपण्याची कामे करीत होते. तर ती ज्वारी काढून पोत्यात भरण्याचं काम परशा करीत होता. काम खूपच किचकट व कष्टाचं होतं. मणामणाची पोती उचलून तो ट्रॅक्‍टरमध्ये ठेवीत होता. पाठीवर गोणी घेऊन जाताना त्याला आटापिटा करावा लागत होता. ऊन असल्यानं अंग घामानं निथळत होतं; पण तरीही तो तसाच काम करीत होता. भाकरीचे तुकडे तोंडात टाकून व घटकाभर विश्रांती घेऊन तो पुन्हा कामाला लागत असे.

संध्याकाळ झाली की ट्रॅक्‍टर निघून जात असे आणि परशा बैलगाडीने येत असे. घरी आल्यानंतर ट्रॅक्‍टर त्याची वाटच पहात असे. पुन्हा त्या सर्व ज्वारीच्या गोण्या तो कोठारात ठेवत असे, आणि शेवटी बैलांना चारापाणी घालून रात्री उशिरा घरी जात असे. एक दिवस मात्र त्याला अंगात कणकण वाटायला लागली. तरीही तो शेतात जाऊन ज्वारी काढून आला व सर्व पोती ट्रॅक्‍टरमध्ये ठेवली. अंग तीळतीळ तुटत होतं; पण तो तसाच काम करीत राहिला. अंग दुखायला लागलं होतं. परशानं वेग वाढवून सर्व गोण्या ट्रॅक्‍टरमध्ये टाकल्या होत्या. अंधारून येण्याच्या आत त्याला गावात जायचं होतं. काळेकुट्ट ढग जमा झाले होते. पण पाऊस पडत नव्हता.

घरी आल्या आल्या परशा कामाला लागला. त्याला बरं वाटंत नव्हतं तरीही तो काम करीत राहिला आणि मंगेश पायावर पाय टाकून बसला होता. अप्पा पाटील बाहेर गेले होते. बायका स्वयंपाक घरात आपापली कामे करीत होत्या.
परशा एक एक गोणी पाठीवर घेत कोठारात ठेवू लागला. पोती जड असल्यानं तो वाकला होता. त्याला अशक्तपणाही जाणवत होता. मंगेशकडं पहात तो म्हणाला,
‘‘भाऊ !... गोणी उचलायला थोडा हातभार लावता का? फार बरं होईल.’’ त्यावर मंगेश आश्‍चर्याने उत्तरला...
‘‘काय ! मी? आणि गोण्या उचलू? माझं ते काम नाही. मी मालक आहे आणि तू सालदार. तूच ते कर, तुला ते करावंच लागेल.’’
‘‘तरी पण ! भाऊ’’ परशा अजीजीने म्हणाला.
‘‘पणबीण काही नाही...नाटकं नकोत...चल ठेव लवकर त्या गोण्या...’’ मंगेश जवळजवळ ओरडलाच होता... त्याला परशाचं वागणं आवडलं नव्हतं.
परशा मुकाटपणे पुढे काहीही न बोलता कामाला लागला...अतिशय कष्टाने...त्याला त्रास होत होता हे निश्‍चित.
तेवढ्यात अप्पा गावातून घरी आले...कपडे काढून ते खुर्चीत विसावले. परशा गोण्यांची ने-आण करीत होता. आता त्याला असहाय्य होत होतं. एक गोणी उचलताच त्याचे पाय थरथरू लागले. तसाच तो खाली पडला. त्याच्या अंगावर गोणी होती. तो तळमळत होता. अप्पांच्या ते लक्षात येताच ते उठले व गोणी बाजूला करण्याचा प्रयत्न करीत मंगेशला म्हणाले, ‘‘मंग्या...आरं ऊठ की ! परशा खाली पडलाय...उठव त्याला.’’
‘‘जाऊ द्या. अप्पा, नाटकं आहेत नुसती, उठेल तो...’’ मंगेश बेदरकारपणे म्हणाला.
अप्पांनी गोणी ढकलत परशाला हात दिला व उचललं व म्हणाले, ‘‘अरे ! परशा काय झालं? बरं नाही का?’’
‘‘होय अप्पा...कणकण आहे...’’ परशा उत्तरला.
‘‘अरे, मग, राहू दे, जा तू घरी. आराम कर. ज्वारी ट्रॅक्‍टरमध्येच राहू दे. उद्या कर हवं तर ! जा तू.’’ परशा अदबीनं उठला व अप्पा पाटलांना नमस्कार करून निघून गेला. मंगेशला मात्र हे अप्पाचं वागण रुचलं नव्हतं.

रात्र झाली होती. ट्रॅक्‍टर अंगणातच होता. ढग गडगडायला लागले. वारं सुटलं होतं आणि पाऊस सुरू होण्याची चिन्हं होती. अप्पा म्हणाले, ‘‘मंग्या !... आरं पाऊस येतोय वाटतं, धान्य आत घेतलं पाहिजे...नाहीतर लाखोचं नुकसान होईल.’’
‘‘अप्पा, तुम्ही उगाच परशाला पाठवीलं. गोण्या ठेवल्या असत्या त्यानं.’’
‘‘अरे ! मंग्या तो बी माणूसच हाय की...बरं नसंल त्याला...’’
‘‘काही नाही अप्पा...यांची सगळी नाटके असतात. थांबा मी त्याला बोलावणं पाठवतोय.’’ मंगेश हेकेखोरपणे म्हणाला. तेवढ्यात निरोप आला. परशा तापानं फणफणला होता. मंगेश हवालदिल होत म्हणाला. ‘‘आता अप्पा...काय करायचं?’’ मंगेशचा प्रश्‍न.
‘‘आता काय?... तू धडधाकट हाईस...उचल आणि ठेव त्या गोण्या...’’ अप्पा जवळजवळ आदेश देतच म्हणाले.
एव्हाना पाऊस सुरू होण्याच्या मार्गावर होता. मंगेशजवळ पर्यायच नव्हता आणि मणामणाच्या गोणी उचलू लागला...एक एक पोती उचलताना त्याला धाप लागू लागली. मोठ्या कष्टानं त्यानं दोन गोण्या उचलल्या. पुढच्या गोणी उचलण्याचं त्याचं धाडसचं होतं नव्हतं. त्याच्या मनात येऊन गेलं.
‘‘मगाशीच आपण परशाला हातभार लावला असता तर आता सर्व गोण्या घरात असत्या.’’ तो स्वतःशीच पुटपुटत होता...अप्पा म्हणाले, ‘‘मंग्या काही म्हणाला का तू?’’
‘‘काही नाही अप्पा...माझ्याच्यानं हे होणार नाही. माझी पाठ धरलीय.’’ अप्पा पाटलांनी नुसतंच स्मित केलं...ते स्वतः मदत करीत होते. पण विजांच्या कडकडाटात धो-धो पाऊस पडू लागला. ट्रॅक्‍टरमध्ये पाणी साचून सर्व धान्य वाया गेलं. अप्पा व मंगेश पहातच राहिले होते. ते काहीच करू शकले नाहीत. अप्पा पाटील म्हणाले,
‘‘मंग्या !... वेळीच तू परशाला मदत केली असती तर ही वेळ आली नसती. तुझी पाठपण धरली नसती आणि धान्यही वाया गेलं नसतं. माणसानं एकमेकांना मदत करणं हाच आपला धर्म आहे. जा तू आता. आराम कर.’’ मंगेश खालमानेनं बसला. त्याचा चेहरा अपराधी झाला होता.

तात्पर्य ः एकमेकांना साह्य करण्यातच खरा मानव धर्म आहे. उच्चभ्रू घोडा आणि कष्टाळू गाढव या दोघांचीच तर ही संकल्पना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com