Article: प्रत्येकाला आनंदाचा मार्ग शोधावा लागेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रत्येकाला आनंदाचा मार्ग शोधावा लागेल
प्रत्येकाला आनंदाचा मार्ग शोधावा लागेल

प्रत्येकाला आनंदाचा मार्ग शोधावा लागेल

डॉ. सूरज एंगडे

महिलेच्या स्वातंत्र्याबाबत बहुतांश धर्मीयांची मते एकसारखीच आहेत. महिलांना मर्जीनुसार संबंध ठेवण्याचा अधिकार आहे का? कोणाच्या बेडरूममध्ये काय चालते, याचे संशोधनात्मक पुरावे आपल्याकडे नाहीत; मात्र त्यावरून ठरवलेले नियम आहेत...

काही वर्षांपूर्वी ‘#मीटू’ घोषवाक्याचा समाजमाध्यमांवर उदय झाला आणि अख्ख्या जगभरात खळबळ माजली. महिलांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध ही एक आधुनिक चळवळ होती. लिंगभेदातील या प्रभावी चळवळीचा उदय अमेरिकेत झाला. या चळवळीची प्रणेती एक अमेरिकन कृष्णवर्णीय महिला तराना बुर्क. ती २००६ पासून लैंगिक विषमतेविरुद्धच्या चळवळीत अग्रेसर होती. २०१७ मध्ये तिने या चळवळीला एक नवीन परिभाषा व दिशा दिली. प्राथमिकरीत्या तरानाचे लक्ष हे कृष्णवर्णीय महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारावर होते; पण त्याची गरज प्रतिगामी संस्कृतीने जखडलेल्या अनेक महिलांना होती. त्यामुळेच अनेक महिलांनी या मोहिमेत भाग घेतला आणि जबाबदार पदावर असलेल्या अनेक बलाढ्य पुरुषांना मान खाली घालायला लावली. हॉलीवूडचे निर्माते, प्रस्थापित लेखक आणि करमणूक क्षेत्रातील दिग्गजांच्या लैंगिक छळाच्या कृत्यांना ‘मीटू’ने काळे फासले. काही ठिकाणी पुरुषांना क्षुल्लक कारणांवरूनसुद्धा अटक झाली. अनेक प्रस्थापित पुरुषांचे व्यवसाय व दुकाने बंद पडली. महिलांच्या हक्काचा एकप्रकारे तो महत्त्वाचा काळ होता. आजही आपल्याला त्याचे पडसाद अनेक ठिकाणी पाहायला मिळतात.

‘मीटू’ चळवळीच्या निमित्ताने लैंगिक असमानता व छळावर भरपूर प्रकाश टाकला गेला. त्यातील महिलांचे अनुभव वाचून अनेक पुरुषांना स्वत:चाच दृष्टिकोन व वागणुकीवर विचार करणे भाग पडले. या चळवळीने जगातील अन्य भागांत कसा व काय बदल केला, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न मी केला... त्यातील एक संभाषण स्त्रीच्या वयात येण्यापासून तिच्या लैंगिकतेबद्दल आहे...

युरोपात एका ३९ वर्षांच्या महिलेसोबत सहज बोलताना अनेक विषयांवर चर्चा झाली. त्या महिलेने तिच्या पहिल्या प्रियकराबद्दलचे आपले अनुभव सांगितले. वयाच्या सतराव्या वर्षी त्या महिलेने प्रियकरासोबत तीन वर्षे घालवली. तिचा प्रियकर तिच्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा होता. या प्रेमसंबंधाबद्दल तिच्या आई-वडिलांना पूर्ण माहिती होती. तिच्या वडिलांना याबद्दल विचारले असता, त्यांनी त्यावर काहीही असहमती दर्शवली नाही. ‘तो तिचा निर्णय होता. मी त्यामध्ये काय म्हणणार? या वयात प्रियकर असणे स्वाभाविक आहे,’ असे त्यांनी सांगितले. तिच्या आईला विचारले तर त्या म्हणाल्या की, ‘माझी मुलगी काही वाईट व अविचारी निर्णय घेणार नाही. माझा तिच्यावर विश्‍वास होता,’ असे तिने स्वाभिमानाने सांगितले. तिच्या निर्णयाबद्दल आईही खूश होती.

युरोपात १७ वर्षीय मुलीने तिच्यापेक्षा पाच-सहा वर्षांच्या मोठ्या मुलाबरोबर प्रेम केले. अगदी जोडपे म्हणून वावरले. त्याला परिवाराचा व समाजाचा काहीएक विरोध नव्हता. भारतात असे आपल्याला सहज दिसणे सोपे आहे का? आपल्याकडे महिलांच्या वयात येण्याला १८ वर्षाची मर्यादा आहे. मात्र मुद्दा हा की, असा निर्णय घेणाऱ्या या दोन्ही व्यवस्थांमध्ये महिला किती आहेत?

देशादेशांत संमती वय वेगवेगळे आहे. काही देशांत मुलींना १४ वर्षे; तर काही ठिकाणी १५, १६ व १७ वर्षे असे आहे. आता हे ठरवणे कितपत योग्य आहे? याचे उत्तर त्या देशाच्या सांस्कृतिक विचारधारेवर अवलंबून आहे; मात्र वेगवेगळ्या देशांमध्ये वयाबाबत हा फरक का? अशा पद्धतीने मुलीचा प्रगल्भपणा व तिच्या आकलनशक्तीचे मोजमाप करणे कितपत योग्य आहे? भारतात ती १८ वर्षांपर्यंत बालीश, अल्पवयीन असते, असे का? बहारीन राष्ट्रात तिला २१ वर्षे लागतात व नायजेरियात ती ११ वर्षांची असताना संमती देऊ शकते. हे असतानाही काही मध्य पूर्व आणि आफ्रिकन राष्ट्रांत संमती वय असा काही प्रकार नाही; मात्र तेथे विवाहबाह्य संबंध ठेवण्यास संपूर्ण बंदी आहे.

हेही वाचा: विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज तुरुंगात करणार लग्न

मुलीचे वयात येणे व तिच्या मनात स्त्री स्वातंत्र्यवादी विचार येणे, याचा काही ताळमेळ असतो का? अठराव्या वर्षी ती स्त्री होते व तिला स्वतःचा निर्णय घेण्याचे अधिकार प्राप्त होतात. निदान न्यायालयात तरी तिचे विचार एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून विचारात घेतले जातात. जर ती महिला किंवा मुलगी १६ किंवा १९ वर्षांची असेल; तर तिला आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत (मग तो पुरुष असो अथवा स्त्री) संबंध ठेवण्याचा अधिकार आहे का? ती स्वतःच्या शरीरावर आपला हक्क बजावू शकते का? आपल्याकडील कायद्यानुसार ती अल्पवयीन असल्याने तिला आणखीनच दाबले जाते.

त्यात कुटुंब, आई-वडील, समाज, पोलिस व न्यायालय या सर्वांचे योगदान आलेच; पण समजा त्या मुलीला स्वतःचा निर्णय घ्यायचा असेल, तर तिने काय केले पाहिजे? आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत जीवन जगण्यासाठी तिला १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी लागेल; पण मुद्दा इथेच संपत नाही. ती कायमचीच शोषित असते, याच नजरेने महिलांचे हक्क सांगणारी मंडळी तिच्याकडे पाहत असतात. म्हणजे १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही ती स्वतःबद्दलचा निर्णय घेण्यास पात्र नाही, हीच समाजाची धारणा असते; मात्र निसर्गापुढे समाज, कुटुंब व कायदाही फिका पडतो. म्हणूनच रात्रीच्या अंधारात किंवा दिवसा एखाद्या बागेच्या झाडाझुडपात लपूनछपून प्रेम करत असलेली जोडपी आपल्याला दिसतात. हे पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे होत असेल किंवा वर्गीय समाजरचनेमुळे; मात्र यात एक साम्य आहे आणि ते म्हणजे जातीचे संरक्षण. सर्वच जातींमध्ये तथाकथित जाती वाचवण्यासाठी मुलींच्या हक्कांना, तिच्या प्रणयाबद्दलच्या आकर्षणाला दाबून ठेवले जाते. किंबहुना तिच्या मूलभूत गरजांना ठार केले जाते. अशा स्थितीत एखाद्या महिलेला किंवा मुलीला लग्नाआधी प्रणयाबद्दल काहीही माहिती नसेल; तर लग्नानंतर ती वैवाहिक आयुष्य कसे जगणार? नवरा हासुद्धा त्याच व्यवस्थेने बांधलेल्या नियमात अडकलेला असतो. त्यालाही वैवाहिक संबंध व परिवार याबद्दल शिकवले जात नाही. तो त्याच्या पुरुष वर्तुळात घेतलेले धडे आपल्या वैवाहिक जीवनात आणतो. वैवाहिक संबंधांची अपूर्ण माहिती व त्यावर आधारित असलेली स्वास्थ्यप्रणाली यावर चर्चा न होता निरक्षर राहिलेल्या या दोन्ही जीवांची गाडी धगधगत्या आगगाडीसारखी चालत असते.

लैंगिक संबंधांच्या वयोमर्यादेवर भारतात वेळोवेळी चर्चा घडल्या आहेत. लग्नाचे वय आपल्याकडे वाढत गेले आहे. भारतात संमती वयाचा कायदा प्रथम ब्रिटिशांनी १८९१ मध्ये मंजूर केला होता. तेव्हा मुलींची वयोमर्यादा दहावरून बारापर्यंत वाढवली होती. त्यातही फक्त लैंगिक संबंधांवर बंदी होती, लग्नावर नव्हती. परंपरेच्या हितासाठी नाना प्रकारचे कायदे व नियम पारित करण्यात आले; पण त्यामध्येही मुली, महिलांचे विचार व त्यांच्या सहमतीबद्दल जास्त चर्चा नाही.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

भारतातून अनेक शास्त्र, विचार व विज्ञानाचा उदय झाला. त्यामध्ये पुरुष-स्त्री संबंध, पुनरुत्पादन, परिवार, अध्यात्म, तर्कशास्त्र, विज्ञान यावर अद्वितीय दृष्टिकोनही मांडण्यात आले आहेत. आपल्याला आधुनिक व पुरोगामी सांस्कृतिक ठेवा यांचे मिश्रण करून जीवन जगण्याची एक अनोखी व्यवस्था लाभली आहे. प्रत्येक व्यवस्थेने आपले अनुभव सांगितले आहेत. त्याचा तुम्ही कशा प्रकारे स्वीकार करता अथवा नाकारता, हे व्यक्तीवर अवलंबून असले पाहिजे. जबरदस्तीने स्वतःचेच खरे आणि बाकी वाईट ही मानसिकता कधी कधी पूरक ठरत नाही. प्रत्येकाला आपल्या आनंदाचा मार्ग शोधावा लागेल.

samyrdalwai@gmail.com

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, मुलांच्या विकास आणि वर्तनाचे अभ्यासक आहेत.)

loading image
go to top