सुवर्णमहोत्सवी वर्षाकडं वाटचाल करताना...

साकेतच्या वाटचालीत नवं वळण अर्थातच ऑनलाइन विक्रीचं होतं. एकंदर सर्वच प्रकाशन संस्थांची आर्थिक घडी नोटाबंदीने विस्कटली होती.
E-Books
E-BooksSakal
Summary

साकेतच्या वाटचालीत नवं वळण अर्थातच ऑनलाइन विक्रीचं होतं. एकंदर सर्वच प्रकाशन संस्थांची आर्थिक घडी नोटाबंदीने विस्कटली होती.

- साकेत भांड, saptrang@esakal.com

साकेतच्या वाटचालीत नवं वळण अर्थातच ऑनलाइन विक्रीचं होतं. एकंदर सर्वच प्रकाशन संस्थांची आर्थिक घडी नोटाबंदीने विस्कटली होती. त्या काळात साकेत प्रकाशनाने ऑनलाइन विक्रीची वाट चोखाळली आणि हळूहळू यात जम बसू लागला. नोटाबंदीच्या काळात प्रकाशन व्यवसाय जसा अडचणीत आला, तसा या व्यवसायाला आणखी एका प्रतिकूलतेचा सामना करावा लागला तो कोरोना महासाथीच्या काळात. ते दीड वर्ष या व्यवसायासाठी सर्वार्थाने परीक्षा पाहणारं होतं. पण ऑनलाइन विक्रीच्या वाटेवर चालत असल्याने नक्की काय केलं पाहिजे, हे समजलं होतं. या महासाथीनं काय दिलं?

तर ऑनलाइन वितरण आणि विक्री व्यवस्थेच्या अभ्यासाची संधी. इंटरनेटवरचे अनेक प्लॅटफॉर्मस् हाती आले आणि त्यावर साकेतची पुस्तकं वेगाने उपलब्ध झाली. दुकानं बंद असल्यामुळे पुस्तकविक्री थांबली होती. मग आम्ही सर्वशक्तिनिशी ई-बुक्सच्या निर्मितीकडे मोर्चा वळविला.

साकेतच्या ई-बुक्सनादेखील वाचकांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि नोटाबंदीच्या काळात निर्माण झालेली ही पायवाट पुढे हमरस्ता होत गेली. आज साकेतची टीम पारंपरिक वितरण आणि ऑनलाइन माध्यम या दोन्ही क्षेत्रांमध्ये वाटचाल करते आहे.अर्थात, ऑनलाइन विक्रीमध्ये जितक्या संधी आहेत, तितकीच आव्हानंही आहेत.

इथे वाचकांसमोर पुस्तक खरेदीसाठी असंख्य पर्याय असतात, त्यामुळे स्पर्धेत राहायचं तर पुस्तकं वाचकांना आपलीशी वाटणं आवश्यक असतं. यासाठी पुस्तकं आकर्षक पद्धतीने सादर करणं आम्हाला महत्त्वाचं वाटलं, त्याद्वारेच मोठा वाचकवर्ग आमच्याशी जोडून घेणं शक्य झालं.इथे आणखी एक गोष्ट खास नमूद केली पाहिजे. ऑनलाइन व्यवसायासाठी संशोधन करताना जगभरातल्या साहित्यविश्वात सुरू असणाऱ्‍या घडामोडी, वाचकप्रिय साहित्य यांचाही आम्हाला अदमास येत होता. साकेतच्या प्रकाशनमालेत आणखी वेगवेगळे पैलू येत गेले आणि नव्या वाचकांचा ओघ दिसू लागला. त्यामुळे जगभरामधील विविध भाषांतील वाचक काय वाचतात आणि आपल्या मराठी वाचकांना कोणते नवे विषय दिले पाहिजेत, हे लक्षात येत गेलं.

दर्जेदार आणि आशयघन पुस्तक निर्मितीची बाजू पत्नी प्रतिमाने सक्षमपणे सांभाळली. आम्ही ललित आणि ललितेतर या दोन्ही पुस्तक प्रकारांमध्ये संतुलन साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला. अनुवादित पुस्तकांसाठी तज्ज्ञ अनुवादकांची विचारपूर्वक निवड केली. अनेक नामवंत लेखक संस्थेशी जोडले. पुस्तकं प्रकाशित करताना संपादकीय विभागाची जबाबदारी मोठी असते, त्यामुळे संपादकांची भक्कम फळी उभी करणं हे महत्त्वाचं काम प्रतिमाने केलं. ही संपूर्ण प्रक्रिया तिने काळजीपूर्वक सांभाळल्याने पुस्तकांची गुणवत्ता आणि दर्जाच्या बाबतीत मी निश्चिंत झालो आणि माझा मोर्चा नवीन प्रकल्पांकडे वळवला.

त्या वेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये वाचनप्रेमींसाठी पुस्तकांचं सर्व आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असं ग्रंथदालन असणं गरजेचं होतं. म्हणून २०१६ मध्ये ‘साकेत बुक वर्ल्ड’ हे ग्रंथदालन सुरू केलं. वाचकांची आवड आणि बदलती अभिरुची लक्षात घेत या भव्य अशा ग्रंथदालनात मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्हीही भाषांतील १०,००० हून अधिक पुस्तकं एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली. तिथे सातत्याने विविध योजना राबवून अधिकाधिक वाचक जोडण्याचा आम्ही प्रयत्न करीत असतो.

लोकप्रिय विषय निवडताना आम्ही आधुनिक आणि नव्या युगाच्या विषयांशी-वाचकांशी नातं जोडलं, त्या जाणिवेतून आम्ही संस्कृती संवर्धन करणारे आणि मुलांसाठी संस्कारक्षम असे अनेक विषय हाताळले. सुप्रसिद्ध जलतज्ज्ञ श्री. माधवराव चितळे यांनी अनेक वर्षांच्या साधनेनंतर मूळ वाल्मीकी रामायणावर दिलेली ८८ प्रवचनं वाचकांपर्यंत नेणारा ‘वाल्मीकी रामायण’ ग्रंथ प्रकाशित केला. विषयाच्या वैविध्याबद्दल सांगताना आणखी एक उल्लेख करावासा वाटतो तो कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी आपलं अवघं आयुष्य समर्पित करणाऱ्‍या नेल्सन मंडेलांच्या ‘नेल्सन मंडेला - कन्व्हर्सेशन विथ मायसेल्फ’ या आत्मचरित्राचा. याचा मराठी अनुवाद साकेतने प्रकाशित केला, तर राजकीय वाङ्‍मय प्रकारात इस्राईलची सर्वाधिक महत्त्वाची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ या गुप्तहेर संघटनेच्या कारकीर्दीचं तटस्थ विश्लेषण करणारं पहिलं पुस्तक ‘मोसाद’ हेदेखील मराठीत उपलब्ध करून दिलं.

बावीस २२ वेगवेगळ्या वाङ्‍मय प्रकारांमधील आंतरराष्ट्रीय ख्यातीची पुस्तकं आणि मराठीतील नामवंत लेखकांचं साहित्य यांची सांगड घालत सातत्याने वाचकांच्या अभिरुचीसंवर्धनाचा प्रयत्न करीत आहोत. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ते वाचकांपर्यंत सर्वदूर पोहोचवण्यात प्रकाशकाचा कस लागतो. सध्याच्या जाहिरातीच्या युगात पुस्तकाचं प्रमोशन सक्षमपणे करणं ही काळाची गरज आहे. यासाठी आम्ही पुस्तक परीक्षणं, वाचकांशी पत्रसंवाद, सोशल मीडियावरील जाहिराती आणि व्हिडीओज, आकर्षक बुकमार्क्स अशी वेगवेगळी माध्यमं वापरली. साकेत ग्रंथवार्ता हे मासिकही चालवलं. २०२० दरम्यान व्यवसायविस्ताराची संधी मिळाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये अजून एक पुस्तकं आणि स्टेशनरीचं स्वतंत्र दालन सुरू केलं. महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात सुरू केलेल्या ‘साकेत बुक्स अॅण्ड मोअर’ या दालनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

पारदर्शी व्यवहार आणि वाचकांना उत्तम तेच देण्याच्या बांधिलकीमुळे आम्ही आजवर वाचकांचा अपार विश्वास मिळवू शकलो आहोत. साकेत प्रकाशनाच्या पुस्तकांना वाचकांनी जशी पसंती दिली, तसं सरकारदरबारी आणि साहित्य क्षेत्रातही साकेतच्या कार्यावर शिक्कामोर्तब होत गेलं. त्यामुळे साकेतच्या शोकेसमध्ये आज अनेक मानाचे पुरस्कार आहेत. २०१० मध्ये साकेत प्रकाशनाला राज्य सरकारच्यावतीनं दिला जाणारा उत्कृष्ट प्रकाशनाचा ‘श्री. पु. भागवत’ पुरस्कार मिळाला. द फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स यांच्यामार्फत देण्यात येणारा उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा पुरस्कारही साकेत प्रकाशनास सात वेळा मिळाला आहे.

‘पहिली निष्ठा साहित्याशी आणि वाचकांशी’ हा बाबांचा मंत्र आम्ही सातत्याने जपत आहोत. साकेत प्रकाशनाच्या साहित्यनिर्मितीच्या ४७ वर्षांच्या या वाटचालीत प्रकाशित झालेल्या कथा, कादंबरी, चरित्र, विज्ञान, अध्यात्म, व्यवस्थापन अशा विविध २२ वाङ्‍मय प्रकारांतील पुस्तकांची संख्या आज तीन हजार आहे. तसंच एक हजार ई-बुक्स व शंभर ऑडिओ बुक्स प्रकाशित केली. या ऑनलाइन माध्यमांद्वारे उपलब्ध झालेल्या साकेतच्या पुस्तकांना विदेशांतूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद भविष्यातील नवीन उपक्रमांसाठी प्रोत्साहन देणारा आहे.

महाराष्ट्राला समृद्ध साहित्यिकांची प्रदीर्घ पंरपरा आहे. याबरोबरच नवीन लेखकांना लिखाणाचं बळ देण्यासाठी त्यांची पुस्तकं प्रकाशित करणं हेही प्रकाशकाचं कर्तव्य असतं. या जाणिवेतून गेल्या ४७ वर्षांपासून नवोदित लेखकांचं पहिलं पुस्तक आम्ही काढत आलोय. आज लोकप्रिय झालेल्या अनेक प्रथितयश लेखकांची पहिली पुस्तकं साकेत प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत. ज्ञानसंस्कृती जोपासणाऱ्‍या पुस्तक प्रकाशन क्षेत्रात खारीचा वाटा देता येण्याचं मनस्वी समाधान आहे.

सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करताना आगामी तीन वर्षांत वेगळं काय देता येईल याचा विचार सुरू आहे. मराठी वाचक अभिरुचीसंपन्न आहे. त्यामुळे नव्या पिढीला वाचनासाठी प्रेरित करताना केवळ पुस्तकं प्रकाशित करून चालणार नाही, तर साहित्यविषयक वेगवेगळे उपक्रम राबवून वाचकाला पुस्तक आणि लेखकांच्या अधिक जवळ आणावं लागेल, याची आम्हाला जाणीव आहे. साकेत प्रकाशनाच्या आजवरच्या प्रवासात वाचक, लेखक, वितरक, ग्रंथविक्रेते या साहित्य क्षेत्रातील विविध घटकांची आम्हाला अतिशय आत्मीयतेने मोलाची साथ मिळाली आहे. प्रकाशनावरील हा विश्वास यापुढेही टिकवण्याचा आमचा प्रयत्न असेल.

(लेखक ‘साकेत प्रकाशन’ या संस्थेचे संचालक असून ‘साकेत बुक वर्ल्ड’ चे कार्यकारी संचालक आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com