esakal | 'महाशिवआघाडी'ने 'या' पाच महापालिकांमध्ये होऊ शकते सत्तांतर 
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar, Sonia Gandhi, Uddhav Thackeray

लक्ष मुंबई महापालिकेकडे 
भाजप-शिवसेनेचा सत्तासंघर्ष सुरू झाला तो मुंबईत सत्ता कोणाची यावरून. मुंबईतील आपल्या सत्तेला कोणताही धोका न लावता शिवसेनेने आतापर्यंतचे राजकारण केले आहे. 227 सदस्यांच्या मनपात शिवसेना 94 सदस्यांसह सत्तेत आहे. 82 सदस्य असलेल्या भाजपने त्यांना बाहेरून पाठिंबा दिला आहे. येथे काँग्रेसकडे 28 आणि राष्ट्रवादीकडे 9 सदस्य आहेत. त्यामुळे भाजपने पाठिंबा काढला तरी येथे आघाडीच्या पाठिंब्यावर शिवसेना आपली सत्ता कायम राखू शकते. 

'महाशिवआघाडी'ने 'या' पाच महापालिकांमध्ये होऊ शकते सत्तांतर 

sakal_logo
By
संभाजी पाटील

राज्यात भाजप-शिवसेना महायुतीत पडलेली फूट, सत्ता स्थापनेचा पेच वाढल्याने लागू झालेली राष्ट्रपती राजवट आणि नव्याने आकार घेणारी 'महाशिवआघाडी' यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ता समीकरणे बदलण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. जर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची "महाशिवआघाडी' भविष्यात कार्यरत झालीच तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसोबतच सहकारी संस्थांमध्येही मोठी उलथापालथ शक्‍य होणार आहे. त्याची सुरुवात पुढच्या आठवड्यात होणाऱ्या महापौरांच्या निवडीपासून होणार आहे. राज्यातील नाशिक, ठाणे, अहमदनगर, सांगली आणि लातूर या महापालिकांमध्ये सत्तांतराची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात नवे सरकार स्थापन झालेच तर राज्याच्या राजकारणाचे नवे पर्व सुरू होणार, हे निश्‍चित. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाशिवआघाडीच्या स्थापनेमुळे जिल्ह्याजिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला नवे धुमारे फुटू लागले आहेत. आतापासून कोण मंत्री, कोण जिल्हा परिषद अध्यक्ष, कोण महापौर, कोणाला महामंडळावर स्थान मिळणार, कोणाची सत्ता जाणार आणि कोणाची येणार याची राजकीय गणिते मांडण्यास सुरुवात झाली आहे. या बदलत्या सत्तासमीकरणांची नांदी पुढील आठवड्यात होणाऱ्या राज्यातील 27 महापालिकांच्या महापौरांच्या निवड प्रक्रियेपासून सुरु होणार आहे. मुंबई, पुण्यासह 27 महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी काढण्यात आली. यात मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, नवी मुंबई या महत्त्वाच्या महापालिकांचे महापौरपद हे सर्वसाधारण गटासाठी खुले झाले आहे. महापौरपदाच्या निवडीची प्रक्रिया 21 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. कदाचित राज्यातील नव्या सरकारच्या स्थापनेपूर्वीही नवे महापौर निवडले जातील. जर महाशिवआघाडी सत्तेत येणार असेल तर राज्यातील सत्तावीस पैकी किमान पाच महापालिकांमध्ये सत्तांतर होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. जर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रामाणिक साथ द्यायची ठरवली तर स्थानिक स्वराज्य संस्थांसोबतच सहकारी संस्थांमध्येही मोठे बदल होऊ शकतात. भाजपने पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणावर काँग्रेस आघाडीच्या सहकारी संस्थांना सुरुंग लावण्याचे काम केले आहे. त्यामुळेच हे सत्तांतर सहकार चळवळीवरी ल काँग्रेसची पकड मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. 

फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावात शरद पवार; शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

कोणत्या महापालिकांमध्ये होऊ शकतात बदल ? 
1. नाशिक : सध्या संख्याबळ 120 इतके आहे. भाजपकडे 65 नगरसेवकांसह बहुमत आहे. मात्र बाळासाहेब सानप फॅक्‍टरमुळे जर 8 ते 10 नगरसेवक फुटून शिवसेनेकडे गेले तर मात्र सेनेचे सध्याचे 34 व भाजपचे बंडखोर 10 असे 44 संख्याबळ होईल. राष्ट्रवादी, काँग्रेस व मनसे यांच्यासह नोंदणीकृत अपक्ष मिळून 20 नगरसेवकांनी सेनेला साथ दिली तर संख्याबळ 64 होऊन महापौरपद मिळू शकते. 
2. अहमदनगर : महापालिकेत एकूण संख्याबळ 68 आहे. येथे अवघ्या 14 जागांसह तिसऱ्या क्रमांकावरील भाजप सत्तेत आहे. 18 जागा असलेल्या राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिल्यामुळे 24 जागांसह प्रथम क्रमांकावरील शिवसेनेला विरोधी बाकावर बसावे लागले आहे. महापौर व उपमहापौरपद भाजपकडेच आहेत. मात्र भाजपविरुद्ध विरोधक एकत्र आल्यास बहुमत सहज शक्‍य आहे. महानगरपालिकेतील विद्यमान महापौरपदाचा कार्यकाळ 30 जून 2021 पर्यंत आहे. 
3. सांगली : 78 सदस्य संख्येच्या मनपात भाजप 41 सदस्यांसह सत्तेत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची बेरीज 35 असून त्यांना केवळ 4 सदस्यांची गरज आहे. भाजपच्या सदस्यांत किमान 20 ते 22 जण हे राष्ट्रवादी वा काँग्रेसमधून आयात आहेत. त्यांची फोडाफोड आणि भाजपअंतर्गत नाराजीनाट्य झाल्यास येथे महाआघाडीसाठी येथे आशा आहे. 
4. लातूर : एकूण 70 जागांपैकी भाजपला 36, काँग्रेसला 33 तर 1 जागा राष्ट्रवादीला मिळाली होती. काठावर बहुमत असलेल्या भाजपने महापौरपद मिळवले होते.भाजपचे नगरसेवक मूळचे काँग्रेसचे आहेत. मात्र गेल्या अडीच वर्षात भाजपत अंतर्गत कलह वाढला आहे. भाजपच्या एका नगरसेवकाचे निधन झालेले आहे. भाजपला बहुमतापेक्षा एक जागा कमी आहे. त्यामुळे येथे आघाडीला सत्ता स्थापनेची संधी मिळू शकते. 
5. ठाणे : 131 सदस्यांच्या मनपात शिवसेना 67 आणि भाजपचे 23 सदस्य मिळून युतीची सत्ता आहे. येथे काँग्रेसचे तीन, तर राष्ट्रवादीचे 34 सदस्य आहेत. येथे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली तर निर्विवादपणे नव्या आघाडीचीच सत्ता येथे शकते. 

बच्चू कडू ताब्यात; राष्ट्रपती राजवटीत मोर्चाला परवानगी नाही? 

लक्ष मुंबई महापालिकेकडे 
भाजप-शिवसेनेचा सत्तासंघर्ष सुरू झाला तो मुंबईत सत्ता कोणाची यावरून. मुंबईतील आपल्या सत्तेला कोणताही धोका न लावता शिवसेनेने आतापर्यंतचे राजकारण केले आहे. 227 सदस्यांच्या मनपात शिवसेना 94 सदस्यांसह सत्तेत आहे. 82 सदस्य असलेल्या भाजपने त्यांना बाहेरून पाठिंबा दिला आहे. येथे काँग्रेसकडे 28 आणि राष्ट्रवादीकडे 9 सदस्य आहेत. त्यामुळे भाजपने पाठिंबा काढला तरी येथे आघाडीच्या पाठिंब्यावर शिवसेना आपली सत्ता कायम राखू शकते. 

महाशिवआघाडीची बैठक सुरु; फॉर्म्युला ठरणार?

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे, त्यामुळे येथे बदलाचा प्रश्‍न येत नाही. कोल्हापुरातही काँग्रेस-आघाडीचे बहुमत असल्याने येथे तिसरा पर्याय येऊन सत्तांतराची शक्‍यता नाही. 

थोडक्‍यात राज्यात महाशिवआघाडी सत्तेवर आलीच तर स्थानिक पातळीवरचे राजकारणही ढवळून निघणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीच्या ताब्यातील सहकारी संस्थांना भाजपने सुरुंग लावला. सत्तापरिवर्तन झालेच तर या सहकारी संस्था पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्याची संधी आघाडीला प्राप्त होणार आहे. या बदलत्या राजकीय परिस्थितीचा मुकाबला भाजप कसे करते हे तेवढेच महत्त्वाचे राहणार हे नक्की! 

loading image