गोष्ट सांगणारी म्हातारी

अंकुशा म्हातारी तिच्या कथनशैलीच्या बळावर असंख्य व्यक्तिरेखा जिवंत करायची. तिने सांगितलेली गोष्ट रात्रभर मला चित्रपट होऊन दिसत होती.
old woman who tells story
old woman who tells storysakal
Summary

अंकुशा म्हातारी तिच्या कथनशैलीच्या बळावर असंख्य व्यक्तिरेखा जिवंत करायची. तिने सांगितलेली गोष्ट रात्रभर मला चित्रपट होऊन दिसत होती.

अंकुशा म्हातारी तिच्या कथनशैलीच्या बळावर असंख्य व्यक्तिरेखा जिवंत करायची. तिने सांगितलेली गोष्ट रात्रभर मला चित्रपट होऊन दिसत होती. एक दिवस अशीच तिने मुंबईत गेलेल्या पांड्याची गोष्ट सांगितली. तेव्हा मी मुंबई पाहिली नव्हती; पण म्हातारीनं मुंबई माझ्यापुढं उभी केली होती. मग आम्हाला रोज गोष्टी ऐकायचा नाद लागला. दुपारच्या प्रहरात भरभर जेवण उरकून आम्ही म्हातारीकडं जात होतो. रोज नव्या गोष्टी. एकदा सांगितलेली गोष्ट पुन्हा तिने कधीच सांगितली नाही. सगळ्या ताज्या गोष्टी होत्या. त्या गोष्टी ऐकून आम्ही समृद्ध झालो...

गोष्टी ऐकायची सवय लहानपणी लागली. पुढं गोष्टी ऐकण्याचं वेड वाढत गेलं. मला ज्यांनी पहिल्यांदा गोष्टी ऐकायचं वेड लावलं, ती अंकुशा आजी. आमच्या घराजवळ राहात असे. ती म्हातारी आम्हाला गोष्टी सांगायची. ती गोष्टी सांगते हे मला माझ्या दुसरीच्या वर्गात कळलं. दुपारची सुट्टी झाली आणि मला दिनकर म्हणाला, येतोस का? आजीच्या गोष्टी ऐकायला.’’

‘‘कुठली आजी.’

‘‘आरं चल म्हणत त्यांनं मला ओढतच नेलं. बघतो तर आमच्याच घराशेजारीच राहात असलेल्या म्हातारीच्या घरात घेऊन गेला. तिचं छोटं कौलारू घर. आम्ही चौघे होतो. आमची चाहूल लागताच आतून आवाज आला, ‘‘पोरांनो, आला काय रं?’’

‘‘होय आजी.’’

ती बाहेर आली. तिच्या हातात एक वाटी होती. तिने आम्हाला प्रत्येकाला खडीसाखरेचा एक एक खडा दिला. मला बघून म्हणाली, ‘‘तुबी आलायस, बस.’’

मग आजी आमच्यापुढं बसली. तिने आम्हाला एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. ती होती पांड्याची गोष्ट. पांड्या नावाचा एक गरीब भोळसट मुलगा. गावातील सगळे त्याची चेष्टा करतात, त्याला त्रास देतात. तो सांगकाम्या बनतो. गावातील लोकांना काहीही काम पडलं तर लोक त्याला काम सांगत. काम ऐकलं नाही तर मारहाण करत. पांड्या त्याच्या आईसोबत रहात होता. त्याला वडील नव्हते. आई गरीब होती. पांड्या निमूटपणे सगळं सहन करत राहिला. एक दिवस तो वैतागून कोणालाही न सांगता मुंबईत गेला.

तिथं एका श्रीमंत माणसाजवळ नोकरीला राहिला. श्रीमंत माणूस सांगेल ती कामे करू लागला. त्याचा त्याने विश्वास संपादन केला; मग त्याचा प्रामाणिकपणा बघून शेठने त्याला शिकवणी लावली. तो हिशेब शिकला. हळूहळू त्याला बढती दिली. पगार वाढवला. काही वर्षे गेली. पांड्या त्या कुटुंबातील एक भाग झाला. दरम्यान श्रीमंत माणसाची सुंदर मुलगी त्याच्या प्रेमात पडली. मग त्याचे लग्न तिच्याशी झाले. गावातील लोकांच्या कटकटीला कंटाळून अनवाणी पायाने मुंबईला गेलेला पांड्या एक दिवस टॅक्सी घेऊन आला. आईला हाक मारली. आईला पोराला बघून आंनद झाला. गावकरी गोळा झाले. जे गावकरी त्याचा तिरस्कार करत होते, त्यांनीच त्याची मिरवणूक काढली.

अंकुशा म्हातारी ही गोष्ट सांगत होती. तिच्या कथनशैलीच्या बळावर तिने त्या कौलारू घरात आमच्या डोळ्यासमोर पांड्या, त्याची आई, गावकरी, पांड्या मुंबईत गेल्यावर ते विराट मुंबई शहर उभं केलं होतं. त्या रात्री रात्रभर तीच कथा माझ्या स्वप्नात चित्रपट होऊन रात्रभर मला दिसत होती. तेव्हा मी मुंबई पाहिली नव्हती; पण म्हातारीनं मुंबई माझ्यापुढं उभी केली होती. मग आम्हाला रोज गोष्टी ऐकायचा नाद लागला. दुपारच्या प्रहरात भरभर जेवण उरकून आम्ही म्हातारीकडं जात होतो. रोज नव्या गोष्टी. एकदा सांगितलेली गोष्ट पुन्हा तिने कधीच सांगितली नाही. सगळ्या ताज्या गोष्टी होत्या. त्या गोष्टी ऐकून आम्ही समृद्ध होत निघालो होतो.

रामायण, महाभारतातील गोष्टी असोत किंवा भक्तीविजयमधल्या. संत सखुबाईची तिने सांगितलेली गोष्ट आजही आठवते. संत सखुबाई कराड गावच्या. त्यांना झालेला सासुरवास आमची अंकुशा म्हातारी असं सांगायची की, तिने हा सगळा सासूरवास जवळून बघितला असावा, असं वाटे.

दुसरी ते सातवी या आमच्या शैक्षणिक वर्षात या म्हातारीने आम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या. म्हातारीचा एक नियम होता. ती शाळेच्या दिवशी आम्हाला छोटी गोष्ट सांगत असे; मात्र रविवारी सकाळी सुरू झालेली गोष्ट अगदी सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू असे. आम्हाला रविवार आवडे; कारण त्या दिवशी मोठी गोष्ट ऐकता येई.

पुढंपुढं आम्ही हायस्कूलला गेलो, हायस्कूल शाळा थोडी दूर होती. आमच्याकडे सायकली नव्हत्या. त्यामुळं गोष्ट ऐकायला येणं जमत नव्हतं आणि आजीही थकत चालली. तिला अंधुक दिसत होतं. तिच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झालेल्या. आम्ही तिची गाठ घ्यायला जायचो; मात्र आता तिच्या गोष्टी बंद झाल्या होत्या. आम्ही तिला म्हणायचो, ‘‘आजी, गोष्ट सांग.’’ ती हसायची. ‘‘नको आता गोष्ट. मला कंटाळा आलाय,’’ असा संवाद होत राहिला..

दिवस जसेजसे गेले, आम्ही वयाने मोठे झालो. पुस्तक वाचू लागलो. गोष्टी ऐकायचा छंद आता गोष्टी वाचून पुरा होत होता. अंकुशा म्हातारी गोष्ट सांगताना जे चित्र उभं करत होती, तसंच चित्र वाचताना उभं राहायचं. गोष्ट ऐकायची कशी हे तिच्याकडून शिकलो आणि गोष्ट वाचायची कशी, हे तिच्या गोष्टी ऐकत मोठं झाल्यामुळे मला कळत होतं. समजत होतं. एवढी पुस्तक वाचत होतो; पण अंकुशा म्हातारीने सांगितलेल्या गोष्टी कुठंही वाचायला मिळत नव्हत्या...

पुढं अभ्यासासाठी मराठी साहित्य हा विषय होता. तेव्हा लोककथा हा विषय आला. हा विषय अभ्यास करताना अंकुशा म्हातारीची आठवण येई. वाटत होतं तिला जाऊन विचारावं, एवढी वर्षं आम्हाला गोष्टी सांगत होतीस, त्या तुला कुणी सांगितल्या होत्या? कुठं ऐकल्या होत्यास? आणि त्या सांगायला तुला कुणी शिकवलं? पण या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ती आता कुठं होती. कुठल्याही प्रकारचे निवेदनकौशल्य न शिकता किंवा सादरीकरणाचे कुठलेही प्रशिक्षण न घेता म्हातारी हे बोलत होती, हे अस्सल होतं. ही कौशल्य ज्यांनी आत्मसात केलीत त्यांच्यासारखं किंवा त्यांच्यापेक्षा भारी ही म्हातारी गोष्ट सांगायची... आयुष्यात शाळेत कधीही न गेलेल्या म्हातारीने एवढ्या गोष्टी लक्षात कशा ठेवल्या असतील? याचे उत्तर मला मिळू शकलेले नाही.

मी माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी ऐकल्या. अनेकांच्याकडून ऐकल्या, संस्कारक्षम वयात ऐकल्या; पण मला गोष्टीचा लळा लावला याच म्हातारीने. पुढं गोष्टी लिहिल्या, सांगितल्या, सांगतोय. कोणी गोष्ट सांगायला लागले, तर मन लावून ऐकतो, दाद देतो. पण जेव्हा जेव्हा गोष्ट, कथा, स्टोरी हा विषय येतो, तेव्हा मला माझ्या गावची गोष्टी सांगणारी म्हातारी आठवते... या म्हातारीने जे गोष्टीचं धन दिलं, त्या गोष्टीनी गोष्टी लिहायला, वाचायला शिकवले; पण अडचणीच्या काळात अनेक गोष्टीनी मला वाट दाखवली. आज ती म्हातारी नाही, माझ्यासोबत तिच्याकडे गोष्टी ऐकायला जे सवंगडी येत, तेही तिला विसरून गेलेत. तीचं घरही आता पडलं आहे. गावाकडे गेलो की मला तिच्या घरासमोरून जाताना तिचा आवाज ऐकायला येतो आणि ती आम्हाला जो खडीसाखरेचा खडा द्यायची, त्याची चव आठवते. गोष्टी सांगणाऱ्या म्हातारीला मी काही केल्या विसरू शकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com