सुखदुःखाच गाठोडं!

डोक्यावर गाठोडं घेऊन अख्खी जिंदगी फिरून काढली, असा येशा भाऊजी. उंचपुरा. धोतर, पांढरा सदरा, डोक्यावर टोपी अशी त्याची वेशभूषा.
Happy Ending Life
Happy Ending LifeSakal
Summary

डोक्यावर गाठोडं घेऊन अख्खी जिंदगी फिरून काढली, असा येशा भाऊजी. उंचपुरा. धोतर, पांढरा सदरा, डोक्यावर टोपी अशी त्याची वेशभूषा.

डोक्यावर गाठोडं घेऊन अख्खी जिंदगी फिरून काढली, असा येशा भाऊजी. उंचपुरा. धोतर, पांढरा सदरा, डोक्यावर टोपी अशी त्याची वेशभूषा. पायी चालून तो गावोगावी जायचा, राहायचा, त्या-त्या गावातील पाहुण्यांच्या आनंदात आनंदी व्हायचा. दुःखात दुःखी व्हायचा... पण तो का फिरत होता, आनंदाने फिरत होता की दुःखाने, हे आजवर कळू शकले नाही... ज्या गावाला जाईल ती सगळी त्याच्या जवळची माणसे. त्याच गावांना तो पुन:पुन्हा जायचा. राहायचा. पण तो जिथे जाईल तेथील पाहुण्यांनी त्याला त्यांच्या त्यांच्या ऐपतीप्रमाणे जपले आहे.

येशा भाऊजी आमचा दूरचा नातेवाईक. आम्ही शाळेत असताना तो नेहमी यायचा. उंचपुरा. धोतर, पांढरा सदरा, डोक्यावर टोपी अशी त्याची वेशभूषा. डोक्यावर मोठं गाठोडं घेऊन तो यायचा, अनवाणी पायाने झपझप चालत. येशा भाऊजीच्या नातेवाईकांबद्दल फारशी माहिती नव्हती, पण महिन्या-दोन महिन्यांनी डोक्यावर गाठोडं घेऊन प्रत्येक गावात जायचा. त्याला एक सवय होती. सकाळी लवकर उठून आंघोळ केली की गाठोड्यातील कपडे काढून बोअरिंगवर धुवायचा. ते वाळत घालायचा, पुन्हा दुपारी कपडे सुकले की त्या गाठोड्यात बांधून ठेवायचा. त्याच्या या वागण्याची आम्ही मुलंच नाही, तर मोठी माणसंसुद्धा थट्टा करायची; पण जोरात हसून ‘गप्प बसा बाबांनो’ म्हणायचा.

आमच्या लहानपणी भाऊजी वर्षातून किमान पाच-सहा वेळा यायचा. भाऊजी कधीही सकाळी आला नाही. ऊन खाली झाले की पाच-सहा वाजायदरम्यान तो यायचा. आल्यावर सगळ्यांची चौकशी करून तो गावात एक चक्कर टाकून यायचा. रात्री सगळ्यांना तो कोणत्या गावातून आलो, तिथे किती दिवस मुक्काम केला, सध्या त्या पाहुण्यांच्यात काय सुरू आहे, या गोष्टी सांगायाचा. भाऊजी सगळ्यांना त्या महिन्यात केलेल्या प्रवासाची आणि त्या त्या पाहुण्यांचे अपडेट सांगत असे.

आता हा भाऊजी कोणत्याही गावात गेला की किमान आठ दिवस आणि जास्तीत जास्त पंधरा दिवस मुक्काम करत असे. आमच्या गावात तर त्याचे खूप पाहुणे, त्यामुळे तो पंधरा दिवसांहून जास्त दिवस मुक्काम करत असे. त्याला कोणीही काही काम लावत नसे. कोणीही त्याचा अपमान करत नसे. त्याच्या लहानपणी तो याच गावात राहिलेला असल्याने गावाबद्दल त्याला जिव्हाळा होता. अनेक जुन्या गोष्टी तो सांगत असे. दिवंगत झालेल्या जुन्या माणसाची शब्दचित्रे तो सांगत असे. तो आल्याचा कोणाला आनंद नसे आणि गेल्याचे दुःख नसे...

भाऊजी पंधरा दिवस राहून निघाला की जाताना खूप रडत असे. जाऊ का असे प्रत्येकाला विचारायचा आणि रडायचा..‘एवढा रडतोयस तर जाऊ नको,’ असे कोणी म्हणताच ‘तसे कसे, गेले पायजे, गेले पायजे.’ मग फडक्यात बांधून दिलेली भाकरी डोक्यावरच्या गाठोड्यात बांधून डोळे पुसत तो निघायचा. जाताना कोपऱ्यावर जाईपर्यंत वळून बघायचा. शेवटचा हात करायचा आणि दिसायचा बंद व्हायचा. ते सगळे चित्र बघून आम्हालाही गलबलून यायचे. वाईट वाटायचे. आता तो कुठे जाईल? कुठे राहील? त्या गरिबाने आता कुठेच जाऊ नये, असे आम्हा मुलांना वाटायचे. चांगला दोनतीन दिवस तो आठवत राहायचा...

येशा भाऊजीचा असा आयुष्याचा एक मार्ग होता. भोळसर स्वभाव. लहानपणापासून अशीच भटकंतीची सवय. गावात मोठा वाडा, शिवारात पाचपन्नास एकर जिरायत जमीन. आई-वडील होते तोवर ठीक होते, आईचा या भोळ्या पोरावर जीव होता. आपल्या माघारी कसे होईल, याची काळजी. आई गेल्यावर याच्या नशिबी गाव भटकायचे आले. डोक्यावर ओझे, त्यात कपडे घेऊन तो फिरत राहिला. तो ज्या गावाला जाईल ती सगळी त्याच्या जवळची माणसे. त्याच गावांना तो पुन:पुन्हा जायचा. राहायचा. पण तो जिथे जाईल त्या गावातील पाहुण्यांनी त्याला त्यांच्या त्यांच्या ऐपतीप्रमाणे जपले. कोणी अचानकपणे त्याला नवी कपडे घेतली, कोणी त्याला नवीन चप्पल. सगळे म्हणत, ‘‘तुझे वय होत चालले आहे. एक ठिकाणी निवांत राहा.’’ पण हा फिरत राहायचा. गावोगावच्या जत्रा, लग्न याच्या बातम्या त्याला समजत. कोणा पाहुण्याच्या घरी दुःखद प्रसंग घडला की तो हमखास यायचा.

आमच्या लहानपणी त्याचे असे दिवस आम्ही बघितले. पुढे आम्ही महाविद्यालयात गेलो. एसटी आल्या. वाहने आली, तरीही डोक्यावर गाठोडं घेऊन चालणारा भाऊजी दिसायचा. भवताल बदलला होता तरी त्याला त्याचे काहीही नव्हते. या बदलाचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नव्हता. त्याचे वय वाढत चालले होते. तो थकत निघाला होता, तरीही तो गावं फिरत होता.

एक दिवस राती आठच्या दरम्यान मी आणि माझा मित्र अंबक रोडने येत होतो. बोलत निघालो असताना भाऊजीसारखा एक माणूस निघालेला. गाडीच्या लाईटच्या उजेडात मी ओळखले.

‘भाऊजी कुठं निघालाय?’

‘आवं वाट चुकली, कुंभारगावला निघालोय; पण गाव येईना.’ थकलेल्या भाऊजीची दिशाभूल झाली होती. मग आम्ही त्यांना गाडीवरून घरी आणले. ‘‘आता फिरस्ती बंद करा. एका जागी राहा...’’ असे सांगितले, पण भाऊजीची फिरस्ती सुरू राहिली. आता त्याला डोक्यावरचे गाठोडे जड वाटायचे. बोजा पेलायचा नाही. ते बघून खूप वाईट वाटायचे; पण काहीही करता येत नव्हते. तो एका जागेवर थांबणार नव्हता.

दिवसामागून दिवस गेले. आता पुन्हा काही बदल आलेले, मुक्कामी येणारा पाहुणा ही गोष्ट बंद झालेली. माया, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी कुठल्या कुठे गेलेली. जग जवळ आले आणि माणसे दूर जाऊ लागली, यात भाऊजीची आठवणसुद्धा यायची बंद झाली. एक दिवस तालुक्याच्या गावाकडून घरी येत होतो. भाऊजीचे गाव आले. असेल का गावात भाऊजी, असा प्रश्न पडला तर एका झाडाखाली माणसे बसलेली. तिथे भाऊजीही होता. गप्प बसलेला. मला बघून त्याला बरे वाटले. घरातील लोक, गावातील ओळखीचे लोक यांची मनापासून चौकशी करू लागला.

‘भाऊजी आला नाहीत अनेक दिवस?’

‘आता कुठे जाऊ मी,’ असे म्हणत तो ढसाढसा रडू लागला. त्याने पायाकडे हात दाखवला. मग तिथला एक जण म्हणाला, ‘‘त्याला गाडीने ठोकर दिली. पाय अधू झालाय. काठीशिवाय चालता येत नाही त्याला.’’ ऐकून खूप वाईट वाटलं...

‘मस्त जाऊ वाटतेय, माणसांना भेटू वाटतेय पण कसे जावे ओ.

देवाने जाग्यावर बसिवले मला.’ भाऊजी पुन्हा हुंदके द्यायला लागला... संपूर्ण आयुष्य फिरलेला भाऊजी आता कोठेही जाऊ शकत नव्हता. डोक्यावर गाठोडं घेऊन अख्खी जिंदगी त्याने फिरून काढली. तो आनंदाने फिरत होता की दुःखाने? पायी चालून तो गावोगावी जायचा, राहायचा, त्या त्या गावातील पाहुण्यांच्या आनंदाने आनंदी आणि दुःखाने दुःखी व्हायचा... पण तो का फिरत होता? तोच त्याचा आनंद होता का? येताना हा प्रश्न मनात आला. आता गाडी बरेच पुढं आलेली. पुन्हा भेटलो की नक्की विचारेन...

(लेखक प्रसिद्ध ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com