भवताल बदलला

कुंडल हे आमच्या गावापेक्षा मोठं असलेलं जवळचं गाव. तिथं आजी-आजोबा बाजाराला जात. मीही एकदा आजीबरोबर या बाजाराला गेलो होतो. मात्र आता बाजाराची वाट बदलली होती.
kundal bazar
kundal bazarsakal
Summary

कुंडल हे आमच्या गावापेक्षा मोठं असलेलं जवळचं गाव. तिथं आजी-आजोबा बाजाराला जात. मीही एकदा आजीबरोबर या बाजाराला गेलो होतो. मात्र आता बाजाराची वाट बदलली होती.

कुंडल हे आमच्या गावापेक्षा मोठं असलेलं जवळचं गाव. तिथं आजी-आजोबा बाजाराला जात. मीही एकदा आजीबरोबर या बाजाराला गेलो होतो. मात्र आता बाजाराची वाट बदलली होती. बाजारही बदलला होता. जुने चेहरे दिसत नव्हते. सगळी नवी माणसं, नवे चेहरे. बाजार तिथेच होता, बाजारात जाण्याची वाटही तीच होती; मात्र भवताल बदलला होता. वाटेवरून जाणारी माणसं गतिमान झाली होती...

आमच्या गावापासून सात किलोमीटरवर कुंडल नावाचे गाव आहे. या कुंडलबद्दल सुप्रसिद्ध लेखक ग. दि. माडगूळकर आणि व्यंकटेश माडगूळकर यांनी भरभरून लिहिलं आहे. माझ्याही या गावाबद्दलच्या खूप आठवणी आहेत. मी पाचवीत शिकत असताना पहिल्यांदाच हे गाव बघितलं. कुंडल हे आमच्या गावापेक्षा मोठं असलेलं जवळचं गाव. रविवारची सुट्टी होती. त्या दिवशी आजी म्हणाली, ‘आज आपल्याला कुंडलच्या बाजाराला जायाचं हाय.’ बाजारला आजी-आजोबा गेले की, येताना खायला घेऊन यायचे. ज्या दिवशी ते बाजाराला जात त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी आजी-आजोबांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेलो असायचो. वाहने कमी असल्याचा तो काळ. कधी बैलगाडी, तर कधी चालत बाजारकरी लोक जात. बैलगाडीचा आवाज आला, की मी पळत रस्त्यावर जायचो. कधीकधी गाडी आमची नसे. मग पुन्हा सोप्यात जाऊन बसायचो. एक दिवस तर अप्पा बैलगाडी घेऊन गेले नव्हते. त्यांना यायला उशीर होणार होता, तरीही मी वाट बघत होतो. वाट बघून बघून मी जेवलो आणि झोप आली. जेव्हा जागा झालो तेव्हा खूप रात झालेली. आप्पा मला उठवत होते. त्यांनी शेवचिवडा आणलेला होता. त्या दिवशी अवकाळी पाऊस आला. मग निम्म्या रस्त्यापर्यंत आलेले अप्पा आणि त्यांचे जोडीदार बलवडीच्या रानातील एका वस्तीवर निवाऱ्याला थांबले होते. पाऊस उघडल्यावर ते आलेले. मला तो प्रसंग नेहमी आठवतो.

आजी मला बाजारला जाऊया म्हणाल्यावर माझ्या मनात बाजाराचं एक चित्र उभं राहिलं. आम्ही सकाळी लवकर उठून बाजाराची वाट चालू लागलो. दिवस उगवून वर आलेला. आम्ही मधल्या वाटेने कुंडलला निघालो होतो. ही वाट खूप जवळची वाटायची. जात असताना वाटेवर असलेल्या वस्त्यावरच्या बायकांना हाका मारत आजी निघालेली. तिच्या डोक्यावर घेवड्याच्या शेंगांची मोठी पाटी होती. माझ्या हातात छोटी पिशवी. लगबगीने आम्ही निघालेलो. त्या रस्त्यावरून जाताना आजी मला अनेक गोष्टी सांगत होती. पिराचं शेत आलं. तिथं पिराच देऊळ होतं. आजी मला सोबत घेऊन गेली. घेवड्याच्या शेंगा घेतल्या. पिराच्या पुढं ठेवल्या. नमस्कार केला. मीही हात जोडले.

पुढं काही अंतरावर भटकीचा माळ आला. हा भटकीचा माळ म्हटलं की आमच्या अंगावर काटे येतं. कारण या माळाबद्दल अनेक दंतकथा ऐकल्या होत्या. कोणे एके काळी या माळावर एक वऱ्हाड गडप झालं होतं. तेव्हापासून दर अमावस्येला रात्री बाराच्या सुमारास बैलांच्या घुंगराचे आवाज ऐकायला येतात. दर अमावस्येला ते वऱ्हाड निघते. भटकीच्या माळावर ते वऱ्हाड पहाटेपर्यंत असते, अशा दंतकथा आमच्या शिवारात वर्णन करून सांगणारी लोक होती. त्या अगदी कळत्या वयातच मलाही ऐकायला मिळाल्या होत्या. तो भटकीचा माळ आम्ही चालत होतो. मला आजीला त्या वऱ्हाडाच्या संदर्भाने काही विचारावं असं वाटलं; पण मलाच भीती वाटली. आजीही आपल्याच नादात चालत होती. पुढं लिंबाचं लव्हाण आलं. इथं पूर्वी लिंबाची झाडं होती, म्हणून लिंबाचं लव्हाण नाव पडलेलं. पुढं गेलो. वाटेत एक छोटं मंदिर आलं. मारुतीचं. आजीने डोक्यावरची पाटी खाली ठेवली. पाटीतल्या चार शेंगा तिने देवापुढे ठेवल्या. देवाला हात जोडले. तिथं झाडाखाली आम्ही बसलो.

‘अजून किती चालायचं?’ मी आजीला विचारलं.

‘आलंय, ते टेक ओलांडलं की...’ आजी म्हणाली..

आम्ही चालत होतो. आता थोड्या थोड्या उन्हाच्या झळा जाणवत होत्या. झाडं-झुडपं मागे पडली होती. ओसाड माळ सुरू झाला होतं. माळावरनं पुढं बघितलं तर डोंगर दिसत होते. गावही दिसू लागलेलं. मोठी घरं, कौलारू घरं, झोपड्या दिसायला लागल्या होत्या. जसजसे गाव जवळ येईल तशी मागून माणसं येताना दिसत होती. गावाजवळ आल्यावर रस्त्यावर जास्तच गर्दी दिसायला लागली होती. सगळे आसपासच्या गावातून लोक बाजाराला निघालेले.

बाजारात पोहोचलो तेव्हा बाजार भरू लागला होता. विक्रेते जागा बघून आपापला माल मांडत होते. एका दुकानदाराला विचारून आजीनेही पाटी खाली ठेवली. एक मोठा कपडा अंथरला. त्यावर शेंगा ओतल्या. मी तिथंच आजीजवळ बसलो. जसजसा वेळ जाईल, तशी बाजारात गर्दी वाढत होती. खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांची गर्दी झाली होती. आजीजवळ येणाऱ्यापैकी काही माणसं घेवडा घ्यायची. काही नुसतं बघून किंमत विचारून जायची.

‘आज शेंगा लवकर खपतील.’ आजी म्हणाली.

‘तुला भुका लागली का? थांब लक्ष ठेव..’ असं म्हणत ती उठली. गेली आणि लगेच एक केळीचा घड घेऊन आली.

‘खा’’ म्हणत ती मला केळी सोलून देऊ लागली. मी केळी खायला लागलो. केळी खाल्ल्यावर मला बरे वाटू लागले.

आमची जागा उन्हात होती. उन्हाने डोकं भाजत होतं. पुन्हा ती उठली. बोअरिंगवर जाऊन टॉवेल भिजवून आणला आणि माझ्या डोक्यावर ठेवला. एकदम गार वाटू लागलं. हिकडं बाजारात गर्दी वाढू लागली आणि आमच्याही शेंगा खपू लागल्या. बघता बघता आमची पाटी रिकामी झाली. आजीने पैसे मोजले. सुट्टे पैसे बाजूला काढले आणि नोटा होत्या त्या तिच्याजवळच्या पिशवीत ठेवल्या.

‘चल.’ मग आम्ही एका दुकानात गेलो. तिथं आजीनं तेल, साखर, चटणी आणि मला खायला पावाचा मोठा पुडा घेतला. मग आम्ही तिथून बाहेर पडलो. आता दिवस मावळतीला निघाला होता. ज्यांचा माल संपला आहे, ते लोकही घरी निघाले होते. आम्हीही गावाची वाट धरली. गावाची हद्द संपली. ओसाड माळ आलं. पुन्हा झाडी-झुडपं असलेली पांद आली. पुढं ते देवाचं छोटं मंदिर. त्या देवळाजवळ आम्ही बसलो. थोडं अंधारून आलं होतं. काही वेळापूर्वी कोणीतरी देवापुढे दिवा लावून गेलेलं दिसत होतं. कोणीतरी नारळही फोडून गेलं होतं. खोबऱ्याचा एक तुकडा देवापुढं ठेवलेला दिसत होता. आजीनं पिशवीतून साखरेची पुडी काढली. देवापुढं थोडी साखर ठेवली. आजीनं देवाला नमस्कार केला. मलाही हात जोडायला लावले. मग आम्ही तिथून पुढं आलो. भटकीचं माळ ओलांडलं की पिराचं देऊळ आलं. तिथं आत गेलो. तिथेही आजीनं पुडीतली साखर ठेवली. नमस्कार केला. मीही हात जोडले. आता बराच वेळ झाला होता.

आम्हाला गावातील लाईट दिसायला लागल्या होत्या. पुढच्या बाबादादाच्या वस्तीवर आलो. त्यांनी शिकारी कुत्री पाळली होती. आम्हाला बघून कुत्री भुंकायला लागली. बाबादादा हातात काठी घेऊन आला. कुत्री भुकायची थांबली. गाव जवळ आलं. जांभळीचा ओढा गेला. आता गावपंढरीत पोहोचलो. काही घरातून रेडिओवरच भक्तिसंगीत ऐकू येत होतं. गावात आल्यावर बरं वाटलं. त्या दिवशी पहिल्यांदाच एवढं चाललो होतो. घरात आलो. बाजारातून आणलेला पाव चहासोबत खाल्ला आणि झोपी गेलो. रात्रभर स्वप्नात बाजार येत होता..

गेल्या काही महिन्यांपूर्वी याच वाटेने कुंडलला जायचा योग आला. आता रस्ता डांबरी झालाय. काही वेळातच कुंडलला पोहोचता येतं. या वाटेने जाताना पिराचं देऊळ आलं, आजीची आठवण आली. भटकीच्या माळावरून लगबगीने जाणारी आजी, पुढं पांद आली. मारुती आला. आजीसोबत इथं ज्या झाडाखाली बसलो होतो ते झाड दिसलं नाही. पुढं ज्या माळावर गेल्यावर दिवसासुद्धा भीती वाटत असे, त्या माळावर आता मळा झाला आहे. या वाटेने जाताना आजीचे तुरूतुरू चालणे आठवत होते. तिचा आवाज ऐकू येत होता. आज आजी असती, तर तिलाही हा बदल पाहून आनंद झाला असता आणि या रोडने एवढ्या कमी वेळात बाजाराला जाता येते, याचे तिला आश्चर्य वाटले असते. लहानपणी ती मला बाजाराला घेऊन जात असे. आता मी तिला बाजारला घेऊन गेलो असतो. ज्या काळात आम्ही चालत जात होतो, त्या काळी जर एवढे बदल होतील, असं सांगितलं असतं तर पटलं नसतं; पण हा काळानुसार झालेला बदल होता. आमच्या गावातील एक आजी नाही तर अनेक आज्या आपल्या नातवाला घेऊन कधी बाजाराला, कधी लेकीकडे, कधी माहेरी, कधी पाहुण्यांच्याकडे जात असत. आजीसोबत नातवाला जायला खूप आनंद होत असे. त्या चालत जात.

माणसं खूप चालायची त्या काळात. दिवस दिवस चालायची. दळणवळण सुविधा नाहीत म्हणून कोणी थांबत नव्हतं. एकमेकांच्या सुखाला आणि दुःखाला माणसं पोहोचत होती. आज वाहन आलीत; पण ती माया, आपुलकी आहे का? असा प्रश्न मला याच बाजारच्या वाटेवर पडला. बाजारात गेलो, जिथं आम्ही बसायचो, त्या जागेजवळ गेल्यावर मला आजीने दिलेल्या केळ्यांची आठवण झाली. गेली आजी. आता ऊन लागतंय म्हणून डोक्यावर टॉवेल कोण टाकणार? भडभडून आलं.

आज बाजाराची वाट बदलली होती. बाजारही बदलला होता. जुने चेहरे दिसत नव्हते. सगळी नवी माणसं, नवे चेहरे. बाजारची वाटही तिथेच होती; मात्र भवताल बदलला होता. वाटेवरून जाणारी माणसं गतिमान झाली होती. कधीकाळी आजी या वाटेवर चालत होती आणि तिच्या मागे मी चालायचो, याचा साक्षीदार आता मी एकटा आहे. बदललेली वाट काही बोलणार नाही. ती बदलली आणि अजून बदलेल...

(लेखक प्रसिद्ध ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com