जत्रा सुरू आहेत, पण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Village Jatra

गावागावांतील जत्रेचे स्वरूप आता बदललेले आहे. बैलगाडीतून यात्रेला जाण्यात जे वैभव होते ते आज नाही. बैलगाडीतून कोणीही जात नाही. अवघ्या काही मिनिटांवर गावं आली आहेत.

जत्रा सुरू आहेत, पण...

गावागावांतील जत्रेचे स्वरूप आता बदललेले आहे. बैलगाडीतून यात्रेला जाण्यात जे वैभव होते ते आज नाही. बैलगाडीतून कोणीही जात नाही. अवघ्या काही मिनिटांवर गावं आली आहेत. एकेकाळी वैभवशाली ठरणारं हे वाहन आज अडगळीत गेले आहे. आमच्याकडेही आता बैल नाहीत, गाडी आहे पण मोडून गेलेली... त्यामुळे जत्रा सुरू आहेत; पण स्वरूप बदलले आहे. कधी कुठे यात्रा पाहिली की आमचे बैल आठवतात. ज्या गाडीने आम्ही जायचो ते सगळे प्रसंग आठवतात. त्या आठवणी मागच्या पिढीच्या समृद्ध जगण्याची संस्कृती अधोरेखित करणाऱ्या आहेत.

आमच्या गावापासून चार मैलांवर सागरोबाचे मंदिर आहे. तिथे दरवर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी यात्रा असते. त्या यात्रेला आम्ही लहानपणी जायचो. त्या काळात आमच्या गावातून देवराष्ट्र गावाकडे जाणारा रस्ता मुरुमाचा, खडबडीत होता. मोठ्या वाहनांची रहदारी कमी होती. सागरोबाच्या यात्रेच्या दिवशी मात्र या रस्त्यावरून लहान टेम्पो, सायकली आणि बैलगाड्यांची वर्दळ असायची. आमचे आप्पा सकाळी लवकर उठून बैल धूत. त्यांची शिंगे रंगवत. त्यांच्या शिंगाला रिबिन बांधत. गाडीत बसायला मोठे घोंगडे अंथरत. आमची सगळ्यांची जेवणं झाली, की गाडी जुंपून सागरोबाच्या दिशेने आमचा प्रवास सुरू होई.

या यात्रेसाठी माझ्या मावश्या, त्यांची मुलं, माझा दोस्त असे सगळे लोक सोबत असायचो. रस्यावरून जाताना आम्हाला अनेक बैलगाड्या दिसत. त्याही सजवलेल्या असत. एखादा खोडकर गाडीवाला दुसऱ्या गाडीवाल्याला शर्यतीचं आव्हान द्यायचा. दुसराही ते स्वीकारायचा. मग रस्त्यावरून या दोन गाड्या फुफाट्यातून उधळत निघायच्या. त्या गाडीत बसलेली बायका, लहान मुलं आरडाओरडा करत, पण इर्षेला पेटलेले गाडीवाले गाड्या थांबवत नसत. चांगले मैलभर गेल्यावर त्या गाड्या थांबत. त्या शर्यतीकडे इतर गाडीवाले गमतीने पाहत, काही ओरडून त्यांना प्रतिसाद देत. ही शर्यत थांबल्यावर मात्र ते गाडीवाले गप्पा मारत वाट पार करत असत.

आमची बैलगाडी देवराष्ट्रे गावात गेल्यावर यात्रेची गर्दी दिसायला सुरुवात व्हायची. सागरोबाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सगळीकडे माणसंच माणसं दिसायची. सागरोबाकडून येणारे आठ-दहा सायकलस्वार एका सुरात पोऽऽऽ... पोऽऽऽ असा पिपाणीचा आवाज काढत सगळ्या लोकांचे लक्ष वेधून घेत. पिपाणीचे आवाज, माणसांची गर्दी आणि या गर्दीतून वाट काढताना बुजणारे बैल, बुजून थांबलेल्या बैलाच्या पाठीवर चाबकाचे फटकारे मारणारे गाडीवान, आडव्या आलेल्या बैलगाडीला वैतागून जोराने हॉर्न वाजवणारे वाहनचालक, असे चित्र दिसायचे.

मोकळ्या मैदानात बैलगाड्या सोडल्या जात. तिथून एक कोसावर सागरोबा होता. बैलगाडीतून उतरून जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला भजीवाले, चहावाले, छोटी खेळणी विकणारे, काकड्या-पेरूवाले, सायकलीवरून गारेगार विकणारे यांची रेलचेल असे. ही सगळी माणसे येणाऱ्या-जाणाऱ्यांना हाका मारत. आम्हा पोरांना वाटायचे, भजी खावीत, मस्त गारेगारचा आस्वाद घ्यावा. मीठ टाकलेल्या पेरूची चव वेगळीच असते, ती चाखावी. खेळण्याच्या दुकानाजवळ थांबल्यावर शिट्टी घ्यावी, ट्रॅक्टर घ्यावा, मोटर घ्यावी असे वाटायचे, पण माझ्याकडे आजीने दिलेले पाच रुपये असायचे. त्याचा अंदाज घेतल्यावर हिरमोड व्हायचा. तरीबी वाटायचे किती मन मारायचं! पण, गारेगारच्या दोन कांड्या घ्यायचो. एक दोस्तासाठी, एक माझ्यासाठी. एक रुपया खर्च होऊन पाच रुपयातून चार उरायचे. मग मित्रही भज्याची प्लेट मागवायचा. आम्ही यात्रेत असे रमलेले असायचो.

पुढे गेल्यावर पाळणा असायचा. पाळण्यात बसायला यात्रेकरूंची गर्दी. खालचा पाळणा वर जाताना आणि वरचे पाळणे खाली येताना मजा वाटायची. पाळण्यात बसलेले लोक मोठ्या उत्साहाने खाली उभ्या असलेल्या लोकांना हाका मारायचे, हातवारे करायचे. पाळणा थांबल्यावर पाळण्यात बसलेले लोक बाजूला व्हायचे आणि दुसरे बसायचे. आम्ही बराच वेळ ते बघत असायचो. त्यानंतर आम्ही खूप गर्दी झालेल्या नेमबाजीच्या दुकानाजवळ थांबायचो. एकाच्या हातात बंदूक. त्यांनी बोर्डवर असलेल्या फुग्यावर नेम धरलेला. त्याच्या गोळीतून फुगा फुटला, त्याने चार आणे काढून त्या उभ्या असलेल्या माणसाला दिले. बोर्डवर अनेक रंगांचे फुगे होते. तिथे फुगे फोडायला गर्दी झाली होती. अनेकदा नेम चुकायचा. आम्ही तासभर तिथे थांबलेलो असायचो. आम्ही बराचवेळ उभे आहोत हे पाहून फुगेवाला म्हणायचा, ‘‘ये पोरानो का उभा रहिलाय, जावा की.’’ तेव्हा कुठं आम्ही तिथून हालायचो.

पुढे रस्त्यावर जादूचा प्रयोग सुरू असायचा. बूट-सूट टायवाला जादूगार कधी मराठीत, तर कधी हिंदीत बोलत जादूचे प्रयोग दाखवायचा. एका स्टुलावर कागदाचा जाळ करायचा. ती राख हाताने चोळली, की त्याचा भंडारा व्हायचा. लोक टाळ्या वाजवायचे, तो पुन्हा एका दहा रुपयांच्या नोटेच्या दोन दहाच्या नोटा करायचा. भुका लागल्या की आम्ही गोड्या शेवचे दुकान हुडकून काढायचो. तिथे गोडी शेव खायचो. नळाला जाऊन पाणी प्यायचो. पोट भरल्यावर पुन्हा जत्रेत हिंडायचो.

अशीच एक यात्रा मला आठवते. कुंडल गावची. ही यात्रा अंनत चतुर्थीच्या दरम्यान असायची. स्वातंत्र्यपूर्व काळात कुंडल या गावाने प्रतिसरकारच्या स्थापनेत मोठे योगदान दिले होते. इतिहासाच्या पानापानावर या गावाची नोंद घेतली आहे. या गावाच्या यात्रेला आमचे दादा व आप्पा मला घेऊन जात असत. दिवसभर कुंडलच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मैदानावर भारतातील मोठमोठ्या मल्लांच्या कुस्त्या असत. अगदी त्या काळातील नामांकित मल्ल इथे कुस्त्यांना येत. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरनंतरच्या कुस्त्या या गावाने आयोजित केलेल्या असत. कुंडल हे विचाराने भारलेले गाव.

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली तेव्हा या गावातील लोकांनी त्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी म्हणून कुस्ती मैदानाचे नाव ‘महाराष्ट्र कुस्ती मैदान’ असे दिलेले. याच मैदानात देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेले आणि आम्हाला ज्याचा धडा अभ्यासाला होता ते क्रांतीअग्रणी जी. डी. बापू दिसायचे. तुफान सेनेत फिल्ड मार्शल म्हणून कामगिरी केलेले कॅप्टन रामभाऊ लाड हे कुस्तीमैदानाचे सूत्रसंचालन करत... आपल्या बुलंदी आवाजाने ते पैलवान आणि कुस्तीशौकीन यांच्या मनात जोश निर्माण करत. ‘‘आरं मठपती कुस्ती कर कुस्ती कर...’’ असे संवादी सूत्रसंचालन त्यांचे असे.

कुस्त्या सुटल्यावर आमचे एक नातेवाईक तमाशाला जात. ग्रामीण भागात लोकप्रिय असलेले जयवंतराव सावळजकर यांचा तमाशा अनेकदा बोर्डिंगच्या समोर याच जत्रेत पाहिला. जयवंतराव आज नाहीत; पण त्यांची लोकप्रियता एवढी होती, की ते स्टेजवर आले की लोक हसायला सुरुवात करत. बोलीभाषेवर प्रभुत्व आणि विनोदाचे त्यांचे टायमिंग या गोष्टी लोकांना आवडत असत. त्यांचा तमाशा बघून पुन्हा आठ-दहा दिवस लोक त्यांचे डायलॉग ऐकून एकटेच हसत, एवढे त्यांचे विनोद ताकदीचे असत.

बोर्डिंगसमोरचा तमाशा पहाटे संपला की आमचा बैलगाडी घेऊन परतीचा प्रवास सुरू व्हायचा. ते दिवस पावसाचे असायचे. कधी पावसाची सर यायची. एका वर्षी भल्या पहाटे आम्ही निघालो. निम्म्या रस्त्यात आलो आणि पुढचे मला काहीच समजले नाही. आभाळ भरून आलेले होते, एवढेच मला आठवत होते. दुपारी थोडा पाऊसही झालेला. हवेत गारठा होता. मी थंडीने कुडकुडत होतो. त्याच अवस्थेत मला झोप लागली. पहाटे झोपताना माझ्या अंगावर पांघरूण नव्हतं, पण जेव्हा जागा झालो तेव्हा अंगावर पांघरूण होतं. माझे आजोबा आप्पा, दादा शेजारी बसलेले. एक वाकळ त्यांनी माझ्या अंगावर टाकली होती आणि ते दोघे तसेच कुडकुडत बसलेले.

ज्या काळात या जत्रा भरत, तो काळ आता बदलला आहे. बैलगाडीतून यात्रेला जाण्यात जे वैभव होते ते आज नाही. बैलगाडीतून कोणीही जात नाही. अवघ्या काही मिनिटांवर ही गावं आली आहेत. एकेकाळी वैभवशाली ठरणारी वाहनं आज अडगळीत गेली आहेत. आमच्याकडेही आता बैल नाहीत. गाडी आहे, पण मोडून गेलेली... जत्रा सुरू आहेत, पण स्वरूप बदलले आहे आणि अजून बदलत जाणार आहे.

कधी कुठे यात्रा पाहिली की आमचे बैल आठवतात. ज्या गाडीने आम्ही जायचो ते सगळे प्रसंग आठवतात. अजून किती दिवस आठवत राहतील. दोन दिवसांपूर्वी यात्रेत नेहमी सोबत येणारा मित्र अनेक वर्षांनी भेटला. त्याच्याजवळ यात्रेच्या आठवणी काढल्या, तो म्हणाला... ‘‘माझ्या काहीही लक्षात नाही आता. तू कसं लक्षात ठेवतो...’’ आणि खरोखरच जगण्याच्या लढाईत माझा मित्र आयुष्यातले आनंदी आणि कायम ऊर्जा देणारे प्रसंग विसरला होता. कसे का? मी विचार करतोय...!

(लेखक प्रसिद्ध ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत.)