गाव जवळ; माणसं दूर...

श्रावण महिन्यात मावळभाचे एकत्र जेवण करण्याची प्रथा होती. आता ती बंद झाली; पण कधी पाडळी रोडने गेलो तर अण्णांसोबतचा श्रावण महिन्यातला प्रवास आठवतो.
गाव जवळ; माणसं दूर...
Summary

श्रावण महिन्यात मावळभाचे एकत्र जेवण करण्याची प्रथा होती. आता ती बंद झाली; पण कधी पाडळी रोडने गेलो तर अण्णांसोबतचा श्रावण महिन्यातला प्रवास आठवतो.

श्रावण महिन्यात मावळभाचे एकत्र जेवण करण्याची प्रथा होती. आता ती बंद झाली; पण कधी पाडळी रोडने गेलो तर अण्णांसोबतचा श्रावण महिन्यातला प्रवास आठवतो. आता लोकांच्यात जिव्हाळा राहिलेला नाही, मुक्कामी पाहुणा येणे ही पद्धत खेड्यात बंद झालीय. दारात गाड्या आहेत. दोन तासांत काही शे-दोनशे कि.मी. अंतर पार केले जाते. त्यामुळे कोणी मुक्कामी राहत नाही. पाहुणा येतो आणि जातो. कधीकाळी दूर वाटणारी गावं आता खूप जवळ आली आहेत; मात्र माणसं मात्र दूर निघाली आहेत. या काळात लोकांना जोडणारा, आवर्जून पाहुण्यांच्या गावी जाणारा, गाठीभेटी घेत फिरणारा राजाअण्णासारखा अवलिया हवा आहे.

सातवीत शिकत होतो. एका दुपारी राजाअण्णा शाळेत आला. माझी चौकशी करत माझ्या वर्गात आला. त्याला वर्गाच्या समोर बघून मला आश्चर्य वाटलं. त्याने दारात गुरुजींना काही तरी सांगितलं आणि गुरुजी वर्गात येऊन मला म्हणाले, ‘अरे, तू दप्तर घेऊन घरी जा.’ मलाही तो आदेश ऐकून खूप आनंद झाला. मी दप्तर आवरून बाहेर आलो. बाहेर अण्णा माझी वाट बघत होता. मला पाहून म्हणाला, ‘चल लवकर आपल्याला पाडळीला जायाचं हाय.’

‘कशाला?’

‘मावळभाचे जेवायला.’

शाळेच्या बाहेर आलो तर आमचे आजोबाही उभे होते. त्यांच्यासोबत आम्ही दोघे निघालो. गोष्ट अशी होती, आमच्या भागात श्रावण महिन्याच्या सोमवारी मामा आणि भाचे एकत्र जेवण करण्याची प्रथा होती. राजाअण्णा माझ्या आईचा मामा. त्याने आज आमच्या आजोबांना त्यांच्या बहिणीच्या घरी जेवायला घेऊन जायचे नियोजन केले होते. दर श्रावण महिन्यात तो अशी मावळभाचे जेवण घडवून आणत असे. तेव्हा पाडळीला जायचं म्हटलं तर दोन ठिकाणी एसटी बदलावी लागे. आम्ही स्टॅण्डच्या दिशेने निघालो तर मागून गाडी आली. अण्णाने हात केला तर गाडी न थांबता निघून गेली. आता गाडी नव्हती. मग आम्ही चालत निघालो. जाता जाता मी म्हणालो, ‘‘मी पिशवी (दप्तर) कुठे तरी ठेवतो. हे वझं कुठं न्यायचं?’’ मी गावातील एका घरी गेलो. त्या घरातील मुलगा माझ्याच वर्गात होता. त्याच्या रानातल्या वस्तीवर पिशवी ठेवून मी, आमचे आजोबा दादा आणि राजाअण्णा निघालो. दुपारच्या उन्हातून आमचा प्रवास सुरू होता.

‘देवराष्ट्रेत गाडी मिळल’ असं म्हणून आम्ही चालत होतो. ‘देवराष्ट्रेत पोहोचायला शिरवाळ पडलं. आम्ही चौकात गेलो. एक टेम्पो उभा होता. तो चिंचणीपर्यंत जाणार होता. आम्ही तिघे त्यात बसलो. काही वेळात चिंचणीला आलो. तिथून मात्र रात्री उशिरा गाडी होती. त्या गाडीची वाट पाहण्यात काही अर्थ नव्हता. पुन्हा आमची पायपीट सुरू झाली.

दिवस मावळत होता. गावातील डोंगराला चरायला गेलेली जनावर गावाकडं येत होती. त्यांच्या पायाची धूळ रस्त्यावर उडत होती. गळ्यातील घंटा वाजवत जाणाऱ्या जनावरांचा कळप येत होता. आम्ही ते बघत निघालो. गावाच्या पश्चिमेला मोठा डोंगर. तो मोहक दिसत होता. गावाला लागूनच शेती सुरू झालेली. आमच्या पाहुण्यांच्या घराला लागून दोन घरं सोडली तर शेती होती. डोंगराच्या जवळ एका बाजूला असलेलं हे गाव मराठी चित्रपटातल्या खेड्यासारखं होतं.

त्या काळात वाहनांची सुविधा कमी प्रमाणात होती. पाहुणे वर्ष-सहा महिन्यांनी येत असत. दारात एकाएकी पाहुणा आलेला पाहून खूप आनंद व्हायचा. आम्हाला बघून पाहुण्यांना खूप आनंद झाला. आजोबांची बहीण शांताआत्ती भावाला बघून पळतच आली. त्यांचे मेहुणे भीमराव मामाही म्हणाले, ‘बरं झालं आज सोमवार गाठून आलाय.’

‘त्यासाठीच आलोय,’ राजाअण्णा म्हणाला.

मग आम्ही सोप्यात बसलो. त्या तीन म्हाताऱ्या माणसांत गप्पा सुरू झाल्या. जुने विषय निघाले. तिघेही बोलायचे आणि खळखळून हसायचे. मला त्यांच्यातील गप्पा समजत नव्हत्या; पण खूप आनंदाने ते संवाद करत होते. त्यांच्या गप्पा सुरू असतानाच मी तिथं चटईवर कलंडलो. मला झोप लागली तेव्हापासून मला जागे करेपर्यंत हे तिघे बोलतच होते. काय बोलत होते? किती दिवसांचे बोलत होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला बोलायला वेळ नाही, फोन केला तर एसएमएस करून उत्तर दिलं जातं. बोलणं टाळण्याचा काळ आलाय आणि न बोलताही मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला काय म्हणायचं आहे ते समोरच्याला सांगण्याची सुविधा आलीय. बोलणं टाळण्याच्या काळात वावरत असताना मला आमचे आजोबा, राजाअण्णा आणि पाडळीचे मामा हे एवढं त्या वेळी काय बोलत असतील असा प्रश्न पडतोय, पण त्याची उत्तरं मिळवण्यासाठी ते तिघंही आता नाहीत.

श्रावणातल्या सोमवारी मावळभाचे एकत्र यायची प्रथा हळूहळू बंद झाली. जशी वाहनं आली, दळणवळण वाढलं तशा या प्रथा बंद पडत गेल्या. सर्वांनी किमान जेवणाच्या निमित्ताने एकत्र यावे यासाठी ती प्रथा होती. एकत्र येऊन आपली सुखदुःखं सांगायची. मन मोकळं करायचं. एक रात मुक्काम करायचा. सकाळी काल शिल्लक राहिलेलं जेवायचं आणि पुन्हा एक वर्षांनी परत भेटायचं, असं दरवर्षी व्हायचं. आमच्या पैपाहुण्यांत राजाअण्णा श्रावणात चार सोमवार असतील तर चार ठिकाणी अशी जेवणं घडवून आणत असे. ते करण्यात त्याला आनंद वाटत होता. तो सगळ्या पैपाहुण्यांना जोडून होता. आमच्या सगळ्या पाहुण्यांत तो फिरत असे. प्रत्येकाची खबरबात त्याच्याकडे असे. कोण आजारी आहे, कोणाचं लग्न ठरलं, कोणाच्या लेकीला सासू त्रास देते हे त्याला कळत असे. मग जिथं अडचण असे तिथं अण्णा हजर व्हायचा. त्याचीही परिस्थिती नाजूक होती, तेव्हा आमचा मुलुख दुष्काळी होता. खर्चायला पैसे नसत. मग अण्णा ज्या पाहुण्याला अडचण असे, तिथं आधार द्यायला जायचा. चालत जायचा. अशी किती पावले तो पाहुण्यांसाठी चालला असेल? त्याच्या जगण्याचे तत्त्व काय होते? जीवनाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन काय होता? हे समजून घेण्याचा आता कोणताही मार्ग नाही. त्याच्याकडूनच समजून घ्यायला हवे होते...

घरातील आणि पैपाहुण्यांतील सगळी म्हातारी माणसं निघून गेली. अगदी उन्हाळ्यात जत्रेला सगळी येतात आणि अंगणात येऊन बसतात. गप्पा सुरू असतात आणि मग जसजशी रात्र वाढत जाईल तसतशी एक एक करत माणसं उठून विसाव्यासाठी जातात. काही वेळापूर्वी अंगण भरलेलं असतं, ते रिकामं होतं तशीच आमची माणसं गेली. म्हातारी माणसं गेली. आजी गेली, आजोबा गेले, राजाअण्णा गेले, पाडळीचे आत्ती मामा गेले आणि शेवटी अंबकची आत्ती गेली. यात राजाअण्णा सारखा आठवतो.

मला त्याने एकदा पाडळीला सरत्या सोमवारी नेले. तेव्हापासून त्याची मला गोडी लागली. मी त्याच्यासोबत लय गावं फिरलो. हा प्रवास चालत अधिक आणि एसटीने कमी असे. एकदा तडसर-शिरसगावच्या खिंडीतून आम्ही दिवस मावळत असताना गेलो होतो. एकदा माणदेशातील (सातारा जिल्ह्यातील माण तालुका) जुन्या पाहुण्यांच्या शोधात फिरलो. दोन दिवस, दोन रात्री गेल्या. एक मुक्काम मायणी बसस्थानकावर, दुसरा गोंदवलेकर महाराजांच्या मठात. तिसऱ्या दिवशी आम्ही आमच्या जुन्या पाहुण्यांच्या गावात पोहोचलो. त्या घरातील वयोवृद्ध व्यक्तीने अण्णाला ओळखले. त्या रात्री आम्हाला बाजरीची भाकरी आणि वांग्याच्या कालवणाचे खास जेवण दिले. दुसऱ्या दिवशी चपात्या आणि केळीचे शिकरण. मी शाळा बुडवून फिरत होतो. मला शाळेपेक्षा राजाअण्णासोबत फिरायला बरं वाटत होतं. लहानपणी अनेक गोष्टी, जुन्या घटना, गावातील इतिहास, राजा अण्णांच्या आयुष्यातील चांगली-वाईट माणसं याबद्दल त्याने मला सांगितलं. अण्णाने मला जे सांगितलं, त्यातील अनेक गोष्टी मला पुढं पुस्तकात वाचायला मिळाल्या.

श्रावण महिन्यातील मावळभाचे एकत्र जेवण करण्याची प्रथा आता बंद झाली आहे. त्याबद्दल कोणालाही माहिती नाही. श्रावण महिना येतो तेव्हा मला अण्णांची आठवण येते. गावाकडे गेल्यावर तर जास्तच. शहरात असल्यावर त्या गोष्टी आठवत नाहीत; पण कधी पाडळी रोडने गेलो तर अण्णांच्या सोबतचा श्रावण महिन्यातला प्रवास आठवतो. आता लोकांच्यात जिव्हाळा राहिलेला नाही, मुक्कामी पाहुणा येणे ही पद्धत खेड्यात बंद झालीय. दारात गाड्या आहेत. दोन तासांत काही शे-दोनशे कि. मी. अंतर पार केले जाते. त्यामुळे कोणी मुक्कामी राहत नाही. पाहुणा येतो आणि जातो. पहिली माया कमी होत निघाली आहे. कधीकाळी दूर वाटणारी गावं आता खूप जवळ आली आहेत; मात्र माणसं मात्र दूर निघाली आहेत. या काळात लोकांना जोडणारा, आवर्जून पाहुण्यांच्या गावी जाणारा, गाठीभेटी घेत फिरणारा राजाअण्णासारखा अवलिया हवा आहे. आमचा राजाअण्णा तर गेलाय, तुमच्यात जर कोणी असेल तर त्याला जपा, त्याची काळजी घ्या...

(लेखक प्रसिद्ध ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com