आठवणी जोपासलेली कुस्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kisanrao Dadu Yadav

मैदानात शेवटची कुस्ती संपली की आप्पा उठतात. कुस्तीच्या मैदानात एक गोष्ट आढळते. म्हाताऱ्या माणसाला तरुण पोरं सावरतात. गर्दीतून बाहेर काढतात, त्यांची चौकशी करतात.

आठवणी जोपासलेली कुस्ती

मैदानात शेवटची कुस्ती संपली की आप्पा उठतात. कुस्तीच्या मैदानात एक गोष्ट आढळते. म्हाताऱ्या माणसाला तरुण पोरं सावरतात. गर्दीतून बाहेर काढतात, त्यांची चौकशी करतात. हवं तिथं नेऊन सोडतात. हाच कुस्तीचा विचार आहे. हीच कुस्तीची शिकवण आहे आणि काळ कितीही बदलला तरी कुस्तीचा हा विचार बदललेला नाही. लाल मातीचा हाच विचार आहे. हीच संस्कृती आहे आणि आप्पांनी अनेकदा तो अनोळखी जिव्हाळा अनुभवलाय...

किसनराव दादू यादव. माझे आजोबा. आईचे चुलते. काही वर्षांपूर्वीचा एक प्रसंग. आप्पा त्या दिवशी आजारी होते. त्याच वेळी शिराळा तालुक्यातील कोकरूडला कुस्त्याचं मैदान होतं. मला वाटलं आजारी असल्यानं ते विसरले असतील; पण त्या दिवशी रात्री मला म्हणाले,

‘उद्या सकाळी किती वाजता निघायचं.’ त्यांच्या लक्षात होतं.

‘कशाला एवढ्या लांब? तुम्ही आजारी हायसा.’

‘आरं कोकरूड लै लांब न्हाई. मी सायकलीवरून कुस्त्याला गेलोय कोल्हापूरला.’

काही वर्षांपूर्वी आप्पांच्या तरुणपणाच्या काळात आप्पांचे गावात किराणा मालाचे दुकान होते. या दुकानात रोज रात्री त्यांचे सहकारी, बसायला येणारे लोक कुस्त्यांचे नादी. एक दिवस कोल्हापूरला हिंदकेसरी मारुती माने विरुद्ध विष्णुपंत सावर्डे अशी कुस्ती ठरलेली. या कुस्तीला आप्पा आणि त्यांचे सहकारी सायकल घेऊन ऐंशी-नव्वद किलोमीटर अंतरावर असलेल्या कोल्हापूरला गेलेले. या कुस्तीची नोंद कुस्तीच्या इतिहासात घेतली आहे. आजही ती कुस्ती समक्ष पाहिलेले आप्पा त्या कुस्तीचं वर्णन सांगतात. जवळपास अडीच तास चाललेली कुस्ती पाहायला आलेली गर्दी पांगवायला पोलिसांना अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागलेल्या. तेव्हा आमणापूरला कृष्णा नदीवर पूल नव्हता. नावेतून पलीकडे जावं लागायचं. नावेत सायकली टाकून हे लोक पुढं गेलेले. याच परिसरात एक बाबू राडे नावाचा नामांकित पैलवान होता. त्यांची कुस्ती दरवर्षी कुंडलच्या मैदानावर व्हायची.

आप्पा मला सांगू लागले, ‘आम्ही पंचगंगा ओलांडून गेलो. खासबाग मैदानात बसायला जागा मिळाली. तिकीट काढून कुस्त्या होत्या त्या. हिंदकेसरी मारुती माने यांची जीत झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी गावी आलो. तसेच एकदा विट्याजवळच्या नागेवाडीला कुस्त्या बघायला गेलो होतो. कुस्त्या संपल्यावर ते आणि रामदाजी रात्रभर चालत आले होते. वस्तीव आलो तेव्हा कोंबडा ओरडला.’

आज आम्ही कोकरूडला निघालो होतो. वातावरण पावसाळी, गार वारं सुटलेलं. त्यात आप्पा आजारी, पण हट्टाला पेटलेले. कालपासून कुस्तीबद्दल बरंच ऐकवलेलं. देवराष्ट्र, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे आजोळ. घाट उतरला की तुपारी, जवळच दह्यारी. पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर दह्यारीकर यांचं गाव, मग आप्पा त्यांची गोष्ट सांगू लागले. त्या ऐकत इस्लामपूर कसं आलं समजलं नाही. शिराळा मतदारसंघात आलो. पुढे कोकरूडच्या कुस्त्या भरउन्हात बघितल्या. एक लेमनगोळी विकणारा माणूस आला. आप्पांनी मला लेमनगोळी घ्यायला पाच रुपये काढून दिले. मला ते अजून लहान समजत होते. पूर्वी मी लहान असताना कुंडलच्या मैदानात मला ते पैसे द्यायचे. आता माझ्याकडे पैसे असतील हे ते विसरलेले. या मैदानात डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार, नामदेव मोळे आणि बापू लोखंडे हे तीन महाराष्ट्र केसरी एकाच वेळी आलेले. तेव्हा झालेला जल्लोष मी पाहिला आहे.

या मैदानाचं निवेदन सुरेश जाधव करत होता. कुस्ती परंपरा असलेल्या चिंचोली गावचा हा पोरगा. मैदानाला जान आणत होता. या मैदानात शेवटची कुस्ती झाली. आम्ही गर्दी कमी झाल्यावर बाहेर पडलो. आता इथून सत्तरेक किलोमीटर जायचं होतं. गाव दूर होता. रात्र झालेली. वाहनांची वर्दळ कमी झालेली. आमची मोटरसायकल निघालेली. आप्पा मला सांगत होते मारुती माने विरुद्ध नाथा पारगावकर यांच्या लढतीची गोष्ट. गोष्टीवेल्हाळ आप्पांचं सांगणं असं होतं, की ‘मीच ती लढत बघतोय’ अस वाटत होतं. येताना फक्त कुस्तीचा विषय. आप्पा मला सगळ्या मैदानावरून फिरवून आणत होते. रात्रीचे अकरा वाजले. यशवंत घाट आला. खिंड ओलांडली. देवराष्ट्र आलं. कधी काळी कुस्तीवर अफाट प्रेम करणारे हे गाव. या गावातील कुस्ती मैदानाने पत्रीसरकारच्या लढाईला बळ दिलंय. या गावात स्वातंत्र्यपूर्व काळात मोठ्या कुस्त्या व्हायच्या. कडेपूर गावचे देशपातळीवरचे पैलवान साहेबराव यादव यांची कुस्ती याच मैदानात पहिल्यांदा पाहिल्याची नोंद यशवंतराव चव्हाण यांनी ‘कृष्णाकाठ’मध्ये केलीय. क्रांतिसिंह नाना पाटील यांची या मैदानात दरवर्षी सभा व्हायची. एरव्ही भूमिगत असलेले नाना पाटील या मैदानात प्रकट व्हायचे. नाना पाटील या मैदानात नक्की बघायला मिळणार म्हणून दूरवरून लोक यायचे या कुस्ती मैदानाला.

बोलता बोलता रामापूर देवराष्ट्रची शिव आली. घराजवळ आलो. आम्हाला भुका लागलेल्या. मी पोटभरून जेवलो, पण आप्पांनी दुधात फक्त अर्धी भाकरी खाल्ली. जणू कुस्त्या बघून त्यांचं पोट भरलेलं. मग बोलत बसलो. बोलता बोलता मला झोप लागली. मला न उठवता आप्पा रात्री नेहमीप्रमाणे काठी टेकत वस्तीवर गेलेले. दीडशे किलोमीटर प्रवास केलेल्या या म्हाताऱ्याला रात्री रानात दोन किलोमीटर वस्तीवर पायी जायचा कंटाळा का आला नाही, ही विचार करण्याची गोष्ट आहे. मी आता पुण्याला असल्याने मला त्यांना कुस्त्यांना घेऊन जाता येत नाही. ती जबाबदारी आता मामेभाऊ प्रसाद यादवने घेतली आहे.

काही वर्षांपूर्वी एसटी, सायकल आणि प्रसंग पडला तर चालत कुस्तीला जाणारे आप्पा. भारतीय कुस्तीच्या इतिहासात ज्या कुस्तीची नोंद सुवर्णाक्षरांनी झालीय, ती मारुती माने विरुद्ध विष्णुपंत सावर्डेकर यांची कुस्ती बघायला आप्पा सायकलीवरून कोल्हापूरला गेले होते. सकाळी आठ वाजता सुरू झालेला त्यांचा प्रवास दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजता संपला. एक कुस्ती बघायला एवढा वेळ देणारी ही माणसं. त्यांना ना थंडी रोखू शकत होती, ना पाऊस. कुस्तीची बातमी ऐकली, पैलवान यायच्या अगोदर मैदानावर दाखल होत जागा धरणारे आप्पा.

हिंदकेसरी मारुती माने आणि मल्लसम्राट विष्णुपंत सावर्डेकर, महाराष्ट्र केसरी दिनकर दह्यारी आणि मारुती माने, दादू चौगुले आणि सतपाल, तसेच मारुती माने आणि नाथा मास्तर पारगावकर अशा अनेक जुन्या लढतींचे साक्षीदार आप्पा. या लढतीचे किस्से अनेकदा ऐकले आहेत त्यांच्याकडून. कुस्तीसाठी वेडी झालेली ही माणसं आणि पैलवानांवर उदंड प्रेम करणारे हे लोक. तारुण्यात कुस्तीसाठी जाणारे आप्पा वयाची ८६ वर्षे पूर्ण झाली तरी पडत झडत जात असतात. कुंडल, बलवडी, वारणानगर ही महत्त्वाची मैदानं काहीही झालं तर चुकवली नाहीत त्यांनी... कुस्तीसाठी आर्थिक झळ लावून घेतानाही मागंपुढं पाहत नाहीत. गावापासून दूर असलेल्या वारणेच्या मैदानाला जाताना परत कधी यायचं आणि कसं यायचं? याचा विचार न करता गेलेले आप्पा, आनंदा गायकवाड (तात्या), सुखदेव आप्पा गायकवाड ही वयोवृद्ध माणसं आणि त्यांचं कुस्तीप्रेम हे आम्हा तरुणांसाठी प्रेरणा देणारं आहे.

मैदानात शेवटची कुस्ती संपली की आप्पा उठतात. कुस्तीच्या मैदानात एक गोष्ट आढळते. म्हाताऱ्या माणसाला तरुण पोरं सावरतात. गर्दीतून बाहेर काढतात, त्याची चौकशी करतात. हवं तिथं नेऊन सोडतात. दृष्टी कमी झालेल्या आणि पायातील बळ कमी झालं आहे म्हणून लटपटत चाललेल्या या वयोवृद्ध कुस्तीशौकिनाला एखादा तरुण कुस्तीशौकीन हात देतो. आस्थेने चौकशी करतो. बोटाला धरून गर्दीतून बाहेर काढतो. लाल मातीचा हाच विचार आहे. हीच संस्कृती आहे आणि आप्पांनी अनेकदा तो अनोळखी जिव्हाळा अनुभवला आहे.महाराष्ट्र केसरी अधिवेशनात मला चार-पाच वयोवृद्ध कुस्तीशौकीन भेटले होते. एक फलटण भागातील होते. दुसरे पाटण भागातील. दौलतराव पवार हे बुलढाणा येथून पोर घेऊन कुस्तीला आलेले. त्यांना बघून मला आमच्या आप्पाची आठवण झाली.

कुस्तीचा नाद करावा याच लोकांनी आणि कुस्ती सांगावी ती याच लोकांनी. कुस्ती बघणाऱ्या आणि कुस्ती जगणाऱ्या आप्पा नावाच्या कुस्तीप्रेमींची ही सत्यकथा आहे. या कुस्तीप्रेमी माणसाबद्दल मी देशातील महान मल्ल हिंदकेसरी रोहित पटेल यांना सांगितले. काही दिवसांपूर्वी रोहित त्यांना भेटायला त्यांच्या वस्तीवर आले. एका पैलवानाने कुस्तीशौकिनाला भेटायला त्यांच्या घरी जाणे, ही गोष्ट पहिल्यांदाच घडली.आप्पांच्या कुस्तीप्रेमाचं चीज झालं. 'आप्पांना भेटून मला उर्जा मिळाली. याच लोकांची प्रेरणा मोलाची असते,’ असे उद्‌गार रोहित यांनी काढले. रोहित पटेल अनपेक्षितपणे भेटायला आल्याचा आनंद आप्पांच्या डोळ्यातून व्यक्त झाला.आयुष्यभर कुस्तीसाठी पायपीट केलेल्या एका कुस्तीप्रेमी माणसाला याहूनी काय हवं ?

(लेखक प्रसिद्ध ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत.)

टॅग्स :wrestlingsaptarang