साहित्यातला उजवा ‘कल’

पुन्हा भेटूया असं सांगत जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलचा गेल्या आठवड्यात समारोप झाला. पुन्हा भेटू या, हे तसं गेल्या तेरा वर्षांत दरवर्षीचं; मात्र यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये निरोपावरही ‘कोविड१९’ च्या वातावरणाची छाया होती.
Literature
LiteratureSakal
Summary

पुन्हा भेटूया असं सांगत जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलचा गेल्या आठवड्यात समारोप झाला. पुन्हा भेटू या, हे तसं गेल्या तेरा वर्षांत दरवर्षीचं; मात्र यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये निरोपावरही ‘कोविड१९’ च्या वातावरणाची छाया होती.

- सम्राट फडणीस / आशिष तागडे

पुन्हा भेटूया असं सांगत जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलचा गेल्या आठवड्यात समारोप झाला. पुन्हा भेटू या, हे तसं गेल्या तेरा वर्षांत दरवर्षीचं; मात्र यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये निरोपावरही ‘कोविड१९’ च्या वातावरणाची छाया होती. माणसाला माणूस पारखा होण्याचा अनुभव प्रत्येकाच्या गाठी होता. २०२१ कसं उगवलं, मावळलं आणि काय काय घेऊन गेलं, याची जाणीव होती. कितीही संकटं आली, तरी माणूस पुन्हा उभा राहतो आणि निर्मितीत स्वतःला जुंपून घेतो, ही भावना जगभरातल्या प्रत्येक संस्कृतीला नव्यानं प्राप्त झाली होती. हा अनुभव, जाणीव आणि नव्यानं प्राप्त झालेली भावना मांडणारं साहित्य सर्वच भाषांमध्ये निर्माण होत असल्याचं याची देही याची डोळा साहित्यरसिकांनी पाहिलं. आधुनिक मानवी इतिहासातल्या विषण्ण करणाऱ्या कालखंडातून प्रवास करत असतानाही एका माणसांमध्ये एकाचवेळी किती माणसं नांदत असतात, हे साहित्यातून समोर आलं. ‘कोविड१९’ च्या लाटा आदळत असताना माणूस धर्म-जाती, लिंगभेदाच्या भिंतींवर सरपटतो आहे, की या भिंती उद्ध्वस्त करण्याची मनीषा बाळगून आहे, यावर देशी-विदेशी साहित्यातून चिंतन प्रकटत आहे, हे जयपूरमध्ये दिसलं. उजव्या किंवा डाव्या अशा एकाच चष्म्यातून जगाकडं पाहायचं, की या दोन्हींच्या मध्यावर काही जागा आहे, यावर लेखक, साहित्यिक, कलाकारांमध्येही शोध सुरू आहे, याचं दर्शनही जयपूरमध्ये झालं.

भारतीय आणि जगभरातल्या साहित्यकारांमध्ये देवाणघेवाण घडविण्यात गेल्या दशकभरात जयूपर लिटरेचर फेस्टिव्हलचा मोठा वाटा राहिला. या फेस्टिवलची आक्रमक मांडणी, हे त्यामागं एक प्रमुख कारण आहे. आक्रमक मांडणी, याचा अर्थ राजकीय, सामाजिक, आर्थिक वास्तवापासून लपून न राहता त्याबद्दल थेट मतप्रदर्शन करणे, असा.

जयपूरच्या फेस्टिव्हलमध्ये सहभागी वक्त्यांनी, लेखकांनी विद्यमान राजकीय व्यवस्थांवर, समाजात खोलवर पसरू पाहणाऱ्या धृवीकरणावर, आर्थिक विषमतेवर भाष्य केलं. त्यांनी त्यांच्या साहित्यकृतीतून हे भाष्य केलं होतंच; तथापि संमेलनाच्या मंचावरूनही ती मांडणी केली. शशी थरूर, पवन वर्मा यांच्यासारख्या राजकारण-लेखन अशा दोन्ही क्षेत्रांत संचारणाऱ्यांनी त्यांची त्यांची गृहीतकं, ग्रह ठामपणानं मांडली; तशीच मकरंद परांजपेंसारख्यांनी प्रतिवादाची भूमिकाही तितक्याच ताकदीनं निभावली.

भारतीय लेखन-साहित्य आता डावीकडून उजवीकडं वाटचाल करतं आहे, हे जयपूर फेस्टिव्हलच्या गेल्या दशकभरातल्या वाटचालीत पाहायला मिळतं आहे. लेखनाचा प्रवाह डावा किंवा उजवा असावा की नसावा, हा स्वतंत्र चर्चेचा विषय. तथापि, ज्या लेखनाला लोकप्रियता, प्रतिष्ठा प्राप्त करून दिली जाते आहे, अथवा मिळते आहे त्या लेखनाचा उद्देश काय, हे पाहिलं, तर ही वाटचाल स्पष्ट दिसू लागते. सावरकरांविषयीचं अधिकाधिक संशोधनपर लेखन असो किंवा भारतीय संस्कृतीच्या प्रवाहात टिकून व्यक्तिरेखांकडं नव्यानं पाहणं असो, याबद्दलचं साहित्य आणि त्यावरच्या खुल्या चर्चा ही आता जयपूर फेस्टिव्हलची स्वतंत्र खूण बनते आहे.

साहित्यावर तत्कालीन राजव्यवस्थेचा प्रभाव असतो. राजा जाऊन लोकशाही आली, तरी व्यवस्था असतेच. ही व्यवस्था आपल्या प्रभावाची पुरेपूर काळजी घेत असते. भारतात २०१४ नंतर राजकीय व्यवस्था बदलली. डाव्या, समाजवादी विचारांच्या काँग्रेसचा अस्त सुरू झाला आणि उजव्या, हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या भाजपचा काळ सुरू झाला. लोकशाही मार्गाने भारतीय प्रौढ मतदारांनी ही व्यवस्था बदलली. त्याचे प्रतिबिंब साहित्यात उमटले नाही, तरच आश्चर्य. पत्रकार, लेखिका सबा नक्वी आणि राणा आयुब यांनी २०२० ला अल्पसंख्यांकांबद्दलच्या केंद्र सरकारच्या भूमिकांवर याच संमेलनात प्रश्न उभे केले होते. यंदा विक्रम संपत यांच्या अनुपस्थितीत सावरकरांविषयीच्या त्यांच्या पुस्तकावर झालेल्या चर्चेचा समारोपात, ''आधी पुस्तक वाचा, मग बोला,'' अशी आग्रही मागणी वक्त्यांनी केली. सावरकरांचा हिंदुत्ववाद असो, द्विराष्ट्र सिद्धांतावरचे त्यांचे मतप्रदर्शन असो, या साऱ्या मुद्द्यांवर जयपूरसारख्या मंचांवर होणारी चर्चा केवळ डावा किंवा केवळ उजवा असा एकच विचार मांडत नाही. उजवा विचार मांडणाऱ्यांची वाढती संख्या आणि या विचारांवर तुटून पडणाऱ्यांची घटती संख्या हा बदल नोंदवणं महत्त्वाचं.

उत्तम साहित्यिक समाजासमोर दृष्टिकोन ठेवतात. तो स्वीकारावा किंवा नाकारावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न. उदा. इपिक वूमेन या विषयावर आनंद नीलकांतन, कोरल दासगुप्ता, इरा मुखोती यांनी मांडलेल्या स्त्रिया आहेत सीता, द्रौपदी, उर्मिला, अहिल्या इत्यादी. या स्त्रियांकडं एकविसाव्या शतकाच्या जाणिवांमधून भिंगातून पाहताना त्यांना त्यांच्यातली काही चिरंतन मूल्यं सापडतात. दासगुप्ता यांना सीता स्वयंनिर्णयाचा अधिकार बजावणारी सर्वश्रेष्ठ स्त्री वाटते, मुखोती यांना द्रौपदी बंडखोर वाटते. आनंद यांना उर्मिलाच्या मिटून घेण्याचं कोडं उलगडायचं असतं. आजच्या काळातल्या स्त्रीचा शोध घेण्यासाठी तिघेही मिथकानं माखलेला शेंदूर बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. ही अशी चर्चा एकाचवेळी तात्कालिक असते आणि संस्कृतीचा शोध घेणारीही. अशा चर्चांमधूनच नवे दृष्टिकोन तयार होत असतात. साहित्यातून असे दृष्टिकोन देणाऱ्या माणसांचा मेळा म्हणून जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलचं महत्त्व दहा वर्षांत वाढत गेलं आहे.

वेद, साहित्य-सांस्कृतिक परंपरा, राजकारण आदी विषयावर भाष्य करणारे परिसंवाद. साहित्य आणि कला क्षेत्रात गेल्या वर्षभरात कोणत्या विषयावर विमर्श निश्चित करायचा आहे, याची पायाभरणीही होत असते. या फेस्टिव्हलमध्ये कोणताही विषय वर्ज्य नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. त्यावर परखडपणे भाष्य करण्याचेही कोणी वक्त्याने टाळले नाही. ठरवून आलेला विचार ठोसपणाने मांडला जात होता. अर्थात त्यातून कोणता मतप्रवाह निश्चित करायचा आणि कोणता मतप्रवाह आपल्या बरोबर ठेवायचा याचा विचार मात्र ऐकणाऱ्यावर सोडून दिलेला असतो. परिसंवादातील विषयांवरून त्या वर्षात घडलेल्या घटनांचे समाजावर कोणते परिणाम होतात, याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. समाजमनाने कोणती कास धरावी, याचे ठोस स्वरूपात आकलनही यातून होत असते.

खटकणारी बाब म्हणजे या संमेलनातला अपवादात्मक अथवा नसलेलाच मराठी चेहरा. मराठी साहित्य तमिळ, मल्याळी, कन्नड, बंगाली, उडिया, आसामी आदी भारतीय भाषांच्या बरोबरीचं किंबहुना सरसही. तथापि, अशा बहुभाषिक, जागतिक मेळ्याच्या ठिकाणी मराठीच नाही. ही मराठी लेखक, प्रकाशक आणि वाचक म्हणून आपलीही त्रृटी आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातल्या बहुतांशी रटाळ अनुभवांमुळं साहित्य संमेलन या एकूणच प्रकाराबद्दल आलेली विरक्तीही कारणीभूत असावी. जयपूरमध्ये आढळणारा तरुणाईचा उत्साह मराठीच्या वाट्यालाही यायला हवा असेल, तर संमेलनाची पद्धत बदलावी लागणार आहे. शिवाय, मराठी भाषिक साहित्य अनुवादित होऊन अन्य भाषांमध्ये विशेषतः इंग्रजीत जावं लागणार आहे. जागतिकीकरणानं जवळ आलेल्या जगात मराठी अनुभवविश्व मराठीपुरतंच बांधून घालण्याची आवश्यकता नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com