सर्फिंग भावनांच्या लाटांवर (सम्राट फडणीस)

सर्फिंग भावनांच्या लाटांवर (सम्राट फडणीस)

उंच उंच उसळणाऱ्या लाटांवर सर्फिंगचा खेळ चालतो. कधी पाहिलाय? खेळ थरारक असतो. लाटांवर स्वार व्हायचं आणि सुऽऽळकन बाहेरही यायचं. हे जमलं, तर सर्फिंगचा आनंदच. नाही जमलं, तर त्या लाटेत बुडायला होतं. नाका-तोंडात पाणी जातं. खेळ जीवघेणा ठरतो. कधी कधी जीवदेखील जातो. पण म्हणून सर्फिंग थांबलंय? त्यातला आनंद मिळालेल्यांना तो अजून हवाय आणि आनंदासाठी नव्यानं येणाऱ्यांची रांगही आहे. जे बुडता बुडता वाचलेत, त्यांना एकतर सर्फिंगवर प्रभुत्व मिळवायचंय किंवा अजिबातच नकोय. 

सर्फिंगचं हे उदाहरण समाजमाध्यमांना (सोशल मीडिया) लागू पडतं. येथे भावनांच्या लाटांवर लाटा उसळताहेत. प्रत्येक क्‍लिकवर. प्रत्येक रिफ्रेशवर. मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर ही लाट उसळतेय. उंच उंच उसळणाऱ्या या लाटांवर स्वार व्हायचा मोह टाळता येत नाहीये. स्वार होऊन सहीसलामत बाहेर येणाऱ्यांना इथं सर्फिंगचा आनंद मिळतोय आणि कोसळणाऱ्या लाटेत अडकणाऱ्यांना गुदमरायला, घुसमटायला होतंय. जे बाहेर आहेत, त्यांना लाटेच्या पडद्याआडचं काही दिसत नाहीये. लाटेवर स्वार झालेला दिसतोय. लाटेवर स्वार व्हायला उभी असलेली नवी रांग उत्साहानं सळसळतेय... 

समाजमाध्यमांमधील विलक्षण भावनिक लाटांचा परिणाम सर्फिंग करणाऱ्या आणि बाहेरून पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनावर खोल कुठंतरी होतोय. फेसबुक, व्हॉट्‌सॲप किंवा इन्स्टाग्रामवर क्‍लिक केल्याक्षणी दिसणारे कुणा-कुणाचे हसरे चेहरे, कुणाची ॲचिव्हमेंट, कुणी कुठल्या राजकीय पक्षाला-नेत्याला हासडलेल्या शिव्या, कुठं शॉपिंग, कुठं टुरिझम, काहींची गोंडस बाळं तर काहींचे मेंदीनं सजलेले गोंडस हात. यूट्यूबवर न अनुभवलेलं भावनांचं जग पसरलेलं. टेलिग्रामवर जगाच्या नकळतचा संवाद. टीक-टॉकवर अचाट प्रयोग. कॅराओकेवर लहानपणी मनात रुजलेलं गाणी गाण्याचं स्वप्न साकारणारे हज्जारो तुमच्या-आमच्यासारखी माणसं. या साऱ्या लाटा एकापाठोपाठ उसळणाऱ्या. लाटांवर स्वार व्हायचं, तर मी जसा आहे, तसाच राहून होऊ शकतो किंवा मी जशी आहे, तशीच राहून होऊ शकते. 

‘मी त्याच्यासारखा’, ‘मी तिच्यासारखी’, ‘आमचं कुटुंब त्यांच्यासारखं’ हा विचार म्हणजे सर्फिंग करतानाचा अपघात होण्याची शक्‍यता दाखवणारा पहिला संकेत. त्यानं किंवा तिनं असं असं पोस्ट केलं, म्हणून..., आपणही काही करायला जावं, हा अपघाताचा दुसरा संकेत. यानंतर संकेत नसतात. अपघातच असतात. अपघातांमध्ये परस्परसंबंधांतील विश्‍वासाचा बळी आधी जातो; मग थेट संबंधांचाच. विचार मोजणारी यंत्रं आजतरी कुठं मिळत नाहीत. त्यामुळं आपण कशाचा किती विचार करतोय, हे आपल्यापेक्षा इतर कुणाला माहिती असत नाही. समाजमाध्यमं वापरायची, तर लाटांवर स्वार होणं शिकावंच लागेल. आपलं स्वत्व, नाते-संबंध, समाजभान या तीन घटकांची जाणीव ठेवावी लागेल. मग सर्फिंगचा आनंद मिळेल, अन्यथा लाटेखाली कधी घुसमटून जाल याचा पत्ताही लागणार नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com