बोटांवर पैशाचा हिशेब... (सम्राट फडणीस)

samrat phadnis technodost article in saptarang
samrat phadnis technodost article in saptarang

महिन्याची चौदा तारीख आली. एक तारखेला झालेला पगार कुठल्या कुठं गेला काही समजत नाही. महागाई वाढलीय. खर्च वाढलाय...
- नोकरदार वर्गाची तक्रार
निम्मा महिना संपला. खिशातले पैसे मात्र जवळपास संपत आलेत. पॉकेटमनी पुरत नाही. खर्च वाढलाय. पेरेंट्‌स समजून घेत नाहीत...
- कॉलेजच्या ग्रुपची अडचण
अजून अर्धा महिना शिल्लक आहे आणि पेन्शनचे पैसे उडालेत. परत घरी मागायचे, तर बरं नाही वाटत. पैसा खर्च होतोय हे नक्की...
- पेन्शनरांची काळजी

या तिन्ही घटना कधी ना कधी कुठं ना कुठं घडत असतात. तारीख कधी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातली असेल किंवा शेवटच्या आठवड्यातली; पण खिशातला पैसा पुरत नाही, ही तक्रार कॉलेजच्या कट्ट्यापासून ते पेन्शनरांच्या गप्पांपर्यंत सतत ऐकू येत असते.

  •   असं नेमकं होतं काय की पैसा पाहतापाहता गायब होतो?
  •   पैशाला काय खरंच पाय फुटतात?
  •   आपल्या पैशाची (नोटाबंदीशिवाय) कोणी परस्पर विल्हेवाट कशी काय लावू शकतं...?

खरं तर असं काही होत नसतं. पैसा आला कसा, किती, कुठून आणि गेला कुठं आणि किती या पाच प्रश्नांची उत्तरं आपल्याला अचूक माहिती नसतात, म्हणून ही परिस्थिती येते. पैशाचा हिशेब बोटांवर ठेवायचा एक काळ होता; कदाचित तो काळ पुन्हा परत आला आहे आणि पैशाचा हिशेब बोटांवरच; मात्र मोबाईल ॲपमध्ये ठेवायचा काळ आला आहे. Expense Manager किंवा Money Manager ॲप्स अँड्रॉईड आणि आयओएसवर उपलब्ध आहेत. या ॲप्सद्वारे आपला रोजचा जमा-खर्च नीट ठेवता येतो आणि वेगवेगळ्या पद्धतीनं तपासताही येतो.

अशा स्वरूपाची सर्व ॲप्स आपल्या मोबाईलमधले एसएमएस आणि ई-मेल्स तपासतात आणि त्यावरून जमा-खर्चाचा हिशेब मांडतात. गेल्या पाच वर्षांत सर्वच बॅंका त्यांच्या खातेदारांना एसएमएस आणि ई-मेलद्वारे खात्यांमधल्या पैशाचा व्यवहार माहितीकरता पाठवतात. एसएमएसमधली आकडेवारी वापरून आपल्याकडं पैसे शिल्लक किती आहेत आणि खर्च किती झाले, हे ॲपमध्ये प्रोसेस केलं जातं. याशिवाय, रोखीनं केलेल्या व्यवहाराच्या नोंदी आपण ॲपमध्ये भराव्या लागतात.

अँड्रॉईड आणि आयओएस ॲप-स्टोअरमध्ये शेकड्यांनी मनी मॅनेजर ॲप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. मात्र, ती डाऊनलोड करण्यापूर्वी एक काळजी घ्यावी लागते आणि ती म्हणजे ॲप भारतीय रुपयांचा हिशेब ठेवण्यासाठी आहेत की नाही हे पाहणं! पाच वर्षांपूर्वी अशा ॲपचा उदय झाला, तो मुळात डॉलर आणि पौंड वापरणाऱ्या देशांमध्ये. तिथून ती ॲप भारतात आली. त्यातली फीचर्स चांगली होती; मात्र हिशेब डॉलर किंवा पौंडात होते. गेल्या दोन वर्षांत भारतीय रुपयांत हिशेब ठेवणारी ॲप्स तयार झाली आहेत. त्यामुळं ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी आकडेवारी भारतीय रूपयांमध्येच आहे, हे पाहून घेणं आवश्‍यक आहे.

हिशेबाच्या ॲपचे पाच प्रमुख फायदे

  •   भराभर कुठंही कार्ड स्वाइप करून पैसे भरत गेल्यानंतर हिशेब ठेवायची कटकट राहत नाही.
  •   ईएमआयपासून ते प्रवासापर्यंत कुठल्या कुठल्या कारणांसाठी पैसे खर्च झाले, याचा ट्रॅक राहतो.
  •   दररोज, आठवड्याला, महिन्याला नेमके किती खर्च झाले, याचे चार्टस मिळतात.
  •   किती खर्च झाले पाहिजेत, यावर नियंत्रण ठेवता येतं. नियंत्रणापेक्षा जास्त खर्च झाल्यास तसे ॲलर्ट मिळतात.
  •   वीज, डीटीएच आदी बिलं भरण्याचे ॲलर्ट सेट करून ठेवता येतात.

हिशेबासाठी टॉप ॲप्स
ॲप     स्टार रेटिंग
Walnut    ४.४
Money View    ४.३
Qykly    ४.२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com