भारतीय भाषांसाठी ‘इंडस ओएस’ (सम्राट फडणीस)

samrat phadnis technodost article in saptarang
samrat phadnis technodost article in saptarang

भारतीय भाषांमध्ये ऑपरेटिंग सिस्टिम (ओएस) नसल्यामुळं कॉम्प्युटरच्या युगात निमशहरी आणि ग्रामीण भारतीयांचं काही ना काही नुकसान नक्कीच होऊन गेलेलं आहे. मोबाईलच्या युगात तसं घडू नये आणि जुन्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मोबाईलसाठी भारतीय भाषांमधली ऑपरेटिंग सिस्टिम सक्षम करण्याचं काम सुरू आहे. त्यावर एक नजर...

ऑपरेटिंग सिस्टिम हा प्रकार तांत्रिक आणि आपल्याला त्याच्याशी काय देणं-घेणं, असा एक अविर्भाव आपल्यासारख्या सर्वसामान्य युजर्सच्या मनात असतोच असतो. ‘अँड्रॉइड’ असो किंवा ‘विंडोज’ किंवा ‘ॲपल’ आपल्याला डिव्हाईस वापरता आलं की झालं,’ अशी त्रयस्थ भावना त्यामागं असते. प्रत्यक्षात कोणत्याही डिव्हाईसचा युजरला येणारा अनुभव हा ऑपरेटिंग सिस्टिमवर सर्वाधिक अवलंबून असतो. कॉम्प्युटरवर जितकं महत्त्व ऑपरेटिंग सिस्टिमला असतं, तितकंच किंबहुना त्याहून जास्त महत्त्व मोबाईलसारख्या डिव्हाईसेसमध्ये आहे. त्याचं एकमेव कारण, मोबाईल डिव्हाईस आजघडीला जवळपास प्रत्येक मिनिटाला हाती असतं आणि त्याच्या दर्जावर आपले दैनंदिन व्यवहार अधिकाधिक अवलंबून राहायला लागले आहेत. अगदी सोप्या भाषेत सांगायचं, तर ऑपरेटिंग सिस्टिम किंवा ओएस म्हणजे आपल्या डिव्हाईसेसच्या रक्तवाहिन्या आणि हृदय दोन्ही आहे.

कॉम्प्युटरवर मायक्रोसॉफ्टची विंडोज आणि ॲपलच्या आयओएसचं राज्य आहे, हे कदाचित रोज कॉम्प्युटर उघडताना आणि बंद करताना जाणवतं. मोबाईलवर गूगलच्या अँड्रॉईडचं राज्य आहे. ॲपलच्या फोनची उत्सुकतेनं चर्चा होते आणि माध्यमांमधून भरभरून त्याबद्दल बोललं जातं. म्हणजे ॲपलची ओएस मोबाईलवर दुसऱ्या क्रमांकावर असेल, असं आपण गृहीत धरू शकतो. वस्तुस्थिती काय आहे?
भारतामध्ये मोबाईलवर अँड्रॉईडनंतर सर्वात लोकप्रिय आहे ती ‘इंडस ओएस.’ ॲपल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या अवाढव्य कंपन्यांना मागं टाकणारी ‘इंडस ओएस’ तब्बल २३ भारतीय भाषांच्या गरजा पूर्ण करते आणि मोबाईलला शब्दशः ‘देसी’ बनवते. वापरायला सोपी; शब्द सहजगत्या समजणारे  आणि भारतीयांच्या गरजांना नजरेसमोर ठेवून बनवलेली ‘इंडस ओएस’ गेल्या तीन वर्षांत तब्बल एक कोटींहून अधिक लोकांच्या मोबाईल डिव्हाईसेसवर स्थिरावली आहे.

ज्या कंपनीचा मोबाईल आहे, त्या कंपनीच्या गरजेनुसार ओएस वापरण्याचा निर्णय घेतला जातो. मायक्रोमॅक्‍स, इंटेक्‍स, कार्बन, आयटेल, सेलकॉन आणि स्वाइप या तुलनेनं अधिक स्वस्त स्मार्टफोन बाजारात आणणाऱ्या कंपन्यांनी ‘इंडस ओएस’ला पसंती दिली आहे. मोबाईलवर भारतीय भाषांमध्ये टाईप करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन इंडस ओएसनं काना-मात्रांवर विशेष काम केलं आहे. देवनागरी लिपीमध्ये वेलांटी आणि उकारांना व्याकरणदृष्ट्या महत्त्व आहे. ते लक्षात घेऊन भाषेच्या टायपिंगची सुविधा ‘इंडस ओएस’नं दिली आहे. परिणामी, मराठीमध्ये व्याकरणदृष्ट्या अचूक आणि तरीही जलद काम मोबाईलवरून करणं शक्‍य होत आहे.
भारतीय मोबाईल क्षेत्रात येत्या काळात राज्य करू पाहणाऱ्या इंडस ओएसचा प्रमुख आहे मराठमोळा राकेश देशमुख. राकेश आयआयटी, मुंबईचा पदवीधर. इंडस ओएस कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून राकेश सध्या काम पाहतोय. त्याच्या म्हणण्यानुसार, भारतामध्ये नव्वद टक्के लोकांची इंग्लिश ही पहिली, दुसरी किंवा तिसरीही भाषा नाही आणि तरीही तंत्रज्ञानाचा सगळा वापर इंग्लिशमधून भारतीयांना करावा लागतो. ‘आपल्या देशात स्मार्टफोन अजूनही तीस टक्के लोकांच्याच हाती आहे. ती संख्या रोज वाढते आहे. त्यामुळं, भारतीय भाषांमध्ये मोबाईल वापरता येण्याची गरज कधी नव्हे एवढी आज आहे. येत्या पाच वर्षांत तीस कोटी लोकांच्या हाती स्मार्टफोन येईल आणि त्या सर्व लोकांना भारतीय भाषांमध्ये मोबाईलची रचना हवी असणार आहे. इंडस ओएस त्यांच्यासाठी आज काम करते आहे. फोन कॉल आणि मेसेजच्या पलीकडं जाऊन स्मार्टफोनच्या सुविधांचा लाभ घ्यायचा असेल, तर ऑपरेटिंग सिस्टिम भारतीय भाषांमध्येच असावी लागणार आहे,’ असं राकेश सांगतो.

इंडस ऑपरेटिंग सिस्टिम

  •  फक्त मोबाईलवर उपलब्ध
  •  सध्या मायक्रोमॅक्‍स, इंटेक्‍स, कार्बन, आयटेल, सेलकॉन आणि स्वाइप या कंपन्यांच्या मोबाईलवर
  •  इंडस ओएस वापरणारे ७७ टक्के वापरकर्ते मध्यम आणि छोट्या शहरांमधले
  •  मराठी, हिंदी, कोकणी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, ओरिया, पंजाबी, तेलुगू, तमीळ, उर्दू, नेपाळी, बोडो, डोग्री, संस्कृत, मैथिली, सिंधी, काश्‍मिरी, मणिपुरी, काश्‍मिरी अरेबिक, संथाळी आणि इंग्लिश भाषांमध्ये ओएस उपलब्ध
  •  गूगलच्या प्ले स्टोअरला पर्यायी असे स्वतःचे ॲप बझार (App Bazaar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com