देव ज्याचा मित्र... (सम्राट फडणीस)

samrat phadnis
samrat phadnis

‘गॉड फ्रेन्डेड मी’ ...देवाच्या फेसबुक अकाउंटचा शोध घेणारी मालिका. माणुसकी, श्रद्धा आणि आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान यांचा मेळ या मालिकेत आहे. विषय आपल्या जिव्हाळ्याचा आहे. ‘ओह्‌ माय गॉड’ हा बॉलिवूडमधला आविष्कार पाहिला असेल तर ‘गॉड फ्रेन्डेड मी’ त्याच धर्तीनं जाणारी मालिका आहे, असं सुरवातीला वाटण्याची शक्‍यता जरूर आहे. मात्र, एकापाठोपाठ एका भागात ती शक्‍यता धूसर होत जाते. ‘गॉड’चा शोध पुढं पुढं सरकत राहतो आणि या शोधावरच्या वाटेत माणसांच्या स्वभावाचे कंगोरे, नातेसंबंध, नात्यांमधले तणाव, तणावांची खोलवर रुजलेली कारणं, बोथट होत चाललेल्या सामाजिक जाणिवा असे नवे पदर उलगडत जातात.

मा  ईल्स (ब्रॅंडन मायकेल हॉल) हसऱ्या चेहऱ्याचा गोड आफ्रो-अमेरिकी. ठाम नास्तिक. जगानं देवाचं अस्तित्व अमान्य केलं पाहिजे, ही त्याची विचारसरणी. त्यासाठी तो ‘मिलेनियल प्रॉफेट’ नावानं पॉडकास्ट करतो. प्रसिद्ध आहे त्याचं पॉडकास्ट. अफाट अशा न्यूयॉर्क महानगरात देव नाकारत त्यानं स्वतःचं इवलंसं का असेना, एक अस्तित्व तयार केलं आहे. आस्तिकतेवर, श्रद्धांवर तुटून पडणाऱ्या माईल्सचे वडील आर्थर (जो मॉर्टन) ख्रिश्‍चन धर्मगुरू. एका चर्चचं धार्मिक नेतृत्व ते करतात. बहीण अली (जॅव्हिशिया लेस्ली) आणि जिवलग मित्र राकेश (सूरज शर्मा) इतकंच माईल्सचं विश्व. बाकी विश्व पॉडकास्टला मिळणाऱ्या प्रतिसादातून उभं राहणारं. टेक्‍नॉलॉजी कंपनीत भुरटं काम करायचं, भटकायचं आणि घरी आलं की पॉडकास्टवरून ‘देव’ धुऊन काढायचा, असं माईल्सचं आखीव-रेखीव आयुष्य. त्याचं ध्येय एकच. पॉडकास्टमधून उभ्या राहिलेल्या एका प्रसिद्ध रेडिओ चॅनेलवर शो मिळवायचा. त्या दिशेनं माईल्स धडाधड चाललेला.

सगळं कसं छान चाललेलं असताना ‘तो’ येतो. इथून-तिथून नव्हे; थेट फेसबुकवरून! माईल्सच्या मोबाईलमधलं नोटिफिकेशन खणखणतं. ‘गॉड सेन्ट यू अ फ्रेन्ड रिक्वेस्ट’...कुणाचा तरी खोडसाळपणाच हा. माईल्स रिक्वेस्ट ‘इग्नोर’ करतो. परत तेच. परत रिक्वेस्ट. परत परत तेच तेच. माईल्स जाम वैतागलाय. ‘गॉड’ नावाचं फेसबुक प्रोफाईल माईल्सच्या मागं लागलंय. या प्रोफाईलनं त्याला फक्त फ्रेन्ड रिक्वेस्टच पाठवली नाही; तर एक फ्रेन्ड सजेशनसुद्धा पाठवलं. सगळाच चावटपणा. माईल्स त्रासिक व्हायला लागला. तो चालतोय, तेवढ्यात त्याला ढकलून एक माणूस धाडकन रस्त्यावर येतोय. त्यानं मागं वळून पाहिलं तेव्हा माईल्सला चेहरा दिसला. ज्याच्या नावाचं सजेशन होतं, तोच हा माणूस. यानंच खोडसाळपणा केला असणार... माईल्स त्याचा पाठलाग करतोय. माणूस रेल्वे स्टेशनवर येतोय. त्याचं काहीतरी बिनसलेलं स्पष्ट दिसतंय. माईल्स सजग होतोय. ट्रेन सपसप अंतर कापत जवळ येतेय आणि हा माणूस ट्रॅकवर उडी घेण्यासाठी सरसावतोय. तो जीव देणार तेवढ्यात माईल्सनं त्याला घट्ट पकडलं... त्याचा जीव वाचवला...

‘तू देवासारखा आलास...मी आत्महत्या करणार होतो...मला वाचवलंस...’ त्या माणसाचे शब्द. नास्तिक माईल्सचं डोकं भिरभिरलं. देवबीव काही नाही...योगायोग होता हा. स्वतःला समजावत माईल्स पुढच्या दिवसाकडं वळला. नव्या दिवशी नवं फ्रेन्ड सजेशन. ‘गॉड’कडून. कॅरा ब्लूम (व्हायोलेट बीन) हिच्या नावाचं. कॅरा ब्लूमही ‘योगायोगा’नं भेटली आणि तिचा जीव वाचवायला माईल्सच्या मदतीला ‘योगायोगा’नं आधीचा माणूस आला. एक साखळी नकळत तयार होतेय. कॅरा पत्रकार. माईल्सनं तिला हे ‘गॉड’ अकाउंट दाखवलं. सजेशनही दाखवल्या. हे सगळं कुणीतरी घडवून आणतंय, यावर माईल्स, टेक्‍नोक्रॅट राकेश ठाम. आता त्या टोळीत कॅराही सामील! पुढचं सजेशन आलं की कोडं उलगडणार. हा उद्योग कोण करतंय हे समजणार. कॅरा या विषयावर लेख लिहिते. लेख जबरदस्त चालतो. मानसिक घालमेल होऊन आयुष्यात साचलेपण आलेल्या कॅराची सुटकाही माईल्सच्या सहवासानं झालीय. माईल्स, राकेश आणि कॅरा पुढच्या सजेशनची वाट पाहताहेत...

‘गॉड फ्रेन्डेड मी’ या ॲमेझॉन प्राईमवर दाखल झालेल्या नव्या मालिकेचा पहिला सीझन भारतात गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. अमेरिकी टीव्ही चॅनेल्सवर सुरू झालेल्या मालिका थोडं मागं-पुढं होऊन भारतातही ओव्हर द टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होत आहेत. ‘गॉड फ्रेन्डेड मी’ ही त्यातलीच एक मालिका. देवाच्या अस्तित्वाचा शोध घेणारी. माणुसकी, श्रद्धा आणि आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान यांचा मेळ या मालिकेत आहे. विषय आपल्या जिव्हाळ्याचा आहे. ‘ओह्‌ माय गॉड’ हा बॉलीवूडमधला आविष्कार पाहिला असेल, तर ‘गॉड फ्रेन्डेड मी’ ही त्याच धर्तीनं जाणारी मालिका असं सुरवातीला वाटण्याची शक्‍यता जरूर आहे. मात्र, एकापाठोपाठ एक भाग पाहताना ती शक्‍यता धूसर होत जाते. ‘गॉड’चा शोध पुढं पुढं सरकत राहतो आणि या शोधावरच्या वाटेत माणसांच्या स्वभावांचे कंगोरे, नातेसंबंध, नात्यांमधले तणाव, तणावांची खोलवर रुजलेली कारणं, बोथट होत चाललेल्या सामाजिक जाणिवा असे एकामागोमाग एक नवे पदर उलगडत जातात.

माईल्सचं नास्तिक असणं त्याच्या बापाला खटकतंय आणि बापानं आई गेल्यानंतर चर्चमध्ये स्वतःला बुडवून घेतलं म्हणून पोरगा त्याला माफ करत नाहीय. या साऱ्यामध्ये बहिणीची तारांबळ उडतेय. मात्र, तीही तिचं आयुष्य स्वतःला हवं तसं जगतेय. एक कुटुंब. तीन वेगवेगळ्या घरांमध्ये राहणारं. त्यांची स्वतंत्र विश्वं. ही विश्वं ‘गॉड’ अकाउंटमुळं एकमेकांना छेद देताहेत. त्यातून कधी गंमत, कधी अस्वस्थता आणि कधी भीषणता समोर येतेय. वीस वर्षांपूर्वी अशा मालिकांना आपल्याकडं प्रेक्षक मिळणं मुश्‍किल ठरलं असतं. कारण, भारतीय उपखंड आणि अमेरिका यांच्या
जीवनशैलीत, आयुष्याकडं पाहण्याच्या दृष्टिकोनात आणि एकूण अनुभवाच्या परिघांत कमालीची विषमता होती. इंटरनेट तंत्रज्ञानानं अनुभवांची देवाण-घेवाण वाढवलीय आणि कदाचित त्यामुळंही तीन घरांत राहणाऱ्या एकाच कुटुंबातल्या तीन माणसांचं विश्व फार काही बोचत नाही. कुटुंबातल्या सदस्यांमध्ये विचारांची इतकी टोकं भारतीय अनुभवालाही आताशा टोचत नाहीत. अलीचं लेस्बियन असणं, कॅरानं तिच्या जुन्या बॉयफ्रेन्डकडं परत जाणं, राकेशची भावी बायको भारतीय वंशाची अमेरिकी असणं ही या कथेच्या ओघात स्वाभाविक आलेली अमेरिकी कुटुंबव्यवस्थेची रीतभात सहज वाटत राहते. नोकरी-व्यवसायातले ताणही या मालिकेत येऊन जातात. या ताणांचा नात्यांवर होणारा दुष्परिणाम आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न सोडवण्यासाठी मालिकेत ‘गॉड’ अकाउंट मध्यवर्ती भूमिका तर बजावतं; मात्र प्रत्यक्षात कुठंही येत नाही. या अकाउंटचा जनक कोण याचा शोध घेत घेत ‘फाल्कन’पर्यंत माईल्स-कॅरा-राकेश पोचताहेत असं वाटेपर्यंत मालिकेचा पहिला सीझन संपतो.

‘गॉड फ्रेन्डेड मी’चा विषय पूर्णतः देव हा असला तरी मालिका क्षणभरही देवाच्या चमत्कारावर अवलंबून नाहीय. कथानकाचं हे वैशिष्ट्य. ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर मालिका पाहताना एखादा शॉट रजिस्टर होण्यासाठी शहरांचे बर्डस आय व्ह्यू दाखवण्याचा ट्रेंड आहे. ‘गॉड फ्रेन्डेड मी’मध्ये या कॅमेरा अँगलचा उत्तम वापर आहे. नवा भाग सुरू होताना अथवा टोळी नव्या सजेशनच्या शोधात बाहेर पडताना बर्डस आय व्ह्यूनं छान परिणाम साधलाय. या मालिकेतं आवर्जून पाहण्यासारखं आणि ऐकण्यासारखं जे आहे ते म्हणजे माईल्सच्या वडिलांचे संवाद. जो मार्टन यांनी माईल्सच्या वडिलांची भूमिका केलीय. उत्तम अभिनेता शारीरबोलीचा संपूर्ण वापर करतो. पित्याची मुलासाठीची तळमळ, स्वतःच्या तत्त्वांचा बळी जाताना पाहताना होणारे हाल, मुलाच्या भविष्याची चिंता आणि त्याचा मित्र बनण्यासाठीची धडपड अशा विविध छटा जो यांनी अफलातून उभ्या केल्या आहेत.

फेसबुकवरची अकाउंट्‌स, त्यावरच्या पोस्ट्‌स आणि त्यावरून बांधता येणारे मानवी स्वभावाचे आडाखे याबद्दल जगभरात संशोधन सुरूय. माणसाचं वागणं प्रेडिक्‍टिव्ह असू शकतं का, असा शोध घेतला जात आहे. गॉड अकाउंट हे माणसाच्या जगण्याचे आडाखे बांधून काही सजेशन पाठवत असणार याबद्दल राकेश ठाम आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून असं काही तंत्रज्ञान उभं राहू शकतं, हे पटण्यासारखंही आहे. राकेश शोधाच्या शेवटापर्यंत येतोय आणि अडखळतोय. देव नाही, हे रक्तात भिनवून घेतलेल्या माईल्सला गॉड अकाउंट कोण चालवतंय, हे शोधणं हा जगण्या-मरण्याचा प्रश्न बनलाय. मात्र, आता तोही योगायोगाच्या पुढं जाऊन श्रद्धेपर्यंत, माणुसकीपर्यंत आलाय. या सगळ्यांचा प्रवास हा ‘गॉड फ्रेन्डेड मी’च्या पहिल्या सीझनला एकमेकांशी जोडणारा धागा आहे. मालिकेत गंमत भरतात ती योगायोगानं म्हणा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं म्हणा किंवा देवानं म्हणा, एकत्र आणलेली माणसं. ही माणसं परस्परांसाठी उभी राहतात. एक साखळी बनत जाते. ही साखळी मालिकेत आपल्याला गुंतवून ठेवत राहते. मालिकेचा प्रभाव म्हणून नास्तिकतेची आस्तिकता होत नाही. मात्र, रोजच्या जगण्यात माणुसकीच्या नात्यांचा ओलावा हवा, हा संदेश लखलखीतपणे मिळतो हे निश्‍चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com