हिंदुत्व सोशल मीडियावरचं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hindutva
हिंदुत्व सोशल मीडियावरचं

हिंदुत्व सोशल मीडियावरचं

दिल्लीच्या जहांगीरपुरी उपनगराशी एरवी अख्ख्या भारताचा ना रोजचा व्यवहार आहे; ना तिथं काही जागतिक-राष्ट्रीय संस्था आहे. याच जहांगीरपुरीनं गेले आठवडाभर सोशल मीडिया व्यापून टाकला. आधी रामनवमीच्या मिरवणुकीवर झालेली दगडफेक, नंतर दिल्ली महानगरपालिकेने याच भागातील घरांना अतिक्रमणं घोषित करून चालवलेला बुलडोझर आणि हा बुलडोझर चालवला जात असताना कम्युनिस्ट पक्षाच्या वृंदा करात वगळता अन्य राजकीय पक्षप्रमुखांनी या भागात टाळलेल्या भेटी हा वादाचा मुद्दा होता. लक्षणीय बाब अशी, की ‘ वृंदा करात आल्या; अरविंद केजरीवाल का आले नाहीत, राहुल गांधी का आले नाहीत,’ हा प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये ल्युटेन्स मीडिया, म्हणजे दिल्लीतील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये घोटाळणारा मीडिया आघाडीवर होता.

राजकारण्यांचे काम मीडियाने हातात घेतल्यासारखी ही अवस्था होती. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर होत होता. जहांगीरपुरीमध्ये बुलडोझर म्हणजे जणू विकासाचे प्रतीक आहे, अशी भूमिका घेणारा एक आणि हा बुलडोझर देश उद्ध्वस्त करतो आहे, अशी दुसऱ्या वर्गाची भूमिका होती.

या दोन्ही भूमिका हिरिरीनं सोशल मीडियावर मांडल्या गेल्या. त्या भूमिकांना त्या त्या गटातून अलोट प्रतिसाद लाभला. धार्मिक ध्रुवीकरण (पोलरायझेशन), असहिष्णुता (इनटॉलरन्स) या मुद्द्यांवर गेले दशकभर देश आणि विदेशात होत असलेल्या चर्चांमध्ये सोशल मीडियाच्या अनियंत्रित भूमिकेवर विलक्षण टीका होत आहे. भारतात हे मुद्दे रोजच्या जगण्याचा अविभाज्य घटक बनवून ठेवण्यातही सोशल मीडियाच कारणीभूत ठरला आहे.

गणपती दूध पित असल्याची अफवा सप्टेंबर १९९५ मध्ये कोणत्याही सोशल मीडियाशिवाय देशभर पसरली होती. जुलै २००६ मध्ये हरियानातील कुरुक्षेत्र जिल्ह्यातील हल्देरी गावातल्या बोअरवेलमध्ये अडकलेल्या प्रिन्सचा जगण्यासाठीचा संघर्ष क्षणोक्षणी दाखवून ‘ट्वेटी फोर बाय सेव्हन ब्रेकिंग न्यूज’ला देशातल्या ‘टीव्ही मीडिया’ने जन्म दिला होता. या दोन्ही घटना किरकोळ ठराव्यात इतक्या अफाट वेगाने २०२२ चा सोशल मीडिया काम करतो आहे.

जहांगीरपुरीला केंद्रस्थानी आणून तासभर होत नाही, तोपर्यंत दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानात हिंदू मुलीवर बलात्कार करून खून केल्याची घटना एप्रिल २०२२ मध्ये व्हायरल केली जाते. ती घटना कोट्यवधी वापरकर्त्यांच्या मोबाईलवर धडकून तास होत नाही, तोपर्यंत कुठल्याशा गावात प्रार्थनास्थळासमोर तलवारी नाचविण्याचा व्हिडिओ पसरायला सुरुवात होते. ''ट्वेटी फोर बाय सेव्हन ब्रेकिंग''ला शब्दशः वास्तवात उतरवण्याचा हा प्रकार आहे; फक्त ‘न्यूज’ आणि ‘फेक न्यूज’ यांच्यातील सीमारेषा जाणीवपूर्वक धूसर करून ठेवण्यात आली. ही धूसर करण्यात असलेला राजकीय स्वार्थ आता लपून राहिलेला नाही. मात्र, सीमारेषा संपविण्याच्या धोक्यांची जबाबदारी घ्यायची कोणाचीही तयारी नाही. सोशल मीडियावरून अजेंडा रेटताना निर्माण होणारी टोकाची द्वेषभावना कट्टरपंथी नागरिक घडवणारी आहे. हा कट्टरपंथ हिंदुत्ववादी आहे; तसाच टोकाचा अन्य धर्मीयही गट आहे.

‘द काश्मीर फाइल्स’, रामनवमी, हनुमान चालिसा या निमित्तानं हिंदुत्वाचा ज्वर सोशल मीडियावर पसरवला गेला. हा ज्वर पसरवताना हिंदुत्व आणि पौरुषत्व या दोन घटकांना समानार्थी वापरण्यात आले. एरवी घरातील देव्हाऱ्यांमध्ये शेकडो वर्षे सोज्वळपणाने नांदणारे देव-देवता सोशल मीडियावर अत्यंत आक्रमकपणे मांडण्यात आले.

फटाक्यांपासून ते व्यंगचित्रांपर्यंत कुठेही प्रसिद्ध होणाऱ्या देव-देवतांच्या चित्रांविषयी कमालीच्या संवेदनशील असणाऱ्या गटांना या आक्रमक, जहाल चित्रांचे वावडे दिसले नाही. उलटपक्षी, देव-देवतांचे जहाल, आक्रमक रुप हेच हिंदुत्व, पौरुषत्व अशी पुरुषप्रधान मांडणी सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे. या मांडणीचा प्रभाव तात्कालिक असतो, असे मानण्याचे आता कारण नाही. आधी भारतीय जनता पक्षापुरता मर्यादित असलेला ‘हनुमान चालिसा’चा मुद्दा पाहता पाहता अन्य पक्षांनी स्वीकारला. त्यांनीही उत्साहाने हनुमान चालिसात आपणही कमी नाही, हे दाखवण्याची चढाओढ सोशल मीडियावर लावली. पाहता पाहता हनुमान चालिसा हा लोकप्रियतेचा मंत्र बनून गेला. वैयक्तिकरीत्या करण्यात कुणाची काही हरकत नसलेल्या मुद्द्याला सोशल मीडियातून सार्वजनिक बनवून अल्पकाळात तो कळीचा भावनिक मुद्दा बनवता येतो, याचं हे ढळढळीत उदाहरण.

सोशल मीडिया तंत्रज्ञानावर चालतो आणि रोज विकसित होत जाणारे हे तंत्रज्ञान आहे. सोशल मीडिया स्थिरावूनही दशक उलटून गेले आहे. कुशाग्र बुद्धीच्या लोकांनी लोकांच्या आवडीनिवडी ओळखून त्यांना विशिष्ट विचारसरणीकडे वळविण्यासाठी वारंवार विशिष्ट आशय दाखविण्यासाठी सोशल मीडियाचा सजगपणे वापर केल्याची उदाहरणे आहेत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप- हिलरी क्लिंटन यांच्यातील निवडणुकीतून सोशल मीडियाचा राजकीय गैरवापर चव्हाट्यावर आला; तरी तो थांबलेला नाही आणि थांबण्याची शक्यता दृष्टिपथात नाही. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्यूब आणि त्यांच्या जोडीला नव्याने निर्माण झालेले भारतीय अवतार नफेखोरीसाठी हा वापर थांबवणार नाहीत, हे आता उघड सत्य आहे. ज्या आशयाभोवती अधिक वापरकर्ते आहेत, त्या आशयाचा सतत गुणाकार करत नेण्याची सोशल मीडियाची अंगभूत रचना आहे. जहाल, आक्रमक धार्मिकता आणि पराकोटीचा धार्मिक द्वेष, या दोन्हींना गुणाकाराच्याच पद्धतीने सोशल मीडियाची रचना पाहते.

भोवळ आणणारी ही परिस्थिती समंजसपणाला आव्हान आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया न वापरणे हे उत्तर ठरू शकत नाही. हा मीडिया समंजसपणे वापरणे आणि आपल्या प्रत्येक कृतीचा गुणाकार होत आहे, याची जाणीव ठेवणे हा उत्तम उपाय आहे. राहुल गांधी जहांगीरपुरीत आले की नाही, यावर झगडायला हरकत असण्याचे कारण नाही; तथापि पेट्रोलचे भाव लिटरला १२० रुपयांवर गेले आहेत, याबद्दल अधिक आक्रमकता लागणार आहे. ‘मला भिडणाऱ्या विषयावर मी बोलणार आहे’ की ‘मला दाखवलेल्या विषयावर मी बोलणार आहे’ याबद्दल दक्ष राहण्याचा हा काळ आहे. या काळात समंजसपणाने तग धरला, तर सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता या शब्दांना आणले गेलेले हेटाळणीचे स्वरूपही घालवून देता येणार आहे.

@PSamratSakal

Web Title: Samrat Phadnis Writes Hindutva Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top