तंत्रज्ञानातली ‘भाषा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

language of technology

इंटरनेटची ओळख होण्याचा काळ होता १९९५ ते २०००; म्हणजे, मागच्या शतकातला! नव्या ओळखीबरोबर नवे शब्द आले.

तंत्रज्ञानातली ‘भाषा’

इंटरनेटची ओळख होण्याचा काळ होता १९९५ ते २०००; म्हणजे, मागच्या शतकातला! नव्या ओळखीबरोबर नवे शब्द आले. उदाहरणार्थ : चॅट, सर्च. ‘चॅट करतो आहोत’, ‘सर्च केलं’ असे शब्द रुळायची ती सुरुवात होती. चॅट करताना ‘एएसएल’ ही समोरच्याबद्दल ‘माहिती’ करून घेण्याची सुरुवात.

ए म्हणजे एज (वय), एस म्हणजे सेक्स (स्त्री आहे की पुरुष) आणि एल म्हणजे लोकेशन (समोरची व्यक्ती कुठून चॅट करते आहे याबद्दलची माहिती). एवढ्या तीन बाबींनंतर ‘चॅट’ सुरू व्हायचं. हळूहळू एलओएल (लाफ आऊट लाऊड - खळखळून हसणं), ओएमजी (ओह माय गॉड) रुळले. एचआरयू (हाऊ आर यू), डब्ल्यूआरयू (व्हेअर आर यू) देखील सरावाचं झालं. यूआर (युअर), पीपीएल (पीपल) अशी लघुरूपं सहज झाली. पाहता पाहता इंग्लिशमधली शक्य तितकी लघुरूपं अस्तित्वात आली. इंटरनेटचा विस्तार आणि त्याआधारे विकसित झालेली समाजमाध्यमं यांनी गेली दोन दशकं व्यापली आहेत.

इंटरनेट तंत्रज्ञानाचा विकासच मुळी इंग्लिश भाषेत झालेला असल्यानं ती भाषा इंटरनेटवर सर्वाधिक वापरली जाते आहे. वापराच्या पद्धतीत वापरकर्त्याच्या सोईनुसार, गरजेनुसार बदल होत आहेत. त्याचा परिणाम भाषेवर झालेलाच नाही असं नाही. तथापि, इंटरनेट-समाजमाध्यमांमुळे किंवा एकूणच तंत्रज्ञानामुळे भाषा खालावते आहे अशी काही परिस्थिती नाही. उलटपक्षी लघुरूपं, लहान मुलं-तरुणांनी त्यांच्या सोईनं केलेले बदल यांमुळे भाषेचा विस्तार वाढला असल्याचं इंग्लिशमध्ये दिसतं.

वर्चस्व इंग्लिश भाषेचंच

‘बोली अथवा लेखी भाषेची व्यक्त होण्याची क्षमता पाहता (इंग्लिश) भाषेची घसरण वगैरे होईल असं काही नाही. संवादात खंड पडेल, अशी भीती आपण बाळगण्याचं काही कारण नाही. आपली भाषा आजअखेर राहिली, तशीच लवचीक आणि अत्याधुनिक राहील. इंग्लिशच्या अधोगतीचे इशारे देणाऱ्यांनी भाषेच्या इतिहासाचा अभ्यास केलेला नाही आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या तक्रारींचं स्वरूपदेखील नीटपणे माहीत नाही. केवळ त्यांना हव्या तशाच पद्धतीनं गोष्टी झाल्या पाहिजेत, यासाठी केलेली ही विधानं (तक्रारी) आहेत,’ असं ‘डोन्ट बिलिव्ह अ वर्ड : द सरप्रायजिंग ट्रूथ अबाऊट लँग्वेज’ या पुस्तकाचे लेखक डेव्हिड शॅरिॲट्मदारी हे लिहितात. डेव्हिड आणि त्यांच्यासारख्या कित्येकांनी गेल्या दोन-तीन दशकांतल्या तंत्रज्ञानाचा भाषेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला आहे.

तंत्रज्ञान समाजात बदल घडवत जातं, तसंच ते भाषेवरही परिणाम करतं. कुठलाही बदल नकारात्मक पद्धतीनं पाहणारा एक वर्ग प्रत्येक काळात प्रत्येक समाजात असतो. तसाच तो आजही आहे. या वर्गाला तंत्रज्ञानाचा, विशेषतः इंटरनेट-समाजमाध्यमांचा, भाषेवर फार विपरीत परिणाम झाला आहे असं सतत वाटत असतं. परिणाम झालेला असतो; तो विपरीतच असतो, असं मानण्याची गरज नसल्याचं इंग्लिश भाषेच्या अनुषंगानं झालेलं गेल्या दशकभरातलं संशोधन सांगतं. इंटरनेट-समाजमाध्यमांचा विस्तार आणि मोबाईल-फोनचा अहोरात्र वापर यांचा भाषेवर होणारा परिणाम हा दशकभरातला इंग्लिशमध्ये संशोधनाचा प्रमुख विषय ठरला आहे. ‘युनेस्को’च्या १९९८ च्या अहवालानुसार, जगातल्या फक्त आठ टक्के लोकांची भाषा इंग्लिश असताना इंटरनेटवरचा ८० टक्के आशय इंग्लिशमध्ये होता.

ज्या ज्या देशांनी त्यांच्या स्थानिक भाषांसाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला, त्यांनी त्यांनी इंग्लिशचं इंटरनेटवरचं वर्चस्व कमी केलं आहे. तरीही इंटरनेटवर ५६.१ टक्के आशय इंग्लिशमधलाच आहे. त्याखालोखाल ५.१ टक्के रशियन आणि मग त्याहून कमी टक्क्यांमध्ये जगातल्या इतर भाषा येतात. हिंदीतला आशय ०.१ टक्के आहे. त्यामुळे, मराठीची टक्केवारी शोधायलाच नको.

अलवचिकता, ग्रह-दुराग्रह...

मोबाईल-फोनवरून समाजमाध्यमं अथवा चॅटिंग ॲप्लिकेशन वापरताना वापरकर्ते प्रमाणभाषेचं आणि बोलीभाषेचं मिश्रण करतात. तंत्रज्ञानावर आधारित या माध्यमांच्या सोईची अशी नवी बोलीभाषा वापरकर्ते जन्माला घालतात. हा नवा भाषिक प्रयोग असतो. अशा प्रयोगांकडे संशोधनाच्या दृष्टीनं पाहता येतं किंवा भाषेचा मृत्यू होतोय म्हणून रडारडही करता येते. गेल्या दोन दशकांत उदयाला आलेल्या इंटरनेट-समाजमाध्यमप्रधान भाषेकडे इंग्लिशमध्ये अधिक संशोधनात्मक वृत्तीनं पाहिलं गेलं आहे.

परिणामी, तंत्रज्ञानातले बदल अधिक उपयुक्ततेकडे झुकत गेले. ते बदल अधिक प्रमाणात रोजच्या वापरात आले. इंग्लिशला तंत्रज्ञानाचा लाभ जितक्या प्रमाणात झाला तितका तो भारतात दिसत नाही. तंत्रज्ञान इंग्लिशवर आधारित असल्याचं कारण आहेच; शिवाय, लवचीकतेचा अभाव, अफाट भाषावैविध्य, बोली-प्रमाणभाषेबद्दलचे ग्रह-दुराग्रह अशीदेखील कारणं आहेत. भारतात २२ प्रमुख भाषा आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात ८७ भाषांमध्ये वर्तमानपत्रं प्रसिद्ध होतात. २४ भाषांमध्ये रेडिओ आहेत, १४६ बोलीभाषांमध्ये रेडिओवर कार्यक्रम होतात आणि १५ भाषांमध्ये चित्रपट निर्माण होतात.

गेल्या शतकभरातलं संशोधन सांगतं की, भारतात १७९ भाषा आणि ५४४ बोलीभाषा अस्तित्वात आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून भाषांवर आणि बोलीभाषांवर अन्य कोणत्याही देशांपेक्षा भारतात अधिक काम करण्याची संधी आणि आव्हान होतं. इंटरनेट-समाजमाध्यमांची आजची अवस्था पाहता, आपण दोन दशकांमध्ये त्यादृष्टीनं केलेले प्रयत्न पुरेसे ठरलेले नाहीत.

आशय हवा स्थानिक भाषेतला

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग हे आजचं झपाट्यानं विकसित होणारं तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा पाया स्वाभाविकपणे इंग्लिश आहे. या तंत्रज्ञानावर आधारित जगात आपण प्रवेश केलेला आहे. अशा काळात आपल्या भाषेचं इथलं अस्तित्व तपासून पाहावंच लागणार आहे. जीपीटी (जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड् ट्रान्स्फॉर्मर) तंत्रज्ञान वापरून अत्याधुनिक चॅटबॉट हवी ती माहिती क्षणात उपलब्ध करून देऊ पाहत आहेत. ती माहिती इंग्लिशमध्येच उपलब्ध होणार असेल तर भाषेची उपयुक्तता घटत जाणार आहे.

उपयुक्तता घटली तर वापर घटणार आहे. या दुष्टचक्रात अडकायचं नसेल तर तंत्रज्ञान वापरून भाषा व्यापक करावी लागणार आहे. केवळ मराठीसमोरचंच अथवा भारतीय भाषांसमोरचंच हे आव्हान आहे असं नाही, तर गेल्या दोन दशकांतल्या तंत्रज्ञानविकासात भाषेकडे दुर्लक्ष केलेल्या प्रत्येक देशासमोर हे उद्याचं आव्हान आहे. या आव्हानाचं संधीत रूपांतर करायचं असेल, तर इंटरनेट-समाजमाध्यमांसह शक्य त्या तंत्रज्ञानात स्थानिक भाषेतला आशय निर्माण करावा लागणार आहे. आपण ते करू शकलो तर चॅटजीपीटी असो किंवा ब्रॅड असो किंवा गुगल किंवा बिंग, सारं तंत्रज्ञान भाषेच्या सक्षमीकरणात उपयोगाचं ठरेल हे निश्चित.