हसलेली झेंडूची फुले... (संदीप काळे)

संदीप काळे Sandip98868@gmail.com
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

आपल्या दोन विद्यार्थ्यांच्या तोंडून एका शिक्षकानं एक व्यथा ऐकली...झेंडूच्या फुलांची आणि त्यांच्या विक्रीविषयीची व्यथा...या व्यथेनं त्या शिक्षकाला अस्वस्थ केलं. याच सकारात्मक अस्वस्थतेचा उपयोग त्या शिक्षकानं कसा केला आणि संबंधित घटकांना त्यांचा "रास्त लाभ' कसा मिळवून दिला, त्याविषयी...

आपल्या दोन विद्यार्थ्यांच्या तोंडून एका शिक्षकानं एक व्यथा ऐकली...झेंडूच्या फुलांची आणि त्यांच्या विक्रीविषयीची व्यथा...या व्यथेनं त्या शिक्षकाला अस्वस्थ केलं. याच सकारात्मक अस्वस्थतेचा उपयोग त्या शिक्षकानं कसा केला आणि संबंधित घटकांना त्यांचा "रास्त लाभ' कसा मिळवून दिला, त्याविषयी...

समाजात दोनच वर्ग आहेत. एक, शेतात माल पिकवणारा आणि दुसरा, तो पिकलेला माल खाणारा. माल पिकवणाऱ्याच्या पाचवीला पिढ्यान्‌पिढ्या अर्थशास्त्राचा शाप असतो. लुटू पाहणारे आणि प्रत्यक्षात लुटणारे यांची हातमिळवणी होऊन शेतकरी नावाची "जमात' हळूहळू खोलात फसत जाते. मग तिला सरकारही बाहेर काढू शकत नाही की सरकारी यंत्रणाही. सरकार आणि सरकारी यंत्रणा यांच्या भरवशावर न राहता वेगळं काही केलं तर चांगलं यश येऊ शकतं. उत्पादन करणारा मोठ्या प्रमाणावर उपभोक्ता आहे, त्यानं ठरवलं तर बळीचं राज्य येऊ शकतं...याच पद्धतीचा प्रयोग हिंगोली जिल्ह्यात झाला आहे.

शेतीच्या क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाऊ शकेल असा हा प्रयोग, अशी ही चववळ आहे. आज तिच्याविषयीच जाणून घेऊ या.
स्थळ ः जयभारत विद्यालय, जवळा (ता. सेनगाव, जि. हिंगोली). शाळेची घंटा वाजली. मुलं शाळेत बसली. गेल्या पाच दिवसांपासून शाळेत सतत गैरहजर असणाऱ्या गणेश गायकवाड आणि पवन गायकवाड या दोन विद्यार्थ्यांना वर्गमास्तर अण्णासाहेब जगताप यांनी शिक्षेसाठी उभं केलं. मास्तरांनी त्यांना विचारलं ः ""शाळा का बुडवता? सणवार आले की तुमचं नेहमी असं होतं...सांगा, काय कारण आहे ते?''
दोघंही म्हणाले ः ""गुरुजी, दसरा होता म्हणून फुलं तोडायला गेलो होतो. माल तोडणं-नेणं-विकणं असं सगळं आम्हालाच करावं लागतं...''
- मुलं खरं बोलत असल्याचं मास्तरांना पटलं. मास्तरांना मुलांचं व्यावहारिक ज्ञान तपासायचं होतं. मास्तर म्हणाले ः ""किती रुपये मिळाले?''
दोन्ही मुलांचा चेहरा पार पडला. काय उतर द्यावं ते त्यांना कळेना. मास्तरांच्या आग्रहापोटी मुलांना सगळं काही सांगावं लागलं. ते सगळं ऐकून इतर विद्यार्थ्यांसह मास्तरही काही क्षण स्तब्ध झाले, हेलावून गेले. नेहमी गोंगाट करणारा सगळा वर्ग शांत झाला. शाळा सुटली, मुलं आपापल्या घरी गेली; पण मास्तर विचार करत तसेच बसून राहिले.
मुलांनी सांगितलेला गंभीर विषय मास्तरांना विचार करायला भाग पाडून गेला.
***

चार महिने आपल्या लेकराप्रमाणे वाढवलेली झेंडूची फुलं या मुलांनी आणि त्यांच्या घरच्यांनी विक्रीसाठी बाजारात नेली...विक्रीसाठी बाजार सुरू झाला...20 रुपये किलोची फुलं दोन रुपये किलोवर आली...मग अधिक फुलं बाजारात आल्यामुळे फुलांना कुणी विचारेना...शेवटी, ट्रकमधली सगळी फुलं रस्त्यावर फेकून देऊन ही मुलं आपल्या घरच्यांसह रिकाम्या हातानं परतली. हात रिकामे होते...पण मन वेगवेगळ्या प्रश्‍नांनी भरून गेलं होतं. मनात विचारांची दाटी झाली होती.

हे सगळं ऐकल्यानंतर मास्तर कमालीचे अस्वस्थ झाले. ही मुलं आता खाणार काय? अंगावर घालणार काय?सणावाराला यांचं कसं होणार? असे अनेक प्रश्न मास्तरांच्या मनात आले. बरं, ही दोनच मुलं नव्हती, शाळेतली ऐंशी टक्के मुलं फुलशेतीशी संबंधित होती. या सगळ्यांना बाजारपेठेत फुलं विकायला गेल्यावर "जाबराठ' फटका बसला होता. मास्तर केवळ अस्वस्थ होऊन शांत बसणारे नव्हते, तर ते धडपड्या "धाटणी'चे होते. सेनगाव तालुक्‍यात ऐंशी टक्के शेती ही फुलशेती आहे. त्या दोन मुलांनी सांगितल्याप्रमाणेच सगळ्यांची गत होती.

त्याच रात्री अणासाहेब मास्तरांनी "झेंडूची फुले अभियान' नावाचा व्हॉट्‌स ग्रुप तयार केला आणि तिथं या चळवळीला सुरवात झाली. एकच विषय सगळ्यांना सांगायचा ः "झेंडूची फुलं येत्या दिवाळीला 50 रुपये किलो याप्रमाणे विकत घ्यायची.' बस्स.
सेनगाव, हिंगोली, मराठवाडा...आणि राज्यात अनेक ठिकाणी सोशल मीडियावर "झेंडूची फुले चळवळ' हा विषय मोठ्या प्रमाणावर चर्चिला गेला. शाळेत शपथ दिली जात होतीः- "मी फटाके वाजवणार नाही... मी घरावर रोषणाई करणार नाही...मी शेतकऱ्यांकडून 50 रुपये या दरानं झेंडूची फुलं घेणार...'

ज्या भागात फुलं नाहीत अशा गावांमध्ये पाचशे लोकांना तयार केलं गेलं...फुलं घेण्यासाठी त्यांना भावनिक आवाहन करण्यात आलं...बघता बघता मराठवाड्यातल्या तीन हजार खेड्यांत हे भावनिक लोण पसरलं. शिक्षण विभाग कामाला लागला. शाळेतून गावात आणि गावातून घराघरात ही मोहीम पोचली. एकमेकांना सांगणं, सोशल मीडियाचा वापर...आणि मग त्यानंतरचा मास्तरांचा "प्लॅन बी' तयार होता. त्यांनी काही साहित्यिकांना या विषयावर लिहायला भाग पाडलं. त्यासाठी त्यांनी सर्वात अगोदर फुलांच्या व्यथेवर आपली पहिली कविता लिहिली. त्या कवितेच्या शेवटच्या ओळी होत्या ः
माझं मन म्हणतय मला
देणाऱ्याला कळ सहन होत नसेल
तर घेणाऱ्यानं लाजलं पाहिजे
घामाच्या तराजूला बाजारात
लक्ष्मीनं पूजलं पाहिजे

या कवितेनंतर अनेक साहित्यिकांनी या व्यथेकडं गांभीर्यानं पाहिलं...तिचं विश्‍लेषण केलं.

त्यानंतर मात्र मास्तरांना आपला कुठलाही प्लॅन बाहेर काढायची गरज पडली नाही. कारण, आता ही चळवळ सर्वांची चळवळ झाली होती. कवी केशव खटिंग, नितीन लोहट, डॉ. दिलीप शृंगारपुतळे, चंद्रकांत कावरके, फौजदार रुपाली कांबळे, संगीता देशमुख, रणजित कारेगावकर, महाराज दस्तापूरकर, किरण सोनटक्के, बाबाजानी दुराणी...अशा अनेकांनी आता या चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती.
पूर्णा इथले आमचे बातमीदार जगदीश जोगदंड यांनी प्रथम लोकांना भावनिक आव्हान करत हा विषय हाताळला. मी त्यांना त्यांच्या घरी भेटलो. शेतकऱ्यांविषयीची त्यांची तळमळ त्या वेळी जाणवली.

लोकांवर एखाद्या भावनिक विषयाचा सतत मारा केला तर तो विषय लोकचळवळीचा भाग बनू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे जगदीश आणि त्यांनी झेंडूची फुले या विषयावर केलेलं अभ्यासपूर्ण बातम्याचं लिखाण.
जोगदंड म्हणाले ः ""दर वर्षी दसऱ्याच्या आणि दिवाळीच्या दरम्यान पाच तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायच्या. या वर्षी एकही झाली नाही.''
जोगदंड यांच्या घरून बाहेर पडल्यावर मी काही शासकीय कार्यालयांत गेलो. कारण, "फुलं घ्या आणि फुलांचा वापर करून शासकीय इमारती सजवा,' असं फर्मान सर्व शासकीय कार्यालयांनी काढलं होतं. पूर्णा इथले पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनीही फुलांबाबतचं आवाहन लोकांना गलोगल्ली केलं होतं. घोरबांड म्हणाले ः ""एकही शेतकरी दिवाळीदरम्यान रिकाम्या हातानं परत गेला नाही. सगळ्यांच्या मालाला "सोन्याचा' भाव पहिल्यांदाच मिळाला. हे या लोकांमुळंच शक्‍य झालं. आपण एकत्रित आलो तर एखादा विषय सहज मार्गी लावू शकतो, हे आता शेतकऱ्याला या विषयामुळं कळलं आहे.''

पूर्णावरून मी निघालो सेनगावला. जिकडं बघावं तिकडं फुलंच फुलं. मन दिवसभर एकाच शेतात रमावं असा परिसर. मास्तरांची भेट घेतली, पोरांची भेट घेतली, तेव्हा या चळवळीचे अनेक पैलू माझ्यासमोर उलगडले गेले. अनेक गावांत फुलविक्रीसंदर्भात महोत्सव भरवले गेले होते..."इडापिडा टळो नाही तर मानसिकता बदलो,' या भावनेतून सगळे एकमेकांना आवाहन करत होते.

मास्तरांशी बोललो. मास्तरांनी दोन-तीन मुद्दे नेमके आणि महत्त्वाचे सांगितले.
मास्तर म्हणाले ः""अहो, आपल्याकडं 25 कोटी शेतकरी आहेत. त्यांनी ठरवलं तर कितीही गंभीर विषय सहज मार्गी लागू शकतो. मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे; त्यामुळे रुपयाचं गणित मला चांगलं माहीत आहे. वस्तूचं मूल्य ग्राहकानं ठरवलं तर झाला ना बट्ट्याबोळ...माल तुम्ही पिकवता..त्याला किती खर्च झाला, हे तुम्हाला माहीत असतं. मग असं असेल तर तुमचा भाव तिसऱ्याच कुणीतरी का ठरवावा? तुम्ही एकमुखानं आपल्या भावावर ठाम का राहत नाही? येऊ द्या मग जी संकटं येतील ती...मला हे काम करत असताना अनेक व्यापाऱ्यांच्या धमक्‍या आल्या; पण मी डगमगलो नाही''.

दसरा ते दिवाळी दरम्यानच्या काळात ही चळवळ जणू काही "लोकचळवळ' होऊन जवळा ते महाराष्ट्र अशी सगळ्या संबंधित घटकांना सामावून घेत प्रवास करत होती. तसं झेंडूचं उत्पादन संपूर्ण महाराष्ट्रातच घेतलं जातं. विशेषतः खडकाळ व मुरमाड जमिनीत या फुलाची जास्त लागवड केली जाते. हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला हा जमिनीचा पट्टा झेंडूच्या फुलासाठी योग्य आहे. ही फुलं दसरा आणि दिवाळी यादरम्यान एकदाच येतात. त्यामुळे या काळात दलालांबरोबरच किरकोळ विक्री करणाऱ्यांचीही नियत फिरते, असं म्हटलं तरी चालेल. या फुलांचा भाव अगदी पाडून मागितला जातो. "द्या दोन रुपये किलो' अशी मागणी केली जाते. या चळवळीमुळे मात्र असा भाव कुणीही केला नाही.

या फुलांची दिवाळीतली अवस्था दसऱ्यातल्यासारखी नव्हतीच. दसऱ्याला ही फुलं "सुकलेली' होती. मात्र, दिवाळीला बाजारात आलेल्या या फुलांची "दुसरी पिढी' अगदी "हसरी' होती... खऱ्या अर्थानं फुलून आलेली होती! झेंडूची ही अशी हसलेली फुलं पाहून, आपल्याला किती फायदा झाला यापेक्षा अधिक फुलं कुणाच्या तरी घरी गेली, हा आनंद शेतकऱ्याला होता. हसऱ्या फुलांनी मुलांच्या चेहऱ्यावर गोड हसू आणलं होतं. "माझी मुलं (विद्यार्थी) जोपर्यंत नवीन कपडे घालणार नाहीत, तोपर्यंत मी पायात चपला घालणार नाही,' असं मास्तरांनी ठरवलं होतं. दिवाळीच्या सुटीनंतर मुलं नवीन कपडे घालून आली...आणि आपल्या अण्णासाहेब मास्तरांसाठी सोबतच नवीन चपलाही घेऊन आली. हा प्रसंग कसा असावा? "तारे जमीं पर' या चित्रपटाचा समारोप होतो, त्याप्रमाणे! सगळ्यांचे डोळे दाटून आले होते...आणि हे अश्रू होते अर्थातच आनंदाचे. हे आनंदाश्रू होते आपल्या मास्तरांविषयी, शिक्षकाविषयी प्रेम व्यक्त करणारे. एक शिक्षक एका विषयाबाबत सकारात्मकपणे "अस्वस्थ' झाला तर त्याची जणू काही लोकचळवळ बनून जाते...सर्व शिक्षक असे कधी तरी, थोडे का होईना, अस्वस्थ झाले तर एक मोठी लोकचळवळ होऊ शकेल. अस्वस्थ नसणाऱ्या शिक्षकबांधवांनो, जरा अस्वस्थ व्हा...केवळ फुलंच नव्हे तर शेतीची सगळी पिकं "आपल्या वाट्याला अशी लोकचळवळ कधी येईल' याची वाट पाहत आहेत...!

Web Title: sandeep kale write article in saptarang