sandeep kale
sandeep kale

एक धागा सुखाचा... (संदीप काळे)

ठरवलं तर एखाद्या एखाद्या शाळेचे-कॉलेजचे माजी विद्यार्थी आपल्या शैक्षणिक संस्थेसाठी बरंच काही करू शकतात. तन-मन-धन अर्पून संस्थेचं रूपडं बदलू शकतात. नांदेडमधल्या "प्रतिभा निकेतन' शाळेचं रूपडं असंच आमूलाग्र बदललं. हे कसं बदललं, त्याचीच ही गोष्ट...

"सकाळ'च्या कामानिमित्तानं सध्या माझं राज्यभर फिरणं सुरू आहे. विदर्भानंतर मराठवाड्याचा दौरा सुरू झाला. जेव्हा जेव्हा मी नांदेडला मुक्कामी असतो, तेव्हा हक्काचं घर एकच, माझे मित्र चित्रकार नयन बाराहाते यांचं. मी नयन यांच्याकडं ज्या दिवशी मुक्कामी होतो, त्या दिवशी ते नागपूरला गेले होते. रात्री उशिरापर्यंत नांदेडमधली कामं आटोपली आणि घरी आलो. एवढ्या मोठ्या घरात एकट्याला झोप येईना. गॅलरीत येऊन सुनसान रस्त्याकडं टक लावून पाहत होतो. डोक्‍यात एकदम क्‍लिक झालं ः "अरे, हा रस्ता तर आपल्या ओळखीचा आहे'! मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो ते "प्रतिभानिकेतन' नयन यांच्या घराच्या मागं आहे. घर बंद केलं आणि सरळ कॉलेजकडं निघालो. रात्रीचा एक वाजला होता. कॉलेजच्या बाजूलाच शीखधर्मीयांचं श्रद्धास्थान असणारं बंदाघाट आहे. त्यामुळे हा भाग खूप स्वच्छ आणि रोषणाईनं न्हाऊन निघाला होता. कॉलेजच्या आवारात प्रवेश केला आणि वाटलं आपण सगळीकडं खूप फिरतो; पण या ठिकाणाएवढा आपलेपणा कुठंही वाटला नाही. सतीश गजभारे आणि किशन पवित्रे हे माझे दोन मित्र. त्यांना रात्री फोन केले. ते तातडीनं आले. आम्ही तिघंही जुन्या आठवणींत रमलो. पहाटचे चार कधी वाजले कळलंच नाही. आमचा व्हॉट्‌सऍपचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपवर सर्व मित्रांसाठी एक निरोप टाकला ः "उद्या दुपारी आपल्या कॉलेजमध्ये भेटायचं आहे...' सकाळी त्याच ग्रुपवर सर्वांचा निरोप आला, "आम्ही येणार आहोत...' दुपारी ठरल्याप्रमाणे सर्वजण भेटलो. बऱ्याच वर्षांनंतर जिवलग मित्र भेटले. त्याचं वर्णन कसं आणि काय करावं?
दिवाळी संपून पंधराच दिवस झाले होते; पण आम्हा सर्वांची खरी दिवाळी आम्ही भेटलो त्या दिवशी झाली. ख्यालीखुशालीच्या गप्पा झाल्या. आपण ज्या कॉलेजमधून घडलो, त्या कॉलेजसाठी आपण काहीतरी करावं ही भावना सर्वांच्या मनात होती. ती कल्पना प्रत्यक्षात साकारण्याच्या दृष्टीनं त्याच दिवशी कागदावरही आली. त्या कल्पनेचं नाव होतं ः "एक धागा सुखाचा ः पी. एन. कॉलेज मित्रमंडळ'. आपण आयुष्यात खूप काही मिळवलं आहे आणि मिळवणार आहोत, आपण खूप मोठे झालो आहोत; मात्र वेळ मिळत नसला तरीही आपल्या शाळेविषयी, कॉलेजविषयी आणि गावाविषयी "काहीतरी केलं पाहिजे' हा सुप्त विचार आपल्या मनात नक्कीच असतो. आपण फक्त वाट बघत असतो, हे सगळं करण्याची संधी कधी येईल याची. आमच्यासाठी ही संधी आली होती. आता आमच्या मनात ज्या काही भावना होत्या, त्यांना मूर्तरूप देण्यास सुरवात झाली. आपल्याला शक्‍य होईल तेवढा निधी जमा करून कॉलेजमधल्या मागासवर्गीयांच्या, बहुजनांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी पूर्णपणे मदत करणं. त्याला "उन्नती पुरस्कार' असं नाव देण्यात आलं. जमलेल्या सर्व मित्रांतून, ज्यांना मदतीची गरज आहे, अशा पाच मित्रांच्या मुलींच्या नावे लकी ड्रॉ काढणं आणि मुलींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी एक ठराविक रक्कम फिक्‍स करणं, कॉलेजच्या सर्व मित्रांना घेऊन कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा देत एक पुस्तक संपादित करणं, सर्वांच्या आरोग्यासाठी, ज्यांना गरज आहे त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदतीचा हात, सर्व सेवानिवृत्त प्राध्यापक-कर्मचारी यांना एकत्रित करायचं आणि त्यांचा सन्मान करायचा, वेगवेगळ्या अशा 20 वेगवेगळ्या कल्पना पुढं आल्या आणि त्यांची डेडलाईनही ठरली.

आपल्या शाळा-कॉलेजाबद्दल काहीतरी करण्याच्या दृष्टीनं आम्ही सर्वांनी तयार केलेला हा एक जबरदस्त आराखडा होता. आपण जे काही करत आहोत, त्यातून एका मोठ्या कार्याची सुरवात होणार आहे,
याची भेटलेल्या सर्व मित्रांना कल्पना नव्हती. हा तयार केलेला आराखडा मित्रमंडळींच्या कम्युनिकेशनसाठी व्हॉट्‌सऍप ग्रुपवर टाकला. या ग्रुपवरून त्या ग्रुपवर हा तयार केलेला आराखडा अनेक दिवसांपासून फिरत होता. गेले आठ दिवस आणि आताही अधूनमधून अनेकांचे फोन येत होते. "आम्ही सगळे मित्र एकत्रित येऊन आमच्या शाळेसाठी, कॉलेजसाठी काहीतरी करणार आहोत...आम्हाला अजून यात काय करता येईल ते सुचवा...आमची बैठक सुरू आहे...' मुंबईत माझे मित्र आहेत प्रा. राम भिसे. त्यांचा दुसऱ्या दिवशी फोन आला. ते म्हणाले ः ""तुमचा "एक धागा सुखाचा' हा "पी. एन. पॅटर्न' म्हणून सगळीकडं चर्चेचा विषय आहे. अहो, सगळीकडं माजी विद्यार्थी "आपल्या शाळा-कॉलेजसाठी काहीतरी करू या' म्हणून ग्रुप करत आहेत. मीटिंग घेत आहेत, नियोजन करत आहेत.''

प्रा. राजाराम वटमवार सर हे पी. एन. कॉलेजचे सेवानिवृत्त प्राध्यापक. वटमवार सरांनी पी. एन. कॉलेजचं "विचारविकास' हे जुनं ग्रंथालय खूप सुंदररीत्या उभं केलं आहे. ते पाहण्यासाठी आम्ही यावं, असा आग्रह त्यांनी कॉलेजची मीटिंग झाली त्या दिवशी केला होता. आम्ही सगळे निघालो. जुनी जीर्ण झालेली शाळा आणि त्याच अवस्थेतलं "विचारविकास' हे वाचनालय...आता या दोहोंचं रूपडं अगदी बदलून गेलं होतं. त्यांना एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखं रूप कसं आलं? यामागं खूप मोठी स्टोरी होती. शाळेच्या प्रवीण नपाते या विद्यार्थ्यानं चक्क 12 कोटी रुपये खर्च करून शाळा बांधून दिली होती. कधीही कुणाला माहीत नाही, अशी एक वेगळी स्टोरी वटमवार सरांनी आम्हाला त्या दिवशी सांगितली. ज्या नपाते यांनी ही मोठी शाळा बांधली, त्यांनी संस्थेला अगोदरच बजावून सांगितलं होतं ः "माझ्या कामाची कुठंही प्रसिद्धी झालेली मला आवडणार नाही.' आणि संस्थेनंही नपाते यांना दिलेला हा शब्द पाळला. मात्र, या स्टोरीच्या खोलात गेलो तेव्हा कळलं, की नपाते यांचं आपल्या शाळेवर जिवापाड प्रेम आहे, आपलं शालेय शिक्षण ज्या शाळेत झालं, ज्या शाळेनं आपली पायाभरणी केली त्या शाळेची आपण पायाभरणी करायचीच, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे खूप मोठं काम केलं आणि शाळेसाठी सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा नवा इतिहास घडवून दाखवला. नपाते हे परदेशात व्यावसायिक आहेत. होत असलेलं काम समोर उभं राहून त्यांना पाहता आलं नाही. त्यांनी या सर्व कामांची जबाबदारी आपले मित्र कृष्णा सहाय यांच्यावर सोपवली होती. सहाय म्हणाले ः ""आपल्या शाळेविषयी प्रेमभावना व्यक्त करणं हाच उद्देश यामागं आहे. जन्म दिलेल्या आई-वडिलांना आपल्या कर्तबगार मुलांविषयी अभिमान वाटतो, तसं शाळेचंही आहे. आई-वडील ज्याप्रमाणे आपल्या मुलांचं कर्तृत्व अभिमानानं मिरवतात, तसाच शाळेतल्या, कॉलेजमधल्या शिक्षकांनाही विद्यार्थ्यांचा कमालीचा अभिमान असतो. आता मुलं या शिक्षकांच्या किती संपर्कात राहतात, त्यावर बरंच काही अवलंबून असतं.''

शाळेवर अफाट प्रेम करणारे नपाते यांच्याविषयी ऐकलं आणि आम्ही सारे गार पडलो. नपाते यांनी केवळ शाळेचं काम केलं नाही, तर शाळेतले सर्व मित्र एकत्रित कसे येतील, यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे शाळेची केवळ बाह्य स्थिती सुधारली नाही, तर शाळेतं एक चैतन्य सळसळलं. बहरलं.

कॉलेजमध्ये कामाची सुरवात केल्यावर आम्हाला खूप अभिमानानं भरून आलं होतं. मात्र, त्याच शाळा-कॉलेजात असणाऱ्या विद्यार्थ्यानं केलेलं मोठं काम पाहून आमच्या अभिमानाचा फुगा केव्हाच फुटला होता. "आपण जे ठरवलं ते करून दाखवू' या प्रामाणिक मतावर आम्ही सर्वजण येऊन ठेपलो होतो. आम्ही कॉलेजमध्ये असताना प्राचार्य असणारे स. दि. महाजन सर आता या संस्थेचे सर्वेसर्वा आहेत. अत्यंत विद्वान असा नावलौकिक असलेल्या स. दि. महाजन सरांची दुसरी ओळख म्हणजे अलीकडंच दिवंगत झालेल्या ज्येष्ठ कवयित्री, साहित्यिक कविता महाजन यांचे ते वडील.

महाजन सर म्हणाले ः ""या आपल्या संस्थेला सामाजिकतेची वेगळी परंपरा आहे. प्रवेश घेणारा प्रत्येक विद्यार्थी "आपली संस्था म्हणजे आपला परिवार आहे,' या भूमिकेतून, शिक्षण झाल्यावरही संस्थेविषयी आपली भावना सतत व्यक्त करत असतो. आमचा दहावीचा विद्यार्थी प्रवीण हे त्याचं उत्तम उदाहरण होय. त्यानं आपल्या शाळेविषयी एवढी उदारता दाखवली. असं उदाहरण माझ्या पाहण्यात तरी नाही.''

असे विद्यार्थी सगळ्या शाळेला मिळोत, अशी सदिच्छा, प्रार्थना करण्याची वेळ आज आली आहे. शाळेला अनुदान नाही, वर्गखोल्या नाहीत, शिक्षक नाहीत, असं चित्र एकीकडं आणि जिथं सगळं ठीक आहे, त्या खासगी शाळांत संस्थाचालक आणि शिक्षक यांच्यात वाद असं चित्र दुसरीकडं. सरकारी शाळेत नियोजनाचा पत्ता नसतो. जी मोठी आणि श्रीमंतांची शाळा-कॉलेजं असतात, तिथं शिकणारी अनेक मुलं शिक्षण गांभीर्यानं घेणारी असतातच असं नाही. अशा निराशाजनक चौकटीत शिक्षणक्षेत्र आज अडकून पडलं आहे. हे चित्र बदलण्यासाठी माजी विद्यार्थ्यांची चळवळ चांगली भूमिका पार पाडू शकते. माजी विद्यार्थ्यांचे मेळावे कॉलेजकडून घेतले जातात; पण त्यातून होतं काय? तर फक्त जुन्या विद्यार्थ्यांच्या भेटी. बस्स. कॉलेजच्याही मर्यादा असतात आणि विद्यार्थांच्याही; पण यातून "एक धागा सुखाचा'सारखं कुणी काही ठरवलं, तर ते उत्तम राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com