हिरवाई पेरणारे प्रकाशदूत (संदीप काळे)

sandeep kale
sandeep kale

एकीकडं शेती उत्पन्न देत नाही म्हणून जीव संपवणारे असताना, दुसरीकडं अनेक शेतकरी संघर्षातून हिरवाई फुलवत आहेत. संघर्ष, वेगवेगळे प्रयोग, कष्ट यांच्या साथीनं चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. प्रकाश पाटील, विजय लोहकरे आणि दिनेश देशमुख यांच्यासारख्या शेतकऱ्यांची आणि पतीच्या मागं कष्टानं शेती फुलवणाऱ्या पंचफुला जाधव यांच्या ही यशोगाथा. त्या प्रकाश दाखवणाऱ्या आहेत आणि त्याच वेळी अंधारवाटांना प्रश्‍नही विचारणाऱ्या आहेत.

कार्यालयीन कामानिमित्त गेल्या काही दिवसांपासून सहकाऱ्यांसह राज्यात दौरा सुरू आहे. ठाणे इथलं काम संपवून आम्ही पालघरला मुक्‍कामाला गेलो. निसर्गानं सौंदर्याची अमाप उधळण या भागात केली आहे. याला निसर्गाची अद्‌भुत लीला म्हणावं लागेल. आमच्या एका सहकाऱ्याचे जुने मित्र प्रकाश मुकुंद पाटील आम्हाला भेटण्यासाठी आले होते. कार्यालयीन कामं आटोपल्यावर पाटील यांच्या आग्रहास्तव आम्ही त्यांची शेती पाहण्यासाठी गेलो. आमच्या कार्यालयापासून अगदी जवळच नांदगाव नावाचं गाव आहे. तिथं केवळ दहा गुंठे जमिनीत पाटील यांनी पानमळा लावला आहे. वर्षाकाठी लागणारा खर्च वगळता पाच लाख रुपये त्यांच्या पदरात पडतात. शिवाय चार ते पाच लोकांच्या हाताला काम मिळतं. हे ऐकून आम्ही थक्कच झालो.

मी पाटील यांना विचारलं ः ""कधीपासून करता तुम्ही ही शेती?'' पाटील म्हणाले ः ""माझं वय सत्तरीकडं झुकलं आहे. सन 1918 पासून आमचा या छोट्याशा शेतात पानमळा आहे. आम्ही पिढीजात हा व्यवसाय करतो.''
पानाचा सर्व इतिहास आम्हाला पाटील यांनी सांगितला. ""दिल्ली, काश्‍मीर, कच्छ, बिकानेर अशा ठिकाणी हा माल विक्रीसाठी जातो. अशी पानं दुसरीकडं उत्पादित होत नाहीत, म्हणून पानाला बाराही महिने मागणी असते. या पानांची टेस्ट जरा तिखट असते. पानांचा वापर खाण्यासाठी वा औषधी म्हणूनही होतो. "काळी पट्टी' असं या पानाचं नाव आहे. शेतातून रोज पानं नेली जातात. सौराष्ट्र एक्‍स्प्रेसनं हा माल जातो.'' पाटील सांगत होते आणि आम्ही ऐकत होतो. जमीन, वातावरण आणि इच्छाशक्ती या तीन गणितांवर शेतीचे सूत्र आहे, असं पाटील सांगत होते. पाटील यांचं सर्व गणित समजून घेतल्यावर मी या भागातल्या अनेक शेतकऱ्यांना भेटलो. निम्म्याहून अधिक शेतकरी हे वीस आणि तीस गुंठेवाले. कुठलंही टेन्शन नाही. खाऊन-पिऊन अगदी सुखी. घरातले सर्व हात शेतात राबतात. मी या शेतकऱ्यांची आणि मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांची मनातल्या मनात तुलना करत होतो; पण कोणत्याच कोष्टकात ती तुलना बसत नव्हती. कारण मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अवस्थेचा मी अनेक वेळा मूक साक्षीदार होतो. मी मागं "शेतकऱ्यांच्या आत्महत्या' या विषयावर संशोधन केलं. संशोधनाच्या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात पाच हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्या आत्महत्यांच्या सर्व कारणात नापिकी हे सर्वांत मोठं कारण होतं. पालघर भागातल्या शेतकऱ्यांचं शेतीचं गणित कधीच बिघडत नाही, म्हणून ते सुखी-समाधानी आहेत. इथला शेतकरी कधी कधी निसर्गाची साथ नसली तरी खचून जात नाही. मग जे दहा-वीस गुंठेवाले एवढे समाधानी आहेत; तर ज्यांच्या जमिनी पन्नास, शंभर एकर आहेत, ते का समाधानी नाहीत, हा माझ्या मनाला पडलेला प्रश्न होता. पाटील यांच्या माध्यमातून खूप कमी जमीन असलेला समाधानी शेतकरी मी पाहिला होता. आता मी अजून काही शेतकऱ्यांना भेटण्याचा बेत आखला. मोठी जमीन असलेले, लोण इथले विजय लोहकरे आणि पाटनूर इथले दिनेश देशमुख अशा दोन शेतकऱ्यांना भेटायचं ठरवलं आणि त्या दिशेनं माझा प्रवासही सुरू केला.
***

लोण हे गाव मराठवाड्यातलं. इथले विजय लक्ष्मणराव लोहकरे या चाळिशीच्या व्यक्तीनं केलेल्या शेतीच्या प्रयोगाविषयी मी खूप ऐकून होतो. वडिलोपार्जित पन्नास एकर जमीन. त्या जमिनीतून सोने काढणारी ही व्यक्ती या भागातला एक आयडॉल आहे. लोणपासून अगदी जवळच विजय यांची शेती आहे. ऊस, केळी, हळद, हरभरा, गहू अशी शेतीतील पिकं. विजयला आपल्या शेतीमधून वर्षाकाठी एकरी दोन लाखापर्यंत उत्पन्न मिळतं. वर्षभर किमान वीस माणसांना रोजगार मिळतोच. विजयची हळदीची शेती पुरुषभर उंचीची. आत शिरलेल्या माणसानं हात वर केला तरी दिसू नये एवढी. शेतीसाठी पाणी आवश्‍यक आहे. मात्र, पाणी जमिनीतच नाही तर विहिरीत येणार कसं हा प्रश्न. तरीही विजयची खटपट दरवर्षी अधिकचं पाणी कसं मिळेल यासाठी. दगडाला पाझर फोडणारी विजयची जिद्द पाहून मी थक्क झालो. आतापर्यंत पाच विहिरी, दहा बोअर शेतात घेतल्यात. त्यामुळं पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. लोडशेडिंगची भीती विजयसारख्या शेतकऱ्यांना नाही; कारण सेंद्रीय शेतीसोबत अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर शेती करण्यासाठी केला आहे. करंट आला, की आपोआप ठिबकच्या माध्यमातून रोपाच्या आवश्‍यक त्या भागात पाणी जातं. सकाळी सहापासून ते रात्री अकरापर्यंत विजयच्या घरातली सगळी मंडळी शेतात राबराब राबतात. कदाचित त्यामुळंच एकरी दोन लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न विजयला मिळत असेल. विजयच्या शेतीच्या आसपास अनेक मोठे शेतकरी आहेत; पण विजयनं कष्टातून साध्य केलं. विजय सांगत होता ः ""दुष्काळ आमच्या पाचवीलाच पुजला आहे. तो केव्हाही अंगावर चाल करून येऊ शकतो, हे ध्यानात घेऊन परिपूर्ण नियोजन करावं लागतं. शेतीत कुठलीही अडचण येऊ द्या; त्यावर तातडीनं तोडगा कसा निघेल, यासाठी कंबर कसून बांधावर तयार राहावं लागतं. शेतीच्या आजूबाजूला कॅनॉलचं पाणी असल्यामुळं त्याचा शेतीला फार मोठा आधार झाला आहे. आम्ही कोणताही माल विकायला शेताच्या बाहेर जात नाही. व्यापारी शेतात माल नेण्यासाठी येतात. सेंद्रीय शेतीवर आमचा अधिक भर आहे; त्यामुळं कमी खर्च, चांगले उत्पन्न आणि रोगमुक्त पिकलेला माल हे घडून येतेच. मी गेल्या दहा वर्षांपासून शेती करतोय. कधी शेतीनं धोका दिलाय, असं झालेलं नाही.''
विजयची ही यशोगाथा शेतीपासून दूर पळणाऱ्या तरुणाईला प्रोत्साहित करणारी आहे. इमानदारीनं काम करणाऱ्या क्‍लासवन अधिकाऱ्यांपेक्षा जास्त कमाई विजयची आहे. विजयचे शेतीमधले प्रयोग पाहण्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या शेतीप्रेमींची संख्या कमी नाही. शेतीत टाकलेल्या एका रुपयाचे पाच रुपये मिळतात; पण जर आपण शेतीचं कष्टशास्त्र समजून घेतलं तर? विजयला जे जमतं ते बाकीच्यांना का जमू नये?
***

निजामाच्या राजवटीशी धीरोदात्तपणे लढलेलं पाटणूर हे मराठवाड्यातल्या अनेक गावांपैकी एक गाव. याच गावात एक मोठे शेतकरी आहेत. दिनेश साहेबराव देशमुख हे त्याचं नाव. वय पस्तीस वर्षं. दिनेशच्या आजोबांची शेती शंभर एकर आहे. सगळी शेती अर्थात राबणाऱ्यांच्या जीवावर. केळी आणि ऊस असं पीक या शेतात आहे. आपल्या आजोबांकडून आणि वडिलांकडून आलेल्या शेतीच्या वारशाशी दिनेशनं योग्य नियोजनाची सांगड घातली आणि त्यातून शेती पिकवली. मात्र, शेती प्रत्यक्षात करणं आणि करून घेणं यात खूप मोठा फरक आहे. दिनेश यांच्या शेतीचं स्टिअरिंग दुसऱ्यांच्या हाती आहे. त्याचा फटका उत्पनाला बसतो हे खरं आहे. निसर्गाचा कोप या भागात नेहमी पाहायला मिळतो. त्यामुळं आलं तर आलं, गेलं तर गेलं! ""निसर्ग, कामगार आणि सरकार या तीन "परीक्षा' पास केल्यावर जे काही उरतं ते आपलं,'' असं दिनेश सांगत होते. ""निसर्ग दरवर्षी साथ देईल असं नाही. गावकुसातला कामगार वेळेत आला तर नवलच. तो आला, तरी मनातून काम करेल असं नाही. कामात रंगत आली, की त्याची निघायची तयारी सुरू होते. निसर्ग आणि कष्ट या दोघांचा संगम झाला, तर सुगी पिकते. अर्थात पिकलेलं सोनं मार्केटला जाऊन हातात रुपये पडेपर्यंत मनात धाकधूक राहतेच. माझ्या शेतीत गेल्या पंधरा वर्षापासून ऊस आहे. कारखान्यानं ऊस नेणं आपेक्षित आहे. इकडं आमच्याजवळ चार-चार साखर कारखाने असून, उसाला कोंब फुटेपर्यंत कारखाना वेळेत उसावर कोयता चालवत नाही. तूर, गहू जेव्हा चांगला आणि जास्त येतो, तेव्हा भाव पडलेले असतात. चांगल्या शेतकऱ्यांच्या मागं अडचणी खूप आहेत. आम्ही सैद्धांतिक शेती करू शकत नाही, वास्तवाचं भान ठेवूनच नियोजन करावं लागतं. त्याचं कारण वेळेचं नियोजन करणं जरा आवघड जातं,'' असं त्यांचं म्हणणं.

दिनेश यांनी आपल्या शेतात सर्व प्रकारचे यशस्वी प्रयोग केले; पण ते शेतीबाबत फार समाधानी नाहीत, असं त्यांच्या बोलण्यावरून वाटत होतं- कारण ते शेती करणारे घरातले एकटे आहेत. अशाही स्थितीत त्यांनी सोनं पिकवणारे शेतकरी म्हणून ख्याती मिळवली आहे. आज त्यांना गावात शेतीत काम करायला माणसं मिळत नाहीत. लोक आता उन्हात काम करण्याऐवजी शहरात जाऊन वॉचमन होणं पसंत करत आहेत. मग एवढी मोठी शेती कसायची कशी, हा प्रश्न दिनेश यांच्यासारख्या मोठ्या शेतकऱ्यासमोर असणारच. तरीही उत्तम शेती कशी असते, हे गणित समजून घ्यायचं असेल तर दिनेश यांच्यासारखी शेतीनिष्ठता तर ठेवावी लागेल. कारण डगमगून शेती होत नाही, हे तेवढंच खरं आहे. दिनेश यांची परिसरात आदर्श शेतकरी म्हणून ख्याती आहे, त्याची शेतीवरची निष्ठासुद्धा कोतुकास्पद आहे; पण तरीही ते समाधानी नाहीत, हे अधोरेखित करावंसं वाटतं.

मी यवतमाळच्या एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला भेटलो. पंचफुला जाधव असं या महिलेचं नाव. पोटच्या तीन मुली घेऊन दोन एकर जमिनीमध्ये या महिलेनं काबाडकष्ट करून पतीच्या माघारी आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवलं. तेच तिच्या पतीला का जमलं नाही? त्याचं कारण शेती आणि नियोजन याचा त्यानं कधी ताळमेळ लावला नव्हता. पंचफुला जाधव यांचं वाक्‍य आजही माझ्या कानात सतत ऐकू येतं. त्या म्हणाल्या ः ""निसर्ग कोपला म्हणून संपून जाण्याचे विचार मनात आणणाऱ्या पुरुषानं हातात बांगड्या भरल्या पाहिजेत. निसर्गाला टक्कर देण्याची ताकद ठेवली पाहिजे, आपलं उद्दिष्ट पक्कं असलं पाहिजे. आज पंचफुलाबाई तेवढ्याच शेतीमध्ये मुलींना शिकवत उत्तम कुटुंबप्रमुख बनून काम करू लागल्या आहेत. या राज्यात पंचफुला यांच्यासारख्या हिरकणी एकच नाही, तर हजारो असतील.

शेतीबाबत आपण बघितलेल्या या सगळ्या कमालीच्या प्रेरणादायी यशोगाथा आहेत. आत्महत्यांचा दुर्दैवी मार्ग वापरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पंचफुला यांची उमेद डोळ्यात अंजन घालणारी ठरावी. वाईट काळाशी संघर्ष करणारी ही निर्भीड शेतकरी महिला. शेती दरवर्षी सोनं देणारी खाण असूनही शेतीला नेहमी दुय्यम स्थान का दिलं जातं, याचं उत्तर मी अनेकांना विचारत होतो; पण मला मिळालं नाही. एकीकडं शेतीत काही पिकत नाही म्हणून जीव संपवणाऱ्या शेतकऱ्यांची यादी दिवसेंदिवस वाढते, तर दुसरीकडं उत्तम शेती केली म्हणून प्रकाश, विजय आणि दिनेश यांच्यासारख्या शेतकऱ्यांना अनेक पुरस्कार मिळतात. शेतीचं गणित मग चुकतं तरी कसं, आणि बरोबर येतं तर तेही कसं, याचा उलगडा होत नाही. पंचफुला यांच्यासारखी महिला मोठ्या धाडसानं निसर्गाशी दोन हात करत परीस्थिती हातात घेण्याची जिद्द ठेवते, तर मग वाघासारखं काळीज असणारी माणसं हतबल का होतात बरं? गणितं शेतीची चुकतात, का आपल्या जगण्याच्या तत्त्वज्ञानाची याचाही आता सखोल विचार करण्याची वेळ आली आहे, नाही का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com