नाद घुंगरांचा...ऐकू न येणारा... (संदीप काळे)

संदीप काळे Sandip98868@gmail.com
रविवार, 6 जानेवारी 2019

कलाकेंद्र...लातूरचं असो की मुंबईतलं. तिथं घुंगरं नाचतात; पण त्यांचा आवाज ऐकू येत नाही. घुंगरं पायात बांधणाऱ्या अनेकजणींची ती अपरिहार्यता असते, अगतिकता असते. समोरच्या बेधुंद श्रोत्या-प्रेक्षकांच्या आवाजांच्या कल्लोळात या असहाय्य घुंगरांचा आवाज दबून जातो..."पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची?' असं म्हणत ही घुंगरं नाचत राहतात...अबोलपणे.

कलाकेंद्र...लातूरचं असो की मुंबईतलं. तिथं घुंगरं नाचतात; पण त्यांचा आवाज ऐकू येत नाही. घुंगरं पायात बांधणाऱ्या अनेकजणींची ती अपरिहार्यता असते, अगतिकता असते. समोरच्या बेधुंद श्रोत्या-प्रेक्षकांच्या आवाजांच्या कल्लोळात या असहाय्य घुंगरांचा आवाज दबून जातो..."पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची?' असं म्हणत ही घुंगरं नाचत राहतात...अबोलपणे.

पुण्याहून लातूरकडं निघालो...सोबत लातूरचे माझे मित्र रामेश्वर धुमाळ होते...थंडीची प्रचंड लाट... दिवसाही रस्ते एकदम शांत...दुपारचं ऊन्हसुद्धा कोवळ्या उन्हासारखं वाटत होतं. प्रवास सुरू झाला... जसजसा अंधार वाढत होता, तसतसं रात्री शांत ठिकाणी गाड्या थांबण्याचं प्रमाण अधिक दिसत होतं. या गाड्या थांबवून लोक जात कुठं असतील, असा माझा प्रश्न होता. आम्ही एके ठिकाणी गाडी थांबवली. मी उतरत होतो, तितक्‍यात रामेश्वर आपल्या लातुरी भाषेत जोरात ओरडले ः "काय करू लालाव, सर? इथं का उतरू लालाव...? चला, इथून लवकर. कुणी ओळखीचं भेटेल. आपली बदनामी होईल.' त्यांच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करत मी धुमाळ यांचा हात धरला आणि निघालो. जसजसे जवळ जात होतो, तसतसा घुंगरांचा वाढणारा आवाज कानी पडत होता. आतमध्ये शिरलो...एवढं धुकं आतमध्ये कसं काय? आणखी जवळ गेल्यावर कळलं की हे धुकं नसून, बिडी-सिगारेटचा धूर आहे! आम्ही दोघंही खाली बसलो. चार चार किलोंची घुंगरं पायांत बांधून 12 ते 15 महिला समोर नाचत होत्या. त्यात 15 ते 20 या वयोगटातल्या दोन-तीन मुलीही होत्या. "पिकल्या पानाचा...' हे गाणं सुरू होतं. श्रोत्या-प्रेक्षकांत होते दारू पिऊन धिंगाणा घालणारे, रुमाल आणि फेटे उडवणारे, जोरात आवाज करत हातवारे करून ओरडणारे. इथं कुणाचं काय चाललं आहे तेच काही कळेना. हा तमाशा पाहण्यासाठी पैसे लागत नव्हते. आपल्याला वाटलं तर पैसे द्यायचे. बायका जिथं नाचत होत्या, तिथं भोवताली खूप मोठं कुंपण घातलेलं होतं. म्हणजे, ज्या काही उड्या मारायच्या त्या खालीच. वर स्टेजपर्यंत पोचण्याचा प्रश्नच नाही. गाण्याची फार्माइश म्हणजे काय, तर एकाचं गाणं सुरू झालं की लगेच दुसऱ्याची फर्माइश यायची...जे दारू पिऊन "फुल्ल' झाले होते, हद्दीच्या बाहेर धिंगाणा करत होते, त्यांना माराच्या प्रसादासह बाहेर हाकलण्याचं काम जाडजूड देहाची माणसं करत होती. काही वेळानं एक पोलिस अधिकारी आपल्या लवाजम्यासह तिथं आले. चौकट सोडून धिंगाणा करणारे त्यांची "एंट्री' होताच एकदम शांत झाले. हातात असलेली दारूची बाटली काढत फौजदारसाहेबही काही वेळातच त्या मैफलीत बेधुंद अवस्थेत सहभागी झाले. डोक्‍यावर दारूची बाटली ठेवत वर्दीवर नाचणाऱ्या या व्यक्तीला उपमा द्यायची तरी कशाची? वातावरण पाहून माझ्यासोबतचे धुमाळ कमालीचे गोंधळून गेले होते. त्यांचे शब्द वारंवार माझ्या कानावर पडत होते ः ""आपण निघायचं कधी...आपण निघायचं कधी...?''
|
""निघू या हो...'' म्हणत मी त्यांच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करत होतो. नाचणाऱ्या सर्व महिलांच्या चेहऱ्यांवरचे हावभाव पाहून वाटत होतं, की यांना थोड्या वेळापूर्वी कुणीतरी खूप मारलं असावं आणि जबरदस्तीनं नाचण्यासाठी उभं केलं असावं. गाण्यांचा कार्यक्रम संपला आणि सर्व सामानाची बांधाबांध सुरू झाली. कलाकेंद्र चालवणाऱ्या विठाबाईंना आम्ही भेटलो. त्यांनी ओळख विचारली आणि आम्हाला बसायला सांगितलं. झुलत येणारे अनेक जण विठाबाईंशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. विठाबाई त्या सर्वांना त्यांच्या भाषेतल्या शिव्या देऊन बाहेर काढत होत्या...पन्नाशीची महिला, नऊवारी पातळ, कपाळभर कुंकू...इतरांशी रोखठोक वागणाऱ्या विठाबाईंनी बसा म्हणून आमचं स्वागत लगेच कसं केलं, याचं जरा आश्‍चर्य वाटलं. कदाचित त्यांची नजर माणसं ओळखण्यात चांगलीच सरावलेली असावी.
मी गप्पांना सुरवात केली.

विठाबाई म्हणाल्या ः ""अहो, तुम्ही काहीच्या काही छापलं तर उद्या कोण येईल आमच्या फडावर...?'' मात्र, असं काही केलं जाणार नाही, याची खात्री पटल्यावर विठाबाईंनी बोलायला सुरवात केली. विठाबाई आठ वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांच्या बापानं त्यांना याच कलाकेंद्राच्या मालकाला विकलं होतं... डोळ्यांतलं पाणी आपल्या कोऱ्या लुगड्याच्या पदरानं पुसत विठाबाई मनात साचलेलं दुःख बाहेर काढत होत्या...""मला नऊ बहिणी...कधीतरी मुलगा होईल या आशेवर आईची बाळंतपणं होतंच राहिली. बाप जिवंत राहिला; पण माय मात्र नवव्या बाळंतपणात गेली...ती खदानी (खाणी) खणून सर्वांना पोसायची आणि बाप भीक मागून दारू प्यायचा. ज्या दिवशी माय मेली त्याच्या दुसऱ्या दिवशी मला 100 रुपयांना विकलं होतं. ज्या शिवाजीबाबांनी मला विकत घेतलं, त्यांनी मात्र मला बापाची माया लावली. त्यानंतर मी कधी घरच्यांविषयी विचारणा केली नाही आणि त्यांनी माझ्याविषयी केली नाही. माझ्या जन्मदात्या बापाचं वागणं पाहून, "पुरुष हा फार किळसवाणा प्रकार असून, पुरुषापासून आयुष्यभर चार हात दूरच राहायचं,' हे तेव्हापासून आजपर्यंत माझ्या मनावर कोरलं गेलेलं आहे.''

नाचण्याची मैफल सुरू होती तिथंच बाजूला आम्ही खुर्च्या घेऊन बसलो होतो.
""तुम्ही राहता कुठं? अजून सोबत कोण कोण असतं?'' या सर्व प्रश्नांची उत्तरं देता देता विठाबाई मध्येच म्हणाल्या ः ""या आतमध्ये.'' त्यांच्या मागं निघालो; पण धुमाळ यांची काही हिंमत होईना; पण एकट्यानं उभं राहण्यापेक्षा सोबत जाणं कधीही चांगलं, असा विचार करून धुमाळ अखेर माझ्यासोबत आत आले. खोल्याच खोल्या आणि त्यांमध्ये मोठमोठ्या लोखंडी पेट्या. ही या नाचणाऱ्या बायकांची दौलत! सगळ्या महिलाच. कुणी मेअकप्‌ काढत होतं, कुणी स्वयंपाक करत होतं, कुणी आजच्या झालेल्या कमाईचा हिशेब करत होतं... सगळ्या जणी आपापल्या कामात व्यग्र होत्या. कुणालाही टीव्ही पाहायला फुरसत नव्हती की मोबाईलशी खेळायला. ...पोटात कालवाकालव व्हावी असं ते वातावरण होतं. एक महिला पायाची घुंगरं सोडत सोडत आपल्या छोट्या मुलाचा अभ्यास घेत होती. मी त्या मुलाला नाव विचारलं. त्यानं लडिवाळपणे आपलं नाव सांगितलं ः "संतोष सविता विठाबाई...' त्यानं आपलं नाव असं का सांगितलं, हे माझ्या लक्षात आलं. दिवंगत डॉ. किशोर शांताबाई काळे यांनी लिहिलेल्या "कोल्हाट्याचं पोर' या पुस्तकाची मला आठवण झाली. माझ्यासमोरची सर्व परिस्थिती त्या पुस्तकातल्या पात्रांप्रमाणे होती...

पंचवीस ते तीस महिलांचा परिवार, अनेकांना मोठमोठी मुलं आहेत. चार मुलं पुण्यात एमपीएससी- यूपीएससीचा अभ्यास करत आहेत. मुली मात्र इथंच विठाबाईंचं काम पुढं चालवत आहेत. त्यांना शिकवून मोठं करावं एवढी समज विठाबाईंनाही नव्हती आणि त्या मुलींच्या आईलासुद्धा नव्हती...त्या खोलीमधली कमालीची शिस्त, नजरेत भरणारी स्वच्छता लक्ष वेधून घेत होती...नंतर कळलं, याला विठाबाई कारणीभूत होत्या... मी अनेक जणींशी संवाद साधत होतो. प्रत्येकीची कहाणी वेगळी, खूप दर्दभरी...प्रत्येकीबाबत काहीतरी मोठा अपघात झाला होता आणि तिला विठाबाईंचा आधार मिळाला म्हणून ती जगतेय...हीच ती कहाणी. निघताना धुमाळ यांनी संतोषला जवळ बोलावलं. शंभराची नोट काढली आणि देण्यासाठी पुढं केली. संतोष पळत आपल्या आईकडं गेला. आईला म्हणाला ः ""आई, मामा पैसे देतो. घेऊ का?'' ती काहीच बोलली नाही. तिची डोळ्यांची भाषा मुलाला कळली. मुलगा घरात निघून गेला. त्या मुलाची आई जोरात रडायला लागली. आई का रडते याचं कारण विठाबाईनं सांगितल्यावर आम्हीही सुन्न झालो. संतोषच्या काळजावर छिद्रं पडली आहेत. आम्ही सगळ्या महिलांनी मिळून खूप पैसा ओतला; पण काही फरक पडला नाही. डॉक्‍टरांनी सांगितलंय की आता पैसा खर्च करून काही फायदा नाही...संतोषच्या आईची समजूत काढत विठाबाईनं तिला जेवायला बसवलं. धुमाळ बारीक चेहरा करून टक लावून त्या मुलाकडं बघत होते...सगळे एकत्र जेवायला बसले. हरभऱ्याची भाजी, मेथीची भाजी, ठेचा, उडदाचं वरण, टाकळ्याची भाकरी, छान कांदा कापलेला...अस्सल गावाकडचं जेवण. सगळे जण विठाबाईंची जेवण्यासाठी वाट पाहत होते...आणि विठाबाई वाट पाहत होत्या आम्ही जाण्याची, तर मी वाट पाहत होतो, मला कुणीतरी जेवा असं म्हणेल याची. मात्र, शेवटपर्यंत कुणीही तसं म्हणालं नाही. माझा आवडता मेनू समोर दिसत होता; पण इलाज नव्हता. आम्ही खूप मोठी माणसं आहोत आणि मोठी माणसं भाकर-भाजी खात नसतात, हा समज त्या सगळ्या जणींचा असावा. आम्ही सुन्न होऊन गाडीत बसलो...गाडी निघाली...भावुक होऊन आम्ही तिथून निघालो. विचार केला होता त्यापेक्षा वेगळं वातावरण तिथं पाहायला मिळालं. आतमध्ये गेलो आणि कुणी आपल्याला पाहिलं तर आपली बदनामी होईल, असं सुरवातीला वाटणाऱ्या धुमाळांना आता मात्र त्या मुलाची काळजी वाटत होती.

नगर ते बीड या मार्गावर जामखेड, सुपा यांसारखी अनेक गावं आहेत; ज्यांच्या आसपास घुंगरांचा आवाज कानावर पडतो. या आवाजाचा नाद करणारेही कमी नव्हते हे बाहेर लागलेल्या व्हीआयपी गाड्यांवरून दिसत होतं...लातूरला मुक्‍काम करून माळेगावच्या यात्रेत गेलो. गेल्या साठ वर्षांपासून येणाऱ्या लोककला केंद्रांची संख्या मोजता येणार नाही एवढी आहे...आतमध्ये जाण्यासाठी तिकीट शंभर आणि दोनशे असं दोन प्रकारचं...आम्ही लावणी ऐकायला बसलो, तिथं दाद देणाऱ्यांची संख्या खूप होती. नाचणाऱ्या बाईच्या हाताला पट्टी लावली आहे, हे मी पहिल्या रांगेत बसल्यामुळं मला दिसलं... कार्यक्रम झाल्यावर मी मागं जाऊन त्या नाचणाऱ्या बाईचा शोध घेत होतो...सोबत काही स्थानिक पत्रकारही होते. सीमा पाटील असं त्या नाचणाऱ्या बाईचं नाव होतं. सलाईनची बाटली काढून ती नाचायला आली होती. गेल्या चार दिवसांपासून ती आजारी होती. काल तिला उठताही येत नव्हतं. "मी आज नाचू शकणार नाही' असं फडमालकाला सांगितल्यावर त्यानं रागानं तिच्या पोटावर लाथ मारली होती. सीमाशी बोलल्यावर कळलं, की तिच्या वडिलांनी या फडाचा मालक जळबा यांच्याकडून उसने पैसे घेतले होते. ते पैसे आता देता येऊ शकत नाहीत म्हणून त्याबदल्यात सीमाला नाचण्यासाठी जळबा या फडात घेऊन आला होता.

मी माळेगावच्या ज्या ज्या लोककला केंद्रांत फिरलो, त्या त्या केंद्रात नाचणाऱ्या बहुतेक महिला दोन वेळच्या जेवणाला महाग होत्या...लावणी पाहणाऱ्या दर्दी मंडळींची संख्या अगदी बोटावर मोजण्याएवढीच. कदाचित या दर्दी माणसांमुळंच ही कला जिवंत असेलही. बाकी तमाशा म्हटलं की बीभत्सपणा हे चित्र कायम पाहायला मिळतं...माळेगावची यात्रा ही लोककला पाहणाऱ्या "हौश्‍यां'ची यात्रा आहे. इथल्या कलांवर जेवढं लिहावं तेवढं कमीच. अलीकडं दर्दी कमी झाले आहेत, ही वस्तुस्थिती मात्र नोंदवायला हवी.

दुसऱ्या दिवशी मुंबईत आलो. सर्वसमावेशक स्टोरी करायची होती. मुंबईत एका नातेवाइकाला घेऊन एका राष्ट्रीय पक्षाचं नाव असणाऱ्या कलाकेंद्रात गेलो...माझ्या सोबत दोनजण होते. आतमधलं वातावरण पाहून जीव कोंडल्यासारखा होत होता. चार माणसं नाचणाऱ्या पोरीवर हात दुखेपर्यंत पैसे उधळत होते...खाली चार-पाच माणसं पैसे वेचत होते. पैसे वेचणाऱ्यांची खूप गडबड चालली होती. पैसे वेचणारे म्हातारे काका पाहून गावाकडं खळं मागायला येणाऱ्या काकांची आठवण झाली. फक्त दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र वेगवेगळे होते. मुंबईच्या काकांच्या टोपल्यात पैशांचं बंडल असलं तरी त्यांच्या चेहऱ्यावर भाव मात्र भीतीचा होता.

गावाकडच्या काकांच्या टोपल्यात मातीमिश्रित धान्य असलं तरी त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद असायचा. मी कोणत्या दुनियेत आहे, हा माझा मलाच प्रश्न पडला होता. तीनशे रुपयांना पाण्याची बाटली आणि पाचशे रुपयांना थंड पेयाची बाटली...अप्सरेसारख्या सुंदर महिला; पण हावभाव एकदम दगडासारखे...कानठळ्या बसतील असे मोठमोठे आवाज...या मोठ्या आवाजापुढं कलेच्या आवाजावर साज चढवणाऱ्या घुंगरांचा "नाद' कधीच दबला होता. परराज्यांतून येणाऱ्या मुलींनी पायात घुंगरं बांधली होती खरी; पण ती कलेसाठी नव्हे तर अनेकांची घरं उद्‌ध्वस्त करण्यासाठी की काय, असं इथलं वातावरण होतं. राज्याचे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे उपकार जेवढे मानावे तेवढे कमीच आहेत. कारण, त्यांनी या वातावरणाला ब्रेक लावण्यासाठी पुढाकार घेतला. या ठिकाणच्या कहाण्या ऐकल्या तर "लैला-मजनू'ही फिके पडावेत! शेवटी इथंही "बाई म्हणजे खेळायची एक वस्तू' अशीच परिस्थिती होती..अनेकांनी बाईच्या नादापायी आपलं सर्व आयुष्य पणाला लावलेलं. इकडच्या दुनियेत सर्व शेट्टी लोकांचं राज्य. घुंगराच्या नावावर केवळ पैसा छापायचा हाच उद्देश! सर्वांच्या साक्षीनं हा "छापखाना' चालतो.

आपण ही सगळी पात्रं पाहिली. हे सर्व जण कलेचे किती उपासक आहेत, हे मी सांगायची गरज नाही...या कलेच्या नावाखाली एका स्त्रीचा वापर मात्र खेळण्यासारखा होतो, हे वास्तव आहे. चार-दोन कलाकार अजून जिवंत आहेत, ज्यांना वाटते ही कला जिवंत राहावी. आणि त्यांच्यावरच तमाशा नावाची कला "तग' धरून आहे.

Web Title: sandeep kale write ghungroo article in saptarang