गर्भ विकणे आहे... (संदीप काळे)

संदीप काळे Sandip98868@gmail.com
रविवार, 23 डिसेंबर 2018

नऊ मुलं घेऊन जाणारी रेल्वेतली आई, संताची आई, बाळाचा व्यवहार करणारी आई आणि त्या व्यवहार करणाऱ्या आईची आई, या सगळ्या "आई' समाजाचे वास्तव दाखवणारे चेहरे आहेत. जिथं भरपूर आहे, तिथं किंमत नाही. जिथं किंमत आहे, तिथं मिळत नाही, असा सगळा मामला. हे सगळं चित्र डोळ्यांत साठवताना मी दगडासारखा झालो होतो. त्या दुनियेतून बाहेर पडलो खरा; पण प्रश्‍नांचं मोहोळ मनात घर करून गेलं...

नऊ मुलं घेऊन जाणारी रेल्वेतली आई, संताची आई, बाळाचा व्यवहार करणारी आई आणि त्या व्यवहार करणाऱ्या आईची आई, या सगळ्या "आई' समाजाचे वास्तव दाखवणारे चेहरे आहेत. जिथं भरपूर आहे, तिथं किंमत नाही. जिथं किंमत आहे, तिथं मिळत नाही, असा सगळा मामला. हे सगळं चित्र डोळ्यांत साठवताना मी दगडासारखा झालो होतो. त्या दुनियेतून बाहेर पडलो खरा; पण प्रश्‍नांचं मोहोळ मनात घर करून गेलं...

सकाळी सहाची वेळ असावी. संताचा फोन आला. ""अरे अजून उठला नाहीस का? काय माणूस तू. सकाळी आठपर्यंत पोचायचं ठरलं होतं ना.'' तिकडून तिचे प्रश्‍न सुरू होते आणि मी कानावर फोन ठेवून "हं... हं...' करत झोपलो होतो. तिचं बोलणं अर्धवट संपून फोन ठेवला आणि तोंडावरून पुन्हा पांघरूण घेतले. धुकं पडलेल्या गुलाबी थंडीच्या वातावरणात झोप म्हणजे सर्वोच्च सुख; पण जायला पाहिजे! कारण अवघड ठिकाणी जायचे आहे, हे पटकन लक्षात आले. उठलो. अवघ्या पंधरा मिनिटांत, लोकल पकडली आणि ठरलेल्या ठिकाणी निघालो...

रविवारचा दिवस, तरीही आपली लोकल अगदी फुल्ल. एक जोडपं आणि त्यांची नऊ मुलं. काही टापटिप तयार झालेली, काही झोपेतच असलेली, काही भुकेच्या मूडमध्ये. मुलं ऐकत नव्हती म्हणून त्या बिचाऱ्या आईची चिडचिड वाढली होती. मुलांचा बाप मोबाईलवर व्हिडिओ पाहत बसला होता. "ती' आई काही काळ मुलांच्या बापाला, तर काही काळ मुलांना दूषणं देत होती. तयार होऊन एवढ्या सकाळी या गर्दीत ती मुलं कशाला आली असतील, सकाळी मुलाच्या तयारीसाठी आई कधी तयार झाली असेल, हा बाप का मदत करत नसावा असे अनेक प्रश्‍न मला पडले. मी एकाला हळूच विचारलं ः ""इतने सुबह कहां जा रहे हो!'' मी ज्याला विचारले तो बेरक्‍या होता. त्यानं गाण्याच्या सुरात सांगितलं ः "मै तो मामा बन गया...' बाजूला बसलेला पोरींचा घोळका त्या मुलाकडं बघून गमतीनं जोरजोरानं हसायला लागला. मी मात्र शांतपणे या परिवाराचा "वेल' मांडवाला कसा गेला, याचा विचार करत होतो. ज्या महिलेच्या कमरेवर वर्षभराचं मूल आहे, तिच्याच मुलीला आज मूल झालं होतं. आज मी ज्या स्टोरीच्या शोधात निघालो होतो, त्या विषयाच्या अगदी उलट हा विषय होता... कसा निसर्ग? सगळे उलट नियम. मुलांच्या आणि त्यांच्या आईच्या बोलण्याचा आवाज, मुलांच्या बापाचा चायनीज मोबाईलचा मोठा आवाज आणि विचाराची तंद्री यात सीएसटी कधी आलं कळलंच नाही. आता मुलांची आई शांत झाली होती; कारण तिच्या पतीच्या मोबाईलची बॅटरी संपली होती. मुलंही उतरायच्या तयारीत होती.

संता स्टेशनच्या बाहेर माझी वाट बघत उभी होती. संता म्हणजे संतोष चव्हाण. मूळचा मराठवाड्यातला. आता पाच वर्षांपासून पूर्ण मुंबईकर. घरी शेतीवाडी, मोठं कुटुंब, घर; पणजोबापासून घरी पाटीलकी. परिवार एकदम हाय प्रोफाईल. दहावीनंतर संताच्या घरच्यांना कळलं, की संता ना पुरुष आहे, ना महिला. घरच्यांनी सर्व इलाज केले; पण निराशा आली. सतत होणारा त्रास. लोकांची बोलणी. जीवन संपवावंसं वाटायला लागलं. दोन वेळा बिकट प्रसंगांना सामोरं जावं लागलं. ज्या दिवशी आईनं साथ सोडली, त्याच दिवशी एका मित्राच्या मदतीनं संतोष मुंबईजवळ "संता' बनून आपल्या नव्या आयुष्याला सुरवात केली. या पाच वर्षांच्या काळात संताच्या आईनं एकही फोन संताला केला नाही. संतानं फोन केला, तर ""आम्ही तुझ्यासाठी आणि तू आमच्यासाठी केव्हाच मेलास,'' असं खुद्द तिच्या आईनंच तिला सांगितलं. मुंबईत तृतीयपंथीयांच्या एका आंदोलनाचं कव्हरेज करायला मी गेलो, तेव्हा संताची ओळख झाली. ""तुला चांगली बातमी देते, चल माझ्यासोबत,'' असं म्हणत संतानं मला बातमीचा विषय सांगितला आणि मी थक्क झालो! संतावर माझा विश्‍वास होता; कारण याअगोदर तिनं असेच अनेक विषय मला सांगून आणि प्रत्यक्ष दाखवून चकित केलंच होतं.

सीएसटीवरून अगदी पंधरा मिनिटांच्या अंतरावर आमची टॅक्‍सी एका गल्लीत जाऊन थांबली. टॅक्‍सीचे पैसे देऊन मागं वळून पाहतो तर संता गायब. दूरवर नजर टाकली, तर संता एका फुलवाल्या मावशीकडून गजरा घेत होती. आसपासचा परिसर वासनेच्या जणू सागरात बुडाला होता आणि त्या सागराला शुद्ध हवा देण्याचं काम त्या गजऱ्यात माळलेली मोगऱ्याची फुलं करत होती. कामाठीपुरा हे नाव सर्वपरिचित. नामदेव ढसाळ यांनी आपल्या "गोलपीठा'मध्ये या परिसराचं खूप वास्तववादी वर्णन केलं आहे. सगळीकडं देहविक्रयाचा बाजार दिसत होता. पोटासाठी रस्त्यावर खाणाखुणा करणाऱ्या आणि लोकांना आपल्या भाषेत "या' म्हणणाऱ्या जवळजवळ सर्व महिला महाराष्ट्रीयन किंवा मराठी नव्हत्याच. त्यांचा पोशाख आणि त्यांचं दिसणं यातही कुठंच महाराष्ट्र दिसत नव्हता. जाता जाता मनातले प्रश्‍न संताला विचारले. तिनं पाठ असल्यासारखी भराभर उत्तरं दिली. "आपण जिकडं चाललो तिकडं काही होणार तर नाही ना,' अशी शंका दोन वेळा मी संताला विचारली; पण तिनं हसून "किती वेडा आहे,' म्हणत माझी नजरेच्या इशाऱ्यातून समजूत काढली. जिथं जायचं होतं तिथं गेलो. घराची बेल वाजली, एक महिला बाहेर आली. तिनं आमचं स्वागत केलं. आम्हाला आत घेतलं आणि दरवाजा धाडदिशी बंद केला. एक आजी पाण्याचा ग्लास घेऊन आली. दुसरी एक महिला चहा घेऊन आली. आमच्याजवळ तीन महिलाच बसल्या होत्या.

संतानं तिथं असणाऱ्या महिलांसोबत जोरदार गप्पा सुरू केल्या होत्या. तिनं आणलेले सर्व गजरे सगळ्यांच्या केसांत कधी जाऊन बसले, हे कळलंसुद्धा नाही. माझ्या बाजूला बसलेल्या आजींना गजरा काही केल्या लावता येईना. शेवटी संता उठली आणि तिनं गजऱ्याची पिन लावून दिली. दहा रुपयांचा गजरा जेवढा आजीबाईंच्या पांढऱ्या केसात खुलला होता त्यापेक्षा जास्त आनंदानं तिचा चेहरा खुलला होता. बाकी घरातल्या कोणत्याही महिलेचं आजीबाईंकडं लक्ष नव्हतं. दोन गजरे उरले, ते संतानं आपल्या आणि माझ्या हाताला बांधले.

संताने बोलायला सुरवात केली... तेवढ्यात माझं लक्ष फोनकडं गेलं. आजी लगेच म्हणाली ः ""तुमचा फोन अगोदर बंद करा.'' मी लगेच फोन बंद केला. संतानंही आपला फोन बंद केला. आजी बाजूला असलेल्या एका मुलीला बंगाली भाषेत काहीतरी चिडून बोलली. त्या मुलीनं आमच्या दोघांजवळचे फोन हातात घेऊन ते बंद आहेत ना याची खात्री करून घेतली. ज्या तीन महिला आमच्या बाजूला बसल्या होत्या, त्यातली एक जण सांगत होती ः ""असंच एकदा एक जोडपं मूल हवं म्हणून विचारपूस करायला आलं आणि त्यांनी आमची बोलणी फोनमध्ये रेकार्ड केली. बाहेर त्यांनी सगळीकडं बोंबाबोंब केली. पोलिसांच्या चकरा वाढल्या आणि त्रासही. तेव्हापासून इथं कुणी आलं, की आम्ही त्यांना अगोदर फोन बंद करायला सांगतो.'' हे सुरू असताना कुणीतरी दरवाजा खडखड वाजवत होतं. शाळेच्या गणवेशात एक गोंडस मुलगी आत आली. आल्या-आल्या तिनं संताला मिठी मारली. त्या शाळकरी मुलीची आई सांगत होती ः ""संतानं हिला शाळेत घातलं.'' आपल्यावर जी वेळ आली, ती या मुलीवर येऊ नये यासाठी तिला शाळेत घालण्याचा संताचा आग्रह होता.

संता मुख्य विषय बोलायला लागली ः ""यांना मूल हवं आहे.'' त्या सर्व महिलांनी माझी चौकशी करायला सुरवात केली. ""तुमच्या बायकोला का आणलं नाही,'' असा त्यांचा प्रश्‍न. माझी आणि संताची ठरलेली कहाणी अगोदरच तयार होती. त्याप्रमाणं मी पटापटा बोलत होतो. सर्वांनी मिळून माझ्यावर प्रश्‍नांचा भडीमार केला. त्या प्रश्‍नांमध्ये दोनच समान धागे होते. एक पैसा आणि दुसरं स्वतःची सुरक्षा. त्या "व्यवहार' करणाऱ्या तिघी मुद्द्यावर आल्या. ""तुम्हाला मूल हवं असेल, तर अगोदर चार लाख रुपये द्यावे लागतील आणि पुन्हा तीन लाख रुपये. बाळ सहा महिन्यांचं होईपर्यंत लागणारा खर्च वेगळा. मुलगा झाला तरी तुमचाच आणि मुलगी झाली तरी तुमचीच. ती तुम्हाला न्यावी लागेल. मुलगी झाली, तर अनेक जण घेऊन जात नाहीत,'' असं त्या सांगत होत्या.

या ठिकाणी सर्व महिला आणि मुलीच का, या प्रश्‍नाचं उत्तर मला मिळालं होते. शेवटी ""तुम्ही संताकडून आलात म्हणून काही पैसे कमी करू,'' असं त्यांनी सांगितलं. ज्या महिला गर्भ विकण्याबाबत माझ्यासोबत "व्यवहार' करत होत्या, त्या सर्व अत्यंत हुशार
होत्या. माझी चोरी केव्हाही पकडली जाऊ शकते, या भीतीनं मी माझा मोर्चा आजीबाईंकडं वळवला आणि त्यांना बोलतं केलं. ""अनेक लोक सर्व मार्ग बंद झाल्यावर आमच्याकडं येतात आणि मग त्यातही मुलगी झाली, की "येतो न्यायला' म्हणतात आणि येतच नाहीत. अगोदर दिलेले पैसे तसेच आमच्याकडं राहतात,'' असं त्या आजीबाई सांगत होत्या आणि मी ऐकत होतो. शेवटी आमचा "व्यवहार' ठरला आणि आम्ही त्या घरातून बाहेर पडलो.

सकाळी दहापासून तीनपर्यंत मी जे काही अनुभवलं, बघितलं होतं ते शब्दांत मांडायला चारशे पानांची कादंबरीही कमी पडेल. पोटचा गोळा विकायची वेळ आईला का येत असावी? हा गुन्हा नाही का? असा राजरोसपणे बाजार?... असे अनेक प्रश्‍न घेऊन मी याच भागातल्या एका मोठ्या पोलिस अधिकाऱ्यांना भेटलो. ते म्हणाले ः ""ही दुनिया वेगळी आहे. इथं कायद्यापेक्षा, तत्त्वापेक्षा, "लोक काय म्हणतील' यापेक्षा भाकरीला आणि ऐषआराम याला अधिक महत्त्व आहे. हे थांबावं यासाठी अनेकदा हालचाली होतात; पण दोन महिन्यांत हा बाजार "जैसे थे' होतो.''

या कहाणीदरम्यान सकाळपासून मला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष खूप पात्रं भेटली होती. नऊ मुलं घेऊन जाणारी रेल्वेतली आई, संताची आई, माझ्यासोबत बाळाचा व्यवहार करणारी आई आणि त्या व्यवहार करणाऱ्या आईची आई, या सगळ्या "आई' समाजाचे वास्तव दाखवणारे चेहरे आहेत. जिथं भरपूर आहे, तिथं किंमत नाही. जिथं किंमत आहे, तिथं मिळत नाही, असा सगळा मामला. हे सगळं चित्र डोळ्यांत साठवताना मी दगडासारखा झालो होतो. त्या दुनियेतून बाहेर पडलो खरा; पण प्रश्‍नांचं मोहोळ मनात घर करून गेलं. ते अजून तसंच आहे!

Web Title: sandeep kale write mother article in saptarang