नाही चिरा...नाही पणती... (संदीप काळे)

sandeep kale
sandeep kale

असे कितीतरी रम्या आणि जित्या इथल्या वस्त्यांमध्ये आढळून येतात. रम्या, रम्याची आई, रम्याचा अप्पलपोट्या बाप, जित्या...अशी कितीतरी पात्रं.
एकदा तरी जिवाची मुंबई करावी, अशी हौस जवळपास सगळ्यांनाच असते. अनेकजणांची ती हौस कधी ना कधी भागतेही... पण हीच जिवाची मुंबई अनेकांचा जीव घेते, अनेकांचा जीवनरस शोषून घेते हेही वास्तव आहे.

मुंबईमधलं ऊन्ह यंदा दुष्काळी भागापेक्षा अधिक चटचटू लागलंय. कालिना विद्यापीठातलं माझं काम आटोपून मी कुर्ला स्टेशनकडं निघालो. उन्हाची तमा न बाळगता सतत वाहत राहणारी, मुंग्यांसारखी वाहतूक मुंबईत अशा दुपारीही कायम होती.

"सिग्नल-दर-सिग्नल'चा प्रवास करत मी कुर्ला स्टेशन गाठलं. दुपारच्या वेळी जरा गाड्यांचा वेग कमीच होता. रेल्वेरुळाच्या मधोमध दोन मुलं - साधारणत: दहा-अकरा वर्षांची असतील - पाण्याच्या रिकाम्या बाटल्या वेचून त्या आपल्या पाठीवरच्या पोत्यात भरत होती. माझं लक्ष त्यांच्याकडं गेलं. आजूबाजूनं भॉं-भॉं करत लोकल गाड्या पुढं जात होत्या. त्या गाड्यांची भीती त्या मुलांना नव्हतीच. बाटल्या शोधण्याचं आणि त्या पोत्यात भरण्याचं त्यांचं काम मी माझी नजर पोचत होती तिथपर्यंत बारकाईनं पाहत होतो. बेलापूरला जाणारी माझी गाडी येऊन थांबली होती आणि निघूनही गेली; पण मी काही गाडीकडं लगबगीनं धावलो नाही. माझं लक्ष त्या बाटल्या वेचणाऱ्या मुलांकडंच अजूनही होतं. ऊन्हानं, पाण्यानं आणि भुकेनं व्याकुळ होऊन काम करणारी ती दोन छोटी छोटी मुलं मला दिसत होती.
आता आसपासच्या रिकाम्या बाटल्या किंवा प्लास्टिकच्या वस्तू संपलेल्या होत्या. मुलांचं वेचण्याचं काम संपलेलं होतं.

ती मुलं स्टेशनवर आली. प्लास्टिकच्या बाटल्यांनी अर्धी भरलेली पोती त्यांनी एका नळाजवळ ठेवली आणि नळ सुरू केला; पण नळाला पाणीच नव्हतं. मुंबईतल्या कुर्ला स्टेशनची ही अवस्था. मी ज्या फूड स्टॉलसमोर थांबलो होतो, तिथं ती मुलं आली आणि फूड स्टॉलवरच्या भैयाकडं पाणी मागू लागली. त्यांना पाहताच भैया एकदम चिडला : "क्‍या तुम्हारी किरकिर रोजकीच...क्‍या तुम्हारे बाप ने इधर पानी रखा है?'
बिचारे दोघं निराश होऊन दोन पावलं मागं आले. मुंबईतल्या अनेक भैयांचा हा चेहरा आहे. माणुसकी दाखवणं हे त्यांना दरवेळी जमतंच असं नाही. काही चांगले असतीलही...
मी थोडा पुढं गेलो आणि भैयाला म्हटलं : ""क्‍यूँ...? क्‍या हुआ? दो ना पानी उनको...''
""साहब, इन का रोजकाच है... दिन में दस बार आते है... मैं मेरा गिरायिक करूँ या इन को पानी दूँ?''
मी शंभराची नोट भैयापुढं केली आणि पाण्याची एक बाटली घेऊन त्या दोघांना दिली. त्याबरोबर पठ्ठ्यांनी ती अर्धी अर्धी करून संपवून टाकली. एवढं पाणी त्यांना पुरेसं झालेलं नाही, हे माझ्या लक्षात आलं. मी आणखी एक बाटली घेतली आणि त्यांना दिली. तीही बाटली त्यांनी संपवून टाकली. एकेक वडा-पाव त्यांच्या हातात ठेवत मी म्हणालो : ""कुठले रे तुम्ही... इथलेच का?''
तर दोघंही एकमेकांकडं बघत म्हणाले : ""हो, साहेब...''
वडा-पाव देणारा भैया मध्येच म्हणाला: ""साहब, इन दोनों को ही कल पुलिस ने मारा था...''

मी भैयाच्या बोलण्याला कुठलंही उत्तर न देता शांतपणे त्या मुलांकडं पाहत होतो. भुकेल्या मुलांनी अवघ्या दोन मिनिटांत वडा-पाव संपवला. मी साध्या ड्रेसमध्ये असलेला पोलिसच आहे, असं त्या दोघांना वाटलं.
त्या मुलांना कसं बोलतं करावं, असा मला प्रश्न पडला. मी त्यांना म्हणालो : ""काल तुम्हाला पोलिसांनी का मारलं होतं?''
अर्धी हिंदी आणि अर्धी मराठी अशी त्या दोघांची भाषा होती. ते म्हणाले : ""काल पाकीटचोरीच्या दोन-तीन तक्रारी पोलिस स्टेशनमध्ये आल्या होत्या, त्यामुळे पोलिसांनी रेल्वे स्टेशनवर वावरणाऱ्या अनोळखी माणसांना धरून जोरदार चोप दिला. मग त्यात भिकारी आले, कचरा वेचणारे आम्ही आलो आणि वेडेही आले.''
मी विचारलं : ""तुम्ही राहता कुठं?''
ते म्हणाले : ""इथून थोडंसं पुढं गेलो की आम्ही एका वस्तीमध्ये राहतो.''
गप्पांमध्ये दोन्ही पोरं चांगलीच खुलली होती.
ते राहतात कुठं, त्यांच्यासोबत कोण कोण आहे, या वेचलेल्या मालाचं ते करतात काय, त्यांचा दिनक्रम चालतो कसा अशा किती तरी प्रश्नांची उत्तरं मला त्यांच्याकडून आणि त्यांच्या पालनकर्त्यांकडून हवी होती. एकाचं नाव रम्या आणि दुसऱ्याचं नावं जित्या. जेव्हापासून त्यांना कळायला लागलंय तेव्हापासून ते दोघं सोबतच आहेत. लहान असताना सुरवातीला भीक मागण्याचं काम आणि आता जरा मोठे झाल्यावर प्लास्टिक आणि बाटल्या वेचायचं काम हे दोघं करत आहेत. कुर्ल्याहून मुंबईच्या दिशेनं आम्ही चालत चालत निघालो. दुपारची वेळ... रेल्वेरुळाचा चरचर करणारा आवाज कानात घुमत होता. रम्या आणि जित्या या दोघांच्या पायात काहीच नव्हतं. दोघांच्याही चड्ड्या गुडघ्यापर्यंत...फाटलेल्या. जेमतेम अंग झाकलं जाईल असे कपडे आणि त्यांना सर्वात प्रिय असलेलं त्यांच्या पाठीवरचं रिकाम्या बाटल्यांचं ते पोतं. एवढंच त्या बिचाऱ्यांचं विश्व! मी सोबत असतानासुद्धा त्या दोघांची मस्ती चालली होती. पायांनी छोटे छोटे दगड पुढं पुढं ढकलण्याचा त्यांचा खेळ सुरू होता. कुणाचा दगड लांब जातोय, अशी त्यांची स्पर्धा चालली होती.
त्यांच्याकडून अपेक्षित माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या या हसऱ्या-खेळत्या मूडमधून त्यांना जरा गंभीर मूडमध्ये नेण्याचा प्रयत्न मी करू लागलो...पण शेवटी लहान मुलंच ती...

***

रेल्वेरूळ ओलांडून आम्ही थोडंसं खालच्या दिशेनं निघालो. तिथली झाडंझुडपं वाढलेली होती. आजूबाजूला असलेल्या तृतीयपंथीयांचे इशारे माझ्या लक्षात येत होते. खाली पोचलो आणि एका मोडक्‍या-तोडक्‍या कंपाउंड वॉलचं गेट आम्ही वाजवलं...
एका म्हाताऱ्या बाईनं दरवाजा उघडला. आम्ही कंपाउंडच्या आत गेलो. कुठून कुठून गोळा करून आणल्या गेलेल्या बाटल्यांचं वजन करण्यात माणसं गुंतलेली होती. आतमध्ये सर्वत्र हेच चित्र होतं. पाण्याच्या बाटल्यांबरोबरच प्लास्टिकच्या इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या चिकार वस्तू तराजूंमध्ये तोलण्याचं काम सुरू होतं. तेच मोजलेलं सगळं प्लास्टिक दुसरीकडं एका ट्रकमध्ये भरलं जात होतं. वय वर्ष सात ते वीस यादरम्यानची किमान तीसेक मुलं-मुली तरी तिथं असावीत. त्यांच्या कपड्यांवर, अंगावर आणि केसांवर कमालीची धूळ होती; पण चेहऱ्यावर आनंद मात्र भरपूर होता. ज्या आजीबाईंनी दरवाजा उघडला त्या रम्याला म्हणाल्या : ""ऐ, ये कौन लाया साथ में?''
तर रम्या म्हणाला : ""ये एक साहब है...और हम क्‍या करते है वो देखने के लिए आए है।''
म्हातारी जरा खवट होती...
ती पुढं रम्याला म्हणाली : ""तेरी क्‍या शादी है, जो इधर तेरी बारात में नाचने के लिए इस को लाया? चल रख, उधर रख तेरा सामान...''
आणि तिनं त्या दोघांना सामान ठेवण्यासाठी अन्यत्र पाठवलं.
म्हातारीनं एका ओळीत मला स्पष्टीकरण दिलं.
ती म्हणाली : ""देखो भैया... आप कौन हो ये मुझे पता नही...ये सुलतानभाई का कारोबार है। बच्चों से माल लेना और बेचना। मै सिर्फ यहॉं काम देखती हूँ। पिछले महीने ऐसा ही एक साहब आया था पुलिस को ले के, जो मुझे और सारे बच्चों को उठा के पुलिस स्टेशन ले के गया। हुआ कुछ भी नही...लेकिन आधा दिन बेचारे बच्चों को पुलिस स्टेशन में गुजारना पडा।'' आजीबाईंना मी माझी ओळख दिली. मी पोलिस खात्यातलाही नाही की "मानवाधिकार'वालाही नाही, अशी त्यांची खात्री मी पटवली. माझं बोलणं आजीबाईंना पटल्यावर त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मला तशी तहान लागलेली नव्हती; पण मी त्यांना "पानी मिलेगा क्‍या?', असं विचारलं. एका डेरेदार झाडाखाली मोठा रांजण पाण्यानं भरलेला होता. त्या रांजणातलं पाणी त्यांनी मला दिलं. मी पाणी पीत असताना आजीबाई माझ्या तोंडाकडं पाहत असल्याचं मला जाणवलं. इथल्या पाण्याची चव खूप चांगली आहे हे दोन-तीन घोट प्यायल्यावर माझ्या लक्षात आलं.
बाजूलाच एक खाट होती, त्या खाटेवर मी बसलो आणि सगळा माहौल एकदा नीट निरखून-न्याहाळून घेतला.
आजीबाईंशी पुन्हा बोललो, मुलांशी बोललो. नंतर सुलतानशेठ आले तेव्हा त्यांच्याशीही बोललो.
इथला सगळा खेळ दोन वेळची रोटी मिळावी यासाठी चाललेला होता. इथं असणाऱ्या बहुतांश मुलांना माहीतच नाही की आपले आई आणि वडील कोण? ज्यांना आई-वडील आहेत त्यांना माहीत नाही की आई-वडील कशासाठी असतात? ज्यांना आई-वडील नाहीत त्यांनी कमावलेले चार पैसे त्यांच्याच खिशात राहतात आणि ज्यांना आई-वडील आहेत त्यांनी कमावलेली थोडीतरी रक्कम आई-वडिलांना मिळत असेल. सगळ्या मुलांना सगळी व्यसनं असतील, मिळालेल्या पैशातून वेगवेगळ्या व्यसनांतून मनसोक्तपणे आनंद लुटायचा हे त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं ध्येय असेल, असं मला वाटलं होतं. जुगाराचा अड्डा बाजूलाच, वेश्‍याव्यवसाय बाजूलाच, दारूचा अड्डा बाजूलाच...अशा सगळ्या अड्ड्यांनी घेरलेला हा प्लास्टिक विकण्याचा अड्डा मला सगळ्यात चांगला वाटू लागला. या अड्ड्यांमध्ये माणूस जेव्हा काम करून वयाची शेवटची वर्षं मोजत असतो, त्या वेळेला इथं त्याला कोणतीच किंमत नसते. त्यांपैकीच मघाच्या त्या आजीबाई होत्या. या सगळ्यांच्या जेमतेम शिक्षणाचा, व्यवहाराचा आणि व्यवसायाचा संबंध फक्त पैशाशीच. पैसाच महत्त्वाचा, असं तिथल्या गरिबीचं एकंदर चित्र.

सुलतानभाई म्हणाले : ""मुंबईमध्ये ऐसा हमारा छोटा छोटा चौकी के उपर काम चलता रहता है।'' सुलतानभाईंच्या सांगण्यामुसार मुंबईमध्ये जर त्यांचं एकट्याचं काम सुरू असेल, तर रम्या आणि जित्यासारखी किती मुलं तिथं काम करत असतील, असा मला प्रश्न पडला. तिकडं मुंबईला आपण खूप सांस्कृतिक, खूप गतिमान, खूप वेगळी मुंबई असं म्हणत असतो; पण दुसरीकडं सुलतानभाईंसारख्यांच्या अड्ड्यांत मुंबईमध्ये छोट्या मुलांचं आयुष्य गंजून चाललेलं असतं. ही अधोगतीच्या दिशेनं पडणारी भविष्यातल्या मुंबईची पावलंच म्हणायची का?
रम्या आणि जित्या मला सांगू लागले : ""एक दिवस जरी आम्ही काम केलं नाही तर उपाशी झोपल्याशिवाय आमच्यापुढं पर्याय उरत नाही. एकीकडं उपाशी झोपावं लागतं आणि दुसरीकडं, पैसे का आणले नाहीत म्हणून आई-वडिलांचा बेदम मारही खावा लागतो. कधी कधी तर माल विकायला आणला नाही म्हणून सुलतानभाईंच्या माणसांचा चपलेनंही मार खावा लागतो.''
ही सुकुमार आणि निरागस असलेली मुलं आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराबद्दल मनापासून बोलत होती. बाजूला बसलेल्या आजीबाई सगळं निमूटपणे ऐकत होत्या. कारण, तो मार यापूर्वी आजीबाईंनाही कुठल्या ना कुठल्या तरी कारणानं बसला होता. रम्या जित्यासाठी आणि जित्या रम्यासाठी काहीही करायला तयार, एवढं दोघांचं एकमेकांवर प्रेम...मला "गुंडे' या सिनेमाची आठवण झाली...आयुष्य अन्‌ सिनेमा एकमेकांवर किती बेतलेले असतात याची प्रचीती आली. तिथल्या सगळ्यांची कैफियत काही फारशी वेगळी नव्हती. मी निघालो आणि जित्या आणि रम्या मला सोडायला आले. फूटपाथच्या शेजारी झाडाखाली एक पेटी ठेवलेली होती आणि बाजूला एक महिला रस्त्यावर तीन दगडांवर चूल मांडून संसार करत होती. ती रम्याची आई होती आणि ती सामानानं भरलेली पेटी म्हणजे रम्याचं घर! भीक मागताना रम्याला लहानपणी जित्या भेटला आणि ते दोघं आता एकत्र राहतात...रम्यानं पेटी उघडली आणि काळवंडून गेलेला व धुळीनं माखलेला एक फोटो त्यानं त्या पेटीतून बाहेर काढला आणि मला तो म्हणाला : ""हा आमचा चार वर्षांपूर्वीचा फोटो बघा...''
बाजूला रम्याची आई स्वयंपाक करत होती. रस्त्यावर अंथरलेल्या कागदावर दोन भाकरी दिसत होत्या आणि एक भाकरी तव्यावर भाजली जात होती. तितक्‍यात एक माणूस तिथं आला. रम्यानं सांगितलं :
""हा माझा बाप आहे...''
त्या माणसाला धड बसताही येत नव्हतं...किमान चार दिवस तरी तो उपाशी असावा. काही वेळातच त्यानं तिन्ही भाकऱ्या संपवून टाकल्या. ते दोघं आईच्या चेहऱ्याकडं पाहत होते आणि मी त्या तिघांच्या चेहऱ्यांकडं! ढेकर देणारा बाप लिंबाची काडी मोडून दातात घालत होता...
मी एका रिक्षाला हात दाखवला. रिक्षा माझ्या बाजूला येऊन थांबली... ते दोघंही माझ्याकडं अपेक्षेनं पाहत होते. त्यांना "बाय' म्हणून लगेच निघालो. त्या दोघांचे भुकेले चेहरे माझ्या डोळ्यांपुढून जात नव्हते.
असे कितीतरी रम्या आणि जित्या इथल्या वस्त्यांमध्ये मी पाहिले आहेत. रम्या, रम्याची आई आणि त्याचा अप्पलपोट्या बाप, जित्या... या पात्रांनी खरी लोकशाही माझ्या डोळ्यासमोर उभी केली होती. एकदा तरी जिवाची मुंबई करावी, अशी हौस जवळपास सगळ्यांनाच असते. अनेकजणांची ती हौस भागतेही; पण हीच जिवाची मुंबई अनेकांचा जीवही घेते, अनेकांचा जीवनरस शोषूनही घेते हेसुद्धा वास्तव आहे आणि ते अधोरेखित व्हायला हवं.
या अशा अनेक कहाण्या इथं घडतात...बिघडतात... "नाही चिरा, नाही पणती' अशा पद्धतीनं संपूनही जातात, एवढंच...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com