दाटून आलेलं पोरकेपण (संदीप काळे)

sandeep kale
sandeep kale

नांदेडजवळ नेरली कुष्ठधाम ही संस्था आहे. कुष्ठरोगातून बाहेर पडलेली जवळपास तीस जोडपी इथं राहतात. त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक त्यांना जवळ करायला तयार नाहीत. या ज्येष्ठांचा आजार कमी झाला; पण समाजाचं मानसिक अनारोग्य तसंच आहे. या ज्येष्ठांना घराची दारं बंद झाली आहेत. त्यांना गरज आहे ती नात्याच्या ओलाव्याची; पण तो ओलावा काही त्यांना मिळत नाही.

रविवारी मित्र गिरीश जाधव यांच्या आग्रहास्तव नांदेडजवळच्या पासदगावला गेलो. सकाळी गिरीश यांनी बाहेर फिरायला नेलं. फिरताफिरता नेरली गाव कधी आलं कळलंच नाही. एका फूलशेतीत गुलाबांना फार बहर आला होता. खूप कष्टांनी ही गुलाबाची शेती केलीय, हे जाणवत होतं. त्याच शेतात चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं असलेले आजी-आजोबा शिवाजी महाराजांचा पोवाडा तल्लीनपणे म्हणत होते. या दोघांनाही हाताची आणि पायाची अर्धी बोटं नव्हती. आम्ही दोघं त्यांच्याजवळ जाईपर्यंत त्यांना कळलंही नाही. आम्ही त्यांच्याजवळ गेलो, त्यांच्याशी बोललो. ""आजी-आजोबा, या वयातही तुम्ही किती काम करता. शेती खूप छान करता, किती शेती आहे तुमची?'' आजोबा म्हणाले ः ""ही आमची शेती नाही हो, आम्ही इथं काम करतो. पोटाला चार घास मिळावेत यासाठी.'' गुलाबांनी भरलेली टोपली उचलत आजी म्हणाली ः ""तुम्ही कुठले? यापूर्वी तर तुम्हाला इथं कधी पहिलं नाही.'' गिरीश मध्येच म्हणाले ः ""अहो, आम्ही बाजूच्या पासदगावचे. फिरतफिरत आलो इकडं. कुणाची शेती आहे ही?'' आजी बाजूला हात करत म्हणाल्या ः "" "नेरली कुष्ठधाम' या संस्थेची.'' पुन्हा आजोबांचा आणि माझा संवाद सुरू झाला. बोलतबोलत आम्ही त्यांच्या राहायच्या जागेपर्यंत पोचलो. तीसच्या आसपास जोडपी असतील. सगळे पंचावन्न ते पंचाऐंशीच्या घरातले. सगळे कामात व्यग्र होते. आम्ही गेलो आणि तिथं मध्यभागी असलेल्या ओट्यावर बसलो. जी आजी शेतात गुलाब तोडायचं काम करत होती, त्या आजीनं तीन बोटांत ग्लास पकडून आम्हाला पिण्यासाठी पाणी दिलं. "चहा घ्या- नाही तर फराळ करा,'' पाठीमागून आजोबांचा आवाज आला. ""काहीही नको,'' असं म्हणून आम्ही एकमेकांच्या तोडांकडं पाहत होतो. त्यांच्या लक्षात आलं आणि चेहऱ्यावर खिन्नता पसरली. आम्ही कशीबशी त्यांची समजूत काढली. इतक्‍या सकाळी मला खाण्याची सवय नव्हती. आमच्या मनात तसं काहीच नव्हतं; पण त्यांच्या मनात मात्र नको ते अगदी घट्ट रुतून बसलं होतं. आजी पुन्हा घरात गेल्या आणि चिकू घेऊन आमच्यासमोर बसल्या. आम्ही खाण्यास सुरवात केली, हे पाहून सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर आनंदाची छबी पाहायला मिळाली. आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि बघताबघता सर्व वयस्कर मंडळी माझ्या बाजूला येऊन बसली.

नेरली कुष्ठधाम ही गेल्या चाळीस वर्षांपासून सुरू असलेली, कुष्ठरोग्यांवर उपचार करणारी, सेवाभावी लोकांनी एकत्रित येऊन सुरू केलेली संस्था. आजारानं त्रस्त असणारी, हजाराच्या वर जोडपी इथं होती. शिवाय हजारपेक्षा अधिक रुग्ण इथून बरे होऊन गेले. काही दगावले, काही आजार बरा झाला म्हणून आपल्या घरी गेले. आता या ठिकाणी तीसच्या जवळपास जोडपी आहेत. या सर्व जोडप्यांचे आजार पूर्णपणे कमी झाले आहेत, तरीही नातेवाईक त्यांना घरी नेण्यासाठी तयार नाहीत, ही आजारापेक्षाही इथली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. त्यांच्या कुटुंबीयांना वाटतं, की हा आजार आपल्या मुलाबाळांना किंवा आपल्याला होईल... म्हणून ते आपल्या आई-वडिलांना इथंच टाकून गेले आहेत. दिवाळी, दसरा असो वा लग्नकार्य... या आजारातून बाहेर आलेल्या लोकांसाठी कुठंही प्रवेश नाही. त्यांच्या नातेवाईकांनीही त्यांना अक्षरशः वाळीतच टाकलं आहे. सोन्यासारख्या भरलेल्या संसारात हे सहभागी होऊ शकत नाहीत, याचं कारण कधीकाळी त्यांना एका आजारानं ग्रासलं होतं. त्यातून ते आता पूर्णपणे बाहेर आले आहेत. त्यांचा आजार कमी झाला; पण समाजाच्या मानसिक अनारोग्याचे काय? आपल्या आई-बाबांना अशी वाऱ्यावर सोडणारी मुलं कशी असतील? रक्ताची नाती इतकी पातळ कशी होत जातात? आम्ही दोघंही अगदी सुन्न झालो! काय बोलावं कळेना.

दोघा जणांचा मुलगा तर डॉक्‍टर आहे. आता डॉक्‍टरची ही मानसिकता, तर बाकीच्यांचं काय? विचारायलाच नको. एक-दोन कुटुंबं अशी होती, की पतीला आजार असल्यानं पत्नी त्याच्यासोबत राहिली. आपल्या पतीला वाऱ्यावर सोडणार नाही, हा विडाच जणू तिनं उचलला होता. आमच्यासमोर बसलेली सगळी मंडळी नाना तऱ्हेची होती. कोणाला पाय नाही, कोणाला हात नाही, कोणाच्या पायाची; तर कोणाच्या हाताची बोटं गेली होती. कोणाचं नाक मधूनच दबलेलं, तर कोणाचा चेहरा दबलेला. कोणाला काहीतरी शारीरिक आजार कुष्ठरोगामुळं जडलेलेच होते. या सर्वांनी आपलं आयुष्य अगदी उपभोगलं होतं. आता यांना गरज होती, ती नात्याच्या ओलाव्याची; पण तो ओलावा काही यांना मिळत नव्हता.

नेरली कुष्ठधामच्या माध्यमातून कुष्ठरोग्यांना सरकारच्या माध्यमातून आणि ट्रस्टच्या सहकार्यातून चार पैसे मिळायचे, त्यातून या सगळ्या आजारी असलेल्यांचा उदरनिर्वाह व्हायचा. ज्या दिवशी हा आजार बरा झाला, त्या दिवसापासून सरकारनं या कुष्ठरोग्यांच्या नावानं देण्यात येणारं अनुदान बंद करून टाकलं. सरकारनं सूचना केल्या, की "आता हे कुष्ठरोगी बरे झाले आहेत, त्यांना आपापल्या घरी पाठवा, आपण यांची व्यवस्था करू शकत नाही.' या ज्येष्ठांच्या मनात एक वेगळं पोरकेपण दाटून आलं. नेरली कुष्ठधामाच्या संस्थाप्रमुखांनी सगळ्यांच्या घरी निरोपही धाडले; पण तीसच्या आसपास आई-बाबांना त्यांच्या मुलांनी आपल्या घरी नेलंच नाही. मग जे नेरली कुष्ठधाम चालवायचे, त्यातल्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्वत:ची पदरमोड करून या लोकांना दोन वेळचं जेवण मिळेल यासाठी पुढाकार घेतला. ज्यांना काम करणं शक्‍य आहे, त्यांच्या माध्यमातून नेरली कुष्ठधामाच्या नावावर असलेल्या काही जमिनीमध्ये त्यांच्या हातून काम करून घ्यायचं, त्या जमिनीमधून मिळालेलं थोडंबहुत उत्पन्न, काही देणगीदारांच्या माध्यमातून मिळणारे पैसे, यातून लोकांच्या उदरनिर्वाहाचा गाडा हाकला जातोय; पण त्यावर फार काही होत नाही. इतक्‍या माणसांना दैनंदिन जगण्यासाठी खर्च येतोच. तो खर्च कसा काढायचा, हा प्रश्न सध्या संगोपन करणाऱ्या प्रमुख लोकांसमोर उभा आहे. बाबा आमटे यांनी अशाच बोटं झडलेल्या माणसांच्या माध्यमातून आनंदवन, सोमनाथ इथं नंदनवन फुलवलं. ज्या लोकांना आपल्या माणसांनी टाकलं, त्या लोकांना बाबांनी आपलंसं केलं होतं. आता या लोकांसाठी इथले अनेक जण बाबा आमटे बनून समोर आले होते...

आम्ही त्या सर्वांमध्ये समरस झालो. त्यामुळे ते सर्व जण अधिक खुलून आमच्याशी बोलत होते. आम्हाला खाण्यासाठी चिकू घेऊन आलेल्या आजी सांगत होत्या ः ""गेल्या तीस वर्षांमध्ये मुलगा दोन वेळा भेटायला आला. त्याचं लग्न कधी झालं, त्याला मुलंबाळं कधी झाली, हे आम्हाला कधीही सांगितलं नाही. गेल्या महिन्यामध्ये सूनबाई आणि दोन नातू भेटायला आले. "मुलगा का आला नाही,' असं तिला विचारल्यावर सूनबाईनं सांगितलं ः "ते मागच्या महिन्यातच वारले.''' पोटचा गोळा आपल्याला सोडून जातो आणि महिनाभरानंतर कळतं, यापेक्षा आयुष्यात आणखी वाईट काय असेल? अशा अनेक वेदना देणाऱ्या वार्ता या सगळ्यांच्या माध्यमातून आमच्या कानावर पडत होत्या. सगळे नाश्‍ता करायला बसले. आम्हीही त्यांच्या पंक्तीमध्ये बसलो. पोहे आणि याच लोकांनी पिकवलेल्या बागेतून तयार झालेली फळं नाश्‍त्यासाठी होती. नाश्‍ता झाला आणि आम्ही आसपासच्या लोकांशी बोलत बसलो. याच लोकांपैकी काही जण शेती करत होते- जी ट्रस्टची होती. आम्ही ती शेती पाहायला गेलो. सोयाबीन, ज्वारी, भाजीपाला यांची ही शेती होती. हाताला बोटं नसलेली आणि तारुण्याचा लवलेशही नसणारी माणसं इतकी छान शेती पिकवत होती, की त्यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. नेरली कुष्ठधामपासून एक-दोन किलोमीटर अंतरावर बरीचशी गावं आहेत; पण त्या गावांतले लोकही या लोकांना फार आपलं मानत नाहीत.

केवळ शेतीकामच नाही; तर काही वेगवेगळ्या वस्तूसुद्धा हे लोक तिथं बनवत होते. नेरली कुष्ठधामला भेटण्यासाठी आलेले अनेक जण त्या वस्तू खरेदी करतात. अलीकडं तिथं येऊन लहान मुलांचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस साजरे करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या माध्यमातून या ज्येष्ठांच्या पोटात चार घास जातात खरे; पण हे चार घास उद्या मिळतील की नाही, याची शाश्वती मात्र त्यांना नाही.

आम्ही सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून जाण्यासाठी निघालो. खरं तर पाऊल पुढं पडत नव्हतं. मायबापागत माया करणारी ही म्हातारी माणसं स्वतःचं पोरकेपण विसरून दुसऱ्याला जीव लावत होती. त्यांना सोडून जाणं आमच्या जीवावर आलं होतं. दोन-तीन आजीबाईंनी गराडा घातला. कोणी गालावरनं हात फिरवत होतं, कोणी पाठीवरनं हात फिरवत होतं. ""परत ये बाबा भेटायला'' असं सांगत होत्या. मन विषण्ण होत होतं. आई-बाबा, मग ते कुठलेही असोत; आपल्या लेकरांवर जीवापाड प्रेम करतात; पण ते आपल्या लेकरांना का कळू नये, या प्रश्नाचं उत्तर मलाच मिळत नव्हतं.
बाहेर पडतो तोच हर्षद शहा नावाचे सामाजिक कार्यकर्ते समोर आले. त्यांच्यासोबत इतर दोन माणसं होती. त्यांच्या डोक्‍यावर इतर सामान होतं. त्या सामानामध्ये या लोकांसाठी पांघरुणं होती. हर्षद शहा यांच्यासोबत गप्पा सुरू झाल्या. त्यातून बऱ्याच गोष्टी समोर आणल्या. हर्षद शहा ज्या पोटतिडकीनं सगळं सांगत होते, त्यातून एक गोष्ट जाणवत होती, की या लोकांना मदत करण्यासाठी दाते म्हणून असणारे हात पुढं आले पाहिजेत. अलीकडं स्वतःच्याच आई-वडिलांना मदत करण्याची मानसिकता लोकांमध्ये नाही; तिथं दुसऱ्याच्या आई-वडिलांना मदत कशी होईल, हाही प्रश्न होताच होता.

नेरलीचं सुन्न करणारं वातावरण पाहिलं आणि आम्ही दोघंही जड अंतःकरणानं पासदगावच्या दिशेने निघालो. आपल्याच माणसांपासून तुटून गेलेल्या त्या अश्राप जीवांबाबतचे विचार आम्हाला गलबलून टाकत होते. आपल्या लोकांमध्ये परतणं आता त्यांच्या नशिबात नव्हतं. ही तुटलेपणाची भावना त्यांच्या प्रत्येक सुरकुतीतून डोकावत होती. आम्हा दोघांच्या नजरेसमोरून ते चित्र हलत नव्हतं... किती तरी वेळ आणि किती वेळा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com