मरण जगवतं! (संदीप काळे)

sandeep kale
sandeep kale

श्‍याम आणि सतीश हे दोघं ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, तो समाज अत्यंत हुशार आणि संपन्न आहे, असं मानलं जातं. मात्र, तो हुशार आहे; पण संपन्न नाही, याची जाणीव पहिल्यांदा झाली ती श्‍याम आणि सतीश यांच्यामुळं.

माझा भाऊ परमेश्वर काळे नाशिकला इंजिनिअर आहे. त्याला जगण्यातले बारकावे खूप कळतात. परवा सकाळीच त्याचा फोन आला. मला म्हणाला ः ""अरे भाऊ, नाशिकला ये. तुला "ऑफबीट' आयुष्य जगणारी माणसं मला दाखवायची आहेत.'' नाशिकला पोचलो. आम्ही ठरवून बेत केल्याप्रमाणे सकाळी नदीकाठी असलेल्या मंदिरात बसून राहिलो, कुणाची तरी वाट पाहत...
गोदाकाठी असलेल्या नाशिक शहराला मोठा इतिहास तर आहेच; पण त्याचबरोबर ही नदी अनेकांच्या पोटापाण्याची व्यवस्थाही शतकानुशतकं करत आली आहे.
सकाळचे नऊ वाजले असतील. आम्ही दोघं ज्या मंदिरात बसलो होतो, तिथं दोन मुलं खांद्यावर एक बॅग घेऊन आली. त्यांनी बॅग नदीच्या काठावर ठेवली. कपडे काढले आणि त्या गढूळ पाण्यात ते उतरले. आम्ही त्यांच्याकडं लक्षपूर्वक पाहत होतो. पाण्यात ते काहीतरी शोधत होते. थोड्या वेळानं लक्षात आलं की चिल्लर-खुर्दा, कपडे, ग्लास, वाटी, नारळाची करवंटी असं बरंच काही एकेक करून बाहेर काढून ते काठावर एके ठिकाणी जमा करत होते. त्यांनी काढून ठेवलेल्या त्या सामग्रीजवळ, चीजवस्तूंजवळ मी उत्सुकतेनं जाऊन बसलो. तेवढ्यात ते दोघं माझ्या अंगावर आल्यासारखे येत म्हणाले ः ""हे सगळं आमचं आहे. इथं तुम्ही काय करता...? आम्हाला माहीत आहे तुम्हाला कुणी पाठवलंय ते. त्यांना सांगा, उगाच आमच्याशी पंगा घेऊ नका. महागात पडेल.''

- मी पुन्हा त्यांना शांत आवाजात म्हणालो ः ""अहो दादा, मला कुणीही पाठवलेलं नाही. तुम्ही काय करताय हे पाहण्यासाठी मी इथं आलोय.'' - माझा शांतपणा पाहून त्यांच्या लक्षात आलं की
ते समजत होते तो मी नसून मी दुसराच कुणीतरी आहे ते. आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली.
ते म्हणाले ः ""थोडंसं थांबा, आम्ही आणखी एक राउंड पाण्यात मारतो. तोपर्यंत तुम्ही इथून कुठं हलू नका. आम्हाला वेळ लागेल. आमच्या या वस्तू वगैरे कुणीतरी घेऊन जाईल.''
त्यांनी पुन्हा गोदावरीत उड्या मारल्या. पूर्ण गोदावरी पार करत ते पलीकडल्या दिशेला गेले. मला दुरून ते सगळं चित्र दिसत होतं. ते कुणाशी काहीतरी बोलत होते, हातवारे करत होते. तिथंही त्यांच्यासारखीच काही मुलं होती. तिथंही चिता पेटलेली दिसत होती. तीही मुलं कदाचित यांच्यासारखीच काहीतरी शोधण्याचं काम करत होती. थैली घेऊन ते दोघं पुन्हा परत यायला निघाले. गोदावरीच्या काठी रामकुंड जिथं आहे, तिथं स्मशानभूमी आहे. त्या ठिकाणी मृतांचे विधी करण्यासाठी येणाऱ्या-जाणाऱ्यांची गडबड पाहायला मिळत होती. "गाडगेमहाराज पुला'जवळ अनेकांच्या येण्या-जाण्याचा ओघ वाढला होता. रामकुंडाजवळ कपिलेश्वराचं मंदिर, शंकराचं मंदिर, गोदावरी मातेचं मंदिर अशी अनेक लोकांची श्रद्धास्थानं असलेली मंदिरं आहेत. राम, लक्ष्मण आणि सीता अशी ऐतिहासिक कुंडंही इथं जवळ जवळ असलेली पाहायला मिळतात. बाजूला कुणाला तरी अग्नी दिला जात होता; तर अग्नी देता देता कुणीतरी मोठ्यानं रडत असल्याचाही आवाज कानी पडत होता. आपल्यातला इगो, आपल्यातला मोठेपणा सारं काही बाजूला ठेवून माणसं कुणाला तरी अखेरचा निरोप द्यायला तिथं जमली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर "एक दिवस आपल्यालाही इथंच यावं लागणार...ये दुनियादारी सब झूठ है,' असेच जणू भाव होते.

गोदावरीचं वाहणारं पाणी आणि जळत असलेली चिता पाहिल्यावर निसर्गाच्या दोन अद्भुत लीला डोळ्यांसमोर येत होत्या. एकीकडं आपलं कुणीतरी गेलं म्हणून स्मशानभूमीत रडणारी दोन मुलं आणि दुसरीकडं आपल्याला आज काही मिळेल की नाही, या चिंतेत खोल पाण्यात जाऊन काहीतरी शोधणारी दोन मुलं...या दोघांपैकी काय अधोरेखित करावं, असा प्रश्न मला पडला होता. पाण्यातून काहीतरी हातात घेऊन ती मुलं आपल्या वस्तूंजवळ, मघाच्या त्या सामग्रीजवळ आली. मी तिथंच बाजूला उभा होतो. माझा भाऊ फोनवर बोलत होता. दोन्ही मुलांच्या अंगाला पाण्यातलं शेवाळ चिकटलेलं होतं. त्यांनी एकमेकांची पाठ पुसली. त्यांनी अंगावरचे भिजलेले जेमतेम कपडे बदलून दुसरे कपडे घातले. पाण्यात मिळालेली जी काही "चीजवस्तू' होती, तिची दोघांत वाटणी केली आणि एका छोट्याशा पिशवीत ती भरून ते जाण्याच्या तयारीला लागले. त्यांनी माझ्या भावाकडं बघितलं आणि हसले. त्यांच्या हसण्यावरून जाणवलं की त्यांची जुनी ओळख आहे. परमेश्वरनं त्या दोघांनाही माझी ओळख करून दिली. त्यानंतर आमच्या गप्पा सुरू झाल्या. मंदिरात त्यांची पुस्तकांची पिशवी ज्या ठिकाणी ठेवलेली होती, त्या ठिकाणी आम्ही गप्पा मारत बसलो. ते दोघं मंदिरात गेले. त्यांनी दर्शन घेतलं. एकाचं नाव श्‍याम कुलकर्णी आणि दुसऱ्याचं सतीश जोशी. श्‍याम अकरावीत आहे, तर सतीश बीएच्या प्रथम वर्षात. दोघांचे वडील अंत्यविधीचं काम करतात. वडील जोपर्यंत हयात आहेत, तोपर्यंत या मुलांना अंत्यविधीचं काम करता येणार नव्हतं. कारण, वडिलांचं काम यांनी केलं तर वडिलांनी काय करावं हा प्रश्न होताच. शिवाय. मृताचे विधी बुजुर्ग व्यक्तीकडून करून घेण्याकडंच मृताच्या नातलगांचा कल असतो. मग हे दोघंही आपल्या वडिलांनी पूर्वी जे काम केलं, तेच काम करण्याची परंपरा पुढं चालवत आहेत. मी त्या दोघांच्या वह्या पाहत होतो. सुंदर हस्ताक्षर, मुद्देसूद मांडणी. ही मुलं अत्यंत अभ्यासू आहेत, हे माझ्या लक्षात आलं. मी त्यांना विचारलं ः ""गेल्या वर्षी तुम्हाला किती टक्के मिळाले होते?''
श्‍याम म्हणाला ः ""मला दहावीला 91 टक्के मिळाले होते.''
सतीश म्हणाला ः ""मला बारावीत 86 टक्के होते.''
-माझ्या चेहऱ्यावरचे आश्‍चर्याचे भाव माझ्या भावाच्या लक्षात आले. त्याला काही वाटलं नाही. कारण, त्यानं याआगोदर या दोन्ही मुलांची कहाणी त्यांच्याकडूनच ऐकली होती.
सतीश मला म्हणाला ः ""दादा, माफ करा, मी तुमच्याशी मघाशी उगाचच चिडून बोललो. कारण,
आम्ही हे काम करू नये, अशी धमकी देण्यासाठी आणि आम्हाला त्रास देण्यासाठी अनेक माणसं इथं येत असतात. ही इतर कुणाची तरी "मक्तेदारी' आहे, असं त्यांचं सांगणं असतं.
आमचं हे वडिलोपार्जित काम आपण करावं, असं अनेकांना वाटत असतं म्हणून हा सगळा आटापिटा चाललेला असतो. यातूनच अनेक वेळा प्रकरणं भांडणापर्यंत गेली आहेत.'' सतीशला थांबवत मध्येच म्हणालो ः ""तुम्ही इथं रोज येता का आणि हे काम रोज करता का?''
तो म्हणाले ः ""हो. रोज सकाळी इथं यायचं आणि दुपारी कॉलेजात जायचं. जे काही मिळतं ते विकायचं आणि त्यातून आई-बाबांना मदत करायची. त्यातूनच शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशांचीही तरतूद करायची, हा नित्य उपक्रम.''
-मी विचारलं ः ""तुमचे आई-बाबा हे काम तुम्हाला करायला लावतात की तुम्हीच मनानं करता?''
ते म्हणाले ः ""हे काम आम्ही करावं यासाठी आई-बाबांचा आग्रह असतोच. कारण, पूजाअर्चा आणि त्यातून मिळणारे चार पैसे हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. तो आम्ही शिकला पाहिजे, हा वडिलांचा आग्रह. खूप शिकावं, मोठं व्हावं, यासाठीही ते आग्रही असतात; पण हे काम करून शिक्षण घेताना आमची दमछाक होते. अनेक वेळा सगळं घरातलं काम करूनही खाण्याचे वांधे असतात. त्यामुळे शिकायचं की जगायचं, या दोन प्रश्नांच्या गुंत्यात आमचा रोजचा दिवस भरडला जातो. कधी कधी दोन-तीन दिवस अंत्यविधीचं कामच नसतं. कुणी मृत पावलं तरच अंत्यविधीचं काम आमच्याकडं येणार ना! मग अशा वेळी खायचं काय, असा प्रश्नही पुढं येतो. माणूस मरण पावल्यावरचे विधीसाठीचे पैसे, अशुभ म्हणून फेकून दिलं जाणारं वाहत्या धारेत टाकलं जाणारं सगळं सामान हे सारं काही आमच्या रोजच्या आयुष्यासाठी उपयोगी पडतं. मेलेल्या माणसांच्या वस्तू या अशुभ समजल्या जातात. अशा वस्तू आम्ही रोजच्या जीवनात वापरतो. त्या अशुभ कशा, असा प्रश्न अनेक वेळा आम्हाला पडतो. जेवढे लोक श्रीमंत, तेवढं काहीतरी जास्त मिळतं. गरिबांची मात्र अनेक वेळा अंत्यसंस्कार करतानाही दमछाक होते.'' सतीश मध्येच म्हणाला ः ""एकदा बसस्टॅंडवरच्या एका भिकारणीचा नवरा वारला. अंत्यसंस्कारासाठी सगळ्या भिकाऱ्यांनी मिळून पैसे जमवले आणि तरीही चितेसाठी लाकडांची तरतूद होईना. आख्खा दिवस गेला तरीही मदतीला कुणी पुढं येईना. माझ्या वडिलांनी काही लोकांकडून मदत आणली आणि स्वतःचे काही पैसे घालून अंत्यसंस्कार केले. सगळे भिकारी आणि मृत भिकाऱ्याची बायको खूप रडत होती. या सगळ्या भिकाऱ्यांचे रोजचे खायचेही वांधे असतात. असा प्रसंग आपल्या बाबतीत घडेल, असं त्यांना वाटलंच नसावं!''

श्‍याम आणि सतीश या दोघांचा गोतावळाही खूप मोठा. आम्ही त्यांच्या घरीही जाऊन आलो. छोटी छोटी घरं; पण अत्यंत नक्षीदार असलेली. या गोतावळ्यात "काम तू करायचं की मी करायचं,' यावरून अनेकदा भांडणं होतात. त्या भांडणाची झलक "दशक्रिया' या कादंबरीत वाचायला मिळते. श्‍याम आणि सतीश यांची घरं एकमेकांना लागूनच. दोघांची पक्की मैत्री. श्‍यामनं त्याच्या आईची ओळख करून दिली. आम्ही जेवून जावं, यासाठी त्यांनी खूप आग्रह केला. घरी सगळ्यांबरोबर खूप गप्पा रंगल्या. मृताच्या नातलगांनी पाण्यात फेकून दिलेलं साहित्य आणि पैसे पाण्यातून काढणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्या रात्रीचं कसं काम करतात, याचे अनेक किस्से या दोघांनी आम्हाला सांगितले. ते किस्से ऐकून अण्णाभाऊ साठे यांच्या "स्मशानातील सोनं'ची आठवण मला झाली.

श्‍याम आणि सतीश हे दोघं ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, तो समाज अत्यंत हुशार आणि संपन्न आहे, असं मानलं जातं. मात्र, तो हुशार आहे; पण संपन्न नाही, याची जाणीव पहिल्यांदा झाली ती श्‍याम आणि सतीश यांच्यामुळं. महाराष्ट्रातल्या अनेक स्मशानभूमींमध्ये अंत्यविधी करणाऱ्यांचा आढावा घेतला,
त्यांच्या कुटुंबातली माहिती घेतली, त्यांची जीवनशैली जाणून घेतली, तेव्हा श्‍याम आणि सतीश यांचा अनुभव आणखीच गडद होत गेला.

केवळ अंत्यविधी करणाऱ्यांचीच नव्हे तर पूजाअर्चा करणाऱ्या पुरोहितांचीही वास्तव माहिती पुढं आली. खेडेगावातल्या पुरोहितांची अवस्था तर आणखी वाईट आहे. त्यांची मुलंही मिळेल त्यात समाधान मानून रोजच्या जीवनाचा गाडा हाकत असतात. कोण आहे या परिस्थितीला कारणीभूत? समाज? रूढी-परंपरा? शिक्षणाचा अभाव की आणखी काही...? हे प्रश्न किती काळ अनुत्तरित राहतील माहीत नाही...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com