कल्पकतेचा सुगंध चंदनापरी... (संदीप काळे)

sandeep kale
sandeep kale

वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना आलेले प्रेरक अनुभव, सामाजिक भान बाळगत केलेले जगण्याविषयीचे सकारात्मक प्रयोग, राबवले जात असलेले विधायक उपक्रम, तरुणाईच्या यशोगाथा आदींविषयीचं कथन करणारं हे नवं सदर.
चंदनशेतीचा आगळावेगळा प्रयोग करणाऱ्या तरुणाची यशोगाथा या पहिल्या लेखात.

शिकून-सवरून पुढं करायचं काय, हा गंभीर प्रश्‍न सध्या तरुणाईसमोर आहे. नोकरी किंवा व्यवसाय करायचा म्हणजे नाना अडचणींना सामोरं जावं लागतं. तिथंही कस लागेल की नाही याची भीती. राज्यभर तरुणाईचा अभ्यास करताना अशी अनेक प्रकरणं पाहिली, जिथं तरुणाई अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळालं, हा एक भाग आणि दुसरा भाग म्हणजे जिथं तरुणाईनं चांगले आणि जरा हट के प्रयोग केले; ज्या प्रयोगांनी जबरदस्त लोकप्रियता मिळवली, अशा प्रयोगांकडं तरुणाईचा कल अधिक जात नाही. त्याचं कारण, वेगळे प्रयोग करायला आणि ते प्रयोग यशस्वी होण्यासाठी कमालीचा संयम लागतो, चिकाटी लागते. ठरवलेलं ध्येय पूर्ण करण्यासाठी एक नियोजनबद्ध प्लॅन लागतो. अशा वेगळ्या आणि लोकांच्या कौतुकाला पात्र असणारा एक चांगला प्रयोग लातूरच्या युवकांनी सुरू केला असून, त्याची ख्याती भारतभर पसरली आहे.

लातूर जिल्ह्यात पाखरसावंगी नावाचं छोटंसं गाव आहे. या गावात "सकाळ'च्या माध्यमातून सुरवातीला दोन लाख रुपये खर्च करून जलसंधारणाची कामं झाली. पुढच्या गावातल्या जलसंधारणाच्या कामासाठी रामेश्वर धुमाळसारख्या तरुणानं आपल्या सर्व तरुण मित्रांच्या मदतीनं कोट्यवधी रुपयापर्यंतची कामं
लोकसहभागातून, सामाजिक मदतीतून उभी केली. गावाच्या आसपास चांगलं खेळतं पाणी उपलब्ध होऊ लागलं. त्यातून मग अनेक छोटे छोटे उद्योग पुढं येऊ लागले. एमआयडीसीच्या एका भागाची तहान या कामांमुळे भागू लागली. खूप हातांना काम मिळू लागलं. अनेक उपक्रम पुढं येऊ लागले. यात सर्वांत चांगला उपक्रम म्हणून धनंजय राऊत या तरुणानं केलेला प्रयोग. या प्रयोगाचं जाळं संपूर्ण भारतभर वाढलं. दरवर्षी पाच हजार रुपयांचा हा व्यवसाय तीन वर्षांत पंधरा कोटी रुपये पार करील, असं कुणाच्या ध्यानीमनीही आलं नसेल.

चंदनाच्या शेतीचं काम धनंजयनं ज्या पद्धतीनं उभं केलं ते नोंद घेण्यासारखं आहे. हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात यांसारख्या 18 राज्यांमध्ये धनंजयचा प्रयोग पसरला आहे. शेकडो तरुणांच्या हाताला केवळ कामच मिळालं आहे असं नव्हे, तर कितीतरी युवकांनी नव्यानं धनंजयप्रमाणेच आपली चंदनशेती उभी करून व्यवसाय सुरू केला आहे.

धनंजय हा एका गरीब शेतमजुराचा मुलगा. अठराविश्वे दारिद्य्र त्याच्या अनेक पिढ्यांच्या पाचवीला पूजलेलं. शिक्षण सोडाच; गाव सोडून बाहेरचं जग काय आहे, हे धनंजयच्या घरच्या एकाही सदस्याला माहीत नव्हतं. धनंजय शिकला. त्यानं बाहेरचं जग पाहिलं, तेही कुणाच्याही मदतीशिवाय. पुढं छोटी-मोठी नोकरी करावी किंवा छोटासा व्यवसाय करावा, असं धनंजयच्या कुटुंबीयांनी त्याला सुचवलं. सर्वांसारखं आपण करायचं नाही, या धारणेतून धनंजयनं सत्यजित चंद्रशेखर राव या केरळमधल्या आपल्या मित्राला गाठलं आणि चंदनशेतीचा जबरदस्त धडा गिरवला. लातूर जिल्ह्यातल्या पाखरसावंगी या आपल्या गावात छोट्या जागेत चंदन रोपवाटिकांची, अन्य दुर्मिळ वनस्पतींची, सर्व प्रकारच्या फळझाडांची लागवड केली. पुढं वर्षभरात चंदनशेतीला सुरवात केली. ज्या ठिकाणी चंदनशेती आहे, त्या ठिकाणी आंतरपीक म्हणून हजार कोंबड्या पाळल्या आहेत. त्यांचं खाद्य याच शेतात आहे. धनंजयनं केवळ शेतीच केली नाही; तर इतरांनीही चंदनशेती कशी करावी, तिचं संगोपन कसं करावं याबाबतचं, तसंच चंदन रोपवाटिका निर्माण करण्यापर्यंतचं सर्व जाळं राज्यभर उभं केलं. यातून आसपासच्या खेड्यातल्या युवकांना आणि राज्यातल्या शेकडो युवकांना प्रत्यक्षात रोजगार मिळाला आहे. तशी ही आकडेवारी खूप मोठी आहे. चंदनशेती आणि सर्व प्रकारच्या रोपवाटिकांचं आर्थिक गणित फार मोठं आहे. अलीकडं सतत घिरट्या घालणाऱ्या दुष्काळामुळे हे गणित थोडं अवघड झालं आहे खरं; पण हे गणित घाट्याचं बिलकूल नाही एवढं मात्र नक्की. कारण, चार वर्षं चंदनाच्या झाडाला पाणी फार कमी लागतं, पुढं पाण्याची गरज नाही. धनंजय हा केवळ चंदनाची लावगड, रोपवाटिका करून थांबला नाही तर त्यानं चंदनशेतीच्या संगोपनाचं काम राज्यभर उभं केलं. आज हजार एकरांपेक्षा जास्त असणाऱ्या शेतात ही चंदनशेतीची लागवड आहे. संगोपनाचे त्याचे प्रयोग राज्यभर सुरू आहेत. एकट्या लातूरमध्ये अमित विलासराव देशमुख यांनी कित्येक एकरांमध्ये चंदनशेतीची लागवड केली. त्याची पूर्ण जबाबदारी धनंजयवर आहे. अमित यांच्या पत्नी अदिती देशमुख या शेतीचं काम पाहतात. त्या म्हणाल्या ः ""चंदनशेती आणि विषमुक्त भाजीपाला शेती, ही माझी दोन वेगळी मॉडेल्स आहेत. वेगळे प्रयोग केल्याशिवाय आपण काय आहोत हे कधीही सिद्ध होणार नाही. धनंजय राऊत यांनी हे वेगळेपण सिद्ध केलं आहे. बाजूच्या एखाद्या शेतकऱ्यानं टोमॅटो लावले की दुसरा लगेच टोमॅटो लावतो. त्याला कुणी विचारणार नाही, त्याला भाव येणार नाही, हे आम्हाला लावगड करताना माहीत असतं. तरीही आम्ही तो प्रयोग करतो. असंच उच्चशिक्षित तरुणांविषयीही झालं आहे. सोबतच्यानं केलं म्हणून तो करतो, मित्रानं केलं म्हणून तो करतो. हे थांबलं पाहिजे. धनंजयसोबत चंदनशेती आणि विषमुक्त शेतीचे प्रयोग करताना, आपण स्वतःच्या आयुष्यात वेगळं काही करतो, समाजासाठी वेगळं काहीतरी करतो, याचं समाधान मिळतं. मी स्वतः नाही; तरी माझ्या घरातला कुणीतरी एक सदस्य शेताच्या बांधावर काम करत असतो, म्हणून धनंजयनं आमच्या शेतात सुरू केलेल्या प्रयोगाला "चार चॉंद' लागले आहेत. आज अर्धी फिल्मसिटी आमचा सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेला भाजीपाला, महिनोन्‌महिने त्याच भावात आनंदानं खातं. कायम मागणी आणि तीही त्याच भावात, हे शेतकऱ्यांना बरोबर घेऊन घडतंय. त्याचं कारण वेगळे प्रयोग, धनंजयसारख्या युवकांची जिद्द, चिकाटी आणि मेहनत असंच म्हणता येईल.''
धनंजयची पत्नी भाग्यश्री राऊत म्हणाल्या ः ""आम्ही सुरू केलेले सर्व प्रयोग पाहण्यासाठी देश-विदेशातल्या पाहुण्यांची दिवसभर लगबग सुरू असते. आम्ही पूर्वी गावात राहायचो; मग अवघं कुटुंब शेतात हलवलं. धनंजय हे 15-15 दिवस भारतभर फिरतात. त्यांची बाकीची सर्व कामं आणि कुटुंबाची सर्व जबाबदारी मी पार पडते. धनंजय यांना त्यांच्या प्रयोगानं झपाटलं आहे. ते तासन्‌तास त्यात घालवतात. आम्ही कुणीही त्यांना "तुम्ही हे करू नका', असं म्हणत नाही.''

धनंजयनं विकसित केलेल्या गुगळ या वनस्पतीनं त्यांना वेगळी ओळख दिली आहे.
उच्चशिक्षित मुलांमधून किती जणांच्या हाताला काम मिळतंय हा प्रश्‍नच आहे; त्यामुळे "शिकून काही फायदा नाही, आम्ही बेकारच राहणार आहोत', हे अकरावीपासूनच मुलाच्या मनावर आपोआप बिंबवलं जातं. त्यातून नैराश्‍य, आळशीपणा आणि चांगलं स्वप्न न पाहणं हे आपसूकच घडत जातं. मग नैराश्‍यातून आत्महत्या, बेकारीतून आत्महत्या, वडिलांच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या...अशा बातम्यांचं प्रमाण आता वाढलं आहे. त्याचं कारण सर्वांना एकाच पद्धतीची नोकरी हवी असते, सर्वांना एकाच पद्धतीनं व्यवसाय सुरू करायचा असतो. खूप शिकलं की सर्वांच्या अपेक्षा खूप वाढतात. माझ्या पाटनूर गावातलं उदाहरण तसं ताजं आहे. रवी रेनेवाड या तरुणानं शिक्षणात चार पदव्या मिळवल्या. अत्यंत हलाखीची परिस्थिती. शिक्षण मिळवून पुढं काय? कुठंही यश मिळेना. छोटी-मोठी काम करून, व्यवसाय करून समाधान होईना. घरचे सर्व जण समजदार; पण रवीचं मन साथ देईना. या सगळ्याचा रवीच्या डोक्‍यावर परिणाम झाला आणि मग त्यानं गळ्यात दगड बांधून विहिरीत उडी घेतली. असे कितीतरी "रवी' आज नैराश्‍यातून स्वतःला संपवायला निघाले आहेत. जे असं करत नाहीत, ते समाजाच्या चौकटीत राहून जगण्यासाठी हात-पाय हलवतात आणि तरतात. वेगळं काहीतरी करतात, संयम बाळगतात. त्यातून मग त्यांच्या आयुष्याच्या ऐतिहासिक भ्रमंतीला लाईव्ह स्थान मिळतं.

धनंजयशी बोलतानाची वाक्‍यं मला फार महत्त्वाची वाटतात. तो म्हणतो ः ""केरळमध्ये मी दोनशे वर्षांचं जुनं एक चंदनाचं झाड पाहिलं. त्या झाडाची किंमत तीन कोटींच्या वर असेल ते झाड कापल्यावर. उभ्या झाडानं अनेक वर्षं अनेकांचं मस्तक शाबूत ठेवण्याचं काम केलं आहे. त्या तीन कोटींपेक्षा हे जास्त महत्त्वाचं आहे. माझं किंवा आम्हा सर्वांचं काम या चंदनाच्या झाडासारखं असलं पाहिजे. जिवंतपणीही लोकांसाठी आणि मेल्यावरही लोकांसाठी....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com