'विल्सन'मधले पांडव (संदीप काळे)

sandeep kale
sandeep kale

विल्सन कॉलेजच्या वसतिगृहात राहणारे पाच अंध मित्र. अभ्यासात पक्के आणि प्रत्येकाकडं विलक्षण कलागुण. अंधपणाचं कोणतंही भांडवल न करता सगळे विलक्षण समरसून जीवन जगताहेत. कुठून कुठून आलेले हे पाचही जण गरीब कुटुंबातले. मात्र, तरीही मनात आत्मविश्वास आणि आकाशाला गवसणी घालू पाहणारं स्वप्न. कोणाचीही नया पैशाची मदत होत नसतानाही, कसलंही टेन्शन यांच्या चेहऱ्यावर नाही. एवढ्या गरिबीतही त्यांचा स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास काही थांबत नाही.

अगदी सकाळी मला प्रा. डॉ. आशिष उजगरे यांचा फोन आला. मला म्हणाले ः "आज तुम्ही येणार आहात ना? आपलं भेटायचं ठरलंय.'' उजगरे सर विल्सन कॉलेजला उपप्राचार्य आहेत. विल्सन कॉलेजला सरांकडं गेलो, त्यांच्याशी चर्चा झाली. बोलताबोलता ते म्हणाले ः ""आमच्याकडं पाच अंध मुलं आहेत. त्यांना पाहिलं, की असं वाटतं, जणू यशश्री त्यांच्या पायाची दासी आहे. आपण त्यांच्या कामाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, तितकी कमालीची मुलं आहेत ही.'' त्यांनी केलेली स्तुती ऐकून माझी त्या मुलांना भेटण्याची उत्सुकता वाढली. मी उजगरे सरांना म्हणालो ः ""सर चला ना, आपण भेटू त्या मुलांना.'' तेही म्हणाले ः ""हो, चला भेटूया.''

विल्सन कॉलेज अगदी चौपाटीवरच आहे. रोडच्या अलीकडं आणि पलीकडं अगदी गिरगाव चौपाटीवर विल्सन कॉलेजच्या मुलांचं वसतिगृह आहे. वसतिगृहाची इमारत 106 वर्षं जुनी; पण कमालीची कोरीव, देखणी. वसतिगृहाच्या आसपासचं वातावरण अगदी फिल्मी आहे. खिडकीतून खळाळता समुद्र दृष्टीस पडतो. तिकडं पाहिलं, की वाटतं समुद्र नाचत, बागडत आपल्याकडं येतोय. दुसऱ्या मजल्यावर रूम नंबर दहामध्ये हे पाच अंध तरुण राहतात. राहुलसिंह हा वाराणसीमधला (उत्तर प्रदेश) आहे. आनंदसिंह प्रतापगडचा (उत्तर प्रदेश), विशाल देशमाने गुलबर्ग्याचा (कर्नाटक), समशेगिर शेख दरबंगा इथला (बिहार) आणि पाचवा आश्विन वाघमारे हा आपल्या नाशिकचा. हे पाचही विद्यार्थी अगदी मेरिटचे- 95 टक्‍क्‍यांच्या वर मार्क असलेले. विल्सन कॉलेजला नंबर लागणं आणि सोबत हॉस्टेलला नंबर लागणं ही तशी साधी गोष्ट नाहीच. आम्ही रूममध्ये गेलो, तेव्हा पाचही जण कामामध्ये अत्यंत व्यग्र होते. उजगरे सरांनी मुलांना हाक मारली. त्यांनी सरांचं हसून स्वागत केलं. सरांनी माझी ओळख करून दिली.

आम्ही बसलो. माझ्या बाजूला राहुलसिंह बसला होता. कानामध्ये हेडफोन घालून त्याचं काहीतरी ऐकणं सुरू होतं. मी त्याला विचारलं ः ""काय करतोयस?'' तो म्हणाला ः ""मी "ययाती' कादंबरी ऐकतोय.'' मी म्हणालो ः ""किती झाली आहे ऐकून?'' तो म्हणाला ः ""शेवटची दहा पानं राहिली आहेत.'' त्यांच्या रूममध्ये असलेलं चैतन्य मनाला मोहवून टाकणारंच होतं. अत्याधुनिक टेक्‍नॉलॉजीसोबत त्यांची गट्टी जोरदार झाल्यामुळं त्यांचं आयुष्य जगण्यासाठी अजून सुखकर झालं होतं. ते सगळे कलाकारच. अभ्यासात सर्व हुशार. त्यांना मिळालेली पारितोषिकं, प्रमाणपत्रं, त्यांचे व्हिडिओ, त्यांचे फोटो सारं काही पाहून मी अवाक्‌ झालो. आश्विन गाण्यामध्ये रमलाय. विशाल सगळ्या प्रकारची वाद्यं वाजवतो. समशेगिर हा खेळामध्ये परिपूर्ण. आनंदला सुरेल गाणं येतं आणि तो खेळाचा चॅम्पियन आहे. राहुलसिंहचं पुस्तकी ज्ञान अफाट. त्यानं सर्व महान लोकांची चरित्रं ऐकून, समजून घेतलीत. राजकारण हा त्याचा आवडला विषय. लोकसभेच्या आगामी निवडणुका आणि त्याचा विधानसभेच्या निवडणुकीवर होणारा परिणाम याचं खूप चांगलं विश्‍लेषण मला राहुलसिंहनं करून दाखवलं. कोणी पदवीच्या पहिल्या वर्षाला आहे, तर कोणी शेवटच्या. डिग्री झाल्यानंतर काय करायचं, याचं पूर्ण प्लॅनिंग या पाचही जणांनी केलेलं आहे. दर दिवसाचा "डे प्लॅन', महिना सरताना तीस दिवसांचा केलेल्या कामाचा आढावा, सहा महिन्यांत केलेलं काम आणि वर्षाचं सगळं झालेलं काम... आपण अवाक्‌ होऊन जाऊ असं सगळं! सगळ्यांचा प्रचंड जनसंपर्क, सगळ्यांना मैत्रिणी आणि मित्रही. सगळे जण आपल्या सरांचे आवडते. त्यांना सगळ्यांची सहानुभूती ते अंध आहेत म्हणून अजिबात नव्हती, तर त्यांची कुशल असणारी बुद्धी, कामातलं नियोजन हे त्याला कारणीभूत होतं. त्यांच्या जगण्यात अधोरेखित करावी अशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या अंधपणाचं ते कुठंच भांडवल करत नव्हते. उजगरे सर मध्येच सांगत होते ः ""विल्सन कॉलेजच्या प्रत्येक प्रोग्रॅममध्ये या पाच जणांचा बोलबाला नेहमी असतो.'' मी आश्विनला म्हणालो ः ""म्हण ना रे एखादं गाणं!'' क्षणाचाही विलंब न लावता, "मायेच्या हळव्या स्पर्शाने फुलते' हे गाणं त्यानं म्हणायला सुरवात केली. गाण्याचं पहिलं कडवं सुरू झाल्याझाल्या तृप्त होऊन डोळे कधी मिटले हे कळलंच नाही. खूप मोठं गाणं काही क्षणांतच संपलं, असं वाटलं. मी आश्विनच्या जवळ गेलो. त्याचा हात हातामध्ये घेतला आणि त्याला म्हणालो ः ""अरे, परत एकदा म्हण ना प्लीज.'' त्यानं त्याच सुरामध्ये पुन्हा एकदा गाणं सुरू केलं. विशालला स्वत:ची बॅंक उघडायची आहे, समशेगिरला स्पोर्टसमध्ये आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करायचं आहे. आनंदसिंहला आरजे म्हणून आपलं करिअर करायचं आहे. आश्विनला मोठा गायक व्हायचंय, राहुलसिंहला जिल्हाधिकारी व्हायचंय. प्रत्येकाचं वेगळं स्वप्न. हा ध्यास पूर्ण होण्यासाठी कष्ट आणि मेहनत यांची अतुलनीय जोड त्यांनी लावली होती.
प्रत्येकाची कौटुंबिक कहाणी अगदी मन हेलावून टाकणारी होती. सगळ्यांच्या घरची परिस्थिती अगदी जेमतेम. हातावर पोट भरत असणारी. कुणाला आई नाही, तर कुणाला वडील. कोणाच्या वडिलांची चहाची टपरी आहे; तर कोणाची आई शेतमजूर. केवळ आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर आयुष्याला "स्टार' बनवणाऱ्या या पाचही जणांजवळ काही नसतानाही उद्याच्या भाकरीचीही चिंता त्यांना नाही. राहुल मध्येच सांगत होता ः ""आम्ही नेहमी सायंकाळच्या वेळेला चौपाटीला जाऊन बसतो, मनसोक्तपणे गातो. जवळ असणारी वाद्यं वाजवून स्वत:च्या कानांना तृप्त करण्याचा प्रयत्न करत असतो.''

अनेक सेवानिवृत्त अधिकारी या सुरेल आवाजाचे चाहते आहेत. सायंकाळच्या वेळी फिरायला आल्यावर, हा आवाज त्यांच्या कानी पडतो आणि मग सगळ्यांची मैफल जमते. ""असे कितीतरी दर्दी आमचे मायबाप होऊन समोर आले आहेत. आम्हाला शिकण्यासाठी आणि भाकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी मदत केली आहे,'' असं हे पाच जण सांगतात. या पाचही जणांचं मेरिट पाहूनच विल्सन कॉलेजनं नाममात्र पैशावर त्यांना प्रवेश दिला. वसतिगृहात प्रवेश घेतानासुद्धा तेच झालं. विल्सन कॉलेजमध्ये ते सर्वांचे लाडके. त्यांनी आपलं मेरिट कधी सोडलं नाही. प्रामाणिकपणा दूर जाऊ दिला नाही. त्यातून सगळं काही चांगलंच होत गेलं. कॉलेजनं वेळोवेळी त्यांची मदत केली. हे पाचही जण पाचवीपासूनचे मित्र. हेच एकमेकांचे नातेवाईक आणि हेच एकमेकांचे खरे सोबती. आश्विन सांगत होता ः ""मी आजारी असतो, तेव्हा मला घरच्यांची आठवण येऊ नये यासाठी राहुल रात्रभर जागून माझी सेवा करत असतो. स्वत: त्रास सहन करून आपल्या सोबतच्या मित्राला जास्तीत जास्त जपण्यासाठी आम्ही अधिकाधिक प्रयत्न करीत असतो.''

चांगलं वाचन, वेगवेगळ्या विषयावर चर्चा, अनेक कार्यक्रमाला जाऊन एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान घेणं, छंद जोपासणं आणि सतत मजेत जगणं यामुळं यांच्या आयुष्याची भट्टी खूप छान जमली आहे. अवघ्या मुंबईत हे कधी एकट्यानं फिरतात, तर कधी पाचही जण एकत्रपणे कोणाची मदत न घेता फिरतात. या टोकापासून त्या टोकापर्यंत जातात. मी सात वर्षांपासून मुंबईत राहतो; पण मलाही कधीकधी अनोळखी ठिकाणी जाण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावाच लागतो. शेवटी "गुगलकाका' सोबत असतातच. त्यामुळं या पाच जणांचे प्रयत्न मनात ठसून बसले होते.

सुटीच्या दिवसांमध्ये लोकांची पडेल ती कामं करायची, त्यातून चार पैसे हाताशी राहतील का याची व्यवस्था करायची, नाही तर गावी जाऊन आई-वडिलांच्या कामाला हातभार लावायचा, हे दर वर्षीचं शेड्यूल ठरलेलं. मरिन ड्राईव्ह आणि गिरगाव चौपाटी या भागात अनेक सळसळत्या तरुणाईचे किस्से आपण ऐकले; पण डोळे नसलेल्या या तरुणाईचा धगधगता प्रवास पहिल्यांदाच नजरेसमोर येत होता, ज्यामुळं मी कमालीचा सुखावून जात होतो.
महाभारतामधल्या पाचही पांडवांप्रमाणं हे "विल्सन'मधले पाच पांडवदेखील आपापल्या क्षेत्रात परिपूर्ण होते. किंबहुना परिपूर्ण होण्याचा ध्यास बाळगून होते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

पाचही जणांमध्ये असणारा आत्मविश्वास, पांडित्य आणि आकाशाला गवसणी घालू पाहणारं स्वप्न. काय वर्णन करावं त्यांच्या प्रवासाचं? कोणाचीही नया पैशाची मदत होत नसतानाही, कसलंही टेन्शन यांच्या चेहऱ्यावर नाही. एवढ्या गरिबीतही त्यांचा स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास काही थांबत नाही. सगळी अनुकूलता असलेली श्रीमंताची मुलं बऱ्याचदा घडण्यापेक्षा बिघडलेली जास्त दिसतात. पोटापाण्याची कुठलीही चिंता नसलेल्या या मुलांना या पाच पांडवांप्रमाणं का जगता येऊ नये बरं? त्याची कला, छंद जोपासण्याचा ध्यास, ताठ बाणा यापैकी काही म्हणजे काही त्यांना अंगीकारता का येऊ नये?... अनेक डोळस पाल्यांच्या आई-बाबांच्या डोळ्यात अशा प्रश्नांचं काहूर अनेक वेळा दिसतं. म्हणूनच या या कर्तृत्ववान पाच पांडवांना मानापासून सलाम करावासा वाटतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com