
अलीकडं मरण फार स्वस्त झालंय. माझा मित्र सचिन यादव यांचे वडील सकाळी फिरायला गेले होते. पाठीमागून एका दुचाकीवाल्याने धडक दिली
स्मशानभूमीतला स्थितप्रज्ञ तो...
अलीकडं मरण फार स्वस्त झालंय. माझा मित्र सचिन यादव यांचे वडील सकाळी फिरायला गेले होते. पाठीमागून एका दुचाकीवाल्याने धडक दिली. काकांच्या डोक्याला मार लागला आणि ते जागेवरच गेले. सचिन आणि त्यांचे कुटुंबीय चेंबूरला राहतात.
मला सचिनचा फोन आला. मी लगबगीने सचिनकडे गेलो. अंत्यसंस्काराच्या पूर्वीचे सगळे सोपस्कार आटोपल्यावर आम्ही स्मशानभूमीपर्यंत गेलो. हल्ली अंत्यसंस्काराला फारसं कुणी येत नाही. सचिनचे वडील पोस्टामध्ये होते.
त्यांच्यासोबत काम करणारा केवळ एक सहकारी त्यांच्या अंत्यसंस्काराला आला होता. सात-आठ नातेवाईक, दोन-तीन मित्र यांखेरीज अंत्यसंस्काराला कोणीही नव्हतं. मला क्षणात वाटलं, आपलं गाव बरं, जिथं अंत्यसंस्काराला येणाऱ्यांचीही मोठी रांग असते!
सचिनच्या वडिलांचा आलेला सहकारी मला वारंवार विचारत होता, ‘किती वेळ आहे अजून अंत्यसंस्काराला. मला ऑफिसला जायचं होतं.’ मी त्यांच्याकडे काही न बोलता शांतपणे पाहत होतो. अंत्यसंस्कार आटोपले आणि सचिनच्या घरची मंडळी लागलीच घराकडे जायला निघाली.
सचिन मला म्हणाला, ‘‘आई आणि बहीण दोघीजणी खूप रडत आहेत, मी त्यांना घेऊन घरी पुढे जातो, तू नंतर घरी ये.’’ मी होकाराची मान हलवली. त्या स्मशानभूमीमध्ये कोणी राख सावडत होतं, कोणी पूजा करत होतं, कोणी सरणावर लाकडं रचत होतं...
प्रत्येकाला त्या स्मशानभूमीमध्ये शेवटी यायचंच असतं; पण ते मेल्यावर. आता तिथं जास्त काळ थांबायला कोणालाही आवडत नाही. प्रत्येक जण तिथून लवकर कसं निघता येईल याचीच काळजी घ्यायचा. एक कुटुंब तिथं आलं, त्यांनी समोरच्या राखेसमोर एक पत्रावळी टाकली, त्यावर पंचपक्वान्न ठेवले,
पूजा केली आणि तिथून ते निघून गेले. बाजूला राख सावडणारा एक माणूस ती पत्रावळी ठेवून माणसं गेल्याचं पाहतो आणि त्या पत्रावळीवर लागलीच जेवायला बसतो. त्या पत्रावळीवर असणाऱ्या ताकाच्या कढीचा वास माझ्यापर्यंत आला. त्या माणसाने शांतपणे जेवण केलं आणि समाधानाचा ढेकर दिला. मी बाजूला बसून त्याचं जेवण, त्याच्या सर्व हालचाली टिपत होतो.
त्या जेवत बसलेल्या माणसाच्या समोर जाऊन मी उभा राहिलो. मी त्याच्याकडे शंकेच्या नजरेने बघायला लागलो. तो माझ्या नजरेला नजर देऊ शकत नव्हता. देवासाठी वाढलेलं ताट खाल्लं हे चुकीचं होतं, हे माझ्या नजरेने त्याला सांगितलं.
त्या माणसाला मला बोलतं करायचं होतं. मी त्या माणसाला म्हणालो, ‘‘काय झालं का जेवण?’’ आपल्या डोक्याला लावलेला रुमाल काढत त्याने मान हलवली. माझ्याकडे त्याने पूर्ण लक्ष द्यावं या हेतूने त्याला जरा जोरातच म्हणालो, ‘‘काय हो, असा देवासाठी ठेवलेलं ताट तुम्ही कसा काय खाऊ शकता?’’
तो घाबरला नाही, उलट शांतपणे मला म्हणाला, ‘‘मग काय करणार साहेब, नाहीतरी थोड्या वेळाने कुत्र्यानेच खाल्लं असतं ना?’’ माझ्या नजरेला नजर न मिळवता त्याने हातामध्ये फावडं घेतलं आणि समोर अस्ताव्यस्त पडलेल्या राखेला तो एकत्रित करू लागला.
ती राख एकत्रित करताना त्या राखेमध्ये काही सापडतं का, यावरही त्याची नजर बारकाईने फिरत होती. तो माणूस काम करत होता, मी त्याच्या बाजूला उभा होतो. पलीकडल्या साइडला काकांचं प्रेत आता जळून शांत होऊ लागलं होतं.
मी मध्येमध्ये त्याच्याशी बोलतच होतो. ‘‘तुझं कुटुंब कुठे असतं?’’ तो म्हणाला, ‘‘कोणतं कुटुंब? मला मुलं, बायको नाही.’’ तो पुढे म्हणाला, ‘‘मी स्मशानभूमीमध्ये काम करतो, हे ऐकूनच माझ्याशी कोणी बोलत नाही. मग कुणी मला बायको म्हणून त्यांची मुलगी देणं तर दूरच राहिलं.’’ तो फार स्पष्टपणे बोलत होता.
काय माहीत, इतका धीटपणा आणि प्रामाणिकपणा त्याच्यात कुठून आला असेल! ‘‘तुला ज्या माणसाने पैसे दिले, तो सकाळी राख घेऊन जायला नाही आला, तर मग काय करशील?’’ तो म्हणाला, ‘‘त्यात नवीन काय आहे. अनेक माणसांना इथं सरणावर ठेवायची आणि आग लावायची गडबड असते. कित्येक वेळा असं होतं की, राख न्यायलाही सकाळी कोणी येत नाही.’’
मी सुरजाला म्हणालो की, ‘‘तू एवढं बोलायला शिकलास तरी कुठून? तुझ्यात एवढा धीटपणा आला कसा?’’ तो म्हणाला, ‘‘साहेब माझं आयुष्य बोनस आहे. गावाकडे दरोडेखोरांसोबत मी राहिलो, अनेक ठिकाणी दरोडेही टाकले.
कधीही पोलिसांना सापडलो नाही. एका दरोड्यामध्ये एका गावात माझ्यासोबत असणाऱ्या तिन्हीही लोकांना गावकऱ्यांनी पकडलं आणि ठेचून मारलं. मी कसाबसा सुटलो आणि थेट मुंबईला आलो. कधी कुणाशी संपर्क केला नाही.
आपल्याला कोणत्याही क्षणी ते लोक येऊन मारतील, अशी भीती माझ्या मनात होती. तीन-चार वर्षं घरच्यांशीही बोललो नाही. त्यांनी तर मी मेलो असेल म्हणून माझा विषयच सोडून दिला होता. मुंबईत आल्यावर कामासाठी खूप भटकलो.
मुंबई तुमचा अवतार, शिक्षण पाहून तुम्हाला जवळ करते. माझ्याकडे ते दोन्ही नव्हतं. मग मी भीक मागायला सुरुवात केली. भीकही कोणी देईना. अशा वातावरणात मी कमालीचा थकलो होतो. शांतता फक्त स्मशानभूमीत असायची. रात्री तिथंच झोपायचं.
नैवेद्य म्हणून स्मशानभूमीमध्ये रोज दोन-चार पक्वान्नांनी भरलेलं ताट ठेवलेलं असायचं, त्या ताटातलं अन्न खाण्यासाठी कुत्र्यांची भांडणं व्हायची. मी कुत्र्यांना हाकलून ते जेवायला लागलो. जिवंतपणी ज्यांना एकवेळचं जेवायला मिळालं नाही,
त्यांना नैवेद्य देण्यासाठी मुलं राखेसमोर पत्रावळीवर पंचपक्वान्न आणून ठेवायची, हे मला त्यांच्या वर्तनातून दिसायचं.’’ सुरजाशी बोलताना त्या स्मशानभूमीमधले अनेक किस्से मी ऐकत होतो.
तो काम करत होता आणि मी त्याच्याशी बोलत होतो. त्याच्याशिवाय माझं लक्ष अंत्यसंस्कार होत होते त्या आगीकडे होतं. ती आग विझल्यावर मला तिथून निघायचं होतं. आमचं बोलणं सुरू होतं, तेवढ्यात गेटवरून एक आवाज आला, ‘‘मी आलेय, येऊ का तिकडं?’’
एक लहानशी मुलगी सुरजाला आवाज देत होती. मी म्हणालो, ‘‘कोण आहे ती?’’ तो म्हणाला, ‘‘माझ्याआधी या स्मशानभूमीमध्ये एक जण काम करायचा, ही त्याची मुलगी आहे. त्यानेच मला सुरुवातीला आसरा दिला होता.
एक दिवस सकाळी मी त्याला उठवायला गेलो, तर कळलं की तो जागचा हलतच नाही. त्याच्या घरच्यांना बोलावलं, डॉक्टरकडे नेलं, पण काही उपयोग झाला नाही. मी कधी विचारही केला नव्हता की, ज्याने आपल्याला आधार दिला, त्यासाठी इथं सरण रचावं लागेल.
त्याचं नाव जिजा होतं. त्यानंतर त्याची बायको आणि मुलं इथं काम करू लागली. मी त्याच्या बायकोला विनंती केली की, तुम्ही इथं येत जाऊ नका. मला जे काही चार पैसे मिळतील, त्या पैशांच्या मदतीने मी तुमच्या कुटुंबाला हातभार लावतो. तुम्ही मुलीला शिकवा.’’
सुरजा आपल्या हातामधलं फावडं बाजूला करत आपल्या पेटीकडे गेला. पेटीमध्ये एका तांब्यात काही चिल्लर नाणी होती, ती त्याने काढून त्या मुलीच्या हातावर ठेवली. बायनाच्या चेहऱ्यावर हास्य उमललं आणि बायना निघून गेली.
मी सुरजाला म्हणालो, ‘‘चल, मी तुला कुठेतरी छान काम मिळवून देतो, तू तिथं काम कर.’’ तो म्हणाला, ‘‘माझा जन्मच या कामासाठी झाला आहे. कदाचित मरताना माझ्या आई-वडिलांनी मला शाप दिला असेल.’’
सुरजा आलेला घाम पुसत पुन्हा आपलं काम करत होता. काकांचं सरण पूर्णपणे जळून भस्मसात झालं होतं. सुरजा कदाचित त्या प्रत्येक आत्म्याशी कनेक्ट झाला असेल, म्हणून त्याला अंत्ययात्रेचा वारकरी होणं सहज शक्य झालं असावं. माझ्या मनात विचारचक्र सुरू झालं होतं.
आपण का एवढी धडपड करतो? का रोज कोणाविषयी वाईट विचार करतो? का रोज काहीतरी नवीन मिळवायचा प्रयत्न करतो? काय माहिती, कोणतं कर्म खरं? मी जे करतो ते खरं कर्म आहे की सुरजा जे करतो ते खरं कर्म आहे..? या प्रश्नाचं उत्तर काही मला मिळत नव्हतं. मी निघालो. ‘‘बरं, मी निघतो आता,’’ असं म्हणत मी सुरजाचा निरोप घेतला.
अर्धवट जळून बाजूला पडलेली लाकडं मी समोर करत होतो. तितक्यात तो माणूस मला म्हणाला, ‘‘तुम्ही नका काही करू जी, मी करतो सगळं.’’ मी त्या माणसाला म्हणालो, ‘‘तुमचं नाव काय?’’ तो म्हणाला, ‘‘सुरजा तिगारे.’’ मी पुन्हा विचारलं, ‘‘कुठल्या गावचे?’’ तो म्हणाला, ‘‘मी चंद्रपूरचा.’’ आमचं बोलणं सुरू झालं.
मी त्याला विचारलं, ‘‘किती वर्षांपासून मुंबईमध्ये आहात?’’ तो म्हणाला, ‘‘आता दहा वर्षं होऊन गेली.’’ तितक्यात एक अंत्ययात्रा आली, ती चार माणसांचीच होती. एका रिक्षामधून डेडबॉडी आणण्यात आली, ती थेट सरणावर ठेवण्यात आली.
अग्नी देईपर्यंत माणसं होती, ती पुन्हा लगेच जात राहिली. जाता जाता एका माणसाने सुरजाच्या हातावर शंभर रुपये टेकवले आणि त्याला सांगितलं, ‘‘ही राख भरून ठेव, आम्ही सकाळी घ्यायला येऊ.’’ ते गेले तसं तो पुन्हा राख भरायच्या कामात गुंतला.