चंची (संध्या अष्टेकर)

sandhya ashtekar
sandhya ashtekar

चुरमुरेवाल्या आजीकडं एक जाम भारी वस्तू होती, ती म्हणजे तिची चंची. रेशमी खणाच्या कापडाची, रंगीबेरंगी, शोभिवंत लेस आणि बटणं लावलेली ती छोटी पर्स मला फार आवडायची. एकदा असेच आम्ही तिच्या अवतीभवती खेळत होतो. तिच्याकडं चार- पाच जण चुरमुरे घ्यायला आले होते. त्या गोंधळात आम्ही तिची चंची मागून घेतली. मिळालेले पैसे गडबडीनं त्यात टाकून आजीनं आम्हाला ती चंची दिली. आम्ही खूप वेळ चंची घेऊन खेळत बसलो. आजी आमचा निरोप न घेताच निघाली आणि चंची राहिली आमच्याकडंच.

सुमारे पंचवीस- तीस वर्षांपूर्वीचा काळ. तेव्हा मी असेन तिसरी- चौथीत. आमची शाळा घराजवळच होती. त्यामुळं जेवायला आम्ही घरीच येत असू. डबा पाण्याची बाटली असला काही प्रकार नव्हता. आमची जेवणाची सुटी दोन वाजता व्हायची. चारच्या सुमारास खेळण्याची सुटी व्हायची. त्या वेळेतही आम्ही घरी यायचोच. काहीतरी चिरीमिरी खाण्यासाठी.

खेळायच्या सुटीत घरी यायचं अजून एक कारण होतं ते म्हणजे चुरमुरेवाली आजी! अंगावर फिक्‍या रंगाची नऊवार साडी, हातभर लाल बांगड्या, पायात कोल्हापुरी चप्पल आणि डोक्‍यावर भली मोठी टोपली. त्या टोपलीत असायचे ताजे, कुरकुरीत चुरमुरे, फुटाणे आणि खारे शेंगदाणे! आमचा त्यावेळचा अत्यंत आवडता खाऊ. दोनवेळचं जेवण सोडलं, तर हाच खाऊ आम्हाला मिळायचा. हल्ली घरोघरी होतात तसे पदार्थ म्हणजे उपीट, पोहे, इडली वगैरे त्या काळी नेहमी करत नसत. भूक लागली, की तेल-तिखट भाकरी, दही-भाकरी, ताक, फोडणीचा भात असंच काही खावं लागे. (ते आम्हाला आवडायचंही) फारच लाड म्हणजे चुरमुरे, खारे शेंगदाणे, चिक्की वगैरे. बस्स! एवढ्यातच आमची खाबुगिरी संपायची.

ती आजी थेट भट्टीतून चुरमुरे घेऊन यायची. त्यामुळं ते इतके खमंग असत, की अख्खा गाव आजीकडून चुरमुरे घेई. हल्ली दुकानातून पाकीटबंद चुरमुरे मिळतात; पण त्यांना थेट भट्टीतून आलेल्या आलेल्या चुरमुऱ्यांची सर कुठून येणार! घरातली मोठी माणसं याबरोबर हिरव्या मिरच्यांचा ठेचा खात असत. बच्चे कंपनी मात्र नुसत्या चुरमुऱ्यांवर ताव मारत असे. "आजी आली रे आली' म्हणत आम्ही तिच्याभोवती गराडा घालायचो. आजीही "घ्या रं पोरांनो' असं म्हणत टोपली आमच्या पुढ्यातच ठेवत असे. आम्ही तिथंच जमिनीवर बसून ओच्यात घेऊन खायचो. मुलं तर बकाणेच भरायची. वाटी-चमच्यापेक्षा असं खाण्यातच मजा असायची. आम्ही किती चुरमुरे, शेंगदाणे खाल्ले असतील याची गणतीच नाही; पण आजीनं याचा कधीच हिशेब केला नाही.

आजी खूपच मनमिळाऊ आणि मायाळू होती. लहान मुलं तिला फार आवडत. ती त्याना फार मायेनं वागवत असे. त्यामुळं आम्ही तिच्याजवळ बसलो, की उठायचं नाव घेत नसू; पण शाळेची घंटा झाली, की आम्हाला पळावं लागायचं.

मग आम्ही वाट बघायचो शनिवार आणि रविवारची. शनिवारी सकाळची शाळा. शाळेतून आल्यावर जेवण करायचं, असेल तेवढा अभ्यास उरकून टाकायचा. झोप काढायची. आई शनिवारी दुपारी दामटून झोपवायची आम्हाला. मला आणि माझ्या लहान भावाला. संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान आजी यायची, ती हाश्‍यहुश्‍य करीतच. गावात फिरून ती दमलेली असायची. सगळ्यांचा माल पोचता करून शेवटी ती आमच्या घरी यायची. थकलेली आजी निवांतपणे आंब्याच्या झाडाखाली बसायची. कापडात गुंडाळलेली भाजी-भाकरी खायची, पाणी प्यायची आणि घटकाभर डोळे मिटून बसून राहायची. माझी आई तिला काहीबाही खायला द्यायची; पण शिळं अन्न कधीच द्यायची नाही. अन्न द्यायचं ते ताजंच द्यावं असं तिचं म्हणणं होतं. आजीला याचं अप्रूप वाटे. आई आजीच्या अडी-अडचणीला कायम उपयोगी पडायची. आजीही याची जाण ठेवून आमच्याशी वागायची.

आजीला बच्चे कंपनीचा खूप लळा होता. लहान मुलांच्या सहवासात तिला खूप बरं वाटायचं. त्यांच्या निर्व्याज प्रेमानं ती आपली सगळी दुःखं विसरायची. तिच्याभोवती आम्हा सात-आठ जणांचा नुसता गलका चालू असायचा; पण आजी सर्वांशी मायेनं बोलायची. प्रत्येकाचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यायची. कुणी शाळेच्या गंमती सांगायचं, कुणी मित्राची भांडणं सांगायचं, तर कुणी शिक्षकांची तक्रार करायचं; पण आजी न कंटाळता त्यावर सल्ले द्यायची, कौतुक करायची, तर कधी रागवायचीसुद्धा. मुलांना तिचं रागावणंही आवडायचं. तिने एखादी चापट मारली, तरी मुलांना काही वाटत नसे. आजी आपलं बोलणं ऐकून घेतेय, आपल्याला समजून घेतेय याचंच त्यांना नवल वाटायचं.

या चुरमुरेवाल्या आजीकडं एक जाम भारी वस्तू होती, ती म्हणजे तिची चंची. चंची म्हणजे आत्ताच्या भाषेतली छोटी पर्स. चंचीला बाहेरून कप्पे असतंच; पण आतदेखील छुप्पे कप्पे असत. आतल्या कप्प्यांमध्ये रुपये- पैसे एकदम सुरक्षित राहत. त्या कप्प्यांत तिची दिवसभराची मिळकत असायची. पुढच्या कप्प्यांमध्ये तिचं किरकोळ सामान, घराची किल्ली वगैरे असे. रेशमी खणाच्या कापडाची, रंगीबेरंगी, शोभिवंत लेस आणि बटणं लावलेली ती छोटी पर्स मला फार आवडायची. आजीच्या पर्सवर सगळ्या बाळगोपाळांचा डोळा असायचा; पण आजी ती चंची कमरेत खोचायची. इतकी पक्की खोचायची, की ती हलत नसे, की पडतही नसे. पर्ससारखी हातात धरायची नाही, की खांद्यावर अडकवायची बात नाही. फारच छान आणि उपयोगी प्रकार होता तो.

एकदा असेच आम्ही तिच्या अवतीभवती खेळत होतो. तिच्याकडं चार- पाच जण चुरमुरे घ्यायला आले होते. कुणाला पाव किलो, कुणाला अर्धा, तर कुणाला एक, असं प्रत्येकांना मोजून ती देत होती. त्यामुळं तिचं आमच्याकडं लक्ष नव्हतं. त्या गोंधळात आम्ही तिची चंची मागून घेतली. मिळालेले पैसे गडबडीनं त्यात टाकून आजीनं आम्हाला ती चंची दिली. जणू हाताला खजिना लागला, असं आम्हाला वाटू लागलं. आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही खूप वेळ चंची घेऊन खेळत बसलो. खेळतखेळत जरा लांबवर गेलो. आजीही आमचा निरोप न घेताच निघाली आणि चंची राहिली आमच्याकडंच. मुलींशी भांडून ती मी माझ्याकडंच ठेवून घेतली. रात्री मी ती चंची उशाशीच घेऊन झोपले. दुसऱ्या दिवशी आईला हे दृष्टीस पडलं. त्यावरून ती खूप रागावली आणि चंची नीट कपाटात ठेवायला सांगितली. कारण त्यात आजीचे कष्टाचे पैसे होते. दुसऱ्या दिवशी जड मनानं आम्ही चंची आजीच्या स्वाधीन केली. आता आजी आपल्यावर खूप ओरडणार, असं वाटून आम्ही घाबरून गेलो होतो; पण असं काहीच झालं नाही. आजीनं हसतच चंची कमरेला लावली नेहमीप्रमाणं. जणू तिला विश्‍वास होता- चंची पोरांनी खेळायला घेतली होती, ती त्यांच्याकडं सुरक्षितच असणार.

आजी हे विक्रेत्याचे काम करायची; पण तशी ती सुखवस्तू घरातली होती. घरची शेतीवाडी, जमीन-जुमला होता. एकत्र कुटुंबात पंधरा- सोळा जण गुण्यागोविंदानं राहत होते, मिळून कष्ट करत होते. खाऊनपिऊन सगळे सुखी होते; पण नशिबाची चक्रं फिरली आणि आजीचा नवरा घर सोडून निघून गेला तो कायमचाच. परत त्याची चिठ्ठी नाही, की बातमी नाही आली. सासरच्यांनी याचा दोष मात्र आजीलाच दिला. तुझ्यामुळंच झालं असं म्हणू लागले. ती पार कोलमडून गेली होती; पण आपल्या मुलांसाठी ती अल्पावधीतच सावरली आणि साऱ्या घरादारावर पाणी सोडलं. सासरचा एक पैसाही न घेता ती तेथून निघाली. हिंमत न हारता दुसऱ्यांच्या शेतावर मोलमजुरी केली, पापड-लोणची करून विकलं. अहोरात्र कष्ट करून तिनं तिन्ही मुलांना वाढवलं. दोन्ही मुलांना इंजिनिअर केलं. मुलं आपल्या आयुष्यात स्थिरस्थावर झाली. आपल्या पिलांचे संसार फुललेले तिनं पाहिले. तेच समाधान तिच्या चेहऱ्यावर असायचं आणि वागण्यातही दिसायचं. मुलं तिला आपल्या घरी राहायला बोलवायची; पण हिला तिची झोपडी आणि चुरमुऱ्यांची टोपलीच प्रिय होती. तेच तिचं विश्‍व होते. तिची ही कर्मकहाणी त्या वयात आम्हाला कितपत कळायची काय माहीत; पण आमच्याही नकळत आम्ही तिच्या सुख-दुःखाशी बांधले गेलो होतो.

आजीचा उपदेश करण्याचा तर वेगळाच फंडा होता. रोजच्या रोज अभ्यास करायलाच हवा, हे ती दरडावून न सांगता त्यावरची एखादी गोष्ट किंवा चुटका सांगत असे आणि तो मला हमखास पटत असे. आई मला शिस्त लावण्याचा खूप प्रयत्न करे; पण मी बधत नसे. मात्र, आईला जे जमलं नाही, ते या कोण कुठल्या आजीला जमलं. हे खुद्द आईनंदेखील कबूल केलं होतं. कधी मैत्रिणीशी भांडण झालं, आम्ही एकमेकींवर रुसून बसलो, तर आजी आम्हाला खूप छान समजावयाची. कित्येकदा फक्त आजीच्या सल्ल्यानं आमची भांडणं मिटायची. आम्हाला याचं फार आश्‍चर्य वाटायचं, की आजीकडं खरंच सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं आहेत.

त्या दिवशी माझा वाढदिवस होता. सकाळपासूनच माझी धांदल चालू होती. लहानपणी आपल्याला आपल्या वाढदिवसाचं खूप कौतुक असतं. आईनं सकाळीच पाटाभोवती रांगोळी रेखून माझं औक्षण केलं होते. गोडाधोडाचा स्वयंपाक केला होता. संध्याकाळी गल्लीतल्या मित्रमैत्रिणी जमल्या. हसतखेळत सर्वांचं खाणंपिणं सुरू होतं. नंतर मी घरातल्या सर्व मोठ्या माणसांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. आमच्या घरी वाढदिवासाला केक कापणं, मेणबत्या फुंकून टाळ्या वाजवणं हे प्रकार चालत नव्हते. त्याऐवजी समया लावणं, औक्षण करणं अशा सात्त्विक गोष्टी व्हायच्या.
असा आमचा कार्यक्रम चालू असताना चुरमुरेवाली आजी आली. जरा घाईतच होती ती; पण एवढ्या गडबडीत ती न विसरता आली होती. शेतीच्या कामासाठी तिला तालुक्‍याच्या गावी जायचं होतं. दोन-तीन दिवस ती तिथंच राहणार होती, म्हणून ती एवढ्या धावपळीतसुद्धा मला भेटायला आली होती.

ती माझ्याजवळ आली आणि गंध लावून तिनं मला ओवाळलं. तोंडावरून मायेनं हात फिरवला. "लई मोठी हो गं बाय माजे' असा आशीर्वाद दिला. इकडच्या- तिकडच्या गप्पा झाल्या आणि एकदमच ती उठली. माझ्या हातात एक पुडकं दिले आणि परत यायचा वायदा करत भुर्रकन निघून गेलीसुद्धा!

त्या पुडक्‍यात काय असेल, याची मला कोण उत्सुकता लागली होती. तिथं हजर असलेल्या कुणाचीच पर्वा न करता अगदी आतुरतेनं ते पुडकं उघडलं आणि पाहते तर काय?.... त्यात होती नवी कोरी रेशमी खणाची रंगीबेरंगी चंची!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com