जे अव्यक्तालाही व्यक्त करतं ते संगीत! (संध्या काथवटे)

sandhya kathawte write article in saptarang
sandhya kathawte write article in saptarang

पाच-सहा मिनिटांतच व्हायोलिनचा आवाज बंद झाल्यामुळं मी मागं वळून बघितलं, तर त्या वादकानं व्हायोलिन खाली ठेवलं होतं आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ही पिलूच्या स्वरांनी केलेली किमया होती की त्याची संवेदनशील वृत्ती? की दोन्ही?

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, मला वाटतं, आपण सगळेच थोडंफार आत्मचिंतन करत असतो. काय मिळालं, काय गमावलं, काय बरोबर केलं, काय चुकलं हा विचार मनात येणं साहजिक असतं. माझ्या बाबतीत सांगायचं तर, फुलांनी भरलेल्या माझ्या ओंजळीतून फुलं मला ओघळतानाच दिसतात...कारण, ती ओंजळ तृप्तीच्या फुलांनी शिगोशिग भरलेली आहे.

कुठल्याही प्रथितयश गाणाऱ्यांच्या घरात जन्म झालेला नसूनही मला लहानपणापासून दर्जेदार गाणं-बजावणं ऐकायची सवय माझ्या आई-वडिलांनी लावली. इंदूरसारख्या सांस्कृतिक पार्श्‍वभूमी असलेल्या शहरात त्यांना ‘दर्दी’ श्रोत्यांच्या रांगेत बसवलेलं असायचं. घरात तबला-पेटी होती व आई बऱ्यापैकी व्हायोलिन वाजवत असे. शालेय शिक्षणात खूप चांगले गुण मिळवूनही, गाण्याकडं असलेला माझा कल पाहून, त्यांनी त्यादृष्टीनं मला मोलाचं प्रोत्साहन दिलं. मध्य प्रदेशातल्या ‘नीमच’सारख्या लहान गावात या क्षेत्रात जास्त वाव नसल्यामुळं मी नंतर राजस्थानातल्या वनस्थळी विद्यापीठात पुढच्या शिक्षणासाठी गेले. तिथं राजाभाऊ देव, नारायणराव पटवर्धन, रमेश नाडकर्णी यांच्याकडून माझ्या शास्त्रोक्त संगीताचा पाया घातला गेला व पद्धतशीर रियाजाचं महत्त्व मला उमजलं. अतिशय संवेदनशील वयातला हा काळ खूपच महत्त्वाचा होता.

पुढं इंदूरला परत आल्यावर डॉ. शशिकांत तांबे यांनी शास्त्रीय गायनाची गोडी लावली. ती लागली नसती तर असंख्य मुलींप्रमाणे मीही सिनेसंगीतातच गुंतून पडले असते. ‘वनस्थळी’चं शिस्तबद्ध व इंदूरचं मोकळं वातावरण यांचा सुंदर मिलाफ माझ्या पुढच्या सांगीतिक वाटचालीसाठी पोषक ठरला व तिला एक प्रकारची गती मिळाली, असं म्हणायला हरकत नाही. याच काळात आकाशवाणीच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम या तिन्ही गानस्पर्धांमध्ये मिळालेल्या पदकांमुळं आत्मविश्‍वासही वाढला.
स्त्रीच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे लग्न! इंदूरमध्ये पदव्युत्तर शिक्षण झालं व त्यानंतर लग्न होऊन मी मुंबईला आले. सर्वसामान्य लोकांमध्ये शास्त्रीय संगीताची जितपत रुची असते, तितपतच रुची लष्करी शिस्तीत वाढलेल्या काथवटे कुटुंबात होती. तरी त्यांनी माझ्या सांगीतिक वाटचालीत आडकाठी न आणता मला योग्य ती साथ दिली. अशी साथ मिळणं हे कुठल्याही कलाकाराला आवश्‍यक असतं.

एव्हाना मी छोट्या छोट्या मैफली करू लागले होते. अर्थात्‌ मैफलींमधून मिळणाऱ्या अनुभवांवरच कलाकाराची परिपक्वता अवलंबून असते, हेही तितकंच खरं! संगीताचा कुठलाही वारसा नसलेल्या कलाकाराला तर जास्तच मेहनत करावी लागते. संधी, संधीचा उपयोग, कष्ट व नशिबाची साथ या सगळ्याचं गणित जमतंच असं नाही. माझ्या जुळ्या मुलांच्या जन्मानंतर एका सामान्य स्त्रीपुढं येणाऱ्या सगळ्या समस्या माझ्याही समोर आल्या. मुलांचं संगोपन करताना शिकलेलं गाणं टिकवून ठेवणं हेच एकमेव ध्येय त्या वेळी माझ्यासमोर असे.

पुढं माझे पती श्रीश यांच्या नोकरीनिमित्त आम्ही गोव्याला गेलो. वास्कोत राहत असताना पणजी इथं ‘कला अकादमी’त मी गाणं शिकायला जाऊ लागले. तिथं गुरुवर्य वि. रा. आठवले (आबा) होते. ‘एसएनडीटी’मध्येही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एमए झाल्यामुळं त्यांच्या प्रशिक्षणाचा अनुभव मी घेतलाच होता. मला वाटतं, गायन आणि प्रात्यक्षिक यांच्याकडं असलेला माझा कल तेव्हाच त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर आबांबरोबर मी ‘ठुमरी’ या विषयावर खूप शिबिरं व कार्यशाळा केल्या. आबा आता नाहीत; पण मी शिबिरं व कार्यशाळा अजूनही करते. पुढं पुढं अनेक विषयांवर आधारित कार्यशाळांची भर पडत गेली. भारतात व परदेशातही माझ्या या कार्यशाळा खूप लोकप्रिय आहेत.

मला सुरवातीपासूनच वेगवेगळ्या विषयवस्तूंवर कार्यक्रम करायला फार आवडतं. नवीन विषयांवरचे हे कार्यक्रम श्रोत्यांसाठी करणं ही माझी विशेष आवड. हे कार्यक्रम श्रोत्यांबरोबरच कलाकारांसाठीही तेवढेच रोचक असतात. त्याअनुषंगानं करावा लागणारा अभ्यास, वेगवेगळ्या कलाकारांबरोबर आणि साथीदारांबरोबर घडणाऱ्या मैफली आणि अर्थातच तडजोडीही खूप काही शिकवून जातात. नवीन काहीतरी करावं या माझ्या विचारातून कर्नाटक शैलीच्या प्रसिद्ध गायिका अरुणा साईराम व गीता राजा यांच्याबरोबर मी जुगलबंदीचे बरेच कार्यक्रम केले. त्यातूनच मला माझ्या पीएच.डीचा विषयही सापडला. हा अनुभवही वेगळाच होता. शिकणं, शिकवणं व त्याचबरोबर शोधप्रबंधाचा अभ्यास करताना विविध पातळ्यांवर एकाच वेळी काम करण्याची क्षमता म्हणजे काय याचा नव्यानं शोध लागला. त्यानिमित्तानं खूप फिरले, नवनव्या कलाकारांना, विचारवंतांना भेटले. जर मैफलीच करायच्या तर पीएच.डीचा आग्रह कशाला, हाही विचार बऱ्याच लोकांनी बोलून दाखवला; पण आता वाटतं की परिपूर्ण व सर्वांगीण कलाकार होण्यासाठी जो विश्‍लेषणात्मक दृष्टिकोन आवश्‍यक असतो तो आणि गाण्यातला रुक्षपणा टाळायला ‘ठुमरी’ या गीतप्रकाराची समज मला शोधप्रबंधाच्या कार्यामुळंच मिळाली. आज मी ख्यालापासून ठुमरी किंवा गझल काहीही गायले तरी कशाचीही सरमिसळ होत नाही. सगळे गीतप्रकार मी आपापल्या परीनं हाताळू शकते, याचा मला आत्मविश्‍वास आहे.

कारकीर्दीच्या सुरवातीच्या काळात कलाकार खूप तडजोडी करत असतो. श्रोत्यांची मनं जिंकणं हा एकमेव भाव मनात धरून केलेलं ते प्रस्तुतीकरण असतं; पण पुढं पुढं स्वतःला भावणारं आणि श्रोत्यांना आवडणारं गाणं यातली दरी कमी होत जाते. माझ्याच बाबतीत सांगायचं तर महाराष्ट्रात कार्यक्रम करताना नाट्यसंगीताची फर्माइश बऱ्याच वेळा येते, तेव्हा ‘माझं शिक्षण या गीतप्रकारात झालेलं नाही; मी ते गाऊ शकणार नाही म्हणून कृपया पर्याय म्हणून तुम्ही ठुमरी, दादरा, चैती किंवा बारामासा ऐका...तुम्हाला नक्की आवडेल,’ अशी विनंती मी श्रोत्यांना करते. मग श्रोते ती मान्य करतात व ठुमरीचीच फर्माइश पुढं येते.

गेली काही वर्षं मी विद्यापीठ पातळीवरच्या प्रशिक्षण-कार्यशाळा, विद्यापीठ पातळीवरची महत्त्वाची पदं, परीक्षक, ‘सेलिब्रेट बांद्रा’सारख्या मोठ्या उत्सवात विभागप्रमुख, पीएच.डीची गाईड अशा वेगवेगळ्या भूमिका एकाच वेळी जगत आहे. पत्नी, सून, आई, सासू आणि आजी या भूमिकांमध्ये मी जशी रममाण होते तशीच याही भूमिकांमध्ये मी रमून जाते.

मी अगदी १२-१३ वर्षांची असताना माझ्या स्वरयंत्रावर सूज आली होती व तेव्हा मला सहा महिने ‘मौनव्रत’ धारण करावं लागलं होतं. त्या वेळी आवाज कायमचा गमावला जाण्याची भीती होती. हे झालं सक्तीचं मौन! पण नंतर विपश्‍यनेचा अनुभव घेताना काही वर्षांनी त्या शिबिरात मौन पाळण्याचा सकारात्मक अनुभव आला. कलाकाराच्या जीवनात अध्यात्म आणि कला यांची परस्परपूरक सांगड घातली जाऊ शकते; या दोहोंचा समतोल साधला गेला तर कुठल्याही प्रकारचं नैराश्‍य येऊच शकत नाही, असं माझं मत आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या यशस्वी होण्याच्या परिभाषा वेगवेगळ्या असतात. मला विचाराल तर, मी म्हणेन की जो कलाकार वैयक्तिक, सामाजिक व व्यावसायिक जीवनात समतोल साधू शकतो तो खरा यशस्वी! कलाकाराच्या यशस्वी कारकीर्दीत गुरूंचं मोलाचं योगदान असतं हे सर्वश्रुत आहे. मला संगीताचे सुरवातीचे धडे आईनं दिले. डॉ. शशिकांत तांबे यांनी रागांची समज, विलंबित गाण्यातल्या ठोकताळ्यांची आणि ताल-लयीची समज दिली. सन १९७७ पासून २०१६ पर्यंत मी गुरुवर्य वि. रा. आठवले (आबा) आणि गुरुवर्य बबनराव हळदणकर (काका) यांच्याकडं आलटून-पालटून शिकले. दोघंही उत्तम गायक, बंदिशकार, लेखक, शिक्षक आणि विचारवंत. आग्रा घराण्याची गायकी आणि तीवर त्यांचं प्रभुत्व हा या घराण्याची गायकी शिकणाऱ्यांसाठी अनमोल ठेवा होय. असं असूनही त्यांनी आपली मतं शिष्यांवर, विद्यार्थ्यांवर कधी लादली नाहीत. त्यांनी मुक्तहस्ते शिकवलं आणि शिष्यांना त्यांच्या कुवतीनुसार भर घालण्याची मोकळीक दिली. दोघांच्या बंदिशी ध्वनिमुद्रित करताना त्यांच्या समोर बसून गायचं सौभाग्य मला लाभलं आहे. आबांनी दिलेलं ठुमरीचं शिक्षण आणि सौंदर्यदृष्टी व काकांनी दिलेली आग्रा घराण्याची भक्कम बैठक यांचा परिणाम ख्यालात बोल टाकणं आणि ठुमरीतला बोलबनाव यासाठी पोषक ठरला. एक महत्त्वाची गोष्ट जी मी दोन्ही गुरूंकडून शिकले ती म्हणजे मैफलीची रचना आणि संयोजन, ज्यामुळं मैफल एकसुरी होत नाही.
कार्यक्रमाचं यश साथीदारांच्या भावनिक गुंतवणुकीवर अवलंबून असतं. असाच एक अविस्मरणीय अनुभव सांगावासा वाटतो.

विशाखापट्टणम्‌ इथं गीता राजा आणि माझ्या जुगलबंदीच्या वेळी माझी पिलूची ठुमरी सुरू असताना गीताच्या व्हायोलिन संगतकारानं उत्स्फूर्तपणे माझ्याबरोबर साथ करायला सुरवात केली. मात्र, पाच-सहा मिनिटांतच व्हायोलिनचा आवाज बंद झाल्यामुळं मी मागं वळून बघितलं, तर त्या वादकानं व्हायोलिन खाली ठेवलं होतं आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ही पिलूच्या स्वरांनी केलेली किमया होती की त्याची संवेदनशील वृत्ती? की दोन्ही? कार्यक्रमानंतरही काही न बोलता तो १० मिनिटं मंचावरच बसून होता.

चांगल्या प्रतीचं वाचन, लेखन, पर्यटन आदींचा परिणाम कलाकाराची कला चांगल्या तऱ्हेनं विकसित होण्यासाठीच होत असतो. माझी प्रकृती गंभीर वृत्तीची नसूनही संगीताकडं बघण्याचा माझा दृष्टिकोन मात्र गंभीर वृत्तीचा आहे.थोडक्‍यात म्हणजे, तुम्ही संगीतविश्‍लेषण करायचं तर करू शकता, लक्षपूर्वक ऐकायचं तर तेही करू शकता, आजूबाजूला जे वाजतंय त्याकडं विशेष लक्ष न देता तुम्ही स्वतःच्याच कामात व्यग्र राहिलात तर तेही ठीकच...! मात्र, जर तुम्हाला संगीतात काही शिकण्यासारखं वाटत असेल तर एका विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ते अभ्यासायला हवं. संगीत तेच असतं; पण ते ऐकण्यासंदर्भातला कुणाचाही दृष्टिकोन जरी बदलत गेला तरी ऐकणाऱ्या प्रत्येकाला अपेक्षित असलेला आनंद ‘तेच’ संगीत देतं! ऐकणाऱ्याच्या कुठल्याही अपेक्षेला पुरून उरण्याचं सामर्थ्य संगीताच्या त्या अथांग रूपात आहे. ‘संगीताला काही विशिष्ट शाब्दिक अर्थ नाही, तर ते फक्त ‘अस्तित्व’ आहे,’ असं कुणीसं म्हटलेलं आहे. जे विचार शब्दांत बांधणं कठीण असतं, असे विचारही संगीत व्यक्त करू शकतं आणि जे विचार शब्दांत व्यक्तच होऊ शकत नाहीत, जे विचार निःशब्दच असतात, असेही विचार प्रकट करण्याचं सामर्थ्य संगीतात असतं. शांततेशिवाय एखादी अव्यक्त वाटणारी गोष्ट जे व्यक्त करू शकतं ते म्हणजे ‘संगीत’!

कलेच्या क्षेत्रात जवळजवळ ४० वर्षं निष्ठेनं काम केल्यावर घडलेल्या रोचक घटनांविषयी, भेटलेल्या व्यक्तींविषयी, मिळालेल्या अनुभवांविषयी सगळ्यांना सांगायला हवं’ या विचारानं ‘पूर्वसंध्या ः माझा सांगीतिक प्रवास’ हे पुस्तक मी लिहिलं असून, ते अलीकडंच प्रकाशित झालं आहे.
या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे ते एका बाजूनं मराठीत, तर दुसऱ्या बाजूनं इंग्लिशमध्ये आहे. माझं उर्वरित आयुष्यही असंच गानकलेच्या संगतीत जावं हीच प्रार्थना!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com