आईइतकीच मातृभूमीची सेवा!

Sandip-kale
Sandip-kale

‘काश्मीरमध्ये मी चौथ्यांदा बदलून आलोय. याच्यापूर्वी मी चार वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं आहे. काश्मीरमधलं वातावरण बदललंय, वस्तीलगतच्या अनेक भागांमधून रात्रीच्या वेळी जवानांवर दगडफेक केली जाते. इथले लोक म्हणतात, आमचं काश्मीर स्वतंत्र आहे, आम्हांला लष्कराची गरज नाही. सरकारचं जवानांना सांगणं आहे की पाकिस्तान तसेच दहशतवादी आणि चीनकडून काश्मीरच्या लोकांना धोका आहे, तुम्ही दक्ष राहा. स्थानिक पातळीवरचे पोलिस इथल्या कुठल्याही कारवाईला सहकार्य करत नाहीत.’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशातले अनेक भाग माझ्याकडून पाहायचे राहिले आहेत. तिथले विषय, समस्या आणि त्यासंबंधीचं समाजकारण, राजकारण मला समजून घ्यायचं होतं. त्यामध्ये जम्मू-काश्मीरही होतं. गेल्या तीन वर्षांपासून जम्मू - काश्मीरला जाण्याचं मी ठरवत होतो, पण योग येत नव्हता. या वर्षी ठरवून टाकलं आणि दिवाळीच्या कालखंडामध्ये, ठरलेल्या बेताप्रमाणे मी निघालो. पहेलगाव, सोनमर्ग, श्रीनगर यानंतर मी गंडोल्याला पोहोचलो. स्वर्ग कशाला म्हणतात हे माहीत नाही. पण स्वर्गापेक्षाही इथलं वातावरण सुंदर असावं. गंडोल्याला जमिनीपासून पंधरा हजार किलोमीटरवरती वर मला जायचं होतं. गाडीनं जेमतेम अर्धा भाग मी कापला. अचानक खूप बर्फवृष्टी सुरु झाली. माझी गाडी पुढं हलायचं नाव घेईना. गाडी जागेवर थांबली. माझ्या पुढं आणि मागं गाड्यांच्या रांगाच रांगा होत्या. रस्ता मोकळा करायला माणसं, यंत्रणा यांना अर्थातच वेळ लागणार होता. ना मोबाईलला रेंज, ना कुणी बोलायला सोबतीला. थोड्या वेळानं बर्फ पडणं थोडं कमी झालं. आणि मी गाडीच्या खाली उतरलो. ड्रायव्हर म्हणाला, ‘‘साहब संभालके, बहोत खतरा है इधर.’ थोडसं वर एक नजर टाकली तर एका छोट्याशा टीनच्या झोपड्यामधून धूर निघत होता. मी ड्रायव्हरला सांगितलं, 'मी जरा जाऊन येतो.' ड्रायव्हर म्हणाला, 'साहेब, सांभाळून जा. 

तिकडनं आवाज आला तर त्यांना उत्तर द्या.' मी त्या झोपडीच्या दिशेनं निघालो. बर्फावरून चालताना चार वेळा घसरत मी त्या झोपडीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलो. मी झोपडीच्या जवळ गेल्यावर आवाज आला. ‘कौन है ? क्या कर रहे हो...’ मला काही कळेचना, ड्रायव्हरनं सांगितलेले नियम पटकन माझ्या लक्षात आले. मी दोन्ही हात वर केले. ‘मी, मी यात्रेकरू आहे,’ असा जोरदार आवाज दिला. समोर असलेल्या झोपडीमधून वर्दीतला एक तरुण चेहरा मला हाक मारत होता. माझ्या लक्षात आलं, ही केवळ झोपडी नव्हती. जवानांकरता सुरक्षेसाठी केलेली चौकी आहे. मी खालूनच आवाज दिला. ‘मी येऊ शकतो का वर ? तुम्हाला काही अडचण नाही ना ?’ त्यांनी तिकडूनच मला उत्तर दिलं. ‘कशासाठी यायचंय? काय काम आहे?’ मी उत्तर दिलं, ‘‘काही नाही. माझी गाडी अडकली आहे. मी थंडीनं गारठलो आहे. मला शेकोटीपाशी बसायचंय', तिकडून तो म्हणाला, ‘तुमचं जॅकेट काढा, आतमध्ये काय आहे, ते मला दुरूनच दाखवा.’ मला एकदम धस्स झालं, मी जॅकेट काढलं. माझ्याकडं काहीही नाही, याची मी समोरच्या व्यक्तीला खात्री करून दिली. मी त्या झोपडीच्या अगदी वर गेलो. पण मला वर काही चढता येईना, पाय घसरत होता, माझी चढताना माझी धडपड चाललीय हे त्या जवानाच्या लक्षात आल्यावर तो चौकीच्या बाहेर आला. त्यांनी मला हात देत वर घेतलं आणि आपल्या झोपडीत आत घेतलं. मी त्या व्यक्तीशी काही न बोलता लगेच माझे हातमोजे काढले आणि समोर असलेल्या शेकोटीच्या पुढं माझे हात नेले. तो जवान मला म्हणाला, 'कहॉं से आए हो?' मी म्हणालो,' मुंबई...!' इतक्यात त्याचा फोन वाजला. मी आश्‍चर्यानं त्या फोनकडे बघत होतो. तो फोन उचलणार इतक्यात तो कट झाला. मी त्या जवानाला म्हणालो, 'आपका फोन लग रहा है, मेरा फोन बंद है.' त्याचा पुन्हा फोन आला. 

तिकडून व्हिडिओ कॉलवर मराठी मुलीचा आवाज ऐकून, माझ्या चेहऱ्यावरचा तणाव कमी झाला. ती मुलगी म्हणत होती, 'दादा, ओवाळू का आता, तुला वेळ आहे?' तो म्हणाला, 'थांब जरा. मी डोक्यावर काही तरी घेतो.' त्यानं डोक्यावरची जडच्या जड टोपी काढली आणि खिशामधला हातरुमाल काढून डोक्यावर ठेवला. तिकडनं त्या बहिणींनं ओवाळणं सुरू झालं. हा पण बहिण अगदी समोर असल्यासारखा मान खाली करून तिचं ओवाळणं स्वीकारत होता. तिचं ओवाळणं झाल्यावर मध्येच म्हणाला, ‘एक मिनिट थांब.’ त्यानं ‘गुगल पे’ वरून आपल्या बहिणीला ओवाळणी घातली होती. तो भाऊ लगेच म्हणाला, ‘बघ तुझी ओवाळणी तुला मिळाली ना?' ती बहीण लगेच तिकडून म्हणाली, 'याची काही गरज होती का? तू पण ना ! 

'माझ्याकडे लक्ष देत तो भाऊ त्या बहिणीला म्हणाला, 'माझ्याकडं थोडसं काम आहे. तुला थोड्यावेळाने फोन करतो.' असं म्हणत त्या भावानं आपला मोबाईल बंद केला. मी त्या जवानाला म्हणालो, ‘तुम्ही महाराष्ट्रीय आहात?' तो नुसतं हो म्हणाला. मी त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होतो. तो मात्र जेवढ्यास तेवढ्या पुरतं बोलत होता. त्याला गप्पा मारण्यासाठी कसं तयार करावं असा प्रश्‍न मला पडला होता. मी मग मोबाईल काढून त्यातले जुने फोटो बघत बसलो. त्यालाही सर्व हे फोटो दाखवत होतो. पुस्तकप्रकाशनाचे फोटो दाखवत होतो. हा माझ्या आईचा फोटो, हा माझ्या बाबांचा फोटो. असं करत करत त्याला गप्पात सहभागी करून घेत होतो. तोही त्याच्या परिवाराचे फोटो मला दाखवायला लागला. तुम्ही कुठले ? कधी जॉईन झालात. घरी कोण, कोण आहेत? इथं सर्व काम कसं चालतं, असे विविध प्रश्‍न माझ्याकडून सुरू झाले. तोही मोकळेपणानं त्याची उत्तरं द्यायला लागला. ''तुम्ही किती तास असता?'' यावर तो म्हणाला, 'तसं आठ तास असावं लागतचं. पण परिस्थितीनुसार कधी बारा तास होतात, तर कधी दोन दोन दिवस जागेवरून हालता येत नाही.' मी दीड तासापासून त्या भागात होतो. त्या जवानानं घातले होते तेवढेच गरम कपडे माझ्याही अंगात होते तरीही माझ्या शरीराचा बर्फ झाल्यासारखी अवस्था होती. गप्पांमधून अनेक विषय पुढं येत होते. ही माणसं इथं ५०-५० किलो ओझं पाठीवर घेत, डोळ्यात तेल घालून रात्रीचा दिवस करत खडा पहारा देतात. तेव्हा कुठं आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित झोपतो याची प्रचिती मला तिथल्या वातावरणातून येत होती.

मी ज्या जवानाशी बोलत होतो, त्या जवानाचं नाव श्रीपती राजाराम तिरुके. तो सातारचा रहिवासी. वयाच्या तेविसाव्या वर्षीच तो सैन्यामध्ये भरती झाला. तो सांगत होता. ‘‘ घरी अर्धा एकर शेती. प्रचंड गरिबी. या गरिबीची ठिगळं झाकण्यासाठी मी दहाव्या वर्षापासूनच लोकांकडं मिळेल ती कष्टाची काम करायला लागलो. चांगले मित्र सोबतीला होते. ज्यांनी व्यायाम करायला, निर्व्यसनी राहायला शिकवलं. त्याच मित्रांनी मला सैन्यभरतीसाठी जाण्याकरता पुढाकार घेतला. माझ्यासोबत असणारे चारही मित्र आजही काबाडकष्ट करतात. मी त्यांच्या संगतीनं लष्करांमध्ये झालो. त्यांच्या नशिबी मात्र अजून तोच वनवास कायम आहे.'' मी म्हणालो, ''तुम्ही तुमच्या मित्राला भेटता तेव्हा काय होतं.'' तो म्हणाला, ‘‘आम्ही जेव्हा चौघंही भेटतो, ते मला सॅल्यूट करतात.

आणि मीही त्यांना सॅल्यूट करतो. माझ्या मित्रांनी मला त्या वेळी मदत केली नसती, तर मी आज कुठंतरी हमाली केली असती. लग्न, कुटुंब याविषयी तो मला भरभरून बोलला. अनेक गोष्टी त्यानं मोकळेपणानं मला सांगितल्या. तो म्हणाला, ‘‘ मी जेव्हा लष्करामध्ये भरती झालो, तेव्हा माझं प्रेम असणाऱ्या माझ्या मामाच्या मुलीबरोबर माझं लग्न मोडण्यात आलं. माझी मामी म्हणाली, ‘लष्करात गेलेल्या पोरांचं काही खरं नसतं. वर्षातून एकदा घरी येतात. कधी कुठं हल्ला होतो. 

हे सांगता येत नाही.’’ असं कारण सांगून माझं जमलेलं लग्न मोडण्यात आलं. त्यानंतर पुढच्या दोन वर्षांत माझं ज्या मुलीसोबत लग्न होणार होतं, तिचा मृत्यू झाला.'' पाकिटामधला फोटो काढत आपल्या मामाच्या मुलीचा फोटो मला दाखवला. मी पुन्हा म्हणालो, ''तुमचं लग्न कधी झालं.'' तो म्हणाला, ''मला लग्न करायचं नव्हतं. पण म्हाताऱ्या आईबाबांना आधार नको का, म्हणून मी लग्न केलं. लग्नामध्ये मला फक्त आठ दिवसांची सुट्टी मिळाली. भारत-पाकिस्तान सीमेवर प्रचंड तणाव निर्माण झाला. आणि मला तातडीनं हजर होण्याचे आदेश मिळाले. तिथला तणाव प्रचंड वाढत गेला. चौकी आणि लष्कराची तुकडी, यांचा चार चार दिवस ताळमेळ नव्हता. या वातावरणामुळं कोणाचा कुणाला संपर्क होईना. सलग पंधरा दिवस ते वातावरण कायम होतं. जेव्हा वातावरण निवळलं, तेव्हा मी आमच्या ठिकाणी पोहोचलो. तेव्हा माझ्या वरिष्ठांनी मला माझी आई गेल्याचं सांगितलं. आई गेल्या अनेक वर्षांपासून कर्करोगानं आजारी होती. तिच्यावर उपचार सुरू होते, पण शेवटी तिनं त्या उपचाराला साथ दिली नाही. घरी फोन केल्यावर वडिलांनी रडत रडत चार दिवसांपूर्वी मला आई गेल्याचं सांगितलं. मी घरी पोहोचलो. आई जाऊन सहावा दिवस होता.'' एक एक करत आयुष्यामध्ये घडलेले असे परीक्षा पाहणारे प्रसंग मला श्रीपती सांगत होता.  ‘‘काश्मीरमध्ये मी चौथ्यांदा बदलून आलोय. याच्यापूर्वी मी चार वेगवेगळ्या ठिकाणी काम केलंय.

काश्मीरमधलं वातावरण बदललंय, वस्तीलगतच्या अनेक भागांमधून रात्रीच्या वेळी जवानांवर दगडफेक केली जाते. इथले लोक म्हणतात, आमचं काश्मीर स्वतंत्र आहे, आम्हाला लष्कराची गरज नाही. सरकार म्हणते पाकिस्तान, दहशतवादी आणि चीनकडून काश्मीरच्या लोकांना धोका आहे, तुम्ही सतर्क राहा. स्थानिक पातळीवरचे पोलिस इथल्या कुठल्याही कारवाईला सहकार्य करत नाहीत. या सगळ्या परिस्थिमध्ये चोहोबाजूंनी धोका असल्यानं, काम करणाऱ्या जवानांचं मरण अटळ आहे,'' असं मला श्रीपती सांगत होता. श्रीपतीचा प्रत्येक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर येत होता. एक पायाला आणि एका हातावर त्याच्या हाताला लागलेल्या गोळ्यांच्या खुणा तो मला दाखवत होता. कुठल्या कुठल्या हल्ल्यामध्ये तो कसा बचावला हे मला सांगत होता. सरकार बदलले की लष्कराकडं पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो, ते तो मला सांगत होता. 

मी पुन्हा विषय बदल करत, ''आता घरी कोण कोण असतं,'' असा प्रश्‍न श्रीपतीला केला. त्या टीनच्या झोपडीमधून चोहोबांजूनी नजर टाकत आपल्या खिशामधला मोबाईल काढत आपल्या दोन्ही मुलींचे फोटो माझ्यासमोर ठेवत श्रीपती म्हणाला, ''माझे वडील आणि दोन मुली घरी असतात.'' मी मध्येच म्हणालो, ''मुलींची आई?'' ''ती अपघातात वारली.'' मी म्हणालो, ''कधी झाला अपघात?'' ''चार वर्षांपूर्वी ती दिवाळीला भाऊबिजेच्या निमित्ताने आपल्या माहेरी जात होती. तेव्हा अचानक बसला अपघात झाला.'' मी थोडसं सावरत श्रीपतीला म्हणालो, ''मुली काय करतात?'' तो म्हणाला, ''खास असं काही नाही. त्यांचं शिक्षण सुरू आहे. एकीकडे शिकायचं आणि दुसरीकडं आपल्या आजोबांचा सांभाळ करायचा. अशी दोन्ही कामं माझ्या मुलींना करावी लागतात. माझे चारही मित्र आणि त्यांचे कुटुंबिय मुलींची काळजी घेतात,'' असं मला श्रीपती आवर्जून सांगत होता.

अनेक गोष्टी श्रीपतीनं मला सांगितल्या, ज्याची मी लेखात नोंद करू शकत नाही. मग त्या कौटुंबिक, स्थानिक, कार्यालयीन, सरकारच्या दृष्टीनं, आणि तिथं होणाऱ्या भ्रष्टाचाराविषयी होत्या. समोर पेटणाऱ्या शेकोटीमधून तडतड असा आवाज येत होता. ओली लाकडं, आता पेटली होती. अधून मधून वरच्या पत्र्यावर बर्फ जोरात आदळत होता. शेकोटीची धग, पत्र्याचा आवाज आणि श्रीपतीची नजर या तिघांचा समन्वय साधला गेला होता. जणू त्या वातावरणाला या तिन्ही प्रकारांची सवय झाली होती.

खालून जोरजोरानं कुणीतरी आवाज देत होतं. आम्ही दोघांनीही त्या आवाज देणाऱ्या माणसाकडं पाहिलं. माझ्या लक्षात आलं, तो माझ्या गाडीचा ड्रायव्हर होता. घड्याळ बघितलं तर मला तिथं येऊन साडेतीन तास उलटून गेले होते. बाजूला रचून ठेवलेली लाकडं संपायला आली होती. मी श्रीपतीला म्हणालो, ''मी निघतो आता.'' श्रीपती म्हणाला, ''मी तिकडे आल्यावर तुम्हाला नक्की भेटतो.'' तिथून निघताना श्रीपतीला मिठी मारली. श्रीपती म्हणाला, ‘‘ दादा, आपल्याला जन्म देणाऱ्या मातेची क्षणभरही सेवा करायला संधी मिळाली नाही.

मात्र जी भूमाता आहे, जी आपल्या आईचं दुसरं रूप आहे, तिची सेवा मात्र करायला मिळते. तुम्ही असो, की मी असो, हे भाग्य आपल्याला लाभलंय. माझं साधन, माझी बंदूक आहे. तुमचं साधन लेखणी, आपली साधनं वेगवेगळी आहेत, पण ध्येय एकच आहे.'' श्रीपतीला मिठीतून सोडल्यावर जोरदारपणे सॅल्यूट मारला. खाली जाताना, अवघड रस्ता संपेपर्यंत तो मला सोडायला आला होता. त्या छोट्याशा रस्त्यांमध्ये मी पडू नये याची काळजी तो घेत होता. त्याचबरोबर जवळच्या वस्त्यांवरून कोणताही दहशतवादी हल्ला होऊ नये म्हणून तितकीच काळजी घेत होता. सगळ्या सुखांवर पाणी सोडत भारतमातेच्या सेवेसाठी सदा तत्पर असणाऱ्या श्रीपतीसारख्या त्या प्रत्येक जवानाला करावे तितके सॅल्यूट कमीच आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com