esakal | असे संजीवकुमार हवेतच! (संदीप काळे)
sakal

बोलून बातमी शोधा

Sandip-Kale

संजीवकुमार यांच्या सोबतच्या त्या दिवसभराच्या प्रवासामध्ये खूप प्रश्न माझे मलाच पडले होते. एखादा गावाकडचा माणूस जिल्ह्याच्या ठिकाणी, पुणे, मुंबई, दिल्ली आणि परदेशात जेव्हा स्थिर होतो, तेव्हा आपल्या अन्य गरजू बांधवाला तिकडे स्थिर करावं, असं त्यांना का वाटत नसावं. कुवतीप्रमाणे नोकरी, उद्योग आणि बहुजनांच्या मुलांना काम द्यावं, असं त्या शहरात, परदेशात स्थिरावलेल्या बहुजनांच्या मुलांना का वाटत नसावं? असे अनेक प्रश्न मला या निमित्तानं पडत होते.

असे संजीवकुमार हवेतच! (संदीप काळे)

sakal_logo
By
संदीप काळे sandip.kale@esakal.com

संजीवकुमार यांच्या सोबतच्या त्या दिवसभराच्या प्रवासामध्ये खूप प्रश्न माझे मलाच पडले होते. एखादा गावाकडचा माणूस जिल्ह्याच्या ठिकाणी, पुणे, मुंबई, दिल्ली आणि परदेशात जेव्हा स्थिर होतो, तेव्हा आपल्या अन्य गरजू बांधवाला तिकडे स्थिर करावं, असं त्यांना का वाटत नसावं. कुवतीप्रमाणे नोकरी, उद्योग आणि बहुजनांच्या मुलांना काम द्यावं, असं त्या शहरात, परदेशात स्थिरावलेल्या बहुजनांच्या मुलांना का वाटत नसावं? असे अनेक प्रश्न मला या निमित्तानं पडत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिल्लीमध्ये असणारे आणि माझे अगदी जवळचे संबंध असणारे एक ‘आय.पी.एस.’ अधिकारी कोरोनाशी सामना करत १५ दिवसानंतर  घरी परतले होते. आज भेटायला जाऊ, उद्या भेटायला जाऊ, असं करता-करता पंधरा दिवसांनंतर एक रविवार उजाडला. मी त्यांना भेटायला दिल्लीकडं निघालो. विमानतळावर पोहोचलो. विमानतळावर कोरोनाची परिस्थिती आहे, लॉकडाऊनची परिस्थिती आहे, असं कुठलंही चित्र नव्हतं. परदेशी नागरिकांमुळं आपल्याकडे कित्येक महिन्यापासून कोरोनाचा मुक्काम आहे, हे सर्वज्ञात असतानाही परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांची संख्या आजही मोठ्या प्रमाणात दिसत होती. सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी सुरू होती. मात्र त्यात काटेकोरपणा नव्हता, निष्काळजीपणाचा कळस लोकांच्या जीवनाशी खेळ होईल की काय, असे कितीतरी प्रश्न माझ्या मनात येत होते.

दिल्लीला जाणाऱ्या विमानात एकदाचा मी बसलो त्यापूर्वी कोरोनामुळे वाढलेल्या तपासणीच्या फेऱ्यांतून अखेर सुटलो. विमानामध्ये माझ्या बाजूला एक गृहस्थ येऊन बसले. थोड्या वेळाने त्या गृहस्थांनी मला तुमच्या जवळचा पेपर वाचायला द्या, असे म्हणत बोलायला सुरुवात केली. तुम्ही कुठले, कुठं जाताय, काय करता, अशा आमच्या प्राथमिक गप्पा सुरू झाल्या. आमच्या गप्पांमधून मला माझ्या बाजूला बसलेली व्यक्ती वेगळी असल्याचं जाणवत होतं. त्यांच्या बोलण्यामधनं अनेक विषय माझ्या समोर येत होते. मग ते बोलताना म्हणाले, ‘‘ समाजात संख्येनं मूठभर असलेल्या अशा माझ्या बंजारा समाजाला शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, उद्योगांमध्ये, आरक्षणामध्ये सवलती मिळाव्यात, महाराष्ट्रामध्ये त्यांचं जगणं सुखकर व्हावं, यासाठी मी कालच, राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना भेटलो,’’ असं म्हणत त्या व्यक्तीनं ते निवेदन आणि या समाजासमोर असलेल्या एकूणच समस्यांची फाईल माझ्या हातात दिली. मी खूप वेळ ती फाईल बारकाईनं पाहात होतो.

बंजारा समाजाच्या समस्यांबद्दल एक चांगलं संशोधन माझ्या डोळ्यासमोर होतं. महाराष्ट्राच्या मातीमधला, संस्कृती टिकवून ठेवणारा, प्रचंड कष्ट करणारा, बंजारा समाज आजही एवढा उपेक्षित आहे, हे मला माहीत नव्हतं. मग एक एक करत ते ज्या ज्या घटकांमध्ये काम करत होते, त्यांचे एकेक मुद्दे त्यांच्या सांगण्यातून माझ्या समोर येत होते. मी ज्या गृहस्थांशी बोलत होतो त्यांचे नाव संजीवकुमार राठोड (९७१७२१५५३३). संजीवकुमार मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या चुंचा या गावाचे रहिवासी. संजीवकुमार शिक्षणानिमित्त दिल्लीला आले. तिथं त्यांनी ‘यूपीएससी’चा अभ्यास करीत ‘आयएएस’च्या परीक्षेची तयारी केली. चार वर्षं प्रयत्न करून शेवटच्या टप्प्यामध्येही त्यांना यश आलं नाही. मात्र चार वर्षांत त्यांनी दिल्ली समजून घेतली होती. आता दिल्ली सोडायची नाही, हा निर्णय त्यांनी घेतला. छोट्या छोट्या उद्योगांपासून त्यांनी आज स्वत:च्या चार कंपन्या दिल्लीत सुरू केल्या. ज्या कंपन्यांमध्ये बहुतांशी तरुण हे मराठवाड्यातील आहेत.  वायर तयार करण्यापासून ते बांधकामाचे साहित्य तयार करण्यापर्यंतच्या अनेक  

निर्मिती प्रक्रियांमधल्या कंपन्या राठोड यांच्या मालकीच्या आहेत. संजीवकुमार मला सांगत होते, एकदा रस्ता निवडल्यावर मागं वळून पाहायचे नाही, ही शिकवण मराठवाड्याच्या मातीची आहे. २००२ मध्ये मी सुरुवातीला दिल्लीत ‘यूपीएससी’ चे क्‍लास सुरू केले. पुणे, मुंबईच्या तुलनेत दिल्लीला ‘यूपीएससी’चे वातावरण निश्‍चितच पोषक आहे. त्या वातावरणात आपल्याकडच्या मुलांनी स्वत:ला सामावून घेतलं, तर त्याचा फायदा होतो मग तो अधिकारी होवो किंवा न होवो - आयुष्यभर होतच असतो. मला दिल्लीची ‘नस’ कळल्यामुळे माझ्या भागातील केवळ बंजारा समाजच नव्हे, तर अनेक जातिधर्मातील अनेक गरजू मुलं मुली मी दिल्लीला आणली. जेव्हा आपण ही मुलं घेऊन येतो, तेव्हा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यापासून त्यांचं तिकीट भरण्यापर्यंत, त्यांचा पहिल्या महिन्याचा खर्च उचलण्यापर्यंत. त्यांचा दिनक्रम सुरू झाला की नाही, याची विचारपूस करण्यापर्यंत सगळंच करावं लागतं. काही मुलांना खूप यश मिळतं आणि काही मुलं महिन्या- दीड महिन्यात निराश होऊन मिळेल त्या मार्गानं घरी परततात. माझ्या भागातली आज चारशेहून अधिक मुलं दिल्लीत स्थायिक झाली आहेत, याचा मला आनंद होतो. खरे तर तीच माझी खरी कमाई आहे, असं संजीवकुमार यांनी मला आवर्जून सांगितलं.   

गावातल्या पदवी झालेल्या मुलांना दिल्लीला येण्यासाठी तयार करणं, यातच आपण अर्धी शर्यत जिंकलेलो असतो. गावातला पदवी झालेला मुलगा फार फार तर शहराच्या ठिकाणी जाऊन छोटी-मोठी नोकरी करत पुढे जाऊन शिकण्याचा विचार करतो. थोडा पैसेवाला आणि संस्कारी घरचा असेल तर तो पुण्यापर्यंत जाण्याचा विचार करतो. मुंबई, दिल्ली आणि परदेशामध्ये जाणाऱ्या मुलांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल, इतकीच असते. ही मुलं मोठ्या शहराचा रस्ता का धरत नाहीत, त्याचं कारण संजीवकुमारसारखी फार कमी माणसं त्यांच्या आयुष्यामध्ये येतात. म्हणून त्यांचं भाग्य उजळत नाही, असंच म्हणावं लागेलं. मी मनातल्या मनात विचार करत होतो, तितक्‍यात धाडकन आवाज आला. विमान दिल्ली विमानतळावर पोहचलं होतं. विमानातून खाली उतरतानाही संजीवकुमार यांचं माझ्याशी बोलणं सुरूच होतं. ते म्हणाले, ‘यूपीएससी’ मध्ये उत्तीर्ण होणाऱ्यात मराठी मुलांचा टक्का खूप कमी आहे; पण मेहनत करणारी या प्रवाहात स्वत:ला वाहून घेणारी अनेक मुलं आयुष्याच्या इतर प्रवासामध्ये मात्र यशस्वी होतात.
मी म्हणालो, ते कसं काय?
संजीवकुमार म्हणाले, सरकारी अधिकारी नाही झालं तरी अनेकांनी छोटासा उद्योग सुरू केला. ज्यांना उद्योग जमला नाही, त्यांनी खासगी नोकऱ्या केल्या आणि ज्यांना खासगी नोकऱ्या जमल्या नाहीत, त्यांनी कोचिंग क्‍लास, रिसर्च आणि इतरांनी मदत करण्याच्या दृष्टीने स्वत:ची कन्सल्टन्सी सुरू केली. दिल्लीतल्या राजेंद्रनगर आणि मुखर्जीनगर या दोन्ही भागात आज मराठी टक्का मोठ्या प्रमाणात वाढलाय. त्याचे कारण एकच, एक मुलगा दिल्लीला येतो आणि तो इकडे स्थिरस्थावर होतो. आपल्या अनेक भावांना दिल्ली येऊन सेटल होण्यासाठी मदत करतो. आम्ही दोघंही जण एअरपोर्टच्या बाहेर आलो. संजीवकुमार यांनी माझ्या जवळ असलेला पत्ता हातात घेऊन बघितला. स्मितहास्य करतच ते म्हणाले, अहो, चला आपल्याला जवळ जवळच जायचं आहे. मी जाताना तुम्हाला सोडेन.

आम्ही विमानतळाच्या बाहेर आलो. त्यांचा ड्रायव्हर वाटच पाहात होता. गाडीत बसलो. थोडे पुढे गेल्यानंतर तो ड्रायव्हरही बंजारा भाषेत बोलायला लागला. संजीवकुमार त्या ड्रायव्हरकडं बघत मला म्हणाले, ‘‘हा उमरखेडचा किशन चव्हाण. स्वत: यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीत आला होता. दोन वर्षं त्याने प्रयत्न केले; पण त्याला यश आलं नाही. मागं फिरून गावाकडं जायचं नाही, असं त्यांनं ठरवले होतं. मग त्यानं स्वत:ची एक टॅक्‍सी घेतली. आता त्याच्या दिल्लीत पाच टॅक्‍सी आहेत. पाचही टॅक्‍सी चालवण्यासाठी त्याच्याकडे माणसं आहेत. मी जेव्हा त्याला फोन करतो, माझ्या ड्रायव्हरची अडचण असते, तेव्हा तो मला घ्यायला येतो.’’

मी बोलायच्या अगोदरच किशन स्वत:हून बोलू लागला. संजीवदादांनी मला कशी मदत केली, कसं उभं केलं ते सांगतलं. ‘‘आता माझ्याकडे जे पाच ड्रायव्हर आहेत, ते मीही गावाकडून आणलेत,’’ असं किशन सांगत होता. मला लक्षात आलं अशा अनेक संजीवकुमारची साखळी या निमित्ताने जोडत-जोडत ती पुढं जात आहे. थोडं पुढं गेल्यानंतर आमची गाडी एका हॉटेलच्या समोर थांबली. संजीवकुमार म्हणाले, ‘‘ दादा, काही तरी खाऊन घेऊ या. आम्ही हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलच्या काऊंटरवर बसलेला तरुण मालक संजीवकुमारला पाहता क्षणी स्वागत करायला आला. रामराव महाराज, सेवालाल महाराज यांचा फोटो, छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक मूर्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मोठी प्रतिमा पाहून माझ्या लगेच लक्षात आलं, या व्यक्तीचं काही तरी महाराष्ट्र कनेक्‍शन असलं पाहिजे. ती व्यक्तीही संजीवकुमार यांच्याशी बंजारा भाषेत बोलत होती. आम्हाला घ्यायला आलेला ड्रायव्हर अगदी संजीवकुमार यांच्या बाजूला बसलेला होता. संजीवकुमारांनी त्या हॉटेलमालकाची ओळख करून दिली. संजीवकुमार म्हणाले, ‘‘ हे विठ्ठल आडे यवतमाळचे आहेत. हेही ‘यूपीएससी’च्या तयारीसाठी आले होते. चार वर्षं प्रयत्न केले; पण यश आलं नाही; मग त्यांनी स्वत:चं हॉटेल सुरू केलं. हॉटेलची खासीयत काय? तर महाराष्ट्रीयन फूड, जे तुम्हाला पाहिजे ते. विठ्ठलने केवळ हे एकच हॉटेल बनवलं नाही. दिल्लीतल्या नामवंत भागात आणखी दोन हॉटेल आहेत. या तिन्ही हॉटेलमध्ये दीडशेपेक्षा अधिक कामगार काम करतात. ते सगळे महाराष्ट्रातले आहेत. वारंग्याच्या खिचडीचा वास त्या दिल्लीमधल्या विठ्ठलच्या हॉटेलमध्ये येत होता. मग काय अर्धापूरचा गुलाब जामून, विदर्भातला सावजी रस्सा आणि जळगावचा स्पेशल भरता. सगळे महाराष्ट्रीयन पदार्थ आमच्या टेबलवर आले होते. जेवण झाल्यावर लक्षात आलं, केवळ पदार्थांची नावं आणि ते आकर्षक पद्धतीने मांडलेच नाहीत, तर त्याची चवही कमालीची आहे. विठ्ठल यांनी सांगितलेला त्यांचा सर्व प्रवास कमालीचा होता. एखाद्या चित्रपटाची पटकथा असते अगदी तसा. संजीवकुमार यांना सगळं श्रेय देत विठ्ठल लगेच मोकळे होतात. संजीवकुमार विठ्ठलला सांगत होते, मी तुला फक्त पाठिंबा दिलाय. जे काही उभं केलंस, ते तूच केलंस ना! भावनिक झालेल्या विठ्ठलची संजीवकुमार समजूत 
काढत होते.

आम्ही तिथून निघालो. गाडीत जाताना मी, संजीवकुमार आणि किशन यांच्या गप्पा सुरूच होत्या. संजीवकुमार यांच्या व्यक्तिमत्वातले पण त्यांच्या बोलण्यात न आलेले पैलू मला किशन सांगत होता. राजकारणामध्ये संजीवकुमारांना कसा रस होता, चित्रपट निर्मितीमध्ये त्यांनी टाकलेलं पाऊल आणि आता वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी उभं केलेलं साम्राज्य. या साम्राज्यामध्ये बंजारा समाजातला, महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस दिल्लीमध्ये उभा राहिला पाहिजे, हाच त्यांचा उद्देश होता. आजही स्पर्धा परीक्षा, उद्योग असेल, नवीन येणा-या मुलांना, त्यांच्या पालकांना मार्ग दाखवण्याचं काम आणि तो मुलगा दिल्लीत स्थिरस्थावर होईपर्यंतचं काम संजीवकुमार सातत्याने करत असल्याचे मला जाणवत होते. एका ग्रंथालयाच्या समोर संजीवकुमार यांनी गाडी थांबवली. संजीवकुमारनी जुनी पुस्तकं त्या ग्रंथालयात जमा केली. तिथून नवीन पुस्तक घेतली. ग्रंथालयाचा ग्रंथपाल संजीवकुमार यांच्याशी बंजारा भाषेत बोलत होता. संजीवकुमार यांनी माझी ओळख त्या ग्रंथपालाशी करून दिली. संजीवकुमार म्हणाले, हा सचिन राठोड. हा गेल्या आठ वर्षांपासून दिल्लीकर झालाय. त्याचा सगळा प्रवास मला संजीवकुमार यांनी सांगितला. सचिनने मला संजीवकुमारची अजून एक नवीन ओळख सांगितली.

सचिन म्हणाला, २०१३ पर्यंत केवळ चार वेळा यूपीएससीची परीक्षा देता येईल, असा सरकारी नियम होता. संजीवकुमार यांनी आंदोलन करून ‘चारऐवजी सहा वेळा ही परीक्षा देता यावी, असा नियम करावा,’ अशी मागणी रेटून धरली. त्या मागणीला यश आलं. आता खुल्या वर्गातील मुलांना सहा वेळा परीक्षा देता येते. सचिन एवढ्यावरच थांबला नाही. नगर तिथं ग्रंथालय, ही कल्पना संजीवकुमार यांचीच. ज्यातून हे ग्रंथालय उभं राहिलं. आज अनेक ग्रंथालयं आणि मराठी माणूस दिल्लीच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळतो. आम्ही बाहेर आलो. गाडीत जाताना आमचा पुन्हा संवाद सुरू होता. संजीवकुमार मला सांगत होते. आपल्याकडच्या भागातील मुलांना दिल्ली खूप दूर आहे, असं वाटत असतं. जेव्हा आपण दिल्लीमध्ये मिसळू तेव्हा मुंबईपेक्षा अधिक प्रेमाने दिल्ली आपल्याला आपलंसं करते. पंजाब, उत्तरप्रदेश आणि बिहारची लॉबी दिल्लीत प्रचंड सक्रिय आहेत. या लॉबीज सहजासहजी इतर राज्यातील लोकांना दिल्लीत घुसू देत नाहीत; पण अलीकडच्या या दोन-तीन वर्षांमध्ये मराठीचा टक्का दिल्लीत कमालीचा वाढतोय. हा टक्का वाढण्यासाठी राजकीय वातावरण जरा पोषक असले, तर अजून गती मिळेल. संजीवकुमार दिल्लीच्या वातावरणाचे एक एक पैलू मला सांगत होते.

विमानात बसल्यापासून दिल्लीत माझ्या इच्छित स्थळी पोहोचेपर्यंत मला वाटेत भेटलेल्या प्रत्येक कष्टाळू माणसाचे वेगवेगळे पैलू माझ्या डोळ्यासमोर येत होते. या सगळ्या चेहऱ्यांमागे अपार कष्ट आहेत, जिद्द आहे आणि संजीवकुमारसारखी एक शक्ती आहे. एका संजीवकुमारने दिल्लीमधला मराठी टक्का वाढवण्यासाठी पुढाकार घेऊन चालणार नाही. सगळ्यांनीच याला हातभार लावला पाहिजे, असं मला मनोमन वाटत होतं. संजीवकुमार यांच्या सोबतच्या त्या दिवसभराच्या प्रवासामध्ये खूप प्रश्न माझे मलाच पडले होते. एखादा गावाकडचा माणूस जिल्ह्याच्या ठिकाणी, पुणे, मुंबई, दिल्ली आणि परदेशात जेव्हा स्थिरावतो, तेव्हा आपल्या अन्य गरजू बांधवाला तिकडे सेटल करावं, असं त्यांना का वाटत नसावं. कुवतीप्रमाणे नोकरी, उद्योग आणि बहुजनांच्या मुलांना काम द्यावं, असं त्या शहरात, परदेशात स्थिरावलेल्या बहुजनांच्या मुलांना का वाटत नसावं? असे अनेक प्रश्न मला पडत होते. संजीवकुमार यांचे अनेक पैलू आहेत, ते एका लेखात बसणार नाहीत. किशन, विठ्ठल, सचिन यांसारख्या अनेकांची मला संजीवकुमार यांनी भेट घालून दिली. त्या सगळ्यांनी संजीवकुमार यांचा वारसा पुढं नेल्याचं मला दिसत होतं.

मला ज्या ठिकाणी जायचं होतं, त्या ठिकाणी संजीवकुमार यांनी सोडलं. त्यांच्या निरोप घेताना मी संजीवकुमार यांना कडकडीत मिठी मारत, त्याचा हात हातामध्ये घेतला. संजीवकुमार यांचा हात तसाच माझ्या हातात घट्ट होता. आमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर परस्परांबद्दलची कमालीची आपुलकी होती. दिल्लीच्या वाटेवरचा तो प्रवास फार लवकर संपला. संजीवकुमारांनी अनेकांना या प्रवासातून आयुष्याचा रस्ता दाखवला. असे संजीवकुमार जितके जास्त घडतील, तितके अनेकांच्या आयुष्याच्या वाटा दिल्लीच्या वाटेसारख्या प्रेरणा देणाऱ्या असतील. तुम्ही आम्ही जिथे कुठे असाल तिथे संजीवकुमार बनूया...! हो ना? 

Edited By - Prashant Patil

loading image
go to top